गरीब बिचार्या, दम खा
गरीब बिचारा शोधतोय तो
सायबिणीचे पडके घर -
मी म्हणतो, "विचार, जवळ
चांगला बार असला तर..."
.
बुरसट चिरे न्हाते-धूते
अश्रू भले सुकवू नको
कुळाचारांस आसूसले
भाव भले आटवू नको
.
म्हटले कोणी : "रिबेलो
मूळचे अहो, त्या वाडीचे"
पात्रांव, छ्या! रिबेलो
आहेत सांगा किस झाडीके?
.
ब्रागांस, कून्य, नोरोन्या
कसची गोत्रे, कसची कुळे,
ईश्वराच्या डोळ्यापुढे
बामणांचेही गू पिवळे
.
.
.
सोड बाबुश - पीच थोडी
दर्जेदार काजूफेणी
सोनसळी फेसाळणारे
उसळणारे जादू-पाणी
.
प्याल्यात ओतते आहे बघ
साकी छोकरी गोड कोवळी
झोकात झुकते जणू काही
झुळकेसरशी डुले पोफळी
.
बारवाला बघतोच आहे
काळीज माझे झाले कलम
पैसे मोजून घेऊन माझे
दुखण्यावरती लावतो मलम
.
माझ्यासाठी खास आणला
उंची दारू भरून प्याला
त्याच्या हातून माझ्या हातात -
मध्यस्थ नको द्याला-घ्याला
.
.
.
हाती आहे नाही ते
उदारपणे लुटत राहा
उद्या येत्या गरिबीचा
उगी कशास धाक पाहा?
.
पैसे टाकून दारू झोकत
गाणारा तो औरच आहे
पडक्या वाड्यांत उकीरडे
रडत फुंकणे नकोच आहे
.
मला रोक-टोकणार्यांनो
तुमचे म्हणणे ऐकू आलेय
माफ केले तुम्हा तरी
खरेच आता पुरे झालेय
.
सल्ला म्हणून दिला असता
मानले असते तुमचे बोल
मात्र तुमची शेरेबाजी
काही नाही - नुसता सल!
स्फूर्ती : अबु नुवास
प्रतिक्रिया
5 Dec 2011 - 4:55 am | धनंजय
कवीचा मित्र जुन्या गोव्याच्या शालीन पोर्तुगीज जमान्याच्या रोमान्समध्ये अडकलेला आहे. कवीला वाटते : आता ही जळमटे आहेत नुसती. त्यापेक्षा मस्तपैकी बारमध्ये जावे. तिथली तडपन-धडकन जिवंत आहे.
5 Dec 2011 - 10:24 am | पैसा
आवडले. ही रचना ३ कॊलम्समधे वेगळीच दिसतेय. वेगवेगळ्या क्रमाने वाचून बघते.
5 Dec 2011 - 11:59 am | विसुनाना
मूळ कविता (इंग्रजी भाषांतरात) वाचली. तिचा भावानुवाद अगदी चपखल उतरला आहे. (जुने जाऊ द्या मरणालागुनी...चा अरेबिक आविष्कार आणि त्याचा गोंयकर आविष्कार)
फक्त मधेमधे '.' दिला नसता तर एकसंधपणा आला असता. सध्या ही एकच सलग कविता आहे हे हरवून जाते आहे.
['बामणांचे'ही गू पिवळे मध्ये बामणांच्याऐवजी पोर्तुगीझांच्या एखाद्या उन्नत कुळाचा उल्लेख अथवा डागामा वगैरेंचा उल्लेख योग्य दिसला असता. (म्हणजे बामणांचा उल्लेख आक्षेपार्ह म्हणून नव्हे, तसा करायचा असता तर मग वर ब्रागांस, कून्य, नोरोन्याऐवजी बामणी आडनावे घालावीत - जसे - गोगटे,जोशी, कुलकर्णी इ.)पण मग ती वेगळीच कविता झाली असती. म्हणजे तशीही वाचली आणि ती जास्त मराठी वाटली.]
5 Dec 2011 - 12:18 pm | पैसा
इथला हा उल्लेख किरिस्तावांतील बामण जातीतल्या लोकांबद्दल असावा.
5 Dec 2011 - 3:05 pm | विसुनाना
"हांव पण बामण असां" असे (त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात माझ्या वडिलांना) एका गोवन किरिस्तांव मित्राने ऐकवले होते - हे आठवले. असो. पण तरीही...माझे मत बदलले नाही.
5 Dec 2011 - 8:20 pm | धनंजय
गोव्यात लोकांची ख्रिस्ती धर्मांतरापूर्वीची जात ही धर्मांतरानंतरसुद्धा कायम राहिली. अगदी हल्लीहल्लीपर्यंत ख्रिश्चन बामणांना चर्चमध्ये बसण्यासाठी वेगळ्या मानाच्या जागा होत्या. पार दफनभूमीत बामणांचा मानाचा भाग वेगळा होता. (अजूनही असेल, ठाऊक नाही.) त्यामुळे "बामण" ही उपमा नाही, तांत्रिकदृष्ट्या नेमका शब्द आहे.
"त्रिकाल" चित्रपटात आख्यान सांगणार्याची खालची जात असल्यामुळे नायिकेबरोबरचे त्याचे एकतर्फा प्रेम असफल होणार हे ठरलेलेच होते. त्या पटकथा-संवादात "बामण" शब्द वापरलेला नाही. पण प्रत्यक्षात "बामण" शब्द वापरला गेला असता.
6 Dec 2011 - 10:37 am | विसुनाना
आता 'नेमकेपणाने' कळले. धन्यवाद.
(...
आणखी लिहिणार होतो. पण जाऊ दे.)
6 Dec 2011 - 2:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ख्रिश्चन बामणांना चर्चमध्ये बसण्यासाठी वेगळ्या मानाच्या जागा होत्या. पार दफनभूमीत बामणांचा मानाचा भाग वेगळा होता.
प्रेमानंद गज्वींच्या किरवंतची आठवण झाली तशाच कथा ख्रिश्चन बामणांच्या आहेत की काय ?
बाकी, कविता प्रतिसादांमधून समजली.
धन्स.
-दिलीप बिरुटे
6 Dec 2011 - 2:18 pm | पैसा
म्हणजे अंत्यसंस्कार करणारे ब्राह्मण. त्यांना इतर ब्राह्मणांपेक्षा कमी दर्जाचे समजले जाते असं काही ऐकून आहे. याबद्दल मला अचूक माहिती नाही. तर हे किरिस्ताव बामण म्हणजे गोव्यातले बाटलेले मूळ ब्राह्मण. धनंजयनी म्हटल्याप्रमाणे अजूनही गोव्यातल्या ख्रिश्चनांमधे जाती मानल्या जातात. लग्न ठरवताना आपल्या मूळ जातीतलाच नवरा-नवरी शोधली जाते. मला वाटतं माझा एक अनुभव पूर्वी लिहिला होता. गोव्यात नवीन आले तेव्हा एक ख्रिश्चन स्टाफ रजेवर होती. ब्रँचमधे कोण कोण आहेत चौकशी करताना दुसरी एक हिंदू पण वैश्य जातीची बाई म्हणाली, "ती ख्रिश्चन स्टाफ आली की तुझ्याशी पटकन मैत्री करील कारण ती बामण आहे आणि तू ब्राह्मण आहेस ना!" आणि ते खरंच झालं. कुठेतरी वाचलं होतं "जात नाही ती जात" हे अशा वेळी पटून जातं. बाटून ४००/४५० वर्षं उलटली तरी गोंयकार ख्रिश्चनांमधल्या जाती जात नाहीत.
@धनंजय, "सायबिणीचे घर" हा उल्लेख 'जुन्या पडक्या कोपेलाबद्दल' आहे ना? कारण 'सायबिण' हा शब्द साधारणपणे येशूची आई मेरीबद्दल वापरला जातो ना?
6 Dec 2011 - 2:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्स. मला काय वाटलं वर प्रतिसादात धनंजय म्हणत होते की ” दफनभूमीत बामणांचा मानाचा भाग वेगळा होता” त्यावरुन ” किरिस्ताव बामणांच्या” काही अशाच (उच्च ब्राह्मण, कनिष्ठ ब्राह्मण) कथा आहेत की काय असे वाटले, बा द वे, या किरिस्ताव बामणांबद्दल वाचायला काय मिळेल हो ?
-दिलीप बिरुटे
6 Dec 2011 - 8:45 pm | धनंजय
युरोपियन भाषांमध्ये साधारणपणे मोठ्या घराचा मालक आणि कुलस्त्री यांच्यासाठीचे शब्द "ईश्वर (क्वचित येशू)" आणि "येशूची आई मेरी" हिच्यासाठी वापरतात. पण "मालक/कुलस्त्री" हे अर्थसुद्धा तितकेच प्रचलित असतात.
(इंग्रजीत अवर लॉर्ड/लेडी, पोर्तुगिजात नोस्सो सिन्योर/ नोस्सा सिन्योरा...) त्यापासून सायब/सायबीण यांचे विशेष अर्थ. (मात्र "गोंयचो सायब" म्हणजे फक्त सेंट फ्रान्सिस झेवियर!)
जुनी आराध्य-मेरी आणि आराध्य-कुलस्त्री दोन्ही अर्थ कवितेत लागू होतात.
5 Dec 2011 - 7:21 pm | चित्रा
मूळ कविता आणि त्यातून स्फुरलेली ही कविताही आवडली.
काही कविता या कालातीत असतात असे वाटते, तशी ही कविता आणि तिचा आशय कालातीत वाटतो आहे.
(शीर्षक अजून वेगळे हवे होते असे वाटते - ).
5 Dec 2011 - 9:32 pm | अत्रुप्त आत्मा
मजा येतीये वाचताना... :-) जे काही केलय,ते बेश्ट आहे येकदम...होउन जाउ द्या अजुन बरेच काही असेच.
6 Dec 2011 - 1:30 pm | प्रशांत उदय मनोहर
हा वाक्प्रचार मराठीत प्रचलित होईल तेव्हा मजा येईल.
आपला,
(पिवळी गू असलेला) प्रशांत