कला बघा कलाकारांची
डोंबारी - छायाचित्रः पाषाणभेद
मायबाप हो तुम्ही कला बघा कलाकारांची
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||धॄ||
गावोगाव फिरावं उन्हातान्हात राबावं
मिळलं ते खावं अन जमंल तसं रहावं
नाही हक्काचं ठिकान आम्हां
दोन हात करतो जिंदगीशी
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||१||
दोरीवरून चालणं नशीबी आलं
ढोलकी वाजवत बालपण चाललं
कालचा दिस गेला आजचा चालला
कठीण परीक्षा काळाची
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||२||
नाही आम्हाला कुठंलं घरदार
जमीनजुमला नाही गायीगुरंवासरं
कसं जवावं कळंना काही
कला बघा तुम्ही शरीराची
दया करा अन
खिशात हात घालून मदत करा गरीबाची ||३||
- पाषाणभेद
०५/०४/२०११
प्रतिक्रिया
24 Nov 2011 - 2:02 am | प्रभाकर पेठकर
रस्त्यावर कला सादर करणार्या डोंबार्यांची विदारक आयुष्यचर्या मोजक्या शब्दात माडली आहे.
छायाचित्रातील छोट्या मुलीच्या चेहर्यावरील निरागसता अचूक पकडली आहे. अभिनंदन.
24 Nov 2011 - 2:28 am | पाषाणभेद
धन्यवाद प्रपे.
अवांतर: सदरची कविता एका मराठी चित्रपटासाठी लिहीलेली होती, पण अद्याप पुढे काहीच हालचाल नसल्याने संबंधितांना विचारून प्रकाशीत केली आहे. वरील छायाचित्र फार पुर्वीच काढलेले होते.
घरात आपण बर्याच सटरफटर वस्तू जमवून ठेवतो. त्याचप्रमाणे सदरचे छायाचित्र या कवितेला सुट झाले हा मोठा योगायोग आहे.
24 Nov 2011 - 8:39 am | लीलाधर
कशी नशीबानं थट्टा आज मांडली...
टीचभर खळगीसाठी, भातूकली मोडली....
बस्स एवढंच.
24 Nov 2011 - 8:50 am | विदेश
कविता आणि छायाचित्र - दोन्ही उत्तम !
24 Nov 2011 - 8:58 am | मदनबाण
छान कविता...
24 Nov 2011 - 10:35 am | मिसळलेला काव्यप्रेमी
.....................!!!
24 Nov 2011 - 11:14 am | गवि
एकदम करुण. वाईट वाटलं.. :(
24 Nov 2011 - 11:21 am | सुहास झेले
:(
24 Nov 2011 - 1:30 pm | अत्रुप्त आत्मा
पा.भे. व्यथीत करुन टाकलत हो अगदी ... खय्राखुय्रा भटक्याविमुक्तांच जगणं हे असच आहे,आजही :-(
24 Nov 2011 - 2:08 pm | jaypal
पाझर फुटतो तेंव्हा असा काव्यरस झिरपतो.
त्या फोटो मधिल दोघांचे हसरे चेहेरे पाहुन अस वाटत की ते आपल्याला जगण्याला शिकवित आहेत.
कितीही कठीण प्रसंग आला तरी हसत हसत सामोरे जाव. (रडगाणे गाऊन पोट भरता येत नाही.) आयुष्याची दोरी अशीच सतत झुलणारी आणि झुलवणारी आहे. तेंव्हा तोलुन मापुनच पावल टाकावित आणि पार पडावे.
24 Nov 2011 - 4:08 pm | navinavakhi
कविता आणि छायाचित्र - दोन्ही उत्तम !
फार आवडले.