तो आला, नेहमी प्रमाणेच धाड धाड करून शूज रॅकमध्ये ठेवले आणि घरात आला.
धडामकन सोफ्यावर पडला, त्याच्या गाडीच्या आवाजानं मी बाहेर आले, पण नेहमीसारखी नव्हे. माझ्याकडे पाहताच त्याचा भडका उडाला, तो उडणारच होता हे मला माहीत होतं.
"आशु, अजून सकाळचाच ड्रेस अंगावर ? "
" हो ! काय वाईट आहे त्यात ? "
" तुला माहीताय मला आवडत नाही "
" नसू दे आवडत, मी काही बाउंड्रीवर फिल्डिंग करत नसते की डाइव्ह मारून चेंडू अडवताना कपडे खराब होतील "
" तू रैनासारखी फिल्डिंग कर, किंवा द्रवीडसारखी बॅटींग कर पण जरा टापटीप राहायला काही प्रॉब्लेम आहे का तुला ? "
" हे 'तू' मला सांगतोयस ? तू नेतोस का रे ऑफिसला कपड्यांचा स्पेअर ? "
" देवी, मी जर असा भर ऑफिसात कपडे बदलायला लागलो ऑफिस म्हणजे फॅशन शो नाही का होणार ? "
" नाही ना जमत तुला ! मग मला कशाला आग्रह ? "
" तुला जमू शकतं म्हणून "
"माझ्याकडे इतके ड्रेस नाहीयेत " मी नेहमीचं कारण रेटलं.
" मग घेऊन ये, नाहीतर साड्या नेस ना ! कपाटात साड्यांचे मजले चढवून तुला काय बिल्डिंग बांधायचीय ? "
" हे बघ, तू माझ्या साड्यांबद्दल काही बोलू नकोस " दुखऱ्या नसेला धक्का लागला.
" का गं ? तुझ्या सगळ्या साड्या एकत्र बांधल्या तर चंद्रावर जाण्याइतपत दोरी नक्की तयार होईल. मला नेहमी प्रश्न पडायचा की ऐनवेळी द्रौपदीला नेसवायला इतक्या साड्या कृष्णाने आणल्या कुठून पण आता कळतंय तिच्याकडेपण असाच ढीग असणार साड्यांचा त्याच गोळा करून वापरल्या त्याने " चिडला की असलं काहीतरी भन्नाट बोलतो हा.
" कैच्याकै बोलू नकोस "
" बोलणार "
" मग मी पण बोलणार " माझा दुखावलेला स्वाभिमान.
" काय बोलणार ? "
" तुझ्या त्या घाणेरड्या शूजबद्दल बोलणार, त्याचा वास इतका असह्य होतो की त्यात डिओ मारायला लागतो त्यात. "
" पण डिओ माझाच वापरतो ना मी ? "
" पण तो आणते मीच ना ? खरं तर नुसती एखादी बाटली न आणता मोठासा कॅनच आणायला हवा आणि त्याचं ठिबक सिंचन करायला हवं तुझ्यावर" न राहवून मी त्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं.
" अगं, या असल्या वातावरणात साईटवर फिरताना घाम येणारच ना ! पण म्हणून काय डिओ ओतणारेयस माझ्यावर मी काय असाच घामेजलेला फिरतो घरात ? " एक दुःखी आवाज.
" नसशील फिरत, पण आल्या आल्या सोफ्यावर सुर मारतोस त्याचं काय ? रोजची कव्हर बदलतेय मी त्याची "
" मग काय आल्या आल्या गच्चीतल्या पाण्याच्या टाकीत सुर मारू ? "
" इतकं नको करायला, कमीतकमी हातपाय धुतलेस तरी पुष्कळ आहे चांगल्या सवयी लावून घे रे ! " मी कळवळले.
" एवढी एक सवय सोडली तर काय वाईट सवयी आहेत गं माझ्या ? "
" का ? चहाचं आधण ठेवलेलं पाणी तू खुशाल दाढी करायला ओतून घेतोस, घराच्या कुठल्याही कोपऱ्यात मोबाईल विसरून मग तो शोधायला लँडलाईनवरून फोन करतोस, झालंच तर बाहेर जाताना ते विचित्र कॅनव्हासचे शूज घालतोस ... "
" आता त्याला माझा नाईलाज आहे , देवानं माझ्या पायाभरणीत मटेरियल जरा जास्तच घातलंय त्याला मी तरी काय करणार ? माझ्या मापाचे शूजच नाही मिळत " माझी यादी अर्धवट तोडत तो म्हणाला.
" तुलाच बरे मिळत नाहीत, आणि तुझी कंपनी काय मंगळावरून मागवते ? नसतील मिळतं तर तयार करून घे ना ! "
" आणखी काही बाकी आहे ? " हार पत्करत तो म्हणाला.
" तुझं ते वेळी अवेळी कॉफी पिणं, तू याच वेगात कॉफी पीत राहिलास तर साईडबिझनेस म्हणून मलाच एखादा कॉफीचा मळा विकत घ्यावा लागेल आणि त्याचं एकमेव गिऱ्हाईक तूच असशील. "
" .... "
" साधा टाय तुला नीटं बांधता येत नाही "
" काहीही आरोप करू नकोस, माझा टाय मीच बांधतो " सुटकेचा अयशस्वी प्रयत्न.
" हो SS पण तो माझ्या गळ्यात अडकवून ना ? मी नसताना काय करतोस रे ? " हाच प्रश्न एकदा सासूबाईंनी विचारलेला मी ऐकलाय.
" जमेल गं हळूहळू " त्याची नजर एव्हाना भिरभिरायला लागली होती, ती माझ्या केसांकडे वळलेली पाहून मी आणखी वैतागले.
" आता माझ्या केसांकडे पाहू नको, एकसारखं मला केस शॉर्ट करायला सांगतोस आणि तुझ्या केसांना दोन महिन्यांतून एकदा कात्री लागते. मला वाटतं एक दिवस आई माझ्या ऐवजी तुलाच सूनबाई हाक मारतील "
" आता बस ना माते " कळवळला बिचारा.
" संध्याकाळी देवासमोर उभं राहून एखादं स्तोत्र म्हण सांगितलं तर तू तिथे डोळे मिटून नेमकं काय गुणगुणत असतोस, शाळेतून घरी आलेल्या मुलाचा अभ्यास घे म्हटलं तर तू त्याच्या वहीत शून्य आणि फुल्यांचा खेळ खेळत असतोस हे मला माहीत नसेल असं वाटतं का तुला ? "
" संपलं की आणखी काही बाकी आहे ? " बिनशर्त शरणागती पत्करत असल्याची खूण.
" तुझं ते अशक्य वाचनवेड हातात पुस्तक असताना आतापर्यंत दहावेळा तरी तू घरातलं दूध मांजरीला समर्पित केलंयस , झालंच तर तुझे ते अवेळी येणारे कॉल्स .. "
माझी यादी आणखी लांबत गेली असती पण अश्यांवेळी तो हमखास जी ट्रिक करतो तीच त्याने आता केली.
'च्युईईक' असा आवाज तोंडातून काढत आणि दोन्ही खांदे वर उडवत तो सरळ अंघोळीला सटकला.
आता मला माहीत आहे अंघोळ झाली की आवराआवर करून स्वारी पी. सी . वर जाऊन कीबोर्डवर बोटं आपटत बसेल.
एखादी भयकथा लिहीत.........
प्रतिक्रिया
10 Apr 2012 - 5:31 am | जेनी...
़ कसलं सॉलिड लिहिलय जाम मजा आली वाचताना
मला तर त्यच्या घामाचा वास इथपर्यन्त यायला लागला
होता, मग तो डीओ चा. क्यान दिसायला लागला,
त्यातनं होनारं ठिबक सिंचन ,सोफ्यावर मारलेला सूर ,गळ्यात अडक॑उन टाय बांधन
भन्नाट , जबरि , खत्रि , अफलातून ,सट्याक , खट्याक ,फट्याक , अप्रतिम
थोडसच पण सुंदर :)
10 Apr 2012 - 9:11 am | अमृत
सहमत
अमृत
10 Apr 2012 - 5:53 am | स्पंदना
खर सांगु? घरातन सुटका म्हणुन इथे येण होत. पण इथ तर घरच मांडलय.
फारच वास्तववादी झालय.
10 Apr 2012 - 9:11 am | अमृत
शिर्षकावरून हा धागा 'सकाळ' मधे येणार्या याच शिर्षकावरून लेखमाला लिहीणार्या एका 'पूज्य' (याचा अर्थ शून्य असाही होतो) लेखकानी तर लिहीला नाहीना याची भिती वाटली. :-) म्ह्टलं आता इथेपण छळवास... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
बाकी संवाद छान ओघवते आहेत पण 'त्याला' 'तिच्या' तावडितून खूपच लवकर मुक्ती मिळाल्यासारखं वाटलं :-)
अमृत
10 Apr 2012 - 9:37 am | संजय क्षीरसागर
कोण चूक कोण बरोबर आणि एकमेकांना सुधारण्याचे प्रयत्न या न संपणार्या गोष्टी आहेत.
त्यापेक्षा प्रसंग कसा सावरता येईल ते पाहा. आपण प्रसंग सावरला तर दुसराही स्वतःच्या नकळत सावरतो आणि मग सूर जुळतात कारण आनंद ही आपल्या प्रत्येकाची चाहत आहे.
उद्विग्न होण्यापेक्षा प्रसंग सावरणं जास्त कौशल्याचं आहे आणि दुसरा सुधारला की नाही यापेक्षा आपला मूड लाईट राहतो हे महत्वाचंय. एकदा आपण लाईट मूडमधे असलो की दुसरा आपोआप त्या मूडमधे यायला लागतो. व्यक्ती हाताळण्यापेक्षा प्रसंग हाताळणं सोपंय.सदासर्वदा हे जमेलच असं नाही पण एक वेगळा अँगल आहे, कधी असा प्रयत्न करून पाहा.
सुधीर मोघ्यांच्या ओळी आहेतः
कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही
पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही
जुळले अतूट नाते दोन्ही मनामनांचे
घर दोघांचे ,घरकुल पाखरांचे
10 Apr 2012 - 10:39 am | रुमानी
छान जमलय.
10 Apr 2012 - 12:02 pm | धन्या
छान लिहिलंय. मात्र तक्रारींची यादी खुपच छोटी वाटली. :)
10 Apr 2012 - 12:38 pm | यकु
त्या रहस्यकथा वैग्रे सोड आणि हे असलं काही लिही ;-)
वाचलेलं असूनही पुन्हा मज्जा आली.
10 Apr 2012 - 3:02 pm | प्यारे१
ध मा ल... लिहीलं आहे!
10 Apr 2012 - 4:20 pm | ५० फक्त
मजा आली वाचायला, तेवढीच भिती वाटते
.
.
रोज अनुभवायला.
अवांतर - अच्छा म्हणजे परवा आमच्या हॉलमध्ये ट्युब दुरुस्त करता करता तुम्ही कॅमेरापण बसवुन गेला आहात काय, तरी नशीब सध्या ट्युब पुन्हा बंद आहे नाहीतर..
10 Apr 2012 - 5:00 pm | किचेन
तुम्ही कोण? कुठच्या? आमच्या शेजारी राहता काय? सेम टू सेम आमचेच डायालोग छापलेत. ;)
पण आमची यादी थोडी मोठ्ठी आहे.दोन्ही बाजूने.
10 Apr 2012 - 5:03 pm | यकु
>>>तुम्ही कोण? कुठच्या? आमच्या शेजारी राहता काय? सेम टू सेम आमचेच डायालोग छापलेत.
पण आमची यादी थोडी मोठ्ठी आहे.दोन्ही बाजूने.
अय्या!!! हो???
तुमचे 'हे' सुद्धा भयकथा लिहितात? :p
इथे टाका की मग कधीतरी ;-)
10 Apr 2012 - 6:50 pm | रेवती
आणखी एक भयकथा.;)
10 Apr 2012 - 7:11 pm | निशदे
म्हणजे चाफासदनी अशी कहाणी............ ;)
10 Apr 2012 - 8:29 pm | पैसा
फारच वास्तववादी! पण काही ठिकाणी तिखटपणा जरा कमी झालाय. म्हणजे असं की, माझा नवरा जेव्हा माझ्या साड्यांबद्दल बोलतो तेव्हा म्हणतो, "तुला इतक्या साड्या कशाला पाहिजेत? मरशील तेव्हा लाकडं आणायला नकोत!" इथून पुढे मैफल चढत जाते. पण म्हणून मी गार्डनचा सेल लागला की ५/६ तरी साड्या आणायचं सोडते की काय?
10 Apr 2012 - 9:39 pm | रेवती
बरय गं पैसाताई. मला तर भांडणार्या नवराबायकोचा हेवा वाटतो. माझा नवरा कधीही चिडत, भांडत नाही. मी चिडले की कानात कापसाचे बोळे घालून बसतो अशी एक शंका आहे. एकटी कितीवेळ बडबड करणार? मग शांत बसते. निदान आमच्याकडे मीही शांत बसले तर महिनोन् महिने भांडणं व्हायची नाहीत्....पण तसं केलं तर संसार केल्यासारखं मला वाटणार नाही म्हणून तडतड करत राहते.;) बाकी साड्या वगैरे वापरल्या जात नाहीत म्हणून तो मुद्दा नसतोच.
10 Apr 2012 - 10:39 pm | जेनी...
म्हन्जे रेवती आज्जि ,तुम्हाला
" मी नाइ बाई साड्या वापरत , मी तर ड्रेस्स वापरते ;) ." हे खास करुन पैसा ताईला सांगायच आहे का?
:P
10 Apr 2012 - 8:31 pm | जाई.
मस्त
चाफास्टाईलच दर्जेदार लेखन
10 Apr 2012 - 11:12 pm | सोत्रि
'घरोघरी चाफ्याची फुले' असे म्हणायला आता हरकत नाही ;)
- (सध्या घामाच्या वासाने दुसर्यांच्या परेशान असलेला) सोकाजी
अवांतरः शिर्षक वाचून सहजच ह्याची आठवण झाली :)
10 Apr 2012 - 9:19 pm | मन१
वआचनखूणेत टाकलय.
10 Apr 2012 - 9:26 pm | बटाटा चिवडा
लेख छानच.. अगदी जिवंत संभाषण वाटते आहे... परंतु...
इथे 'च्युईईक' म्हणजे नेमका कोणता आवाज हे समजले नाही.. मी खूप प्रयत्न केले 'च्युईईक' आवाज काढून खांदे उडविण्याचे... परंतु, फक्त खांदे उडत होते आणि 'च्युईईक' च्या जागी विचित्रच आवाज येऊ लागले.. आता कोणीतरी सांगा.. ये 'च्युईईक' 'च्युईईक' क्या हैं .. ये 'च्युईईक' 'च्युईईक' ... :D
10 Apr 2012 - 9:32 pm | जेनी...
' च्त्या '..असा आवज काढुन बघा बरं मग :P
:D
10 Apr 2012 - 10:26 pm | चाफा
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद मंडळी, खरंतर प्रत्येकी एक धन्यवाद वाटायला हवेत पण त्यामुळे प्रतिसाद संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे म्हणून एकाच पोष्टमधे आभार मानतोय :)
हे मुक्तक काल्पनिक आहे त्यामुळे काही गैरसमज नसावेत :) आणि म्हणूनच मला तो च्युईईक आवाज काढून दाखवता येणार नाही :)
11 Apr 2012 - 1:59 am | संजय क्षीरसागर
मी एक ज्योक ऐकला होता.
एकदा अॅग्रीकल्चर कॉलेज आणि नेस वाडीयाची फुटबॉल मॅच होती. आता अॅग्रीकल्चर कॉलेज आणि त्यांची फुटबॉल टीम म्हणजे काही बोलायची सोय नाही त्यांनी पार दोन-तीन बसेस भरून कार्यकर्ते जमा केले होते आणि स्टेडियममधे फुल माहौल केला होता. दोन्ही टीम भिडल्यावर पब्लिकनं जो काय कल्ला केला म्हणतायं की कोण कुणाला नडतंय आणि बॉल कुठेय कळेनासं झालं. त्यात अॅग्रीकल्चरनी पहिला गोल केला! पब्लिक फुल स्टेडियममधे घुसलं, रेफ्रींची शिट्ट्या मारूनमारून हवा संपली, वाडीयाची टीम एका बाजूला शांतपणे उभी राहिली. शेवटी सगळे कसेबसे परत स्टेडियम बाहेर गेल्यावर वाडीयाचा कॅप्टन म्हणाला `काय झालं?’
तर अॅग्रीकल्चरचा कॅप्टन म्हणाला `अबे, दिसत नाही का? गोल मारलाय!
यावर वाडीयाचा कॅप्टन म्हणाला, `अबे, कळलं नाही का? तुम्ही तुमच्याच गोलमधे गोल मारलायं!
`हे मुक्तक काल्पनिक आहे' असं आधीच सांगीतलं असतं तर पब्लिक कशाला गोल मारत बसलं असतं?
आणि त्यात पुन्हा हा क्लायमॅक्स, नांव `चाफा' सर्व लेखन `ती'च्या भूमिकेतून आणि `एकाच पोष्टमधे आभार मानतोय' . साधा सुधा नाही एकदम पंचरंगी पोपट झालायं आमचा! काहीच टोटल लागत नाहीये.
11 Apr 2012 - 2:34 am | जेनी...
भावना महत्वाच्या .....बाकिकडे कशाला बघत बसताय राव .....
जे लिहिलय ते वाचायचं ,त्याबद्दल बोलायचं ,का टोटल लावत बसायचं ? :-o
11 Apr 2012 - 3:14 am | नेत्रेश
इथे:
http://www.maayboli.com/node/30011
11 Apr 2012 - 7:46 am | ५० फक्त
मायबोली - आसावरी आशु = मिपा-चाफा. ?
11 Apr 2012 - 12:43 pm | स्वातीविशु
काल्पनिक मुक्तक आवडले. :)
आधी मला भिती वाटत होती, की सकाळमध्ये येणारा "तो आणि ती" लेख आहे की काय? बरे झाले ती खोटी ठरली. ;)
आता तो जी भयकथा लिहित आहे ती कधी टाकणार ?
12 Apr 2012 - 12:36 am | चाफा
मायबोली - आसावरी आशु = मिपा-चाफा. ? >>>>> नाही मायबोलीवर कवठीचाफा :) आसावरी आशु हा सौ चाफाचा आय डी आहे :) तिथे तो तीच्या नावाने आहे आर्थात त्याची मुळकल्पना तीची असल्याने तो `ती' च्या बाजुचा संवाद आहे :)
संजयजी कदाचीत तुमची टोटल आता लागेल :)
आता तो जी भयकथा लिहित आहे ती कधी टाकणार ? >>> लवकरच :)
16 Apr 2012 - 2:51 pm | आदिजोशी
काल्पनीक मुक्तक असेल तर आवर्जून लिहिण्यासारखा प्रसंग वाटला नाही आणि प्रसंग पुरेसा खुललाही नाही. ह्या विषयावर ह्या फॉर्मॅट मधे तुफान विनोदी लिखाण करता आले असते.
17 Apr 2012 - 8:15 pm | चाफा
आदी,
मनापासून मान्य दोस्त, पण वेळ काढून लिहीलेलं नाहीये ते असंच एक ओळ लिहीली म्हणून दुसरी असं करत लिहील्या गेलंय ते :)
ररा टंकाळा हा शब्द अचाटच आवडला :)
16 Apr 2012 - 3:02 pm | रमताराम
चिऊ आणि काऊ वरून ढापल्यासारखी वाटते आहे. ;) तपशीलवार लिहिले असते पण टंकाळा आला आहे. :)