या कथा देण्यामागचा उद्देश केवळ मनोरंजन एवढाच नाही. ते पाहिजेच, पण या कथांचा वर्तमान कालाशी काय संबंध येतो, हे तपासणे महत्वाचे. मागील कथेत आपण पाहिले की मांडव्याने वयोमर्यादा १२ वरून १४ केली. माझी अपेक्षा होती की मिपा वाचक आज ती १६ वरून १४ वर न्यावी का यावर मते देतील. या हजारो वर्षांत सामाजिक बदल नक्कीच घडले आहेत. त्याचे प्रतिबिंब प्रतिसादात दिसले पाहिजे. असो. चुक माझी, मी स्पष्टपणे तसे विचारले नव्हते. आज प्रश्न सरळ विचारणार आहे व आपला प्रतिसाद अपेक्षित आहे.
युधिष्ठिर भीष्मांना प्रश्न विचारतो " पितामह, स्त्रीपुरुषांच्या संयोगात वैषयिक सुख अधिक कोणाच्या ठिकाणी आहे ? " गंमत पहा, पुरुषाने किंवा स्त्रीने कुणीही, काहीही उत्तर दिले तरी ते अपूर्णच, एकतर्फीच राहणार. जरा विचार करा, आपले मत ठरवा व मगच भीष्मांनी सांगितलेले उत्तर वाचा. भीष्म म्हणाले, " या विषयी एक गोष्ट सांगतात "
प्राचिन काळी अंगारवन नावाचा एक राजर्षि होता. त्याला पुत्र नसल्याने त्याने पुत्रप्राप्तीसाठी "अग्निष्टुत" नावाचा यज्ञ केला. त्याने त्याला शंभर पुत्रांची प्राप्ती झाली. पण या यज्ञाची एक गोची होती. या यागात फ्क्त अग्नीचे हवन असते. इंद्राला काहीच भाग मिळत नाही. त्यामुळे इंद्र असा यज्ञ करणार्यावर रागावलेला असतो. इंद्राने अंगारवनाचे व्यंग शोधावयाचा प्रयत्न केला पण इंद्रियनिग्रही राजाकडे तसे काही दिसेना. एके दिवशी राजा रानात मृगयेकरिता गेला असतांना त्याची व सेवकांची चुकामुक झाली. त्याला तेथे एक मनोहर सरोवर दिसले. त्यात स्नान करून तो बाहेर आला तर त्याला आपण स्त्री झालो आहोत असे दिसून आले. हा इंद्राच्या कोपाचा प्रभाव. आपणास स्त्रीरूप प्राप्त झाले आहे असे पाहून त्यास मोठी लज्जा उत्पन्न झाली.त्याची इंद्रिये व्याकुळ झाली व तो मोठ्या चिंतेत पडला. आपल्या शंभर बलवान पुत्रांसमोर जाऊन आता काय सांगावयाचे ? शेवटी तो राजधानीत गेला व विस्मयात पडलेल्या सर्वांना घडलेली हकिगत सांगून म्हणाला " मी आता वनात जातो. मुलांनो ,तुम्ही धर्माने राज्यकारभार चालवा."
तो वनात एका आश्रमात गेला व तेथील एका तपस्व्याबरोबर त्याने विवाह केला. त्याला (किंवा तिला म्हणा) शंभर मुले झाली. मग ती त्या शंभर पुत्रांना घेऊन राजधानीत गेली व पहिल्या पुत्रांना म्हणाली की तुम्ही एकमेकांचे भ्राते आहात हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी एकोप्याने राज्याचा उपभोग घ्या. ती परत वनात गेली. इंद्र वैतागला. तो म्हणाला, मी अंगारवनावर अपकार केला की उपकार ? मग त्याने ब्राह्मणाचे रूप घेतले व तो राजधानीत गेला. तिथे त्याने मुलांत फूट पाडली. पहिल्या मुलांना तो म्हणाला " तुम्ही राजपुत्र. ही दुसरी यतीची मुले. तुम्ही कसले भ्राते ? यांचा राज्यावर काहीच हक्क नाही." असा कलह लावून दिल्यावर त्या सर्वांत भांडणे सुरू झाली व एकमेकाशी लढून सर्वजण मृत्युमुखी पडले. ही बातमी कळल्यावर ती तपस्विनी सारखी रडू लागली. तेव्हा तेथे ब्राह्मणाचे रूप घेऊन इंद्र आला व त्याने ती का रडते ते विचारले. तिने आपली दोनशे मुले मेल्यामुळे मी रडते असे सांगितले. मग कठोर शब्दात इंद्र म्हणाला " मी इंद्र आहे. तुझ्या यज्ञात मला हवन नसल्याने मी रागावून हे भांडण घडवून आणले." हा ब्राह्मण देवाधिदेव इंद्र आहे हे कळल्यावर त्याला साष्टांग नमस्कार घालून राजर्षि म्हणाला " कृपा कर. मी यज्ञ केला तो पुत्र मिळवण्याकरिता. मला तुला दुखवावयाचे नव्हते. " तेव्हा इंद्र संतुष्ट झाला व तिला म्हणाला " मी तुझे शंभर पुत्र जिवंत करतो, कोणते ते सांग. तू पुरुष असतांना झालेले की स्त्री असतांना झालेले ?" तपस्वनीने हात जोडून सांगितले " मी स्त्री असतांना झाले ते." इंद्राने कारण विचारल्यावर ती म्हणाली " इंद्रा, स्त्रीच्या ठिकाणी स्वभावत: अधिक प्रेम असते, तसे पुरुषांच्या ठिकाणी असत नाही : ह्यास्तव मी स्त्रीरूप असल्यावर मला जे पुत्र झाले त्यांनाच तू जिवंत कर." इंद्र प्रेमळपणे म्हाणाला " मी तुझे दोनशेही पुत्र जिवंत करतो. आता तुला आणखी काय मागावयाचे आहे ? तुला स्त्री रहावयाचे आहे की पुरुष व्हावयाचे आह ? स्त्री म्हणाली " मी स्त्री रूपच पसंत करते. मला पुरुषरूपाची इच्छा नाही " इड्राने का म्हणून विचारल्यावर ती म्हणाली "देवाधिदेवा, स्त्रीया किंवा पुरुष ह्यांच्या संयोगामध्ये नित्य स्त्रीयांच्या ठिकाणी अधिक प्रेम वसत असते, ह्यास्तव, इंद्रा, मी स्त्रीरूपच अधिक मानते. इंद्राला नमस्कार करून ती वनात निघून गेली.
म. व्यासांनी आपले मत दिले. तुमचे मत काय ?
शरद
प्रतिक्रिया
19 May 2012 - 11:19 pm | राजघराणं
आम्हाला अनुभव एकाच प्रकारचा.. दुसर्याची माहितीच नाही.. तर मत कसे बनवू ?
शैली आवडली. उत्तम लेख
20 May 2012 - 10:11 am | पैसा
प्रेम म्हणजे प्रेम असतं. मंगेश पाडगावकरांची कविता इथे द्यायचा मोह आवरत नाही.
यावर आणखी काही भाष्य पाहिजे असं वाटत नाही. त्यातूनही प्रत्येक पुरुषात थोडी स्त्री असते, आणि प्रत्येक स्त्रीमधे थोडासा पुरुष. कोणाचं प्रेम श्रेष्ठ सांगणं कठीण आहे. आईइतकंच प्रेम बापसुद्धा करतो. बोलून दाखवत नसेल कदाचित!
व्यासांनी म्हटलं म्हणून ते खरं धरावं असं थोडंच आहे?!
20 May 2012 - 12:28 pm | शैलेन्द्र
जीयो.. आवडलं आपल्याला..
20 May 2012 - 3:44 pm | कानडाऊ योगेशु
वैषयिक सुख (वासना) आणि प्रेम ह्या भिन्न गोष्टी आहेत.
कथा ज्या प्रश्नामुळे सुरु होते त्याचे उत्तर कथेतुन अनुवाद करताना(वा आठवणीतुन उतरवताना) निसटले आहे असे वाटते.कथेमध्ये वारंवार उल्लेख होणारा "प्रेम" हा शब्द मी "वात्सल्य" हया अर्थाने घेतला आणि स्त्रियांमध्ये वात्सल्य ही भावना पुरुषांपेक्षा जास्तच असावी.
बाकी "वैषयिक" सुखासारखा Hard Core प्रश्न भीष्मांसारख्या ब्रम्हचार्यालाच युधिष्ठीरासारख्या विद्वानाने का विचारला असावा?
21 May 2012 - 4:39 pm | स्पंदना
>>बाकी "वैषयिक" सुखासारखा Hard Core प्रश्न भीष्मांसारख्या ब्रम्हचार्यालाच युधिष्ठीरासारख्या विद्वानाने का विचारला असावा?>>
अगदी हेच मनात आल अन झटक्यात" गल्ली चुकल का काय वो त्ये? " असा प्रश्न मनात उभा राहिला
20 May 2012 - 8:31 pm | विकास
युधिष्ठीर आणि भिष्मांना या विषयावर चर्चा करायला नक्की वेळ कधी मिळाला?
20 May 2012 - 8:41 pm | प्रचेतस
शांतिपर्वात उत्तरायणाची वाट पाहणारा शरशय्येवरील भीष्म युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश करतो तेव्हाचे हे संवाद आहेत
20 May 2012 - 9:52 pm | चिगो
ह्याच टायपातली कथा, म्हणजे पुरुष मंत्रभारीत "पोशन" पिऊन गर्भार होतो आणि पुत्रजन्मानंतर त्याच्याही मनात " मला आई व्हायला आवडेल की पिता व्हायला?" असा प्रश्न येतो, ही स्टोरी देवदत्त पटनाईक ह्यांच्या " द प्रेगनन्ट किंग" ह्या कादंबरीत वाचली होती..
21 May 2012 - 6:21 am | स्पंदना
भिष्म?
ज्यांनी कधिही विवाह केला नाही त्यांना हा प्रश्न विचारण्यामागे काय बर हेतु असावा? की विवाह बंधनात न अडकताही भिष्म या बद्दल जाणुन होते.
सर्व प्रथम एक नवी गोष्ट सांगितलया बद्दल धन्यवाद.
पितामह, स्त्रीपुरुषांच्या संयोगात वैषयिक सुख अधिक कोणाच्या ठिकाणी आहे ?
या प्रश्नात वैषयिक सुखाचा उल्लेख आहे, पण उत्तर मात्र वास्तल्य भावने बद्दल मिळत. म्हणजे पुरुष असताना अंगारवन राजाला कदाचित पुत्र किंवा संतती म्हणुया, बद्दल जिव्हाळा तर होता पण एका आईची अनुभुती नव्हती, व्हाईल स्त्री रुपात त्याला गर्भधारणे पासुनच एका दुसर्या जिवाच अस्तित्व गुंतवुन गेल. पण तरिही, एक "आई" म्हणुन दुसर्या आईच दु:ख जर अंगारवन समजु नाही शकला तर तो अपुरा वाटतो.
अर्थात व्यास महाराज एका आईच मन जाणायला अपुरे पडले. इथे राजाची पहिली शंभर मुले त्याला त्याच्या पत्नी वा पत्नींपासुन झालेली गृहित धरले आहे. अन स्त्री रुपात राजा नक्किच आपल्या व्याकुळते वरुन दुसर्या मातेची वा मातांची व्याकुळता जाणु नाही शकला.
21 May 2012 - 9:58 am | मृत्युन्जय
ही कथा माहिती नव्हती. भीष्म - युधिश्ठिर संवाद मला नेहमीच थोडा निरस वाटत आलेला आहे. अर्थात त्यातही काही चांगल्या गोष्टी आहेतच म्हणा. एक चर्चाप सुरु करण्याच्या निमित्ताने तुम्ही इथे ही जी गोष्ट दिलेली आहे ती खरेच स्तुत्य आहे.
गोष्ट भाषांतरित करताना चूक झालेली आहे की गोष्टच अशी आहे? कारण युधिश्ठिराची शंका वैशयिक सुखाला अनुसरुन होती तर भीष्मांचे उत्तर प्रेम आणि वात्सल्य यांना अनुसरुन होते.
पण तरीही कथा म्हणुन चांगली. तुर्तास प्रतिसाद इथेच थांबवतो. सविस्तर प्रतिसाद नंतर देइन.
कृपया बुच मारु नये.
21 May 2012 - 5:10 pm | शरद
भाषांतरात चुक नाही. प्रश्न वैषयिक सुख अधिक कोणाच्या ठिकाणी आहे ? असाच आहे व उत्तरही " स्त्रीया आणि पुरुष यांच्या संयोगामध्ये नित्य स्त्रीयांच्या ठिकाणी अधिक प्रेम वसत असते " असेच आहे. या ठिकाणी प्रेम हे संयोगाकडे जोडून घेतले पाहिजे. तसेच ब्रह्मचारी भीष्म यांना "या" भानगडी काय माहीत ही शंकाही अयोग्य आहे कारण भीष्म पुरातन गोष्ट सांगत आहेत ; स्वत:चे मत नव्हे. त्यामुळे मीही म. व्यासांचे मत म्हटले आहे, भीष्मांचे नव्हे
शरद
22 May 2012 - 9:31 am | रमेश आठवले
भीष्म यांना स्वानुभव नाही. तेंवा त्यांचं निरुपण हे ऐक दृष्टीकोन असे मानावे लागेल. त्यांचे मत हा या विषयावरील अंतिम शब्द नाही असे वाटते.
22 May 2012 - 6:42 pm | चित्रगुप्त
'कौन बनेगा करोडपती' मध्ये या प्रश्नाचे उत्तर दिले गेलेले आहे.
आहे का कुणाच्या लक्षात ?
...खाजवा जरा डोके....