झेलम एक मोठी सुटकेस, एक हॅंडबॅग आणि सामानाने तुडुंब भरलेली कॅरीबॅग कशीबशी सावरत बसमधुन उतरली. चरफडत तिने आजुबाजुला पाहिले. पण कुठेही अमरचा पत्ता नव्हता. पुणं जवळ आल्यापासुन ती त्याला सारखा फोन लावत होती. पण हा बाबा फोन उचलेल तर शपथ. निदान दहा वेळा तरी याला सांगितलं होत की मी पाच-साडेपाचपर्यंत येईन पुण्यात . तेव्हा वेळेवर न्यायला ये मला. आधीच तिची झोप नीट झाली नव्हती. तिला बसमधे कधीच नीट झोप लागत नाही. याउलट अमर बस सुरु झाली की लगेच डुलायला(डुलकी घ्यायला)लागतो आणि कंडक्टर यायच्या आत गाढ झोपुन पण जातो. मग तिकीटं काढणं, मॅडम सुट्टे द्या असं कंडक्टरनी सांगितल्यावर सुट्टे पैसे पर्समधुन शोधणं ही सगळी कामं नेहमी तिलाच करावी लागायची. मधे कुठल्या स्थानकावर गाडी थांबली की मग ह्याला जाग यायची. "तु खाली जाणार असशील तर प्लीज माझ्यासाठी लेज घेऊन ये ना." त्याला पक्कं माहीती असतं की मी खाली जाणारच आहे. जरा कुठे जबाबदारीची जाणीव नाही ह्या माणसाला. बर ह्याने कुंभकर्णासारख्या झोपा काढल्यावर मी काय करायचं? बसमधे काही वाचता येत नाही. वॉकमन बरोबर घ्यायचा मी प्रत्येक वेळी विसरते. खिडकीपाशी बसाव म्हटल तर ते ह्याला चालत नाही. कारण काय तर साहेबांना वार्याशिवाय झोप येत नाही.
नुसती चिडचिड होत होती तिची. त्यात आता ट्रॅव्हल कंपनीवाले तिच्या मागे लागले. "मॅडम कुठे जायचय? दादर, अंधेरी, बोरीवली? बसपेक्षा कमी रेट मधे... व्हिडीओ कोच आहे मॅडम". "नकोये..... अरे मी आत्ताच मुंबईहुन आलीये. परत कशाला जाऊ तिकडे?" ती तिरसटुन बोलली. ते ऐकल्यावर पटकन एक-दोन रिक्षावाले आले. "मॅडम कुठे जायचय? या ना इकडे." तिला आता बोलायची पण इच्छा होत नव्हती. मग तिने हातानीच नको अशी खुण केली. एक नवरा सोडुन बाकी दुनियेला माझी काळजी आहे. एक क्षण तिला वाटुन गेलं की रिक्षा करून जाव पटकन. पण तिला आठवल, मागच्या वेळी रिक्षावाल्याने ऑड वेळ म्हणुन मीटरपेक्षा जास्त भाड घेतल होतं. ते जवळपास मुंबईच्या भाडयाएवढच पडल होतं. त्यामुळे तिनी तो विचार एकदम झटकुन टाकला. मग सुटकेस उभी करुन त्याल ती जरा टेकली. पर्समधुन मोबाईल काढला आणि परत अमरला फोन लावला. पुर्ण वेळ रिंग वाजली पण फोन काही उचलला नाही.
तिला आठवल, लग्नाआधी एकदा सकाळीच दोघांना सिंहगडला जायचं होतं. त्यावेळी एकदम ऑन-टाईम आला होता पठ्ठया. माझा पोलो नेकचा टीशर्ट सापडत नव्हता म्हणुन मला फक्त पंधरा मिनिटं उशीर झाला तर सारखं घडयाळ दाखवत होता मला. "तुझं मॅचिंगच सगळं सापडलं नसेल म्हणुनच उशीर झाला तुला. लोक सिंहगड पहायला येणारेत, तुला नाही." त्याला टीशर्टचं कारण काही शेवटपर्यंत पटलचं नाही. लग्नाआधी अगदी काळजीवाहु सरकार होता. (हा त्याचाच आवडता शब्द). तिला आठवलं, पावसाळ्यात एकदा गाडी घसरल्यामुळे तिच्या पायाला हेअर-क्रॅक गेला होता. तेव्हा हे महाशय जवळजवळ वीस दिवस रोज तिला घरुन ऑफिसमधे आणि ऑफिसमधुन घरी पोहोचवायचे. त्याला ती म्हणाली सुद्धा "अरे मी जाईन रिक्षाने, कशाला एवढा त्रास घेतोस!!!" त्यावर "मी तुझा जिन आहे. तु फक्त काम सांगायचं, मग मी - जो हुकुम मेरे आका - म्हणुन तुझी सगळं काम ऐकणार." असं त्याच उत्तर. तिला आवडतो म्हणुन त्या दिनो मोरेआ चे जवळजवळ सगळे पिक्चर त्याने तिच्यासोबत (एरंडेल पिल्यासारखा चेहरा करून का होईना) पाहिले.
पण आता? एक काम वेळेवर करेल तर शपथ. दहा वेळा ह्याच्या मागे लागल्यावर कुठे काम मार्गी लागतं. शक्य तितकी काम माझ्यावर ढकलणं हेच एक मोठ्ठ काम करतो हा बाबा. लग्न करुन हक्काची कामवालीच आणलिये जशी काही ह्यान. स्वत: कसही वागल तरी चालेल पण मी मात्र कायम आदर्श पत्नी सारखचं वागल पाहिजे. आता ह्यानी फोन केला आणि चुकुन जरी मला नाही घेता आला तर हा आकाशपाताळ एक करणार. शी वैताग आहे नुसता. विचार करुन करुन तिचं डोक दुखायला लागल होतं आता.
"हाय लेझीम!", गाडीचा हॉर्न आणि हाक दोन्ही एकदमच ऐकु आले. मी त्राग्यानी समोर पाहिलं तर अमरच होता. कधीही झेलम अशी सरळ हाक मारणार नाही. आई-बाबांनी इतक सुंदर आणि वेगळ नाव ठेवलं माझं. बारशाच्या वेळी आत्तुला आधीच सांगुन ठेवल होतं त्यांनी की झेलमच नाव ठेवायच माझं म्हणुन. कॉलेजमधे असताना काळे मॅडम नेहेमी म्हणायच्या खुप छान नाव आहे ग तुझं. लग्नानंतर अजिबात बदलु नकोस. तस मी अमरला आधीच सांगुन ठेवल होतं की नाव बदलु नकोस म्हणुन. त्याला मात्र तांदळात नाव लिहायची फार इच्छा होती. त्यामुळे त्याच सारखं चालायच की मी नाव बदलणार म्हणुन. मी म्हणायचे की अडनाव बदलणार आहे ना मी... आणि ते तांदळात लिहायची एवढी हौस असेल तर माझं आत्ताचच नाव लिही. त्यावर म्हणायचा त्यात काय थ्रिल आहे मग? तेव्हा नाव बदलु दिलं नाही म्हणुनच सारखा लेझीम म्हणतो. हां...फक्त चिडतो तेव्हा झेलम अशी सरळ हाक मारतो.
आत्ता त्यानी लेझीम हाक मारल्यामुळे तिनी मुद्दामच दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग त्याला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं असावं. गाडी पटकन स्टॅंडवर लाऊन तिच्याकडे गेला. "अग सॉरी, काय झालं की..." "राहु दे तुझी कारणं तुझ्यापाशीच. मी जाते रिक्षानी." त्याचं वाक्य मधेच तोडत ती म्हणाली. त्यावर काहीच न बोलता त्यानी पटकन सामान उचललं, गाडीवर नेउन ठेवलं आणि तिच्या बाजुला शांतपणे उभा राहिला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग तिनी हळुच त्याच्याकडे निरखुन पाहिलं. दमल्यासारखा दिसत होता. अरे ह्याचे हात पण काळे झालेत की..ती मनाशी म्हणाली. "का उशीर झाला?" अस तिनी विचारल्यावर त्यानी पण हळुच (आणि सावधपणे) पाहिलं तिच्याकडे. "मी घरातुन पाचलाच बाहेर पडलो होतो. पण त्या रतन भेळेपाशी गाडी पंक्चर झाली. आता एवढया सकाळी कुठलं दुकान उघडं मिळणार? मग थेट बोराच्या पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेली. तिथल्या त्या केरळी अण्णाला उठवल झोपेतुन. म्हटल अर्जंट पंक्चर काढुन दे. तुला फोन करावा म्हणुन मोबाईल काढायला खिशात हात घातला तेव्हा लक्षात आलं की गडबडीत मोबाईल घरीच विसरलो. मग अस वाटल की कदाचित तुझी गाडी अर्धा पाऊण तास लेट होईल. कारण मागच्यावेळी एकदा लोणावळ्यालाच खुप वेळ थांबल्यामुळे गाडीला पुण्यात यायला लेट झाला होता ना. खर तर मी तुला एखाद्या एसटीडी बुथपाशी थांबुन फोन करायला पाहिजे होता. पण.." ती त्याच्याकडे बघुन प्रसन्नपणे हसली आणि पाठीवर थोपटत म्हणाली "इट्स ओके. चल मला चहाची खुप तल्लफ आलिये. मला 'तुलसी'तला चहा प्यायचाय." त्यावर एकदम खुष होत तिच्या काळजीवाहु सरकारने "जो हुकुम मेरे आका" अस म्हणत गाडीला किक मारली.
प्रतिक्रिया
17 Jun 2008 - 11:28 pm | यशोधरा
अरे वा!! हसरा शेवट गोष्टीचा!! छान :)
17 Jun 2008 - 11:33 pm | ऋचा
मस्त आहे गोष्ट.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
17 Jun 2008 - 11:40 pm | अमोल केळकर
मस्त
गडबडीच्या वेळी गाडी पंक्चर होणे, पेट्रोल संपणे हे नेहमिचेच
अवांतर
पण तिला आठवल, मागच्या वेळी रिक्षावाल्याने ऑड वेळ म्हणुन मीटरपेक्षा जास्त भाड घेतल होतं. ते जवळपास मुंबईच्या भाडयाएवढच पडल होतं.
नुकतेच वाचानात आले की पुण्यात ३३% रिक्षा भाडेवाढ.
म्हणजे आता ऑड वेळीचे भाड = मुंबई पुणे रिटन भाडे
17 Jun 2008 - 11:57 pm | गिरिजा
खूप छान.. :)
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
18 Jun 2008 - 12:07 am | धमाल मुलगा
क्या बात है!
मजा आली वाचायला :)
आणि 'झेलम' चं 'लेझिम' तर एकदम सह्हीच :)
येऊ दे अजुनही.
अवांतर१:बर्याचश्या बाया आपापल्या नवर्याबद्दल तो अगद्दी अस्साच्च आहे असा गो.गै. का बाळगुन असाव्यात बरं?
18 Jun 2008 - 12:29 am | मनस्वी
छान लिहिलंय.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
18 Jun 2008 - 12:11 pm | अनिल हटेला
सही!!!!!!
मस्त एक्दम मस्त!!!!!!!!!!!!!!!!
बोले तो ये ये येउ दे अजुन!!!!!!!!!!!!!!!
18 Jun 2008 - 12:11 pm | अनिल हटेला
सही!!!!!!
मस्त एक्दम मस्त!!!!!!!!!!!!!!!!
बोले तो ये ये येउ दे अजुन!!!!!!!!!!!!!!!
18 Jun 2008 - 2:19 pm | भडकमकर मास्तर
सुचल तसं..
आपलं लेखन आवडलं...
>>>
दिनो मोरेआ चे जवळजवळ सगळे पिक्चर , वीस दिवस ऑफिसला सोडणे, लेझीम हाक....झकास...>>>>>
कोणत्याही पात्रानं फिल्मी वाक्यं बोल्ली नाहीत की आपल्याला आवडतं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
18 Jun 2008 - 3:34 pm | सुचेल तसं
यशोधरा, ऋचा, अमोल, गिरीजा, मनस्वी, आन्या, कैवल्य आणि भडकमकर मास्तर
आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासुन आभार......
http://sucheltas.blogspot.com
18 Jun 2008 - 7:14 pm | चतुरंग
एकदम फ्रेश वाटलं. ओरिजिनॅलिटी भावली. 'लेझिम' आवडलं.
'सुचेल तसं'च लिहित जा राव्....मस्त वाटतंय! :)
चतुरंग
19 Jun 2008 - 12:15 am | विसोबा खेचर
म्हणतो!
छानच लिहिलं आहे...
तात्या.
18 Jun 2008 - 7:21 pm | वरदा
सही!!!!!!
मस्त एक्दम मस्त!!!!!!!!!!!!!!!!
हेच म्हणते
18 Jun 2008 - 8:53 pm | सखाराम_गटणे™
चांगले लिहिले आहे.
खुप बायका आपल्या नवरयाबद्दल असाच विचार करतात.
18 Jun 2008 - 10:31 pm | वरदा
कुठे आला बरं तुम्हाला? ह घ्या हे सां न लगे
18 Jun 2008 - 11:27 pm | प्राजु
प्रसंग पण सुंदर शब्दबद्ध केला आहे. छोटिशी गोष्ट आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jun 2008 - 8:57 am | II राजे II (not verified)
प्रसंग पण सुंदर शब्दबद्ध केला आहे. छोटिशी गोष्ट आवडली.
हेच म्हणतो.... आप का स्टाईल कुछ अलग है.... दोस्त !! ;)
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
19 Jun 2008 - 1:52 am | शितल
लिहिले आहे, वेगळे असे काहीनाहे पण मस्त वाचले वाचायला
19 Jun 2008 - 5:41 pm | सुचेल तसं
चतुरंग,
आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तात्या, वरदा, प्राजु, सखाराम, राज आणि शितल,
आपले देखील मनापासुन आभार.
http://sucheltas.blogspot.com
19 Jun 2008 - 5:44 pm | विकास्_मी मराठी
िव्कास०१५४
बाय्को - न्व्र्या म्िध्ल "िन्ख्ळ प्रेम" अश्याच प्रसंगातुन वार्वार िद्सुन येते !!!!
म्नापासुन गोष्ट आवडली.