सावळ्याश्या सावळीला, सावळ्याचा ध्यास आहे
सांग कां तो सावळ्या रंगी, निळासा भास आहे
भेट होता, सावळी ती जाहली कांती तुझी गं
गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे
माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी
गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे
सावरुनी घे जिवाला, काय हा वेडेपणा गं
लाजलाजूनी उरी हा, मोहणारा श्वास आहे
मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला
जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(११/१२/२०११)
मात्रा: गालगागा गालगागा गालगागा गालगागा
वृत्त: व्योमगंगा
प्रतिक्रिया
13 Dec 2011 - 10:43 am | फिझा
अप्रतिम कव्यारचना !!!!
13 Dec 2011 - 10:49 am | विदेश
माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी
गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे ...
खास आहे !
13 Dec 2011 - 10:53 am | रामदास
कविता आवडली .
मी निळ्या नसलो तरी कवितेने बर्याच गोरट्यांची आठवण करून दिली आहे.
13 Dec 2011 - 11:09 am | प्रशांत
बर्याच गोरट्यांची
कविता (काव्य) आवडली
13 Dec 2011 - 11:28 am | गवि
मस्त... सुरेख.
शेवटच्या कडव्याची पहिली ओळ सोडली तर वृत्तातही चपखल..
मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला
मला वाटतं, वृत्तातही ही ओळ तांत्रिकदृष्ट्या बसते आहे.
पण "न्ह्या" या तीनाक्षरी जोडाक्षराने उच्चारी ताण बसतो आहे.. वृत्तात म्हणताना नेमके "न्ह्या" वर तोडावे (जोर देण्याचे ठिकाण) लागत असल्याने टोचरा कोपरा झाला असावा..
हे एरवी जाणवायचं अजिबात कारण नव्हतं. पण बाकीच्या ओळी मऊ लोण्यासारख्या स्मूथ गेयतेत असल्यानेच जाणवतंय रे.. तुझ्या कवितांमधे हाच प्रॉब्लेम असतो. रुईच्या सात गाद्यांसारखी शुद्धता असते त्यामुळे त्याखाली एक पीस आलं तरी बोचतं..
13 Dec 2011 - 11:19 am | प्यारे१
कल्लास.....
अतिब्येक्कार.
एकदम भारी वाटलं. ;)
13 Dec 2011 - 11:58 am | नगरीनिरंजन
कविता आवडली!
13 Dec 2011 - 1:26 pm | क्रान्ति
खूप सुरेख रचना!
13 Dec 2011 - 2:46 pm | मेघवेडा
छान. आवडली कविता.
13 Dec 2011 - 3:01 pm | पियुशा
मस्त झालिये कविता :)
13 Dec 2011 - 3:13 pm | कवितानागेश
आवडली गजल... :)
15 Dec 2011 - 2:19 am | पुष्करिणी
+१,
शेवटच्या कडव्याची पहिली ओळ सोडली तर छान्च जमलीय
13 Dec 2011 - 3:17 pm | जाई.
काव्यरचना सुंदर आहे
13 Dec 2011 - 3:31 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा...व्वा ! मि.का.... कडक,,,सह्ही एकदम...
जीवघेणा फास आहे.... मार डाला यार,बास खल्लास...!
13 Dec 2011 - 4:55 pm | दादा कोंडके
ही कविता आवडली! ;)
13 Dec 2011 - 5:51 pm | मोहनराव
आवडेश!!
13 Dec 2011 - 7:57 pm | विजुभाऊ
मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला
जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे
यातील कान्ह्याची हे शब्द खटकताहेत. (प्री आणी न्ह्या अक्षरांमुळे वृत्ताच्या बाहेर जाताहेत )
मो र पं खी प्री त का न्ह्या ची ज री मो ही जि वा ला
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
या ऐवजी
मोरपंखी प्रीत अशी ; मोही जरी जिवाला
जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे
हे वृत्तात नाही पण मिटर मध्ये बसतेय.
15 Dec 2011 - 9:20 am | गवि
विजुभाऊ.. हेच निरीक्षण मीही सुरुवातीला नोंदवल्यावर मिकाने ते अत्यंत चांगल्या रितीने घेऊन आपल्या अंगभूत प्रतिभेने कान्ह्याच्या ओळीला सुंदरपणे पर्याय देत खालील ओळी केल्या:
मोरपंखी प्रीत दाटे, ती जरी मोही जिवाला
जाण राधे, त्यास अंती जीवघेणा फास आहे
त्या ओळी त्याने इथे अपडेट केल्या नसल्या तरी हे खूप आवडल्याने मी आगाऊपणा करुन मिकाच्या परवानगीशिवाय इथे दिलं आहे.
14 Dec 2011 - 7:44 am | पाषाणभेद
फारच छान.
15 Dec 2011 - 4:14 am | वीणा३
सुरेख काव्यरचना !!!
15 Dec 2011 - 8:56 am | यशोधरा
आवडली कविता.
15 Dec 2011 - 9:37 am | चतुरंग
लगेरहो!
-रंगा
15 Dec 2011 - 11:59 am | सविता००१
सुंदर कविता. फारच छान.
15 Dec 2011 - 7:26 pm | परिकथेतील राजकुमार
फक्त :-
हे नसते तरी चालले असते. उगा आपण किती अज्ञानी आहोत हे जाणवत राहते. ;)
17 Dec 2011 - 10:52 pm | पैसा
आधी मेवेनं केलेलं विडंबन आवडलं, आता मूळ कविता आवडली. छान.
17 Jul 2020 - 5:20 pm | प्राची अश्विनी
कातील लिहिलंय! वाह!
17 Jul 2020 - 7:20 pm | वीणा३
ही कविता सुद्धा सुंदर !!!
19 Jul 2020 - 10:19 am | गणेशा
मिका मिसळ पाव वरील आपला एक आवडता कवी..
आवडतात त्याच्या कविता.. शब्द..
तो माणुस म्हणुन पण तितकाच छान.. शांत आहे..
वल्ली नंतर भेटलेला माझा मित्र :-))