सिमोल्लंघनी ट्रेक

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
31 Mar 2012 - 8:07 pm

दूरदर्शनचे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर, विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव २१ मार्च रोजी
प्रतिनिधी, मुंबई
सुचेता

मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीतर्फे दरवर्षी देण्यात येणारे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार बुधवार, २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात आयोजित केला आहे. यंदा या पुरस्काराचे आठवे वर्ष असून समाजसेवा, संशोधन कार्य, पत्रकारिता, संगीत आदी दहा क्षेत्रांतील महिलांचा सन्मान यंदा करण्यात येणार आहे. यंदाचा हिरकणी सन्मान पुरस्कार धाडसी महिला म्हणून सुचेता कडेठाणकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात बुधवारी होईल. तसेच या पुरस्कार वितरण समारंभाचे प्रसारण शनिवारी ३१ मार्च रोजी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे.

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळाल्यावर सुचेताने पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे दोन वर्षे पत्रकारिताही केली. नंतर मात्र, कंपन्यांसाठी तांत्रिक विषयाचे लेखन करायचे काम तिने स्वीकारले. गिर्यारोहण आणि भटकंतीचा छंदही तिला बालपणापासून होता. विद्यार्थीदशेत पुणे परिसरातले गड, किल्ले तिने चालत पालथे घातले होते. हिमालयात जाऊन तिने भ्रमंती केली होती आणि एव्हरेस्टच्या बेस कॅपपर्यंतही ती जाऊन आली होती. पुण्यातली "एड्‌‌युरो अ‍ॅडव्हेंचर रेस' जिंकणार्‍या या सुचेताने, मुंबईतली २६ किलोमीटरची मॅरेथॉन शर्यतही पूर्ण केली होती. शेवटी तिने गोबी वाळवंट पार करायचे ठरवले.

चालण्याची पूर्वतयारी व्हावी म्हणून मावळ भागात ती ज्या कंपनीत नोकरी करीत होती, तिथे जाण्या-येण्यासाठी वाहनाचा वापर तिने बंद केला. दररोज पंचवीस किलोमीटरची पायपीट ती या मोहिमेच्या, तयारीसाठी करीत राहिली. काहीही झाले तरी हे वाळवंट पार करायचेच, असा तिचा निर्धार होता. २५ मे इ.स. २०११ रोजी दहा उंटांवर लादलेल्या अत्यावश्यक साहित्य, अन्न आणि पाण्यासह, ती सामील झालेल्या वाळवंट तुडवणार्‍या सहकार्‍यांची मोहीम, दक्षिण मंगोलियातल्या खोंगरोसखान या गावातून सुरू झाली. त्यानंतर मात्र, मोहीम संपेपर्यंत म्हणजे १,६०० किलोमीटर अंतर पार पाडेपर्यंत या वाळवंटात, ते उंट आणि मोहिमेतला काफिलाच तेवढा चालत होता. रोज पंचवीस किलोमीटरचे आणि शेवटीशेवटी रोज चाळीस किलोमीटरपर्यंतचे अंतर सुचेता कडेठाणकरला चालावे लागले. असा हा दिनक्रम ५१ दिवस सुरू होता. जुलै १५, २०११ रोजी मंगोलियातले गोबीचे वाळवंट पायी पार करणारी ती पहिली भारतीय व्यक्ती ठरली.

भारतभर पायी प्रवास करून भूदानाचे कार्य करणार्‍या विनोबांना जेव्हा विचारले होते की तुमचे सर्वात अवघड वाटलेले पाऊल कुठले? त्यावर ते उत्तरले होते की, “घराचा उंबरा ओलांडतांना टाकलेले!” तसाच, आज जगप्रसिद्ध झालेल्या सुचेताचा एक सिमोल्लंघनी ट्रेक तिच्या प्रवासातला एक अत्यंत अवघड टप्पा होता. होतकरू तरूण-तरुणींना स्फूर्तीदायी ठरू शकेल असा हा ट्रेक होता तरी कसा? तेच खालील कवितेत वर्णिले आहे!

विजयादशमी, गुरूवार, दिनांक ९ ऑक्टोंबर २००८ रोजी सुचेता कडेठाणकर ही पुण्याची मुलगी रात्री, भारत-नेपाळ सीमा ओलांडून जात होती. एव्हरेस्ट बेसकँपच्या पदभ्रमणाकरता निघालेल्या सहा जणांच्या तुकडीतील एकटी महिला सदस्य होती. पदभ्रमण सुरू होण्यापूर्वीच तरतर्‍हेच्या कारणांनी, तिचा प्रवास अत्यंत अवघड होत गेला. तरीही विचलित न होता तिने पदभ्रमणाच्या सुरूवातीचे ठिकाण यथावकाश गाठले. पुढे पदभ्रमणही यशस्वीरीत्या पार पाडून सर्व सदस्य पुण्यात सुखरूप परतले. मात्र, संस्मरणीय झाला तो तिचा सिमोल्लंघनाचा प्रवास. त्या प्रवासाची सर्व हकिकत तिच्याच शब्दांत साप्ताहिक सकाळच्या २००९ च्या दिवाळी अंकात १५४ ते १६० ह्या पृष्ठांवर प्रकाशित झालेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अपार कष्टांना सामोरे जात तिने केलेल्या ह्या सिमोल्लंघनाची कथा अतिशय प्रेरणादायी आहे. त्या कहाणीस उजागर करणारी ही कविता आहे “सिमोल्लंघनी ट्रेक”.

सिमोल्लंघनी ट्रेक

जिथवर न यात्री कोणी, टिकला श्रमा पुरून ।
कडेठाणकर सुचेता, गेली तिथे दुरून ॥ धृ ॥

मुंबईहून “राजधानी[१]”, बैसून मग विमानी ।
जाण्यास काठमांडू, पुण्याहुनी निघाली ॥ १ ॥

जे ओळखीस नेले, “मतदारपत्र” ’मिसले[२]’ ।
पहार्‍यास दावले जे, ते “पॅन[३]” ही न पुरले ॥ २ ॥

मग भूमिमार्ग घेऊन, बनबासी[४]ला निघाली ।
होते “बशी”त मर्दच, “स्त्री” एकटीच ठरली ॥ ३ ॥

जितके वजन तियेचे, तितकेच पाठीवरती[५] ।
जशी मध्यरात्र झाली, तशी झोप आली नेत्री ॥ ४ ॥

मग चक्रधारीमागे, टाकुन पथारी[६] निजली ।
”बनबासी” लक्ष्य धरुनी, करण्या प्रवास धजली ॥ ५ ॥

जागे कुणी करिता, कळले की वाट अडली ।
महाकाली[७] पूर-भरली, गाडी तिथेच अडली ॥ ६ ॥

दुथडी भरून वाहे, “उतार[८]” तिज मिळेना ।
चालून मैल[९] जाता, “उतरून” कोणी गेला ॥ ७ ॥

मग तीही नदीत शिरली, कमरेस पाणी चढले ।
पिशवीत[१०] पाणी मुरले, डोळ्यात पाणी भरले ॥ ८ ॥

जणू सत्त्वपरीक्षा होती, कुठलीही स्त्री डगमगती ।
कडेठाणकर सुचेता, निश्चयी अढळ पण होती ॥ ९ ॥

ती धैर्ये तुडवित अंतर, नदी पार लंघुनी गेली ।
तरी रस्त्यावर[११] येण्यासाठी, जागीच परतुनी आली ॥ १० ॥

मग टांगा घेऊन एक, ते यात्री एकोणीस[१२] ।
देशाच्या सीमेवरती, करू पाहती देशा “क्रॉस” ॥ ११ ॥

ती आंतरदेशीय सीमा, उघडेल “कधीही[१३]”? मुळी ना ।
ती खुलण्यासाठी म्हणून, मग थबका आणि थांबा ॥ १२ ॥

उघडली सकाळी सीमा, अधिकारी उघडती कामा ।
पुसती ते ठावठिकाणा, तिची तमाच[१४] नव्हती कोणा ॥ १३ ॥

जत्था जरी मोठा होता, सिमोल्लंघन उत्सुक होता ।
पहाटेस तीनाची वेळ, सण विजयादशमी[१५] होता ॥ १४ ॥

अवचितच ध्यानी येते, “स्त्री” तीच एकटी असते ।
अन्‌ सीमा पार कराया, टांग्यात चढून ती बसते ॥ १५ ॥

तिज नव्हते ठाऊक काही, होते ते योग्य[१६] की नव्हते ।
तरी हे सिमोल्लंघन न्यारे, इतिहासच घडवत होते ॥ १६ ॥

एकोणीस व्यक्ती होत्या, त्या टांग्यातून सवारी ।
केवळ ती अपूर्व प्रवासी, एव्हरेस्ट पायथ्याप्रतची[१७] ॥ १७ ॥

मग चढाई यशस्वी झाली, परतला घरी प्रत्येक ।
आठवणीत चिरंजीव झाला, तो सिमोल्लंघनी ट्रेक ॥ १८ ॥

सुचेता कडेठाणकर ह्यांनी पुढे अनेक धाडसी प्रवास केले. त्या लोकांच्या कौतुकास पात्र झाल्या. आज त्यांना “दूरदर्शन हिरकणी सन्मान पुरस्कार” ही जाहीर झालेला आहे. मात्र ह्या “सिमोल्लंघनी ट्रेक” चा उंबरा पार केल्यावरचे ते सर्व प्रवास त्यांनाच कदाचित सोपे वाटत असतील. त्यांच्यासारख्या हिरकण्यांना महाराष्ट्रात संधीचे, सन्मानाचे, गौरवाचे दिवस दिसोत आणि उमेदवार तरूण-तरूणींना अपार स्फूर्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

[१] ही गाडी मुंबईहून दिल्लीस घेऊन जाते.
[२] मिस झाले, गहाळ झाले ह्या अर्थाने.
[३] म्हणजे पॅनकार्ड हो. दिल्ली विमानतळावर “मतदार ओळखपत्र” गहाळ झाल्याने, पॅनकार्ड दाखविणार्‍या सुचेताचे ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्याला “ओळख” म्हणून देशात काडीचीही किंमत नसल्याचे ह्या घटनेवरून सिद्ध होते.
[४] बनबासी हे नेपाळच्या सीमेवरचे भूमिमार्गावरील गाव आहे.
[५] म्हणजे “सॅक” हो.
[६] “स्लिपिंग बॅग”.
[७] वाटेतल्या महाकाली नावाच्या नदीला पूर आल्यामुळे बस तिथेच मध्यरात्री अडली होती.
[८] “उतार” म्हणजे पायी ओलांडून जाता येईल अशी जागा.
[९] नदीकिनार्‍याने मैल चालून गेल्यावर अशी जागा गवसली एकदाची.
[१०] सगळी सॅक पाण्याने भिजून दुप्पट वजनदार झाली की हो!
[११] रस्त्याच्या ठिकाणापासून नदी पार करता यावी म्हणून नदीच्या किनार्‍याने जितके समोर चालत जावे लागलेले असेल तितकेच नदी पार झाल्यावर मागे आल्याशिवाय पुन्हा रस्ता मिळत नाही. म्हणून नदी पार झाल्यावर पुन्हा रस्त्याकडे परतून यावेच लागते.
[१२] सम-उद्देश असले म्हणून काय झाले एका टांग्यात एकोणीस? हो पण अडचणीच्या काळात चोखाळावा लागणारा हा अपरिहार्य मार्ग असतो. तोही तिच्या आजच वाट्याला यायचा होता.
[१३] दिवसाच्या ठराविक कालावधीतच सीमा उघडत असे.
[१४] म्हणजे काय की, तिचा ट्रेकरचा वेश, भारतीय चेहरा आणि म्हणूनच स्पष्ट उद्दिष्ट जाणवल्याने सीमेवर तिची अजिबात चौकशी न करता तिला सोडून देण्यात आले.
[१५] काय पण योगायोग, सिमोल्लंघनाकरता मुहूर्तही मध्यरात्रीचा!
[१६] अशा परिस्थितीत स्त्रीने आपला जीव झोकून द्यावा काय? ह्या प्रश्नाचे सरळ उत्तर नाही! हे असतांना धैर्याने हे सर्व पार पाडत असतांना मनात चलबिचल होणे साहाजिकच आहे हो!
[१७] इतर प्रवाशांचे लक्ष्य सामान्यपणे जे असते तेच होते. तिला मात्र पुढे एव्हरेस्ट पायथ्याचा ट्रेक करायचा होता.

वीररसअद्भुतरसप्रवासकवितासमाज

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

31 Mar 2012 - 10:30 pm | पाषाणभेद

काका, वेगळ्याच धाटणीची कविता अन प्रयत्न!
सुंदर मेहनत दिसतेय.

आत्मशून्य's picture

31 Mar 2012 - 10:33 pm | आत्मशून्य

:party:

मनःपुर्वक अभिनंदन.

पैसा's picture

31 Mar 2012 - 11:34 pm | पैसा

सुचेताच्या अचाट धाडसाचं कौतुक, आणि तुमची वेगळ्याच धाटणीची कविता! आवडली!

मोदक's picture

31 Mar 2012 - 11:41 pm | मोदक

अभिनंदन. :-)

बॅटमॅन's picture

1 Apr 2012 - 1:13 am | बॅटमॅन

सिम्प्ली ग्रेट!!! याला म्हणतात महिला पॉवर. सुचेतातैंना आनेक _/\_

प्रचेतस's picture

1 Apr 2012 - 9:18 am | प्रचेतस

वर्णनात्मक कविता आवडली.
सुचेता यांच्या धाडसाबद्दल आधी वाचलेले होतेच.

मुक्त विहारि's picture

1 Apr 2012 - 12:55 pm | मुक्त विहारि

ही माहिती माझ्या वाचनात आली न्हवती...

मनापासून धन्यवाद...

नंदन's picture

2 Apr 2012 - 12:25 am | नंदन

सुचेता कडेठाणकर यांच्या धाडसाची, मेहनतीची प्रशंसा करावी तितकी थोडीच.
तो प्रवास किती यातनामय होता, याचा अंदाज ही कविता वाचून येतो.

यशोधरा's picture

2 Apr 2012 - 11:44 am | यशोधरा

नंदनला अनुमोदन

प्यारे१'s picture

2 Apr 2012 - 12:38 pm | प्यारे१

मनःपूर्वक अभिनंदन....!

सुकामेवा's picture

2 Apr 2012 - 2:44 pm | सुकामेवा

मनःपूर्वक अभिनंदन....!

पाषाणभेद, आत्मशून्य, पैसा, मोदक, बॅटमॅन, वल्ली, मुक्त विहारि, नंदन, यशोधरा, प्यारे१ व पंकज,

सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

५० फक्त's picture

2 Apr 2012 - 5:29 pm | ५० फक्त

सुचेतातै ना नमस्कार आणि तुम्हाला अनेक धन्यवाद ही मोलाची माहिती पुढे आणल्याबद्दल.