नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं. जसे सुरु होतात तसेच संपतातही
हा प्रकार जरा वेगळा असल्यामुळे मि.पा. वर टाकावा की नाही या विचारात होतो....पण म्हणलं जाउदे..फार फार तर काय होईल, आपलीच लोकं शिव्या घालतील ना, ठीक आहे, खाऊ शिव्या... शेवटी हे मनातलं आहे आणि मनातलं सगळं बरोबरंच असल सगळ्यांना पटलंच पाहीजे असं थोडी आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
संवाद - १
"निसर्गात किती अफाट शक्ती आहे नाही?"
"हं...."
"आणि आपण माणसं तर निसर्गाला सुद्धा आपल्या मनासारखं राबवू शकतो."
"हं...."
दोघंही ब-याच वेळ शांतपणे समोर कोसळणा-या जलप्रपाताकडे बघत राहीले. समाधी लागल्यासारखे.
"ए, तुझ्यामते सर्वात सामर्थ्यवान कोण?" अचानक शांततेचा भंग करत त्याने विचारलं
"काळ"
"काळ...? का, माणुस का नाही?"
"माणुसच का?"
"कारण...कारण, माणुस काय वाट्टेल ते करु शकतो, माणसा कडे निर्मितीची अफाट क्षमता आहे. मनात आणलं तर तो ईकडची दुनिया तिकडे करु शकतो."
"असच जर असेल तर या चराचर श्रुष्टीची निर्मिती ज्या शक्तीमुळे झाली ती किती सामर्थ्यवान असेल"
"तुला देव म्हणायचंय का?"
"हो आणि नाही..दोन्हीही"
"म्हणजे?"
"म्हणजे तुला देव म्हणजे काय अभिप्रेत आहे ते आधी सांग"
"देव म्हणजे...देव...देवानेच तर सगळी दुनिया निर्माण केली ना. "
"हंहं..!"
"का? हसलास का?"
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?"
"मग काळ श्रेष्ठ कसा?"
"काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!! "
समोरच्या जलप्रपाताचा आवाज आता त्या आसमंतात भरुन राहीला होता
प्रतिक्रिया
19 Jun 2008 - 10:27 am | धमाल मुलगा
क्या बात है चाणक्य !!!
मस्त :)
पण इतकसंच का लिहिलं बुवा?
ह्यावर त्या विश्वास ठेवणार्या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता असं माझं आपलं वैयक्तिक मत हो. अगाऊपणाबद्दल राग नसावा :)
छान आहे...
आता पुढचा भागही येऊदे कुटनितीपंडीत चाणक्य :)
आपला,
- धमाल मौर्य.
19 Jun 2008 - 10:46 am | मनिष
सुंदर!
19 Jun 2008 - 11:58 am | ध्रुव
छान लेखन
--
ध्रुव
19 Jun 2008 - 12:11 pm | अनिल हटेला
चाणक्य!!!
खर म्हणजे ह्या नावात देखिल विलक्षण सामर्थ्य आहे ...
बाकी लेख मस्त जमलाये....
20 Jun 2008 - 8:10 am | विसोबा खेचर
मनोविचार, मनोसंवाद आवडले, छान आहेत...
तात्या.
20 Jun 2008 - 9:14 am | चाणक्य
धमाल्या, लेका दिल्या शब्दाला जागलास . प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
खरं सांगायचं तर माहीती नाही. हे लिहीताना त्या ठिकाणी थांबावसं वाटलं.पण तुझ्या सुचनेचा इथुन पुढे लिहीताना नक्की विचार करीन.
हे न करण्याचं कारण म्हणजे मला 'नास्तिक-आस्तिक' हा वाद दाखवायचा नव्हता.
ईतरः ध्रुव, आन्या, तात्या...धन्यवाद
20 Jun 2008 - 12:18 pm | धमाल मुलगा
:)
धन्यवाद कसले रे!!!
कलंदर लेखकाचे गुण अंगी आहेतसं दिसतंय :)
छान....असंच राहू रे!
नको...कलंदरच रहा. लिहिल्यावर वाटणारं आत्मसमाधान महत्वाचं! मला वाटलं की तू काही कारणास्तव थोडंसच लिहिलंस....
अच्छा अच्छा!!!! हरकत इल्ले...हरकत इल्ले :)
20 Jun 2008 - 9:34 am | भाग्यश्री
विचारमंथन आवडले आणि पटले !!
http://bhagyashreee.blogspot.com/
20 Jun 2008 - 5:41 pm | प्राजु
मंथन आवडले...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/