वाट चुकलेली बस - एशियाड

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
2 Mar 2012 - 8:52 pm

मुंबईचा १९७० पासून आजपर्यंतचा प्रवास म्हणजे सामाजीक स्थित्यंतराच्या व्यवस्थापनाच्या फसलेल्या प्रयोगाचे एक नेमके उदाहरण आहे. सार्वजनीक व्यवस्थेवर पडणारा ताणामुळे सत्तरीच्या दशकात या शहराची शिवण उसवायला सुरुवात झाली होती.
नव्या बदलाला जनता वेगवेगळ्या मार्गानी सामोरी जात होती.
गिरगावातून इतर उपनगराकडे स्थलांतराला वेग आला होता .
बॅकबेचा भराव संपत आला होता.
नरीमन पॉइंटच्या बहुमजली इमारती उभ्या रहायला सुरुवात झाली होती.
एका बाजूस अशी परीस्थिती तर दुसर्‍या बाजूस आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी भरभराटीला आली होती .
१९७१ पर्यंत अनधिकृत झोपड्यांना विजेचा पुरवठा होत नव्हता. आता मुंबईपुढे पर्याय एकच होता तो म्हणजे अनधिकृत झोपडपट्टीच्या सुयोजीत पुनर्वसनाचा. पण हा मार्ग खर्चाचा होता म्हणून त्यातल्या त्यात सोयीचा मार्ग म्हणून १५ ऑगस्ट १९७१ पासून झोपड्यांना विजेचा पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. एक अर्थाने अनधिकृत वाढीला राजरोस मान्यता मिळाली. नव्या मुंबईची (तेव्हा नवी मुंबई हा शब्द नव्हता.जुळी मुंबई हा शब्द होता )सुरुवात झाली होती पण मुंबईतून नव्या मुंबईत स्थलांतर फार कष्टाचे होते.
आधी व्हिटी ते मानखुर्द -मग मानखुर्द ते खाडी एसटीने-त्यानंतर पायी चालत खाडी पार करणे आणि नंतर सिडकोच्या बसने घरी पोहचणे.
मुंबईतल्या स्थलांतर करू इच्छिणारांना पुणे हा पर्याय सोयीचा वाटत होता पण दोन वाढणार्‍या शहरांमध्ये एक मोठा डिसकनेक्ट-दुरावा होता प्रवासाचा .दिवसभरात पुण्याला जाणार्‍या मोजक्याच गाड्या होत्या. डेक्कन एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन. सह्याद्री आणि महालक्ष्मी या कोल्हापूरकडे जाणार्‍या किंवा दक्षीणेकडे जाणार्‍या जयंती जनतेसारख्या गाड्या उपलब्ध असल्या तरी सोयीच्या नव्हत्या.
सरकारच्या भूमिका पण विचीत्र होत्या. एरवी पुण्यासाठी डेडीकेटेड गाडी सुरु करण्यासाठी अनेक अडचणी होत्या घोड्यांच्या शर्यतीसाठी खास गाड्या सुरु करण्याची मानसिकता कायम होती.
पुण्याकडे वाढणारा ट्रॅफीक हाताळण्यासाठी आधी एक नविन गाडी आली सिंहगड एक्सप्रेस .ती पण पुरेशी होईना म्हणून दुमजली डब्यांचाही प्रयोग सुरु झाला पण काही कारणामुळे तो प्रयोगही बारगळला.
मुंबईकर जनतेला पुणे हवेहवेसे वाटत होते. पुण्याला एक घर असावे असे बर्‍याच जणांना वाटत होते पण स्थलांतरासाठी सेकंड ऑप्शन म्हणून पुणे हा विचार मनात आला की प्रवासाची दुविधा हा मोठा अडसर वाटायचा .
हे सगळे प्रयोग करता करता राजकीय अस्थिरतेची काही वर्षे आली. भारताची आर्थीक राजधानी आणि महाराष्ट्राची सांकृतीक राजधानी चा संगम जनमानसात असूनही फक्त १८६ किलोमीटरचे अंतर फार दूरचे वाटायचे.
१९८२ साल. आणिबाणीच्या नंतरची जनता दलाची सत्ता संपुष्टात आली होती. इंदीरा गांधी पुन्हा एकदा सत्तेवर आल्या होत्या. मतदात्यांच्या लोकप्रियतेचा कौल इंदीराजींच्या बाजूने पडला असला तरी असला तरी आणिबाणीच्या अतिरेकाचा सल जनमानसात होताच. याच वर्षी नवव्या एशीयाई खेळांचे यजमानपद भारताने स्विकारले होते. दिल्लीचे गव्हर्नर जगमोहन -बुटासिंग आणि नवनिर्वाचीत राजीव गांधी या त्रिकूटाने रात्रं दिवस मेहेनत करून दिल्लीचा चेहेरामोहरा बदलून टाकला. दिल्लीचे रस्ते रुंद झाले -नविन रस्ते बांधले गेले .अनेक फ्लाय ओव्हर याच दरम्यान बांधून झाले . दिल्ली ट्रान्सपोर्टच्या ताफ्यात नविन २९० बसची भर पडली .
एका एशियाडच्या निमीत्ताने दिल्लीचा चेहेरा मोहरा बदलून टाकला.
नोव्हेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात खेळ सुरु झाले. यजमानपद यशस्वी रित्या पार पडले. भारतासारखा गरीब देशही एक मोठा सोहळा पार पाडू शकतो याची जगाला खात्री पटली. चार डिसेंबरला एशियाडचे सूप वाजले. इंदीराजींची लोकप्रियता कळसाला पोहचली . जनता आणिबाणीचे दिवस विसरली. दिल्लीतली जनता तर नक्कीच विसरली कारण या खेळाने दिल्लीला एकविसाव्या शतकात नेऊन ठेवले.
या खेळात एकूण ४५०० खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यांच्या वाहतूकीसाठी खास बसेस बनवल्या गेल्या होत्या. एशियाड संपल्यावर हा बसचा ताफा एकट्या दिल्लीसाठी अनावश्यक होता म्हणून या बसेस सगळ्या राज्यांच्या हाती सुपुर्द करण्याचा सरकारनी निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या वाट्यातही या बस आल्या. पण पुरेसे पैसे नाहीत या कारणास्तव आलेल्या बस परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जवळजवळ घेतला होता. आंध्र प्रदेश सरकारची नजर या बसवर होतीच. जर महाराष्ट्र सरकार नाकारणार असेल तर त्या बस पण आम्हालाच द्या असा पाठपुरावा त्यांनी दिल्ली दरबारात सुरु केला होता. बस परत करण्याचा निर्णय ऐकल्यावर एक सनदी अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले . येणार्‍या नविन बसची महाराष्ट्राला कशी आवश्यकता आहे हे त्यांनी समजावून सांगीतले पण चर्चा एकाच मुद्यावर अडकत होती .या खरेदीसाठी पैसे आणावे कसे ? बर्‍याच चर्चेनंतर या अधिकार्‍यानी स्पष्ट मत मांडले की पैशाची कमतरता हा मुद्दा नाही आहे. जर आलेल्या बस परत गेल्या तर महाराष्ट्र सरकारवर प्रतिगामीत्वाचा शिक्का कायमचा बसेल. आतापर्यंत जपलेली पुरोगामी राज्य अशी ख्याती पणाला लागेल. पुन्हा एकदा चर्चा नव्याने सुरु झाली. पैशाची जर व्यवस्था जर झाली तर गुंतवणूकीचा परतावा किती वर्षात होईल असा प्रश्न विचारण्यात आला. दूरदृष्टी असलेल्या त्या अधिकार्‍यांनी सरकारला एक योजना सांगीतली आणि पैशाची परतफेड एका वर्षात होईल खात्री दिली . या योजनेनुसार येणार्‍या सर्व नविन बसेस फक्त पुणे -मुंबई -पुणे अशा डेडीकेटेड बस म्हणून धावतील असा निर्णय घेण्यात आला. पुणे -मुंबई धावणार्‍या एशियाड बसच्या जन्माच्या कहाणी आहे ही अशी .एका वर्षाच्या आत ही सेवा फायद्यात चालायला लागली आणि एशियाड हा ब्रँड झाला. .
******************************************
एशियाडनी नक्की काय केले हा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे एशियाडने पुण्यामुंबईतला दुरावा नाहीसा केला आणि आधुनीक पुण्याची मुहूर्तमेढ रोवली. एक भाषीय पुण्याला बहुभाषीय -बहुप्रांतीक हा नविन चेहेरा मिळाला. सिटीची मेगा सिटीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.
एशियाड सुरु झाली तेव्हा एक नविन सोय अस्तित्वात आली पण रस्ते जुनेच होते. या टप्प्याला नविन वळण मिळाले ते नव्या मुंबईचा खाडी पूल सुरु झाल्यावर .
अंतर सरले पण सोयी सुवीधा जुन्याच राहील्या . एसटी स्टँडला उतरल्यावर मुतारी कुठे हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. स्टँडच्या गेटपर्यंत येणारा दुर्गंध आपोआप मार्गदर्शन करत होता.
त्यानंतर आला मोठा बदल म्हणजे मुंबई पुणे अतिजलद महामार्गाचा .
पुणे तीन साडेतीन तासाच्या अंतरावर आले. पुण्याचा संपूर्ण नकाशा बदलला.
औंध -पाषाण -हिंजवडी या शरापासून दूर असलेल्या वस्त्यांचे रुपांतर नविन पुण्यात झाले . आता पुण्याचे दोन चेहेरे झाले. एक जुन्या मुंबई महामार्गाला जवळ असणारे पुणे आणि चांदणी चौकाच्या पलीकडेचे नविन पुणे.
*********************************
एशियाडच्या रुपाने महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाला एक क्रांतीकारी ब्रँड मिळाला होता. टु बाय टु सिटची महामंडळाची ही पहीलीच बस .(त्यापूर्वी फक्त महाबळेश्वरला जाणारी बस टु बाय टु सिटची होती.) पण ब्रँड इक्वीटीचा हवा तसा फायदा महामंडळाला करून घेता आला नाही. एशियाडला मिळणारे यश बघून महामंडळाने तशाच दिसणार्‍या अनेक बस बांधल्या पण फक्त रंग बदलून आणि मऊ सिटा टाकून सगळ्याच बस एशियाड होतात याच समजात महामंडळ राहीले.
एशियाड यशस्वी झाली ती रंगामुळे आणि रुपामुळे नाही तर एशियाड म्हणजे थोडक्या वाढीव किमतीत आरामादायक प्रवासाची सोय या कल्पनेमुळे.
मुंबई पुणे एशियाड हे वाहतूकीच्या सोयीचे नाव होते बसचे नव्हे .
पुण्यामुंबईच्या विकासाला जोड देणारी सेवा म्हणजे एशियाड . महामंडळाने अनेक एशियाड बस सुरु केल्या पण पुण्यासारखा क्रांतीकारी बदल इतर शहरात घडून आला नाही.
एशियाड सामाजीक स्थित्यंतराची एक पायरी होती.
मुंबईच्या गर्दीतून बाहेर पडून नव्या शहरात आयुष्याची नवी किंवा अधिक व्यापक सुरुवात करू इच्छिणार्‍यांना हातात आलेले एक संधी होती. ही संधी एक बसमुळे मिळाली म्हणून एशियाड हा ब्रँड झाला. हा ब्रँड मध्यभागी ठेवून एक नवी उंची गाठण्याची संधी महामंडळाकडे होती. पण असे झाले नाही. महामंडाळाच्या इतर सेवा -त्यांच्या बस स्थानकासकट आहे तशाच राहील्या. एशियाडच्या निमीत्ताने संपूर्ण बदल करण्याची संधी महामंडळाने घालवली.
एकदा या संधीकडे सामाजीक स्थित्यंतराची संधी म्हणून बघीतले तर कदाचीत मला काय म्हणायचे हे स्पष्ट होईल. सामाजीक स्थित्यंतरात माणूस केंद्रस्थानी असतो आणि केंद्रातील या घटकाच्या रहाणीमानातील बदल हे त्या स्थित्यंतराचे माप असते.
सामाजीक स्थित्यंतराच्या चार पायर्‍या असतात पहीली पायरी प्रिडेव्हलपमेंटची .
दुसरी टेक ऑफ -तिसरी अ‍ॅक्सीलरेशन्ची तर चौथी आणि अंतीम पायरी स्टॅबीलायझेशनची . पहीली पायरी महामंडळाच्या स्थापनेने पूर्ण झाली होती. एशियाडच्या रुपाने दुसरी टेक ऑफची पायरी गाठली गेली .तिसरी पायरी वेगाने होणार्‍या बदलाची असते पण दुसर्‍या पायरीकडे स्थित्यंतराच्या नजरेने न बघीतल्यामुळे तिसरी आणि चौथी पायरी महामंडळाला कधीच गाठता आली नाही.
सार्वजनीक क्षेत्रातील अनेक उपक्रम संपून जातात ते टेक ऑफच्या पायरीवरच.
असे होण्याचे कारण :या पायरीवर बदलाचे रुपांतर सोपीकरणाकडे आणि सवंग पर्यायाकडे जाते. सार्वजनीक सेवा या सरकारी मालकीच्या असल्यामुळे सोपीकरण आणि सवंग पर्यायी मार्ग जास्त लोकप्रिय होणे हेच सरकारच्या यशाचे माप समजले जाते. स्थित्यंतराची गाडी इथेच अडते आणि प्रगतीचा मार्ग बंद होतो.
आठवणीतील ब्रँड या लेखात अशियाडचा समावेश करण्यामागे विचार एकच आहे .आजही एशियाड नावाच्या बसेस रस्त्यावरून धावत असल्या तरी खरी एशियाड कधीच इतिहासजमा झाली आहे.
ज्या महामंडळाची सुरुवात केवळ तीस गाड्यांनी झाली त्या महामंडळाकडे आज सोळा हजार गाड्या आहेत. संख्यात्मक बळ महामंडळाकडे आहे परंतू सोळा हजारापैकी चौदा हजार गाड्या अजूनही लालडबा या कॅटेगरीतच आहेत. बदल घडत गेले पण ते सर्वांगीण बदल झाले नाहीत. लालडब्यामुळे अजूनही प्रवाशांची दुफळी एशियाड वाले आणि लालडबावाले अशी आहे. एक बस हॅव वाल्यांची आणि दुसरी हॅव नॉट वाल्यांची.
टेक ऑफच्या पायरीवर सवंगीकरण आणि सोपीकरण झाल्यावर हा फरक राहणारच आहे.
जी स्थिती प्रवाशांची तीच गती चालक आणि वाहकांची. रस्ते चार पदरी-दहा पदरी होतील . बर्‍याच बस वातानुकुलीत होतील. पण बदलाचा फायदा सर्वत्र एक सारखा पोहचणार नाही .
संतोष मानेसारखी एखादी घटना झाल्यावर वाटते की बस गुळगुळीत रस्त्यावरून वेगाने धावत राहील पण चालक आणि वाहक त्याच रस्त्यावरून फरफटतच जातील

इतिहासविचार

प्रतिक्रिया

तुम्हाला कोपरापासून हात जोडून दंडवत.
प्रतिसाद देण्याचीही कुवत नाही माझ्यात.
लेखाचा शेवट वाचून कसंसच झालं.

क्या बात है... फार सुंदर.. हे काही वेगळं सांगायला नको.

एशियाड ही पुशबॅकपेक्षाही पाठीला जास्त छान वाटायची हे माझं व्यक्तिगत मत..

>>>चालक आणि वाहक त्याच रस्त्यावरून फरफटतच जातील..

अंगावर शहारा आला हे वाचून..

परवाच कुठेतरी वाचले, आजही (मुंबई बाहेरच्या) चालक आणि वाहकांचा मुंबई मुक्काम भत्ता १२ रू आहे.. या भत्त्यात १ वडापाव आणि १ चहा सुध्दा येत नाही. :-(

सर्वसाक्षी's picture

2 Mar 2012 - 9:23 pm | सर्वसाक्षी

इतक सोप करुन सांगितलत, की हे सगळे सरकारी डोक्यात का शिरले नाही असा संतापजनक प्रश्न पडावा. एशियाड हा ब्रँड होता खरा. सुमार लाल डब्यापेक्षा कोरीकरीत हिरवी पांढरी एशियाड नक्कीच सुखावणारी होती. किंबहुना पुणे मुंबई दळणवळणाचा तो पाया होता. आज जे वोल्वोचे कौतुक आहे ते तेव्हा एशियाडला लाभले आणि मध्यमवर्गीयांच्या मुंबई-पुणे प्रवासाचे ते एक अविभाज्य अंग होते.

असो. अखेर सरकारे धोरणामुळे जे व्हायचे तेच झाले. खाजगी हॉटेले चालतात आणि सरकारी पर्यटनगृहे डबघाईला येतात तेच महामंडळाचे झाले. दुर्दैव आपले!

चिरोटा's picture

2 Mar 2012 - 9:32 pm | चिरोटा

सुंदर लेख. एशियाड यायच्या आधी "मुंबई-पुणे-मुंबई' लिहिलेल्या टॅक्स्या दादरवरून सुटायच्या. चार माणसे भरल्याशिवाय टॅक्सी सुटत नसे. एशियाड आल्यानंतर ह्यांची गुर्मी कमी झाली.

एशियाड ही पुशबॅकपेक्षाही पाठीला जास्त छान वाटायची हे माझं व्यक्तिगत मत

+१

प्रदीप's picture

4 Mar 2012 - 7:49 pm | प्रदीप

ह्या दोन सेवा होत्या व त्या दोन वेगवेग्ळ्या संस्थांनी चालवल्या होत्या. मुंबईत प्रीतम हॉटेलच्या समोरून सुटणार्‍या टॅक्सीजची सेवा मुंबईच्या (तेव्हाच्या प्राम्युख्याने शीख ड्रायव्हरांच्या) टॅक्सी- युनियनतर्फे चालवली जाई. पुण्याच्या टॅक्सी युनियनने चालवलेली सेवा हिंदू कॉलनीतून सुरू होई.

एशियाड आल्यानंतर ह्यांची गुर्मी कमी झाली.

गुर्मीचा संदर्भ समजला नाही. 'चार माणसे आल्यावरच टॅक्सी सुटेल' ह्यात गुर्मी कसली?

लेखात लिहील्याप्रमाणे डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस ह्या दोनच मुंबई- पुणे धावणार्‍या गाड्या तेव्हा असल्याने, ह्या टॅक्सीजनी मध्यमवर्गीयाला प्रथमच चांगली पर्यायी सेवा उपलब्ध करून दिली. माझ्या आठवणीनुसार सुरूवातीस, १५ ~ १८ रूपये माणशी इतके माफक भाडे होते.

ह्या दोन्ही सेवांत अपघाताचे प्रमाण अत्यल्प होते, जवळजवळ नव्हतेच असे म्हटले तरी चालेल. एशियाडच्या ह्या खरे तर 'प्रीकर्सर' सेवा होत्या.

लेख नेहमीप्रमाणेच चांगला आहे, पण मूळ थीमपेक्षा बर्‍याच मोठ्या आवाक्याचा असल्याने काहीसा विस्कळीत झाला आहे, असे वाटले.

अवांतरः

ह्या टॅक्सीसेवा उपलब्ध व्हायच्या अगोदर मुंबई- पुणे प्रवास पूर्वी जेव्हा आगगाडीनेच प्रामुख्याने करावा लागे, तेव्हा त्या प्रवासाची काही ठळक वैशिष्ट्ये होती: कर्जतला मिळणारा दिवाडकर ह्यांचा प्रसिद्ध बटाटेवडा (मुंबईत, छबिलदासच्या नजिकचा श्रीकृष्णचा बटाटेवडा सत्तरीच्या दशकातला, दिवाडकरांचा वडा त्याअगोदर किमान दोन दशके मिळू लागला होता). माझ्या लेखी तेव्हाच काय, अजूनही, बटाटेवडा व दिवाडकर ही नावे सिनोनीमस (मराठी प्रतिशब्द?) आहेत. किंबहुना दिवाडकर ह्या आडनावाचा उल्लेख झाला, की सदर व्यक्ति कर्जतला बटाटेवडे करत असेल व स्वतः ते भरपूर खातही असेल, असेच वाटावे! नंतर पुढे रम्य घाट, बोगदे मोजत जाणे, 'अमृतांजन'चे मोठे नाव असलेला पूल, आणि मग लोणावळ्याची मगनलाल चिक्की!

मोदक's picture

4 Mar 2012 - 11:33 pm | मोदक

सिनोनीमस (मराठी प्रतिशब्द?)

पूरक
अनुरूप

धन्या's picture

2 Mar 2012 - 9:34 pm | धन्या

छान लेख काका.

तुमचा हा लेख लोकप्रभामध्ये येणार आहे हे लोकसत्ताच्या जाहीरातीवरुन कळले होते. त्यानुसार या आठवड्याचा लोकप्रभा घ्यायचा असं ठरवलं होतं. लगेच नाही जमलं.

पण आता तुमचा लेख इथे वाचायला मिळाल्यामुळे लोकप्रभा क्यान्सल. :)

अन्या दातार's picture

2 Mar 2012 - 9:54 pm | अन्या दातार

शब्द नाहीत.

आत्मशून्य's picture

2 Mar 2012 - 10:55 pm | आत्मशून्य

नि:शब्द...

रघु सावंत's picture

2 Mar 2012 - 11:20 pm | रघु सावंत

सर छान जमतं तुम्हांला आणी तुम्हालाच

सुहास झेले's picture

3 Mar 2012 - 12:16 am | सुहास झेले

नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख... प्रचंड आवडला :) :)

अर्धवटराव's picture

3 Mar 2012 - 1:09 am | अर्धवटराव

किती मस्त एक एक पदर उलगडुन दाखवता रामदासजी. अनुभवाचे दुध सगळ्यांकडेच असते.. पण त्याचे दही-लोणी-तूप-पनीर वगैरे बनवुन लज्जतदार आणि पौष्टीकीकरण फार थोड्यांना जमते.
__/\__

अर्धवटराव

गणपा's picture

3 Mar 2012 - 2:38 am | गणपा

काकांचा बटवा उघडला की 'घेता किती घेशील दो करांनी....' अशी अवस्था होते.

मराठमोळा's picture

3 Mar 2012 - 3:05 am | मराठमोळा

>>काकांचा बटवा उघडला की 'घेता किती घेशील दो करांनी....' अशी अवस्था होते.
+१०००
_/\_०_

पाषाणभेद's picture

3 Mar 2012 - 5:42 am | पाषाणभेद

या लेखाच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्या आशियाड बस (निमआराम बस सेवा) चा इतिहास अन ती बस चालू होण्याची कहाणी समजली.

फारच उत्तम लेख. एसटी विषयी मनात एकप्रकारची आपुलकीची भावना आहे. त्यामुळे लेख भावला.

>>संख्यात्मक बळ महामंडळाकडे आहे परंतू सोळा हजारापैकी चौदा हजार गाड्या अजूनही लालडबा या कॅटेगरीतच आहेत.

संपुर्ण महाराष्ट्रभर एसटी महामंडळ बसेस फिरवते. त्यापैकी मोठ्या शहरांदरम्यान आशियाड बस (निमआराम बस सेवा)सेवा देते आहे. ग्रामिण भागात अजूनही लाल बसेचच धावतात. तेथे सुखकर प्रवासाची अपेक्षा नसली तरी प्रवास हा गरजेचा असतो. तेथे खाजगी बसेस, एशियाड चालणार नाहीत. त्यामुळे संख्येच्या दृष्टीने लाल बसेस जास्त असणेच चांगले आहे.

लिखाण नेहमीप्रमाणे उत्तम, हा इतिहास माहित नव्हता, माझी अशी कल्पना होति की एशियाड निमित्त सगळ्या भारतातच अशी सेवा सुरु केली होती सरकारने.

श्रावण मोडक's picture

3 Mar 2012 - 9:31 am | श्रावण मोडक

एशियाडच्या निमीत्ताने संपूर्ण बदल करण्याची संधी महामंडळाने घालवली.
एकदा या संधीकडे सामाजीक स्थित्यंतराची संधी म्हणून बघीतले तर कदाचीत मला काय म्हणायचे हे स्पष्ट होईल. सामाजीक स्थित्यंतरात माणूस केंद्रस्थानी असतो आणि केंद्रातील या घटकाच्या रहाणीमानातील बदल हे त्या स्थित्यंतराचे माप असते.
सामाजीक स्थित्यंतराच्या चार पायर्‍या...सार्वजनीक क्षेत्रातील अनेक उपक्रम संपून जातात ते टेक ऑफच्या पायरीवरच. असे होण्याचे कारण : या पायरीवर बदलाचे रुपांतर सोपीकरणाकडे आणि सवंग पर्यायाकडे जाते. सार्वजनीक सेवा या सरकारी मालकीच्या असल्यामुळे सोपीकरण आणि सवंग पर्यायी मार्ग जास्त लोकप्रिय होणे हेच सरकारच्या यशाचे माप समजले जाते. स्थित्यंतराची गाडी इथेच अडते आणि प्रगतीचा मार्ग बंद होतो.

अगदी नेमके निरिक्षण. ब्रँडवरच्या लेखनाचा हा प्रवास रुक्ष अर्थकारणाबाहेर जाऊन अशा गोष्टी टिपत जातो याची आवर्जून नोंद घेतली पाहिजे. या गोष्टी निव्वळ रंजक असू शकतात. पण त्या केवळ त्याच स्तरावर न ठेवता त्यापलीकडे माणसाशी असलेलं त्याचं हे नातं अधिक तपशिलात आलं पाहिजे आणि ते लिहिण्यास रामदास समर्थ आहेत. लिहितील का? पाहू... :)
आपल्या प्रत्येक निर्णयानं सामाजिक स्थित्यंतर होणार आहे याचं भान अनेक सरकारी निर्णयात नसतं. त्यामुळं तुम्ही मांडलेल्या चार पायऱ्या वगैरेंचा विचार होत असेलच असं मानणं भोळसटपणाचं ठरेल. स्थित्यंतराचं एकच लक्ष्य असतं - भौतीक. ते साध्य होतंय का, मग झालं... असा पवित्रा सरकारचा असतो. सरकार आणि समाज वेगळे नाहीत. समाजही तेच करत असतो. आत्ता इथं या लेखनावर शेवटच्या वाक्यानं हादरलेले काही जण दिसतात. त्यापलीकडं त्यांच्या मनात काही उमटलं नसेल का? एशियाडचा प्रवास हा एकेकाळी प्रतिष्ठेचा मानला जात होता. प्रतिष्ठेच्या संकल्पनाही बदलत गेल्या असाव्यात, या गोष्टी बदलत गेल्या तशा. एशियाडमधला बदल तुम्ही जसा टिपला तसा तो इतर अनेकांना दिसला का? अगदी रोजच्या जगण्यातल्या या गोष्टींकडं किंचितशाही चौकसपणे पाहिलं जात नाही का? जातं... पण ते बुद्ध्याच केलं जात नसावं. आणि मग या स्थित्यंतराचं महत्त्व निसटत असावं. मग सरकार नामक चीज धोपटायला सोपी जातेच. आम्ही आणि तुम्ही!
पुण्यात बीआरटी आणायची होती त्यावेळी दक्षिण अमेरिकेतल्या ज्या शहरात तशी योजना पहिल्यांदा राबवली गेली, तेव्हाच्या तिथल्या महापौरांना (अर्थात, तिथं या पदाचं स्वरूप वेगळं) बोलावलं होतं. त्यांनी आल्या आल्या सांगून टाकलं, बीआरटीनं वाहतूक सुधारत नाही. त्यासाठी सार्वजनिक वाहतूकच सुधारली पाहिजे. पुण्यात बीआरटीचे ट्रॅक केले, आधीच असलेल्या रस्त्यांवर. पीएमटी तशीच राहिली. वाहतूक सुधारली तर नाहीच. पुण्यातल्या दुचाकींची संख्या तशीच वाढते आहे. बीआरटी हे सामाजिक स्थित्यंतराचं वाहन ठरलं असतं. पण समाज तरी (काही अपवाद होते, पण अपवादच) त्याकडं कुठं चौकसपणानं पाहतो? सरकारकडं जे नव्हतं ते समाजाकडंही नव्हतंच. मग कसलं सामाजिक स्थित्यंतर आणि काय! त्याचं व्यवस्थापन वगैरे तर लांबच.

त्यापलीकडं त्यांच्या मनात काही उमटलं नसेल का?
हो, उमटलं. पण ते अचूकतेनं लिहिता यायला हवं. तसं न झाल्यास चर्चा वेगळ्या अंगानं जाते आणि मूळ मुद्दा स्पष्ट करायला मीच कमी पडले असं बराचवेळ वाटत राहिलं असतं. त्यापेक्षा समोरासमोर चर्चा बरी.;) मला असं म्हणायचं नव्हतं किंवा या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता असं तरी सांगता येतं.
एकेकाळी हा प्रवास प्रतिष्ठेचा मानला जायचा हेच लिहिणार होते पण रामदासांचा लेख वाचून संपला की गप्प बसावसं वाटतं त्याला काय इलाज?:) नुसता एशियाडच नव्हे तर सिंहगड नवीन सुरु झाल्यावर त्यानं येणार्‍या नातेवाईकांकडं मोठ्या आदरानं पाहिलं जायचं. एकमेकात (पारावरल्या) गप्पा मारताना मंडळी जेंव्हा घड्याळात बघत, आण्णा सिंहगडनं यायचाय किंवा वहिनी सिद्धेश्वरनं येणारेत, घ्यायला जायचय, अजून कोणीतरी झेलमनं येणार म्हटलं की बाकीचे त्या बुवा/बाईकडंही आदरानं पहात असत. तिकडेही कोण कुठल्या स्टेशनवर चढणार, इथे कुठे उतरणार असं सांगितल्यावर गावांची इतरांनी कधी न ऐकलेली नावं हमखास आदराचे चार कटाक्ष मिळवून द्यायची. (या गोष्टी घडत असतानाचा काळही महत्वाचा. इथल्या कितिकांची वयं जाणती असणारेत?) पण या डोळ्यासमोर असलेल्या गोष्टी तुमच्या किंवा रामदासांच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून द्यायला मी तरी धजावत नाही........अगदी तुम्ही माझी कितीही मस्करी करता (आणि मला प्रतिसाद देत नसलात) तरी.;)

पुण्यात बीआरटीचे ट्रॅक केले, आधीच असलेल्या रस्त्यांवर. पीएमटी तशीच राहिली. वाहतूक सुधारली तर नाहीच. पुण्यातल्या दुचाकींची संख्या तशीच वाढते आहे. बीआरटी हे सामाजिक स्थित्यंतराचं वाहन ठरलं असतं.
बी आर ती च्या नावाने पुणेकरांच्या हातात एक फसवणूक आली. पुण्यातली बी आर टी आणि अहमदाबादमधील बी आर टी यांची तुलना केली तर अहमदाबाद मधील बी आर टी वाहतुकीची शिस्त ही वाखाणण्याजोगी आहे. बंदीस्त बसस्टेशन आनि बसेस ची फ्रेक्वेन्सी या बाबतीत अहमदाबादमधे बी आर टी एक आदर्श व्यवस्था झालेली आहे. पुण्यातील बी आर टी व्यवस्थेचे नक्की काय झाले आहे ते मनपा लाच ठाऊक.

रामदासकाकांचं लिखाण आपण नुसतं वाचायचं असतं.
संगीतकाराचं संगीत सादर करणं, गायकानं गाणं, एखाद्या चित्रकारानं चित्र काढणं नी आईस स्केटींग करणार्‍या त्या जोडप्यानं डान्स करणं . काय उपमा द्याल ती कमीच.

वरच्या गुळगुळीत रस्त्यांबरोबरच स्थित्यंतरासंदर्भात ९३ च्या बॉम्बस्फोटांमुळं देखील मुंबईकरांचा रिटायरमेंटनंतरचं आयुष्य पुण्यात शांततेत जावं असा दृष्टीकोन होता.

त्याहून जास्त एक्स्प्रेस वे आणि सगळ्यात जास्त भाजप सरकारची सगळ्यात मोठी 'सुवर्ण चतुष्कोन' योजना पूर्ण भारताचं समाजकारण, अर्थकारण बदलायला कारणीभूत ठरली आहे. सगळ्या शहरांचे सिटी सेंटर्स या महामार्गानं बदलले आहेत. गावकुसाबाहेरच्या रस्त्यामुळं गावच कडेला जाऊन या हमरस्त्याभोवती वस्त्या, दुकानं, त्या अनुषंगानं येणार्‍या सगळ्याच इतर गोष्टी आल्या. टोलनाके, पेट्रोल पंप वाढले, सहा महिन्यातनं कधी तरी गावी जाणारा नोकरदार माणूस वाहतुकीच्या व्यवस्थेमुळं महिन्या पं धरा दिव्सातनं जा ये करु लागला.

गावाबाहेरच्या ज्या जमिनी ओसाड पडल्या होत्या, पाणी नव्हतं, अ‍ॅक्सेस नव्हता म्हणून कधी भाव नव्हता त्यांना अचानक सोन्याहून जास्त भाव आलाय. काल पर्यंत दूध, भाजी विकणारा अडाणी माणूस अचानके कोट्याधीश झाला, कदाचित त्यामुळं सगळ्या राहिलेल्या स्वप्नांना मिळालेलं बळ, त्यातून आलेला माज आणि त्यामु ळं पैसा नी फक्त पैसा याला आलेलं महत्त्व!
सगळं समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण देखील बदललं गेलंय.

नितिन थत्ते's picture

3 Mar 2012 - 11:03 am | नितिन थत्ते

लेख आवडला. (तपशीलातल्या काही चुका सोडून).

एशियाडने एसटीचा कायापालट होण्याची संधी होती ती एसटी ने गमावली हे म्हणणे अर्धसत्य आहे असे मला वाटते. याचे कारण नव्या अर्थव्यवस्थेचा रेटा हे होते.

एखाद्या संस्थेने बाजारात स्पर्धाही करावी आणि सेवाभावीही असावे हे शक्य नसते.

फारएन्ड's picture

3 Mar 2012 - 11:10 am | फारएन्ड

यातील थोडीशी माहिती होती पण बरीच नवीन कळाली.

एक छोटा बदलः 'सिंहगड' च्याच वेळेस पूर्वी एक 'जनता एक्सप्रेस' होती. बहुधा नावाप्रमाणे ती पूर्ण सेकंड चे डबे असलेली गाडी (नंतर बराच काळ सिंहगडही तशीच होती). ती नक्की केव्हा चालू झाली ते माहीत नाही. मग ७० च्या दशकात कधीतरी तिच्या ऐवजी एक डबल डेकर गाडी होणार अशी बातमी आली. तेव्हाही डबल डेकर डबे बोगद्यांतून कसे जाणार वगैरे चर्चा चालायची. पण त्यांनी त्यावर मार्ग काढला. त्या डब्यांतून जायला मजा वाटायची. इतरही गाड्यांना एक दोन तसे डबे लावायचे तेव्हा. मग का बंद केले माहीत नाही. नंतर तो 'रेक' दौंड शटला वापरत, कदाचित अजूनही असेल. परदेशात 'कम्युटर ट्रेन्स' बघितल्या की हमखास पूर्वीची 'सिंहगड' आठवते.

पूर्वी हे ही माहीत होते की फक्त पुणे-मुंबई मधेच २-२ सीटस वाल्या एशियाड आहेत. इतर ठिकाणी ज्या आहेत त्या ३-२ वाल्या. आता हा लेख वाचून जाणवते की कदाचित त्या २-२ वाल्याच 'खर्‍या' एशियाड असतील आणि इतर त्या नंतर महामंडळाने बनवलेल्या.

पुण्याचा पूर्वीचा विस्तार व ट्रॅफिक हे एकूण कोठूनही स्टेशनला जाऊन गाडीने मुंबईला बर्‍यापैकी सहज जाता येइल इतपतच असावे (पण औंध व इतर काही ठिकाणाहून होणारे रिक्षाचे भाडे आणि रेल्वेचे अनारक्षित तिकीट हे साधारण सारख्याच किंमतीला पडायचे ते आठवते). एशियाड व नंतर इतर पर्याय निर्माण झाल्यामुळे स्टेशनला जायची गरजच पडत नाही. आता कोथरूड, पौड रोड वगैरे भागात राहणारा माणूस दादर, बोरिवली, ठाणे वगैरेला जायला तेथून अर्धा पाऊण तास (आणि १००-१२० रू) घालवून स्टेशनला जाऊन मग तेथे जिने वगैरे चढून उतरून (कारण पूर्वी पुण्याच्या हुकुमी गाड्या प्लॅ. नं १ लाच असत, आता डेक्कन एक्सप्रेस वगैरे मधल्याच प्लॅटफॉर्मवरून सुटतात) मग गाडीचा डबा शोधून जाण्यापेक्षा पौड रोड वरून थेट गाडी पकडतो आणि दुसर्‍या शहराच्या मध्यवर्ती भागात उतरतो. बरोबर कुटुंब व बरेच सामान असणार्‍यांना ते जास्त सोयीचे वाटते. याची सुरूवात या एशियाडनेच झाली असावी. रेल्वेच्या सेकंडच्या तिकीटापेक्षा बरेच महाग व एसी चेअर कार पेक्षाही थोडेसे जास्त असलेले तिकीट काढणारा वर्ग निर्माण झाला तो एशियाड मुळे की एशियाडला (आणि नंतर मेट्रोलिंक, शिवनेरीला) त्याचा फायदा मिळाला कोणास ठाऊक!

आणखी एक म्हणजे तेव्हा एशियाड हे "रॉयल" अर्थाने वापरले जायचे. आता 'शिवनेरी' त्यापेक्षाही चांगली समजली जाते. इतरत्र बर्‍याच ठिकाणी अस्सल मराठी नावे ही डाऊनमार्केट समजली जास्त असताना आपल्या इतिहासातील एक प्रमुख नाव लोकांना आवडणारा ब्रॅण्ड झाला आहे :)

एशियाड काय किंवा दुमजली सिंहगड एक्सप्रेस काय? या दोन्ही अत्यंत नव्या आणि चांगल्या संकल्पना होत्या. त्या सर्वप्रथम राबवणार्‍यांचे कौतुक आहे. पण पुढे या दोन्ही संकल्पना (किंवा अशा चांगल्या संकल्पना) नेहमीच बारगळत जातात. नव्याचे नऊ दिवस. मग पुन्हा येरे माझ्या मागल्या. याचे तर दु:ख आहेच.
जास्त दु:ख वाटते ते याचे की काही जुन्या आणि चांगल्या गोष्टीही आपण टाकून दिलेल्या आहेत/देत आहोत. उदा. ऐंशी सालापर्यंत बेस्ट किंवा एस्टी थांब्यावर लोक रांगेतच उभे रहात आणि रांगेनेच आत चढत. स्टँडवर बस लागली रे लागली की खिडकीतून रुमाल टाकणे, दरवाजाजवळ जीवन-मरणाचा संघर्ष असल्याप्रमाणे धुमश्चक्री करणे असले प्रकार होत नव्हते. (अगदी एक खांब आणि एक पाटी असा थांबा असला तरी.) बेस्ट/पीएमटी सारख्या शहरी बसेसमध्ये लोक फक्त मागच्या दरवाज्यानेच चढत आणि फक्त पुढच्या दरवाजानेच उतरत.
लोक बसच्या टपावरून प्रवास करतात, दरवाजावर घुसाघुशी होते, रिझर्वेशनला कोणीच भीक घालत नाही हे महाराष्ट्रात घडत नाही तर यूपी-बिहार-राजस्थानमध्ये घडते असा आमचा त्याकाळचा ठाम समज होता.या बाबतीत आता जे चित्र दिसते ते भारताचे (महाराष्ट्राचे) 'बिमारूकरण' आहे.
म्हणून शिस्तबद्ध महाराष्ट्र हाही एक 'अस्तंगत ब्रँड' आहे असे म्हणावेसे वाटते.

सुदैवाने (आता असेच म्हणायला हवे) सत्तरच्या दशकातली मुंबई अनुभवली आहे, सुरुवातीच्या अशोक लेलँडच्या 'वरिजनल' एशियाडमधून आणि सुरुवातीच्या वरिजनल (दोनमजली - तेही वरच्या मजल्यावर बसून) सिंहगड एक्सप्रेसमधून मुंबई-पुणे प्रवास करायला मिळाला आहे. ती मुंबई कुठे हरवली देव जाणे - ती सिंहगड एक्सप्रेस का बंद पडली देव जाणे. मला वाटते वापीला जाणारी एक्सप्रेस अजूनही दुमजली असावी. (आहे का, रामदासजी?)
मुंबई आठवते ती रहदारीची शिस्त असलेली. मुंबईच्या रहदारीच्या शिस्तीचा मनात एक अभिमान दाटून यायचा. सिग्नलवर मूर्खासारखे लेन कटिंग करणार्‍या वाहनांना पोलिस पकडत असत. प्रत्येक प्रकारच्या (दुचाकी/चारचाकी) वाहनांसाठी वेगळ्या लेन्स होत्या आणि त्या पाळल्या जात. चालत्या माणसाचे चिन्ह असलेला हिरवा दिवा लागला की मगच रस्ता ओलांडायचा. इतरवेळी मधूनच रस्ता ओलांडणार्‍यांना 'गावंढळ येडं' अशा दृष्टीने पाहिले जाई. मुंबई हाच एक पॉश ब्रँड होता तेव्हा. आता तोही अस्तंगत. :(

गणपा's picture

3 Mar 2012 - 1:18 pm | गणपा

मला वाटते वापीला जाणारी एक्सप्रेस अजूनही दुमजली असावी. (आहे का, रामदासजी?)

हो बहुतेक त्या (सिक्स अप) गाडीचे काहीच डबे अजुनही दुमजली आहेत.

(लहानपणी डब्बल डेक्कर सिंहगडने प्रवास करण्याच भाग्य लाभलेला) गणा

कुंदन's picture

3 Mar 2012 - 4:30 pm | कुंदन

'वरिजनल' दुमजली सिंहगड एक्सप्रेस वरुन कर्जतच्या ,कागदी पिशवीत मिळणार्‍या 'वरिजनल' "दिवाडकर वड्यांची" आठवण आली.

स्वातीविशु's picture

3 Mar 2012 - 12:57 pm | स्वातीविशु

सामाजीक स्थित्यंतराच्या चार पायर्‍या असतात पहीली पायरी प्रिडेव्हलपमेंटची .
दुसरी टेक ऑफ -तिसरी अ‍ॅक्सीलरेशन्ची तर चौथी आणि अंतीम पायरी स्टॅबीलायझेशनची .

हे निरीक्षण खुप आवडले आणि पट्लेसुद्धा. :)

एशियाडचा इतिहास आजपर्यंत माहित नव्हता. आज रामदास काकांच्या अप्रतिम लेखामुळे कळला. मुंबईतून जुळ्या मुंबईत येणेजाणे पुर्वी फारच त्रासदायक असायचे, वाशी - मानखुर्द खाडी पुल सुरु झाल्यापासून हा प्रवास खुप सुखकर आणि वेगवान झाला. हे बर्‍याच जुन्या लोकांकडून एकण्यात आले आहे. :)

काकांचे लेख खरच खुप वाचण्यासारखे आणि माहितीपुर्ण असतात. त्यांनी लिहित रहावे आणि आम्ही वाचत रहावे असेच वाटते. :):)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Mar 2012 - 1:59 pm | निनाद मुक्काम प...

लेख मनापासून भावला.

गाव तेथे एसटी असे एकेकाळी एसटी चे घोषवाक्य होते.

पण एसटी महामंडळाने त्यांच्या लौकिकाला व जनतेशी असलेल्या बांधिलकीशी इमान राखले नाही.

ह्यातून खाजगी कंपन्याचे फावले. सध्या पुणे मुबई मार्गावर हे जनतेला लुटत आहेत.

अमोल केळकर's picture

3 Mar 2012 - 5:01 pm | अमोल केळकर

मस्त मस्त लेख

अहूनही त्या हिरव्या एशियाडची सर ' शिवनेरी' ला येत नाही

अमोल केळकर

दिपक's picture

3 Mar 2012 - 5:29 pm | दिपक

एशियाड बसच्या जन्माची कहाणी आज पहिल्यांदा कळाली आणि बरीचशी नविन माहिती मिळाली. महाराष्ट्रातील गावा-खेड्यात आजही सर्वसामान्यांसाठी एस.टी ही लाईफ-लाईन आहे त्यात सुधारणा व्हाव्यात हे नेहमी वाटते. लेख खुप आवडला काका.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Mar 2012 - 8:04 pm | भाग्यश्री कुलकर्णी

हा लेख वाचताना माझ्या मामानी अजुन एक आठवण सांगीतली. ७० च्या पुर्वार्धात हैदराबाद सिकंदराबाद सह महाराष्ट्रात नाशिक नाशिकरोड मार्गावर ट्रेलरबस धावत होत्या.पुढच्या बसमध्ये चालक वाहक तर मागील बसमध्ये वाहक अशी स्थिती असायची. मागच्या वाहकाने बेल,डबल बेल दिल्यावर बस पुढे जायची.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Mar 2012 - 8:10 pm | भाग्यश्री कुलकर्णी

त्याचप्रमाणे १९६८-६९ साली हैद्राबाद सिकंदराबाद या शहरामध्ये दिल्ली परिवहनची डबलडेकर बस वानगीदाखल दिल्लीहुन चालवत हैद्राबादला आणली.अशी आठवण आमचे मामा दत्तात्रय बेहेरे यांनी सांगितली.(ते या काळात तिथे वास्तव्यास होते.)

प्राजु's picture

4 Mar 2012 - 7:12 am | प्राजु

धिस इज रामदास काका!!
हॅट्स ऑफ!!

लेखक म्हणून तुमचं नाव वाचलं की, अधाशासारखी त्या लिंकवर क्लिक होते. :)

जाई.'s picture

4 Mar 2012 - 9:55 am | जाई.

+१

पूर्णपणे सहमत

टिनटिन's picture

4 Mar 2012 - 11:58 am | टिनटिन

हा दुवा येष्टीवेड्यानी एकदा पहावाच.
http://laldabba.blogspot.in/

तिमा's picture

4 Mar 2012 - 6:23 pm | तिमा

पूर्वी, रेल्वेला एक चांगला पर्याय म्हणून एशियाडने पुण्याला जायचो. आता 'कंपल्शन' मुळे वोल्व्हो, शिवनेरी यांनी प्रवास करतो. याला कारण रेल्वे! त्यांनी सेकंड क्लासमधे तीन तीन सीटची जी रचना केली आहे, त्यात माझ्यासारखी तीन माणसे बसणे अशक्य आहे. खिडकीशी बसलो तर अर्धे अंग खिडकीबाहेर आणि हातावर त्या खिडकीच्या खालच्या दोन रेघांचे डिझाईन उमटते. मधे बसलो तर सँडविच होते. बाहेरच्या बाजूला बसलो तर वेटर, फेरीवाले यांचे धक्के. मागे एकदा, दोन्ही टोकाला दोन ललना आपापल्या जागा सोडायला वा सरकायला तयार नसल्यामुळे , त्यांच्या मधे वडापाव मधल्या अर्ध्या बाहेर आलेल्या वड्यासारखा बसलो होतो, त्यामुळे माझे दोन्ही गुडघे समोरच्या माणसाच्या गुडघ्यांशी संपूर्ण प्रवासभर बुद्धिबळ खेळत होते. तेंव्हापासून रेल्वेने पुण्याला जाण्याचे सोडले.

बोका-ए-आझम's picture

30 Sep 2015 - 8:04 am | बोका-ए-आझम

बसच्या प्रवासातून मुंबई आणि पुण्याच्या सामाजिक स्थित्यंतराचा भेदक लेखाजोखा फक्त रामदासकाकाच मांडू शकतात. जबरदस्त विश्लेषण रामदासकाका! __/\__

वेल्लाभट's picture

30 Sep 2015 - 12:30 pm | वेल्लाभट

क्लास लेख...
हे माहिती नव्हतं खरंच....

पण .... निम-आराम हीच एशियाड असं समजून म्हणतो, खरोखर, मला शिवनेरी पेक्षाही निम-आराम २*२ च्या सीट जास्त आरामदायक वाटतात. आणि तीच जास्त आवडते मला.

आणि लालडब्याची मजाच न्यारी. नो कंप्यारिजन.

हेमंत लाटकर's picture

30 Sep 2015 - 12:57 pm | हेमंत लाटकर

छान लेख.

दिवाकर कुलकर्णी's picture

30 Sep 2015 - 1:55 pm | दिवाकर कुलकर्णी

आप्पू हत्ती एशियाड खेलाचं मानचिन्ह होतं, गुटगुटीत, बालसेदार
व्यक्तिला आप्पू म्हणायचे आमच्या एका साहेबाला सगलेजण आप्पू म्हणायचे,
तसी एशियाड मोकली ढाकली व आरामदायक होती
व आहे प्रवासाचा श्रम जाणवत नाही,जेष्ठत्वाचा शिक्का बसल्यावर तांबडा डबा
आयुष्यातून वर्ज झाला
असो ,रामदासजी आपण नक्की एकच व्यक्ति आहात का हो?
आचार्य अत्रे ,नावांच्या अनेक व्यक्ती असतील असं भविष्यात लोकं
म्हणतील असा एक प्रवाद होता, त्याच्या बहुआयामी व्यक्ती मत्वामुलं,
रामदासजी तुम्हाला त्रिवार कुर्निसात!!

NAKSHATRA's picture

23 Jan 2021 - 8:40 am | NAKSHATRA

बसच्या प्रवासातून मुंबई आणि पुण्याच्या सामाजिक स्थित्यंतराचा भेदक लेखाजोखा फक्त रामदासकाकाच मांडू शकतात. जबरदस्त विश्लेषण रामदासकाका! __/\__