[
© 2003 Dana Clark येथून साभार
आमु आखा... १ , आमु आखा... २ , आमु आखा... ३
***
फार फार जुनी गोष्ट आहे. अगदी शाळेमधे वगैरे असतानाची. शाळेच्या पुस्तकातून भाक्रा-नांगल, कोयना वगैरे मोठमोठ्या धरणांची माहिती आणि चित्रं वाचायला मिळायची. अवांतर वाचनाची खोड असल्याने ही धरणं आणि कारखाने वगैरे आधुनिक भारताची नवीन मंदिरं आणि तीर्थक्षेत्रं वगैरे आहेत अशा अर्थाचे पं. नेहरूंचे वक्तव्यही वाचले होतेच. अर्थात त्यावेळी हे सगळं माझ्यासाठी खूपच क्षुल्लक आणि एक अवांतर असंच होतं. कोयना धरणामुळे भूगर्भीय बदल झाले आहेत एवढीच त्या धरणाच्या पर्यावरणिय परिणामांची माहिती होती. माझ्यासाठी तो विषय तेवढ्यातच आणि तिथेच संपलेला होता.
कॉलेजमधे आल्यावरही काही फारसा बदल घडलेला नव्हता. मात्र तो पर्यंत एक नवीनच नाव, किंबहुना दोन नवीन नावं कानावर येऊ लागली होती. ती ही अधून मधून. फारशी नाहीत.
एक नाव होतं 'सरदार सरोवर प्रकल्प'. नर्मदा नदीवर एक विशालकाय धरण होणार आहे, आणि नर्मदेच्या प्रचंड प्रवाहाला बांध घालून ते पाणी गुजरातेत, मुख्यत्वे सौराष्ट्र आणि कच्छच्या वाळवंटात, नेऊन तिथे नंदनवन फुलवले जाणार आहे एवढेच ऐकू येत होते. भारताच्या आधुनिकतेकडे चाललेल्या घोडदौडीत, हा प्रकल्प म्हणजे एक महत्वाचा टप्पा ठरला होता.
नेमकं त्याच्याच आगेमागे अजून एक नाव ऐकू येऊ लागलं होतं. ते म्हणजे 'नर्मदा बचाओ आंदोलन'. हळूहळू मेधा पाटकर हे नावही गाजू लागलं. जे काही थोडंफार वर्तमानपत्रातून वाचलं त्यावरून फक्त एवढंच लक्षात आलं होतं की, 'हे सगळं वाटतंय तेवढं सरळ काम नाहीये. यात बरंच काही आणि बरंच खोल गुंतलेलं आहे. धरणामुळे नदीचे पाणी अडणार, त्यामुळे एक महाकाय मानवनिर्मित सरोवर तयार होणार, एक मोठा भूभाग पाण्याखाली जाणार आणि पर्यायाने काही लोकांचे विस्थापन होणार. नेमक्या याच मुद्द्यावरून आंदोलन होत आहे. पण सरकार त्या लोकांचे पुनर्वसन करेलच ना! असं कसं कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल? लोकं काय काहीही मुद्दा घेऊन आंदोलन करतात.'
माझ्या दृष्टीने या सगळ्याचीच माझ्या आयुष्यातील व्याप्ती इथेच संपत होती. पुढे पुढे तर माध्यमांच्या लेखी हा मुद्दा डेड इश्यू झाला. मधेच कधीतरी एखाद्या कोर्टात या प्रकरणाची तारिख असायची किंवा एखादा निर्णय यायचा तेव्हा काही दिवस परत काही वर्तमानपत्रांतून याबद्दल वाचायला मिळायचे. टिव्ही वाहिन्यांचे युग आल्यानंतर एखाद्या वाहिनीवर मेधाताई दिसायच्या, कधी गुजरात सरकारच्या अथवा दुसर्या कोणत्याही सरकारच्या प्रतिनिधीचा बाईट असायचा. मग परत शांत. असंच चालू राहिलं.
काही काळानंतर हे सगळं स्मृतीच्या एका अडगळीतल्या कप्प्यात जाऊन पडलं. आयुष्य पुढे जात राहिलं. मीही त्याच्यामागे लळतलोंबत ओढला जात राहिलो.
मराठी आंतरजालावर आलो तेव्हा काही ठळक डोळ्यात भरण्यासारखे लेखक भेटले. बरेचसे, काही घटका मनाला आनंद देऊन जाणारे लेखन करत. मात्र मनाला चटका लावणारं, अस्वस्थ करणारं लेखन करणारं एक नाव, त्यावेळी तर सातत्याने, समोर येत राहिलं. श्रावण मोडक. सुरूवातीला आलेली व्यक्तिचित्रं असोत किंवा पेवली असो. किंवा बाकीचं कोणतंही लेखन. आपण काहीतरी वेगळं, नेहमीच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन घेतलेल्या अनुभवातून आलेलं वाचतो आहोत एवढं समजत होतं. पण हद्द झाली ती मात्र, अशातशाच आलेल्या नोंदींमुळे. एका संवेदनशील मनाने अतिशय डोळसपणे केलेल्या निरीक्षणातून नेमक्या टिपलेल्या या नोंदी. त्रास देऊन न जातील तरच नवल. या माणसाशी ओळख झाली आणि मग दाट मैत्रीही झाली. नेहमी बोलणं व्हायचं, क्वचित भेटीही. हळूहळू नर्मदेच्या तीरावर चाललेल्या संघर्षाची कहाणी तुकड्या तुकड्यातून समोर येत गेली. जुने सगळे संदर्भ जागे झाले. नवीन मिळालेल्या माहितीनुसार, हे आंदोलन म्हणजे नुसताच विकासाला विरोध नव्हे तर त्याला एक नवनिर्माणाची अशी पक्की बैठक आहे हे ही लक्षात येऊ लागले.
श्रावण म्हणायचा, "चल, एकदा जाऊन येऊ, बघून येऊ. प्रत्यक्ष बघून अजून सुस्पष्ट चित्र समोर येईल." मलाही उत्सुकता होतीच. पण वाटायचं की त्या लोकांना भेटायला जायचं तर आहेच, पण ते काही प्राणिसंग्रहालय नाही. नुसती गंमत बघायला जायचं ठिकाण नाही. आपण काय करू शकतो त्याचं नक्की भान येऊ दे, अजून थोडे विचार सुस्पष्ट होऊ देत, मग जाऊ.
असं हो-नाही करता करता खूपच मोठा काळ गेला.
एके दिवशी अचानक एक मेल आलं. नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे चालवलेल्या जीवनशाळांना वीस वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने तिथल्या सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा ता. ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०११ या काळात आयोजित केला आहे. त्यातच युवकांसाठी शिबिर आणि अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे. निमंत्रण अगदी आग्रहाचे होते. त्याशिवाय, इतस्ततः विखुरलेले बरेचसे लोक, कार्यकर्ते एकाच ठिकाणी भेटतील, गप्पा होतील आणि मग हे सगळं चहू अंगाने समजून घ्यायला सोपे जाईल असंही सगळे सांगत होते. जीवनशाळा या अतिशय आगळ्या वेगळ्या कामाबद्दल ऐकून तर खूप होतो, पण आधीच ठरलेल्या काही वैयक्तिक कार्यक्रमामुळे जाणे जमणार नव्हते. पुण्यातून श्रावण आणि अजून काही लोक जाणार होते. थोड्याशा खिन्नतेनेच उपस्थित राहू शकत नाही असे कळवले. पण मनात तीव्र इच्छा होतीच.
सहा नोव्हेंबरला, कौटुंबिक प्रवासातून मुंबईला परत येत असताना, अगदी ऐनवेळेस मनाने उचल खाल्ली. सगळ्या वैयक्तिक जबाबदार्या पूर्ण झाल्या होत्या. बायकोला सांगितलं, आता मला माझ्यासाठी चार दिवस दे. माझं, माझ्या आवडीचं आयुष्य मला जगू दे. चार दिवसांनी येतोच आहे परत. तिनेही फार खळखळ केली नाही. आयत्यावेळी धावपळ झाली खरी.
येथून साभार एक तर हा सगळा कार्यक्रम होता धडगावात. नंदुरबार जिल्ह्यातलं एक तालुक्याचं गाव. तिथे कसं पोचायचं हेच मूळात माहित नव्हतं. मी जिथून जाणार होतो तिथेही बरोबर येणारं कोणीच नव्हतं. पण एक एक संगती लागत गेली, व्यवस्था होत गेली, मार्गदर्शन झालं आणि केवळ दोन तासाच्या तयारीवर मी धुळ्याच्या बसमधे बसलो.
प्रवास जवळजवळ बारा चौदा तासांचा. आधी धुळे, तिथून शहादा आणि तिथून पुढे धडगाव. प्रत्येक ठिकाणी वाहन बदलत जायचं. सुदैवाने एस्टीच्या बसेस सतत उपलब्ध असतात. पहाटे धुळ्याला पोचलो. पुण्याचे लोक थेट शहाद्याला जाणार्या बसमधे होते. त्यांचीही बस नेमकी त्याच वेळी धुळ्यात पोचली आणि माझी सोय झाली. त्यांना जॉइन झालो. तिथून पुढे सुरू झाला ग्रामिण भाग. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली शेतं. पहाटेच्या संधिप्रकाशात हळूहळू जागी होणारी गावं. शहरी माणसाला भुरळ घालणारं वातावरण.
शहाद्यापर्यंत पोचेतोच आठ वाजले होते. धडगावची बस साडेआठला असते हे जाणकारांना माहित होते. त्यामुळे तिखट तर्री मारलेले पोहे आणि गरमागाम चहा असा नाश्ता करता आला. बस अगदी वक्तशीर निघाली. सगळा मैदानी भाग. सपाटच्या सपाट पठार दूरपर्यंत पसरलेले. हळू हळू सांस्कृतिक बदल जाणवायला लागला होता. आदिवासी चेहरेमोहरे रस्त्यातून दिसत होते. लहान लहान वस्त्या, आटोपशीर घरं, त्या घरांवरून पसरलेले भोपळ्याचे वेल आणि त्यांना लागलेले गोल गरगरीत भोपळे.
शेतांमधून मुख्यत्वे कापूस आणि ऊस दिसत होता. शहाद्याच्या परिसरातील सूतगिरणी आणि साखरकारखान्याचा कच्चा माल. बहुतेक अंगणांमधून नुकताच कापणी केलेला आणि साठवलेला केशरी रंगाकडे झुकणार्या पिवळ्या रंगाचा मका दिसत होता. आपण पहाडात चाललो आहोत पण पहाड मात्र अजून दिसेना असा विचार करेकरेतोच एकदम क्षितिजावर, अजस्त्र पसरलेली सातपुड्याची भिंत दिसायला लागली. श्रावण म्हणाला, "आलो आपण पायथ्याशी. एक एक पुडा ओलांडत अगदी तिसर्या चौथ्या पुड्याच्या आत जाणार आपण." ते पहाड बघून तरी हे अशक्य वाटत होते. बस पहाडात घुसली, सराईत चालकाने पहिला गिअर टाकला आणि आम्ही घाट चढू लागलो.
अनंत वळणं घेत, धडगावात पोचेतो साडेदहा वाजले होते.
माझ्याबरोबर असलेले बहुतेक जणून तिथे बरेचवेळेला येऊन गेलेले. त्यांनी सराईतपणे धोकट्या खांद्याला लावल्या आणि एका चिंचोळ्या पायवाटेवरून चालायला सुरूवात केली. मी निमूटपणे त्यांच्या मागे मागे. मग कोणाच्या अंगणातून, कोणाच्या परसातून, कोणाच्या बकरीच्या नवजात पिल्लांवर पाय पडू नये अशी काळजी घेत आम्ही पाचेक मिनिटं चालत राहिलो.
काकावाडी, धडगाव. इथेच पोचायचं होतं. तिथेच 'नर्मदा परिवारा'चे मुख्यालय. पूर्वी भूदान चळवळीच्यावेळी विनोबाजी इथे आले होते. तेव्हा बांधलेले एक छोटेसे ऑफिस कम निवासी जागा. तिथेच आता नर्मदा परिवाराची उठबस आणि कामाचे मुख्य केंद्र. पोचलो तेव्हा तिथे खूपच लगबग चालू होती. लग्नघराचे स्वरूप आले होते. तरीही झालेले स्वागत खूपच मनापासून आणि जिव्हाळ्याचे होते. काही मंडळी कित्येक वर्षांनी एकमेकांना भेटत होती. त्यामुळे आनंद होताच. पण माझ्यासारख्या नवख्यालाही तिथे अगदी पाचेक मिनिटातच घरच्यासारखे वाटू लागले. आंघोळ वगैरे आटोपली. जेवणं झाल्यावरच मुख्य कार्यक्रमाला सुरूवात होणार होती.
एवढं सगळं होताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. शिबिराची व्यवस्था, शिबिरार्थींची व्यवस्था, आमच्या आंघोळीची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, कार्यक्रम जिथे होता तिथल्या व्यवस्थेचे अपडेट्स, कार्यक्रमाला धुळ्याहून काही महनिय व्यक्ती आमंत्रित केल्या होत्या त्यांच्या आगमनावर लक्ष अशा बारीकसारीक गोष्टीत पूर्ण बुडालेली एक पांढर्या केसांची मध्यमवयीन व्यक्ती. मेधाताई. त्यांची माझी त्या आधी एकदाच, अगदीच छोटीशी भेट झाली होती. पण तरीही अगदी मुद्दाम जवळ येऊन 'अरे वा! तुम्हीही आलात. बरं झालं. भेट झाली परत.' असं प्रेमळ स्वागत झालं. एवढंच नाही तर आमची व्यवस्था लागली की नाही यावर कटाक्षाने लक्षही ठेवले गेले.
नेतृत्वाचा वस्तुपाठ बघायला मिळत होता.
पहिल्या दिवशीचा कार्यक्रम होता, जीवनशाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा. यानिमित्ताने आणि एकंदरच तीन दिवसात जीवनशाळांबद्दल खूपच माहिती कळली.
क्रमशः
प्रतिक्रिया
25 Nov 2011 - 10:48 pm | यकु
वा..वा..वा..!
बिका, तुमच्या या लेखातून एक दुर्लक्षित पण कुणाच्या तरी जगण्या-मरण्याशी संबंधीत विषय आमच्यासारख्या बैठ्या वाचकांना समजून घ्यायला मिळणार अशी चिन्हे दिसत आहेत.
श्रामो, त्यांच्या लेखनाबद्दल कुतूहल आहेच पण तुम्ही, मुंबईतील एका माणसानं मुद्दाम तिथं जाऊन हा विषय समजून घेण्यासाठी केलेले श्रम विशेष कौतुकास्पद आहेत.
पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.
25 Nov 2011 - 10:50 pm | प्रास
बिका, एका वेगळ्या विषयाला हात घातला आहे आणि त्याबद्दल मनापासून आभारी आहे.
नर्मदा प्रकल्पाबद्दल आजपर्यंत फक्त ऐकलंय आणि फारच थोड्या प्रमाणात काही वाचलंय. जे वाचलंय, जितकं वाचलंय ते केव्हाही अपुरंच वाटलंय कारण त्याला कधीच प्रत्यक्षाची जोड देता आली नव्हती. श्रामोंसारखे प्रत्यक्षदर्शी जे काही पोटतिडकीने लिहायचे त्या त्यांच्या लिखाणावर श्रद्धा नक्कीच होती पण तरीही त्यात एका त्रयस्थ नजरेची कमी वाटायची जिची तुमच्या या लेखांतून पूर्तता होईल असं वाटतंय.
हा ही एक वृत्तांत पण फोटोंच्या माध्यमातून प्रत्यक्षदर्शी अनुभव देणाराच! तुमच्या अनुभवाच्या काठीचा आधार घेत आता प्रकल्पाची परिक्रमा करण्याचा विचार आहे. पुढे कधी शक्य झाल्यास दर्स्तुरखुद्द नर्मदा किनारी जाण्याची मनिषा आहे पण या वेळी तुमच्याच नजरेने पाहीन म्हणतो.
सुरूवातीचा वृत्तांत आणि फोटो अपेक्षा वाढवत आहेत आणि तुम्ही त्याला न्याय द्याल अशी आशाही दाखवत आहेत.
पुन्हा एकदा एका चांगल्या विषयावर लेखमाला लिहिण्याची सुरूवात केल्याबद्दल धन्यवाद!
पुलेप्र
:-)
25 Nov 2011 - 10:51 pm | अशोक पतिल
फार प्रदीर्घ , चिकाटी चा लढा . मेधाताइ पाट्कर व नर्मदा बचाओ आन्दोलन यान्चा ! एक दुर्मीळ उदाहरण .
25 Nov 2011 - 10:55 pm | सोत्रि
सुरूवात छान झालीय, आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
बरेच नविन शिकायाला आणि वाचायला मिळण्याची अपेक्षा आहे ह्या मलिकेतून...
- (विद्यार्थी) सोकाजी
28 Nov 2011 - 1:13 am | मोहनराव
असेच म्हणतो.
25 Nov 2011 - 11:00 pm | पैसा
धन्यवाद तुला आणि श्रावण मोडक यांना. मलाही हेच वाटत होतं, की आम्ही पेपर्समधे वाचतो, हळहळ व्यक्त करतो आणि १० मिनिटांत विसरून जातो. मुद्दाम उठून या विस्थापितांकडे कोण जातोय, तेही पार सातपुड्याच्या आत! तुझ्या मनात हा विचार आला याचं आधी कौतुक करू दे.
श्रामोंच्या अशातशा नोंदी आम्हाला झोपलेल्याना जागं करतायत, आता तुझ्याकडून आणखी अशाच धक्क्यांची वाट पहातेय.
25 Nov 2011 - 11:08 pm | अन्या दातार
पुढचे भाग लवकरच येऊदेत.
25 Nov 2011 - 11:16 pm | स्मिता.
सुरुवात छान झाली आहे. आता पुढच्या सचित्र भागांच्या प्रतिक्षेत!
25 Nov 2011 - 11:24 pm | दादा कोंडके
नुसते किबोर्ड बडवून सामाजिक प्रश्नांवर हिरिरीने चर्चा करणार्या आंतरजालिय वाचकांना क्षुद्रतेची जाणीव करून देणारी लेखमाला... :(
25 Nov 2011 - 11:50 pm | शाहिर
खरा आहे
( क्षुद्र ) जंतु
26 Nov 2011 - 7:42 am | अर्धवटराव
(डबल क्षुद्र) अर्धवटराव
25 Nov 2011 - 11:26 pm | आळश्यांचा राजा
लाइक!
25 Nov 2011 - 11:29 pm | कुंदन
वाचतोय.
धन्यवाद एका वेगळ्या विषयावर प्रकाश टाकतोयेस त्याबद्दल.
26 Nov 2011 - 12:59 am | गणपा
तुमच्या संपुर्ण टीमचे धन्यवाद.
आजच्या काळात आंतरजाल हे एक प्रभावी माध्यम होत चालल आहे.
या माध्यमाचा उपयोग करुन या समस्ये बद्दल जनजागॄती जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहीजे.
बर्याच गोष्टी ज्या छापील आणि अन्य माध्यमातुन येत नाहीत, त्या या लेखमाले मुळे कळतील असा विश्वास आहे.
पुभाप्र.
26 Nov 2011 - 1:47 am | विंजिनेर
बरेच दिवसांनी काही सकस वाचायला मिळणार :)
पुढे?
26 Nov 2011 - 6:43 am | जयंत कुलकर्णी
छान व माहितीपूर्ण..
//नेतृत्वाचा वस्तुपाठ बघायला मिळत होत////
खरे आहे !
26 Nov 2011 - 8:04 am | चतुरंग
चेपुवर धडगाव कार्यक्रमाचे फोटो बघितले त्यानंतर इतर अनेकांप्रमाणेच मी सुद्धा तुला लिही म्हणून म्हणालो आणि फार प्रतीक्षा न करायला लावता तू लिहायला सुरुवात केलीस त्याबद्दल प्रथम तुझे अभिनंदन.
नमनाचा भाग सुरेख जमलाय, वातावरण निर्मिती झाली आहे. पुढे वाचायला उत्सुक आहे.
वर्तमानपत्रे आणि चॅनेल्स ह्या दोन्ही माध्यमांच्या पलीकडे जाऊन प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांची नस लेखनात पकडायचा प्रयत्न करावास असे वाटते. तू प्रत्यक्ष शिबिरार्थी झाल्यामुळे लेखनाला वेगळे परिमाण लाभणार हे निश्चित.
श्रामोंचेही कौतुक वाटते की त्यांनी तुझ्या मनात तिथे जाण्याचे बीज रोवले! चिकाटीच लागते ह्या सगळ्याला.
(वाचनोत्सुक) रंगा
26 Nov 2011 - 8:50 am | प्रचेतस
आवडले. पुढचा भाग येऊ द्यात लवकर.
26 Nov 2011 - 9:17 am | रामदास
छान आहे .
पुढे काय?
उत्सुकता आहे.
26 Nov 2011 - 9:45 am | श्री गावसेना प्रमुख
चोपड्याच्या पावरा समाजाच्या लोकान्ना घेउन प्रतीभा ताईन्नी मोर्चा नेला होता.
वनजमिनी नावावर कराव्यात म्हणुन ,
आपल्या मुख्यमंत्र्यान्नी खोटे आश्वासन अन प्रशासनाने खोटे सातबारा देउन फसवणुक केली त्यांची,
ह्या आदिवासी लोकान्ना फसवतात,त्यांच्याच जिवावर आमदार अन मंत्री झालेले लोक.
26 Nov 2011 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार
फार उत्कंठेने वाटच बघत होतो ह्या लेखमालेची.
रोज भेटणार्या बिका आणि श्रामोंची एक वेगळी ओळखा आत्ता सुरू होते आहे :)
26 Nov 2011 - 12:57 pm | छोटा डॉन
अगदी हेच म्हणायचे आहे.
ह्या लेखमालेची अगदी आवर्जुन वाट पहात होतो, सुरवात चांगली झाली आहे.
काहीतरी वेगळे वाचायला/पहायला मिळेल अशी खात्री आहे.
- (व्याप बाजुला सारायला न जमलेला)छोटा डॉन
26 Nov 2011 - 1:03 pm | श्रावण मोडक
असं झालं की आम्ही तुम्हालाच बाजूला सारतो. ते सोपं पडतं. ;)
26 Nov 2011 - 1:15 pm | छोटा डॉन
:(
सध्या ह्याहुन अधिक स्पष्टिकरण देण्यासारखे माझ्याकडे काही नाही.
- छोटा डॉन
26 Nov 2011 - 11:12 am | नितिन थत्ते
बर्याच दिवसांनी बिकांचं लेखन.
पुढचे भाग येऊद्यात.
26 Nov 2011 - 12:47 pm | अभिज्ञ
वाचतोय.
फेसबुकावर तुझे काहि फोटो पाहिले होते. तेंव्हा फारसा उलगडा झाला नव्हता.
आताशा लिंक लागतीये.
पुढचे भाग लवकर येउ द्यात.
अभिज्ञ.
26 Nov 2011 - 12:59 pm | सविता००१
मस्त सुरुवात. बाकी अभिज्ञ यांच्याशी सहमत. मलाही फेसबुक्च्या फोटोंवरून फरसे काही कळाले नव्हते.
26 Nov 2011 - 1:02 pm | प्यारे१
नक्की काय प्रतिक्रिया द्यावी..? अशी कामं नक्कीच आवश्यक आहेत.
तर्कटपणा न करता, आपलं तेच खरं अशी स्वतःची पोळी भाजण्याची भूमिका न ठेवता केली तर आणखी जास्त लोकाभिमुख होऊ शकतील अशी कामं जास्त फायद्याची (स्थानिक लोकांच्या)ठरतील.
अशाच एका प्रकल्पामध्ये मी 'दुसरीकडून' उभा आहे. लोकांसाठी खलनायकाच्या भूमिकेत.
काम तर करावं लागतंच.
दोन्ही बाजू माहिती आहेत.
दोन्ही बाजूंच्या पांढर्या आणि काळ्या रंगांच्या शेडस आणि त्यात फिरतानाचे चेहरे दिसतात, समजतात, जाणवतात.
असो. जास्त बोलत नाही.
- संभ्रमित प्यारे
26 Nov 2011 - 3:13 pm | अत्रुप्त आत्मा
मेधाताईंना माध्यमांमधुन पाहतो/ऐकतो आहेच,अता त्यांच्या कार्य/कर्मभूमीचा हा एक प्रकारचा माहीतीपट आपण दाखवत आहात त्याबद्दल मनापासुन धन्यवाद.....
सर्वांप्रमाणेच पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
26 Nov 2011 - 3:15 pm | विनायक प्रभू
मी काय करु ते बोला बिका.
तुम्ही लिहाल, मी वाचेन, हळहळेन.
पण प्रश्न एकच, "मी काय करु शकतो ते बोला"?
26 Nov 2011 - 9:03 pm | सर्वसाक्षी
बिका,
लेखमालेची उत्सुकता आहे. काहीतरी वेगळे वाचायला मिळत आहे.
धन्यवाद
26 Nov 2011 - 9:23 pm | आत्मशून्य
भाग लवकर येऊद्यात.
26 Nov 2011 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा.. बिकासेठ. प्रास्ताविक अगदी समर्थपणे पोहचलंय.
पुढे कायची उत्कंठा आहेच.
-दिलीप बिरुटे
27 Nov 2011 - 3:21 pm | किचेन
कॉलेजमध्ये असताना मेधताईन्चा एक फोटो बघितला होता.साप्ताहिक सकाळ मध्ये.पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या मेधाताई.आजही तो फोटो आठवला कि अंगावर शहारा येतो.
या विषयावर आणखीन जाणून घ्यायला आवडेल.
27 Nov 2011 - 6:12 pm | सुहास झेले
सुंदर... पुढचा भाग लवकर येऊ द्यात :) :)
28 Nov 2011 - 8:55 am | विवेक मोडक
वाचतोय आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द शोधतोय.
28 Nov 2011 - 11:03 am | उदय के'सागर
धन्यवाद बिका ह्या लेखमालिके बद्दल. तुमच्या लेखमालिकेतुन जी "डीटेल" महिती मिळेल त्यातुन ह्या आंदोलनाबद्दलच्या बर्याच ईतर गोष्टींबद्दल कळेल, त्या बद्दल पुन्हाएकदा धन्यवाद , खुपच छान उपक्रम. तुमच्या कार्यास आणि पुढील लिखाणास शुभेच्छा!