प्राचीन भारतः शेलारवाडी लेणी(घोरावडेश्वर)

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
21 Nov 2011 - 10:02 pm

शेलारवाडीची लेणी-बौद्धधर्मातील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या गेलेल्या ९/१० लेण्यांचा हा छोटासा समुच्चय.

भाऊबीजेनंतर लगेचच दुसर्‍या दिवशी इथे सकाळी ७ वाजताच पोहोचलो ते भावंडांसह. शेलारवाडी तशी घरापासून-चिंचवडपासून अगदीच जवळ, जेमतेम १० किमी. इथे बरेचवेळा येणे झालेलेच होते. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडीमुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणतात पण वास्तविक ही लेणी आहेत पायथ्याच्या शेलारवाडीला खेटून.

समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत. वर जायला उत्तम पायर्‍या बांधलेल्या आहेत पण खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही काहिशी दमछाकच होते.
२० मिनिटातच लेण्यांपाशी पोहोचलो. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना. पण अत्यंत साधीसुधी. इथे नक्षीकाम वगैरे अत्यंत थोडकेच. कदाचित निधीच्या अभावामुळे इथे जास्त संस्करण होवू शकले नसावे.
डावीकडच्या पहिल्या विहारामध्ये आता विठ्ठ्ल रखुमाईच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. पाठीमागेच त्या कोरलेल्याही दिसतात. कदाचित शिवकालानंतर हा बदल झालेला असावा.

१. पायथ्यापासून दिसणारी लेणी

२. विहारातील आजच्या मूर्ती.

३.

नंतर काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये छोटेखानी कक्ष, त्यात झोपण्यासाठी खोदलेले ओटे अशीच यांची रचना.

४. विहार

५. विहार

६. विहार

उजवीकडच्या बाजूला एका विहारावर एक ब्राह्मी प्राकृतात एक शिलालेख कोरलेला आहे,. आजमितीला तो बराचसा जीर्ण झालेला आहे. जवळचा पाण्याची टाकी पण आहेत. या विहाराशेजारीच येथील एकमेव चैत्यगृह आहे. आज त्याचे रूपांतर शिवमंदिरात झालेले आहे. हाच येथील सुप्रसिद्ध घोरावडेश्वर महादेव.
हे चैत्यगृह पण अगदी साधे. सभामंडप, त्यात असलेले ओटे आणि आत गर्भगृह अशी याची रचना. सभामंडपातही एक शिलालेख कोरलेला आहे. गर्भगृहात आज शिवलिंगाची स्थापना झालेली दिसत असली तरी तिथल्या मूळच्या स्तूपाची हर्मिकेची चौकट आजही तिथे स्पष्ट दिसते. घोरावडेश्वर देवस्थान पंचक्रोशीतल्या भाविकांचे श्रद्धास्थानच, दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा असते.

७. चैत्यगृहाशेजारील शिलालेख कोरलेला विहार

८. पूर्वीचे चैत्यगृह, आजचे शिवमंदिर

९. चैत्यगृहातील सभामंडपातील कक्ष

१०. तिथल्या कक्षावर असलेला कोरीव लेख

११. घोरावडेश्वर महादेव

१२. शिवलिंगाच्या वर दिसत असलेली हर्मिकेची चौकट

बाहेरील शिलालेखात कोरलेला मजकूर याप्रमाणे.

सिधं धेनुकाकडे वायवस
हालकियस कुडुबिकस उसभ
णकस कुडुबिणिय सिअगुत
णिकाय देयधमं लेणं सह पुते-
ण णं(द)गहपतिणा सहो

धेनुकाकट येथे वास्तव्यास असलेल्या शेतकरी असलेल्या ऋषभनकाची पत्नी श्रीयगुप्ती हिने हे लेणे गृहपती असलेल्या आपल्या नंद नावाच्या पुत्रासह धर्मार्थ दान केले आहे.

धेनुकाकट ही तत्कालीन बौद्ध संघाची वस्तू. कदाचित आजचे डहाणू. आंध्रप्रदेशातही सातवाहनांचे धेनुकाकाट्क(धन्यकाकाटक) नावाचे एक शहर होते. प्रस्तुत शिलालेखातील धेनुकाकट नेमके कुठले याचा उलगडा होत नाही. हालिक म्हणजे हल-नांगर धरणारा अर्थात शेतकरी. म्हणजे सामान्य जनतेचाही लेणीनिर्मितीस हातभार लागलेला होता हे येथे स्पष्ट होते.

चैत्यगृहाच्या पुढे एक विहार व एक पाण्याचे टाके असून त्यापुढे कड्याला लगटून चालत गेल्यास वरच्या बाजूला एक बर्‍यापैकी प्रशस्त विहार खोदलेला आहे. पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी छोटेसे प्रस्तरारोहण करून वर जावे लागते. इथली गुहा बर्‍यापैकी मोठी असून विहारातील खोल्यांमध्ये गणपती, शिवलिंग, देवी इत्यादींची स्थापना झालेली दिसते. इथल्या लेणीमध्ये जे थोडेफार अलंकरण दिसते ते इथेच. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात व सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. अर्थात नक्षीकाम तसे ओबडधोबडच आहे.

१३. कातळारोहण करून गेल्यावर वरच्या टप्प्यात असलेला प्रशस्त विहार

१४. विहारात असलेले ऩक्षीकामाने सजलेले कक्ष.

१५. स्तंभांवर कोरलेली गजशिल्पे.

तिथून परत उतरून पहिल्या टप्प्यापाशी आलो. लेण्यांच्या एका बाजूला पुणे मुंबई दृतगती महामार्ग आणि दुसरीकडे जुना पुणे मुंबई महामार्ग आणि त्यापुढे इंद्रायणी, बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आणि समोर गजाननाची प्रचंड मूर्ती असा सुरेख नजारा दिसतो. जेमतेम अर्ध्या तासात ही सर्व लेणी पाहून होतात पण ती जुन्या नव्याचा संगम दाखवून मनाला नक्कीच तृप्त करतात.

१६. वरून दिसणारा निसर्गरम्य देखावा

१७. सोमाटणेफाटा येथे असलेली गजाननाची मूर्ती.

१८ परतीच्या वाटेवर कॅमेर्‍यात बंद केलेले फुल

संस्कृतीछायाचित्रण

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

21 Nov 2011 - 10:23 pm | अन्या दातार

>>१२. शिवलिंगाच्या वर दिसत असलेली हर्मिकेची चौकट

हर्मिकेची चौकट हा काय प्रकार आहे बरे?

हर्मिका म्हणजे स्तूपाच्या वर असलेली चौकट.
स्तूपाचे जोते(मेघी), अण्ड, हर्मिका आणि वर क्षत्र असे घटक असतात. जोते म्हणजे मृत्युलोक, अण्ड म्हणजे आकाश आणि हर्मिका म्हणजे स्वर्ग. हर्मिकेवरील क्षत्र म्हणजे स्वर्गमार्गाचे प्रतिक.

इथल्या चैत्यगृहाची उंची कमी असल्याने इथे गजपृष्ठाकृती छत, लाकडी फासळ्या इ. दिसून येत नाहीत. हर्मिका छताला अगदी भिडलेली आहे.

हा बेडसे लेण्यातील आदर्श स्तूप, छत्र, त्याखालील हर्मिका, अण्ड, वेदिकापट्टी, जोते इ. रचनांनी परिपूर्ण.

आत्मशून्य's picture

21 Nov 2011 - 10:26 pm | आत्मशून्य

(इंडीयाना जोन्स व्हायच्या मार्गावर असलेला - आत्मशून्य)

प्रास's picture

21 Nov 2011 - 10:27 pm | प्रास

झकास फोटो आणि अभ्यासपूर्ण लिखाण.

ती गणपतीची मोठी मूर्ती पुण्याला येता येता दिसल्याचं स्मरतंय.

बाकी, वल्लीशेठ, ते टिमविचं मनावर घ्याचं बर्का...... तुझ्याइतकी लायक व्यक्ती त्यासाठी असेल असं वाटत नाही.

:-)

वल्लीशेठ अहो बोलवत चला अशा गोष्टी पाहायला. एकट्याने जात जाऊ नक्का हो..

- पिंगू

मन१'s picture

21 Nov 2011 - 10:50 pm | मन१

बुकमार्क केले आहे.

सोत्रि's picture

21 Nov 2011 - 11:07 pm | सोत्रि

वल्ली मस्त!

छान फोटो आणि माहितीही!
इथे कसे जायचे ते जरा इस्कटून सांगाल का?

- (लेणी पहाण्यात रमणारा) सोकाजी

प्रचेतस's picture

21 Nov 2011 - 11:13 pm | प्रचेतस

येकदम सोपे आहे मालक. निगडी -पुणे गेटवरून सरळ पुढे जायचे. देहूरोडच्या पुढे चार लेनचा रस्ता सुरु होतो. तिथेच शेलारवाडीला लागूनच डोंगर आहे. हायवेला लागूनच पायर्‍या आणि कमान पण दिसते. गाडी पार्क करून अर्ध्या तासात वर.
टोलनाक्याच्या अलीकडेच आहे.

कपिलमुनी's picture

22 Nov 2011 - 11:02 am | कपिलमुनी

सोकाजीराव ,
कधी यायचा झाल्यास मला सांगा आणि सेवेची संधी द्या :)

आवडत असल्यास "चुलीवरच्या झण्झणीत मटणाची " बैठक घेउ... छान मिळते मावळात ..

घोरवडेश्वर - मोठा गणपती- प्रति शिर्डी-शिरगाव असा १ दिवसाचा प्लान करता येतो ..

अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण !! अर्थातच आवडल्या गेले आहे.

कपिलमुनी's picture

22 Nov 2011 - 7:51 am | कपिलमुनी

गावामधला म्हणून जास्त जवळचा वाटला..

प्यारे१'s picture

22 Nov 2011 - 9:16 am | प्यारे१

मस्त रे वल्ली. खूप छान माहिती.

-वल्ली ट्रेकर्स संघटनेचा सदस्य होण्याच्या तयारीत प्यारे

स्पा's picture

23 Nov 2011 - 11:04 am | स्पा

वल्ली ट्रेकर्स संघटनेचा सदस्य होण्याच्या तयारीत
+१

वल्ली सेठ
झकास फोटू.. शेवटचा तर अप्रतिम आहे

अनवट वाटांवर भटकण्याचा तुमचा नाद असाच बहरत जावो , हीच प्रार्थना :)

वल्ली ट्रेकर्स संघटनेचा सदस्य होण्याच्या तयारीत

कट्ट्याला हजर राहता न येणारी मंडळी म्हणे ट्रेकला हजर राहणार..... पाहा जरा आरशात....

नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण लेखन अन् फोटु. :)

मृत्युन्जय's picture

22 Nov 2011 - 10:15 am | मृत्युन्जय

हा माणूस कुठेकुठे फिरत असतो देव जाणे. पण असाच फिरत रहा रे देवा आणि आम्हाला अश्याचब नवनव्या ठिकाणांची माहिती करुन दे :). सुंदर लेख आणि रोचक माहिती.

दीप्स's picture

22 Nov 2011 - 10:18 am | दीप्स

छान छान फोटो, छान छान माहिती. परतीच्या वाटेवर कॅमेर्‍यात बंद केलेले फुल तर अतीशय सुरेख !!

पैसा's picture

22 Nov 2011 - 9:54 pm | पैसा

आणि फोटोदेखील नेहमीप्रमाणे वल्ली पेश्शल. मस्त. पण तिथे विठोबा रखुमाईच्या मूर्ती कधी कोरल्या असाव्यात?

प्रचेतस's picture

22 Nov 2011 - 10:04 pm | प्रचेतस

पण तिथे विठोबा रखुमाईच्या मूर्ती कधी कोरल्या असाव्यात?

हा बदल शिवकालानंतरच झाला असणार. तुकारामांनतरच हे निश्चित. इथले शिवलिंग कदाचित शिवकालाच्याही आधीचे असावे पण विठोबा-रखुमाई अगदी अलीकडच्या, कदाचित १८ व्या १९ व्या शतकातही कोरलेल्या असाव्यात.

पैसा's picture

22 Nov 2011 - 10:36 pm | पैसा

त्या मूर्ती अगदी ओबडधोबड आहेत खर्‍या.

चित्रा's picture

23 Nov 2011 - 12:28 am | चित्रा

हे काळ ठरवण्याचे काही विशेष आधार असतात का?

१८ व्या आणि १९ व्या शतकातल्या मूर्ती आणि त्याआधीच्या म्हणजे १५ व्या किंवा १६ व्या शतकातील मूर्ती यात काही फरक आहेत का?

प्रचेतस's picture

23 Nov 2011 - 8:36 am | प्रचेतस

नाही.
हा केवळ अंदाज. इथला प्रदेश हा देहूला अत्यंत जवळचा, तुकारामांच्या वास्तव्याने पुनित झालेला. त्यामुळे सरळ आहे की विठ्ठ्ल रखुमाईंच्या मूर्ती शिवकालानंतरच्याच. २ र्‍या फोटोतल्या कोरलेल्या मूर्ती त्यांच्या कोरीव कामावरून तरी फारश्या जुन्या वाटत नाहीत. साहजिकच आहे की तुकारामांना संतपद मिळाल्यानंतरच्याचकाळातील त्या आहेत. शिवाय विठ्ठलाच्या घडीव मूर्ती तर अगदी अलीकडच्याच म्हणजे जेमतेम ३०/४० वर्षांपूर्वीच्याच वाटतात.
घोरावडेश्वर महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना मात्र कधी झाली असावी ते सांगता येत नाही.

खुद्द देहूनजीकच्या तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर पलीकडच्या बाजूने खालच्या पातळीत अशीच कोरीव लेणी आहेत. तिथे फारसे कुणी जातही नाही. तिथे एक स्तूपही आहे. तिथल्याही एका विहारात विठ्ठ्ल रखुमाईच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. पाण्याची टाकी पण आहेत.

पैसा's picture

23 Nov 2011 - 7:04 pm | पैसा

भंडारा डोंगरावर तुकोबा नेहमी जाऊन बसत असत ते याच विहारात तर नव्हे?

जातही असतील तिथे. गाथेसारखा अजोड ग्रंथ रचायला अशी एकांत जागा खूपच चांगली.
भंडारा डोंगरावरील एका झाडाखाली तुकाराम महाराज ध्यान करत बसायचे असे वाचले होते. बाकी यावर अधिक प्रकाश आपल्याकडील संतसाहित्याचे गाढे अभ्यासक धनाजीराव वाकडे किंवा किसन शिंदे हे टाकू शकतील असे वाटते.

इथलं काही लेखक्,काही भटके आणि काही खाउ घालणारे यांच्या धाग्यावर कौतुकाचे शब्द लिहिणं बंद करायचं ठरवलं होतं पण ते शक्य होत नाही. वल्ली त्यातलाच एक,

मन१'s picture

23 Nov 2011 - 2:10 pm | मन१

पुण्यापास्नं जवळच आहे म्हणायचं कार्ले-भाज्या सारखं.

अन्या दातार's picture

23 Nov 2011 - 3:20 pm | अन्या दातार

कार्ले-भाजेच्याही अलिकडे आहे

चौकटराजा's picture

11 Jan 2012 - 6:42 pm | चौकटराजा

अलीकडेच मी सुमारे ३५ वर्षानी घोरवाडी डोंगरावर गेलो होतो. पण वल्ली , गड्या पायर् याचा रायझर टेरर आहे . पाच वेळा थांबावे लागले. मला जुंगफ्राउ ला पुढच्या वर्षी जायचे आहे . कसं जमायचं ? तिथे पार वरपर्यन्त लिफ्ट आहे महणे. तुझा आशीर्वाद दे म्हणजे सगळं जमेल .

मालोजीराव's picture

11 Jan 2012 - 6:53 pm | मालोजीराव

वल्लीशेठ और खजानेकी खोज ! ;)

योगेश आलेकरी's picture

9 Dec 2015 - 12:22 pm | योगेश आलेकरी

पुन्हा एकदा जाव लागणार हा लेख वाचून.. मागे एकदा मुंबई पुणे मार्गावरील लेण्या पाहत फिरत असता ईथे आलेलो पण माहीती कमी होती.. आता पुर्ण मिळतेय :-) धन्वाद

लई भारी's picture

9 Dec 2015 - 3:57 pm | लई भारी

वल्ली राव, इथे आधी जाउन आलोय पण तुम्ही दिलेली माहिती वाचून परत जायची इच्छा झालीय(आधी नुसतीच भटकंती झालीय). बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.
अलीकडे २-४ वेळा ट्रेकला जातोय, पायऱ्यांच्या अलीकडून पायवाट आहे तिथून वरच्या पठारापर्यंत. तुमच्याबरोबर जायला आवडेल एकदा :)

भंडारा डोंगर

संत तुकारामांच्या उल्लेखामुळे इथे जायची उत्सुकता आहे. आवर्जून जाण्यासारखी जागा आहे का ही? कसे जावे लागेल?

बेगडेवाडी स्टेशन च्या मागे, इंद्रायणी नदीच्या पात्रात रांजण-खळगे आहेत. ते बघितले असेलच तुम्ही.
image

प्रचेतस's picture

9 Dec 2015 - 4:30 pm | प्रचेतस

भंडारा डोंगर तशी आवर्जून बघण्यासारखी जागा नाही. वर विठ्ठलाचं आणि तुकारामबुवांचं मंदिर आहे. मात्र संध्याकाळी तिकडच्या कठड्यावर बसावं, मस्त थंडगार आणि जोरदार वारं असतं. लवकर आलात तर पलीकडच्या बाजूला पायवाटेने अर्धा डोंगर उतरून हीनपंथीय गुहा आणि स्तूप पहावा.

जायचे दोन मार्ग. - मुंबई पुणे महामार्गाने देहूरोड- देहू गाव - तिथून इंद्रायणीवरचा पूल करुन भंडारा डोंगर
दुसरा मार्ग म्हणजे - निगडी- तळवडे - देहू गाव - भंडारा डोंगर.

राजो's picture

9 Dec 2015 - 4:11 pm | राजो

वल्ली --> प्रचेतस ??

प्रचेतस's picture

9 Dec 2015 - 4:30 pm | प्रचेतस

:)

सत्याचे प्रयोग's picture

9 Dec 2015 - 7:48 pm | सत्याचे प्रयोग

घोरवाडेश्वर परीसरात जन्म झाला पण अशी अभ्यासपूर्ण माहिती कोणी दिली नव्हती अत्यंत धन्यवाद.

बॅटमॅन's picture

10 Dec 2015 - 12:06 pm | बॅटमॅन

हा लेख नजरेतून सुटला खरा. मस्तच!!!!

सुनील's picture

10 Dec 2015 - 1:54 pm | सुनील

धेनुकाकट ही तत्कालीन बौद्ध संघाची वस्तू. कदाचित आजचे डहाणू. आंध्रप्रदेशातही सातवाहनांचे धेनुकाकाट्क(धन्यकाकाटक) नावाचे एक शहर होते. प्रस्तुत शिलालेखातील धेनुकाकट नेमके कुठले याचा उलगडा होत नाही

http://aisiakshare.com/node/2885