दि अगस्ती कोड (भाग २)

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जनातलं, मनातलं
23 Mar 2012 - 2:41 pm

श्याम देशपांडेचे बालपण सोलापुरात गेले.कानडी मुलुखाच्या तोंडाशी असल्याने मराठी इतकीच कन्नड देखील तिथे कानी पडत असे. त्याचे अनेक नातेवाईक व मित्र देखील कन्नड होते. त्यामुळे एक अपरिहार्यता म्हणून झालेला कन्नडचा परिचय पुढे भाषाशास्त्रात उपयोगी पडेल, असे त्याला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. पण पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये तौलनिक भाषा शास्त्राचा अभ्यास करताना मराठी आणि कन्नड मधील साम्यस्थळे त्याच्या इतकी पटकन लक्षात येत की बाकीच्यांना अचंबा वाटे. मग ते तूप-तुप्पा, अडकित्ता-अडकोत्तु असे शब्द असोत किंवा ळ चा मराठी मधील प्रादुर्भाव असो, त्याच्या नजरेतून एकही बाब सुटत नसे. हळूहळू त्याने मराठी , कन्नड, संस्कृत, हिंदी, इंग्रजी आणि कुतूहलापोटी बंगालीचा अभ्यासदेखील केला.

श्याम पुण्यात आपल्या केबिन मध्ये विचार करीत बसला होता. ही कॉनफरन्स त्याच्या दृष्टीने महत्वाची ठरली होती. रशियातील काही संशोधकांनी त्याच्याबरोबर काम करण्याची तयारी दाखविली होती. विशेषत: इरिना ग्लुश्कोव्हाने त्याच्या “मराठीची उत्पत्ती ही क्रिओलप्रमाणेच झाली आहे” या सिद्धांताला पाठींबा दिला होता. संस्कृत सारखे व्याकरण, शब्दसंपदा आणि द्राविडी शब्दसंपदा- विशेषत: कन्नड- असे मिश्रण साधारण ३००-४०० वर्षे शिजत ठेवले, की मराठी सारखी खमंग “डिश” तयार होते, असे त्याचे म्हणणे होते. त्या जुन्या काळात इतकी सरमिसळ होती, की नेमके कोण कुठले हेच कळत नव्हते. कन्नडचं एक ठीक आहे , पण श्रवणबेळगोळ सारख्या कानडी मुलुखाच्या अंतर्भागात चावुंडरायाचे नाव मराठीत अजरामर कसे काय झाले? तो शिलालेख त्याच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. बाहुबलीच्या त्या अवाढव्य मूर्तीच्या डाव्या पायाजवळ तो मजकूर लिहिलेला होता. त्याची लिपी देवनागरी असली तरी हलकीशी बंगाली छटा त्यात जाणवत असे. दीर्घ वेलांटीचा फराटा काय किंवा “य” लिहिण्याची पद्धत काय, बंगालीसारखाच मामला होता सगळा…त्याला कोलकात्यातील दुकानांवरील पाट्या आठवल्या..बंगाली ब्राह्मण आधीपासून मासे-मांस खातात आणि कोकणातील सारस्वत देखील..त्यांच्यात एक परंपरा आहे की ते बंगालमधून आले आहेत म्हणून..मग त्यांच्या प्रभावाखाली ही लिपी अशी झाली असेल का? ते असो, पण मग मराठी आणि बंगाली मध्ये इतके साम्य कसे? भाताला “भात” फक्त मराठी आणि बंगालीमध्येच कसं काय म्हणतात?…त्याचा विचार करता करता डोळा लागला..

चेन्नईमधील इंडस रिसर्च सेंटर येथे इरावतम महादेवन आणि दंडपाणी अय्यर या दोघांची चर्चा चालली होती (अर्थात तमिळमध्ये)..महादेवन सांगत होते ,

“हडप्पामधील लिपी आणि प्राचीन तमिळ लिपी यांच्यात अतिशय साम्य आहे आणि हे इतर कोणत्याही भाषा अगर लिपीपेक्षा जास्त आहे.उदाहरणार्थ, हे चिन्ह पहा- X
इजिप्त आणि हडप्पा या दोन्ही संस्कृतींमध्ये सारख्याच अर्थाने हे चिन्ह वापरले जाते..शेतात पिकलेल्या पिकाचा पुरेसा हिस्सा अशा अर्थाने..”

“आप्पडिया !! आदिरेडी सिद्धांता! ” अय्यर उद्गारला. तमिळ भाषेच्या प्राचीनतेचा अजून एक पुरावा मिळाल्याने अय्यरला अजूनच भारी वाटत होते. अस्को पारपोला सारख्या ख्यातनाम द्रविड भाषाशास्त्रज्ञाने अय्यरने इलामो-द्राविडी सिद्धांताला केलेला विरोध वाखाणल्याने त्याचा हुरूप अजूनच वाढला होता. त्यावरचा पेरियारच्या द्राविडी विचारांचा प्रभाव तरुणपणाइतका नसला तरी अजून बराच शिल्लक होता. मदुराईमधून त्याने शिक्षण पूर्ण केले आणि मैसूर च्या CIIL (केंद्रीय भारतीय भाषा संस्थान) मध्ये कन्नड आणि मलयाळम या भाषांचा विशेष अभ्यास केला. तमिळखालोखाल त्याला कन्नड भाषा सफाईने येत असे. तोलकाप्पियं (प्राचीन तमिळ व्याकरण) त्याला अथपासून इतिपर्यंत मुखोद्गत होते. तमिळचा जाज्वल्य अभिमान असला तरी रोबर्ट काल्डवेलच्या The Dravidian Languages या पुस्तकाने त्याला भाषाशास्त्राची ओळख करून दिली, आणि ज्याप्रमाणे कडू काढा लोक तोंड वाकडे करून का होईना पितात, त्याप्रमाणे तो हिंदी देखील शिकला. मैसूरमध्ये त्याच्या कट्टर द्रविडवादी मित्रांनी त्याला त्याबद्दल टोमणे मारले, पण त्याचे एकच सांगणे होते.

“हिंदी भाषे उत्तर भारतदल्ली तुंबा महत्वपूर्ण अदे. अदक्क स्वल्परे माताडक्क बरबेकु. उत्तर भारतदल्ली हिंदीगे पर्याय इल्ला. मत्तू संस्कृत भाषेयल्ली बदलावणी आईते हेंग प्राकृत भाषागळू विकसित आदरु, अदे नोडक्क हिंदी कलबेकु”

(“उत्तर भारतात हिंदीला खूप महत्व आहे. त्यामुळे थोडेतरी बोलायला आले पाहिजे. तिकडे गेल्यावर हिंदीला पर्याय नाही. शिवाय संस्कृत पासून प्राकृत भाषा कशा तयार झाल्या, हे कळायला हिंदी शिकले पाहिजे”).

हा प्रांतीयवादाच्या पलीकडे जाणारा दृष्टीकोन राहुल पांडेकडे देखील होता. मूळचा हरियानातील रोहतक येथील राहुल पांडेला हरियानवी, पंजाबी आणि हिंदी भाषा तर येतच होत्या.शिवाय मैथिली, मगही आणि भोजपुरी या भाषांचा देखील त्याचा सखोल अभ्यास होता- अर्थात त्या भाषांचा परिचय होण्याचे कारण काहीसे वेगळे होते. दिल्लीला जे एन यु मध्ये एम ए च्या वर्गात असताना त्याचे एका मुलीवर प्रेम बसले- उत्तरप्रदेशमधील बलिया येथे एका सर्व्हे साठी गेला असताना एका गाव की गोरी ने त्याचे चित्त आकर्षून घेतले होते आणि तिच्याशी जास्तीत जास्त बोलता यावे म्हणून त्याने भोजपुरीचा दांडगा अभ्यास चालवला होता. प्रकरण सफल झालेदेखील असते, पण पांडेजींचा धीर होईना. शेवटी तिच्या नादात भोजपुरी शिकून पांडेजी दिल्लीला परत आले. तो संभाषणाचा अनुभव घेऊन आणि तद्दन बी-ग्रेड भोजपुरी सिनेमे बघत त्यांनी ती भाषा पाहता पाहता आत्मसात केली. एकदा भोजपुरी शिकली की मगही आणि मैथिली शिकणे म्हणजे हातचा मळ होता. त्याला नेहमी प्रश्न पडत असे, या भाषा म्हणजे हिंदीच्या नुसत्या बोलीभाषा आहेत की स्वतंत्र भाषा? तथाकथित अलाहाबादी हिंदीचे दुद्ढाचार्य पुरस्कर्ते या भाषांच्या संवर्धनाबद्दल जी उदासीन भूमिका घेत आणि रघुबीर सिंगांच्या अति जडजम्बाल, संस्कृताळलेल्या हिंदीची वारेमाप स्तुती करीत, ती त्याला बिलकुल नापसंत होती. परंतु असे असूनही नागरी प्रचारिणी सभेचा तो एक खंदा कार्यकर्ता होता. हिंदीचा पूर्ण भारतभर प्रसार करणे हे देशाच्या एकतेसाठी परम आवश्यक आहे, अशी त्याची धारणा होती. परंतु हिंदीभाषिक लोकांवर नेहमी जो दुसर्यांच्या भाषेला डावलण्याचा आरोप केला जातो त्याला तो अपवाद होता. रोहतक पासून पानिपत काही फार दूर नव्हते- शिवाय मराठ्यांच्या बद्दलच्या कथा-दंत कथा तो लहानपणापासूनच ऐकत होता. त्यामुळे मैसूर येथे CIIL मध्ये त्याने मराठी शिकून घेतली होती. आणि कन्नड बोलता आली नाही तरी बोललेले थोडेफार कळत असे.

पांडे कॉनफरन्सबद्दल विचार करीत होता. हिंदी भाषेतील शेतीशी निगडीत शब्दांपैकी अनेक शब्द हे आर्यन किंवा द्रविडीयन भाषांपासून आलेले नसून त्यांमागे आता लुप्त झालेली आणि या दोघांपासून वेगळी असलेली मूळ गंगेच्या खोर्यातीलच एक भाषा असली पाहिजे, असा दावा त्याने केला होता. त्याच्या या दाव्याला पुष्कळ जणांनी पाठींबा दिला होता. आता हिंदीची पूर्ण पाळेमुळे खणून काढण्यात आपण नक्की यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास त्याला वाटत होता….

कॉनफरन्सनंतर एक वर्ष उलटले. दरम्यानच्या काळात विशेष काही घडले नाही. सध्या तसेही आदिवासी भाषांचा अभ्यास करण्याचे एक फॅडच आले होते. जो तो आदिवासी भाषांच्याच मागे होता. मग आदिवासी भाषांसाठी लिपी तयार करणे असो अथवा त्यांचे व्याकरण लिहिणे असो- ग्लोबलायझेशनच्या रेट्यात या भाषा कधी आणि कशा नष्ट होतील हे सांगणे अशक्य होते आणि त्यामुळेच सर्व भाषा शास्त्रज्ञ “कल हो ना हो” या न्यायाने आपापल्या भागातील आदिवासी भाषांवर तुटून पडले होते. त्यामुळे देशपांडे नर्मदेच्या खोर्यातील निहाली भाषेचा अभ्यास करीत होता, तर पांडे आणि अय्यर हे अनुक्रमे कुरुख आणि कोडगू या भाषांचा अभ्यास करण्यात मग्न होते.

ते एक वर्ष तिघांसाठी बऱ्याच प्रकारे आमूलाग्र बदलाचे ठरले. आदिवासी समाजासोबत राहताना बऱ्याच बाबतीत आपल्या नेहमीच्या संकल्पनांना फाटा द्यावा लागतो हे तिघानाही कळून चुकले. बाकी समाजापासून पूर्ण अलग राहून निसर्गाच्या रौद्र रूपाशी कायम सामना करून चिवटपणे तग धरून राहणाऱ्या आदिवासिंबद्दलचा त्यांच्या मनातील आदर शतगुणित होत चालला होता.

सर्वांचीच खतरनाक परिस्थिती होती. नर्मदेच्या खोऱ्यात वाघांचे भय देखील होतेच. कुरुख प्रदेशात तर माओवादी होते. कोडवा भागात असे काही फारसे नसले तरी जंगलात राहण्याचे जे फायदेतोटे होते, ते अय्यरने देखील सहन केलेच होते. देशपांडेने तर एका मोठ्या रानडुकराच्या शिकारीत देखील भाग घेतला होता. आणि जिथे पांडे होता तिथे तर माओवाद्यांच्या चौकशीला तोंड देणे हे नित्याचेच होते. आदिवासी काय आणि माओवादी काय, सर्वांच्या मनात या बाहेरून येणाऱ्या शहरी लोकांबद्दल मोठा संशय असे. तो नष्ट करणे हे मोठे जिकीरीचे काम. पण तिघांनी हे शिवधनुष्य पेलले आणि त्या वर्षभर ते आदिवासींमध्ये मिळून मिसळून गेले.

तोपर्यंत CIIL म्हैसूर इथे अजून एक वर्कशॉप आयोजित केले गेले होते. अरुणाचल प्रदेशात एका नवीन भाषेचा शोध लागला होता. तिबेटो-बर्मन भाषासमूहामधीलच ती एक भाषा होती. त्या प्रदेशात नुकतेच फील्डवर्क करून आलेले दोघेजण मोठ्या उत्साहाने त्या भाषेची माहिती सांगत होते. नवीन भाषा सापडली म्हणजे तिचे व्याकरण, तिबेटो-बर्मन भाषाकुलामधील तिचे स्थान, तिचे उच्चारशास्त्र अशा सर्वच गोष्टी नव्याने करणे आले. आणि पहिलेपणाचा मान त्यांना मिळाल्यामुळे दोघेही उत्साहाने जणू फसफसत होते.

पांडे, देशपांडे आणि अय्यर या तिघांनीही तिथे हजेरी लावली होती. एक वर्षापूर्वीच्या कॉन्फरन्समधील वाद त्यांच्या डोक्यात अजूनही होताच. आदिवासी भाषांच्या अभ्यासातील काही गोष्टींची देवाणघेवाण त्यांच्यात आपापसात चालू होती, आणि त्यातून बऱ्याच गोष्टी उघडकीस येतील अशी त्यांची खात्री होती. निहाली आणि हिंदी मधील शेतीविषयक काही शब्दांमध्ये काही परस्परसंबंध असू शकेल, अशा निष्कर्षाप्रत पांडे आणि देशपांडे दोघेही आले होते. पण त्यासाठी अजून फील्डवर्क गरजेचे होते. इकडे अय्यर देखील मुंडा आणि द्रविडीयन भाषांच्या तौलनिक अभ्यासात काही निष्कर्ष काढू पाहत होता.

यथावकाश वर्कशॉप संपले. गेले वर्षभर सतत फील्डवर्क करून वैतागल्याने तिघांनीही जवळपास एक ट्रिप काढली होती. पांडे आणि देशपांडे दोघांचेही म्हणणे होते की जरा जीवाचे केरळ करू.

“नीवु नोडी, आगळे हेळबिडतिने, अदु हागे चन्नागि इरबेकू, यल्ला केरळ तोरस बिडी नामगे.” देशपांडे म्हणाला.

“आमा ! ” अय्यर उत्तरला.

“कोई अच्छी जगह ले जाओ यार, मस्त ऐश करेंगे | ” खुर्चीवर रेलून बसलेला पांडे म्हणाला.

“नाम पोवरम !”

“मतलब चलो!” पांडेच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत देशपांडे म्हणाला.

आणि तिघेही केरळात गेले. प्रथम कोचीन, मुन्नार, कालडी, वायनाड, पोनमुडी इत्यादी स्थळे पाहत त्रिवेंद्रम आणि पद्मनाभपुरमला गेले. अय्यर ने मलयाळम यथेच्छ पाजळून घेतली आणि पांडेची डोकेदुखी अजूनच वाढली. ते सगळे, ळ सारखे मूर्धन्य स्वर ऐकता ऐकता मूर्च्छा येऊ शकते हा पांडेचा एक लाडका सिद्धांत होता. आणि द्राविडी भाषांवर कोणी चेष्टेने केलेली टीका देखील अय्यरला सहन होत नसे. पण बदला घेण्याचा एक मौका अय्यरला लवकरच आला.

त्याचे असे झाले, अय्यर चे पूर्ण नाव होते एम.सी. डी.अय्यर. पांडेने एकदा त्याचे नाव विचारले आणि अय्यरने जी मालगाडी सुरु केली काय विचारता…

“अय्यर…दंडपाणी अय्यर..मुत्तुस्वामी दंडपाणी अय्यर..चिन्नास्वामी मुत्तुस्वामी दंडपाणी अय्यर..पेरुम्बुदूर चिन्नास्वामी…”

“नही नही अय्यर बस कर अब…मै तेरे हाथ जोडता हुं, पांव पडता हुं लेकीन तुम मुझे बक्ष दो |” पांडे कळवळून उत्तरला आणि बाकीचे दोघेही हसण्यात बुडाले..

केरळची सहल मस्त चालली होती. परत जायला अजून काही दिवस बाकी होते.अय्यरचे म्हणणे पडले की निलगिरी पर्वतामध्ये ट्रेक करूया. तामिळनाडू , केरळ आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमारेषेवर ही पर्वतरांग होती आणि राहायलादेखील चांगल्या सोयी होत्या. आणि तोडा नामक आदिवासिदेखील तिथे राहत असत.

निलगिरीची उंच तरीही आवाक्यातील शिखरे, घनदाट वनश्री आणि विविध प्राणी-पक्ष्यांच्या आवाजांनी तिघांच्याही डोक्यातील ती कीसकाढू प्रवृत्ती काही काळ का होईना शमली होती….एकही शब्द ना बोलता संथपणे मार्गक्रमण चालले होते. वाटेतील जळवा, साप आणि क्वचित कुठे लागणारी जनावराची चाहूल यापलीकडे फारसे काही घडतविघडत नव्हते. पांडे निवांतपणे शीळ घालत चालत होता, इतक्यात त्याला कसली तरी चाहूल लागली. त्याने बाकीच्या दोघांना खुणेनेच सांगितले. ते पाहू गेले तर वरच्या घनदाट झाडीतून कुणाच्या ध्यानीमनी नसताना एका पुरुषाचे प्रेत त्यांच्यासमोर पडले. ..(क्रमश:)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

23 Mar 2012 - 2:48 pm | बॅटमॅन

पहिला भाग
http://www.misalpav.com/node/21101

यकु's picture

23 Mar 2012 - 4:10 pm | यकु

मस्त कथा आणि मांडणीही भारी.

प्रचेतस's picture

23 Mar 2012 - 4:21 pm | प्रचेतस

भन्नाट चाललीय कथा.
पुभाप्र.

मराठीची उत्पत्ती ही क्रिओलप्रमाणेच झाली आहे”

क्रिओल आजही रेवदंड्यानजीकच्या कोर्लई गावात प्रचलित आहे.

पैसा's picture

23 Mar 2012 - 4:29 pm | पैसा

कथेची मांडणी आवडली.
वल्ली, क्रिओल भारतात कशी आली?

क्रिओलचा ढोबळमानाने अर्थ काही भाषांच्या मिश्रणातून तयारी झालेली विशिष्ट भूभागापर्यंतच मर्यादित असलेली स्थानिक भाषा, जी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते. क्रिओलला लिपी नाही.

कोर्लई इथे मराठी, पोर्तुगीज आणि इंग्रजी यांच्या मिश्रणातून ही तयार झाली आहे आणि ऐकायला प्रचंड गोड वाटते.
(साळावचा खाडीपूल होईपर्यंत कोर्लई बर्‍यापैकी आयसोलेटेड होता त्यामुळेही ही भाषा आजपर्यंत टिकून राहिली असावी)

पैसा's picture

23 Mar 2012 - 4:41 pm | पैसा

ती हीच का?
http://en.wikipedia.org/wiki/Kupari

प्रचेतस's picture

23 Mar 2012 - 4:44 pm | प्रचेतस

नाही, ती वेगळी.
कोर्लईची क्रिओल थोडी वेगळी.

http://en.wikipedia.org/wiki/Kristi_language

पैसा's picture

23 Mar 2012 - 4:49 pm | पैसा

ही क्रिओल पोर्तुगीजला जवळची आहे तर

ती सामवेदी कोकणीला फारच जवळची दिसतेय. इथे बघ.
http://www.vasaiker.com/samvedi-bhasha-suvarta.html

प्रचेतस's picture

23 Mar 2012 - 4:54 pm | प्रचेतस

सुंदर माहिती पैसाताई.

सामवेदी कोकणीतील शब्द ऐकायला छान वाटत आहेत.

कोरलईचा दिपस्तंभ पाहिला आहे का ? तिथल्या ऑपरेटरनं दिपस्तंभाचं कामकाज समजावुन सांगितलं होतं ते अजुन लक्षात आहे, त्या किल्यावर जाणारा रस्ता सुद्धा खुप छान आहे.

प्रचेतस's picture

23 Mar 2012 - 6:58 pm | प्रचेतस

पाहीलाय. नितांत सुंदर.

बॅटमॅन's picture

23 Mar 2012 - 4:44 pm | बॅटमॅन

@ वल्ली:

कोर्लई क्रिओल माझ्यासाठी नवीनच आहे, माहितीकरिता धन्यवाद!

@पैसातै:

इन्टरेस्टिंग लिंक!

इरसाल's picture

23 Mar 2012 - 4:31 pm | इरसाल

छान. हा ही भाग आवडला.

अन्या दातार's picture

23 Mar 2012 - 7:48 pm | अन्या दातार

भाषांमधून आता मर्डर मिस्ट्रीकडे का? बॅटमॅन, तुस्सी ग्रेट हो दादा!

हैयो हैयैयो's picture

24 Mar 2012 - 7:31 am | हैयो हैयैयो

भात.

भाताला “भात” फक्त मराठी आणि बंगालीमध्येच कसं काय म्हणतात?

"भात" हाच शब्द सिंहलम् भाषेमध्ये "भत्त" अशा रूपाने येतो.

हैयो हैयैयो

-

ही माहिती नवीनच, आभार हैयो :)