मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राचीन भारतः शेलारवाडी लेणी(घोरावडेश्वर)

प्रचेतस · · कलादालन
शेलारवाडीची लेणी-बौद्धधर्मातील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या गेलेल्या ९/१० लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. भाऊबीजेनंतर लगेचच दुसर्‍या दिवशी इथे सकाळी ७ वाजताच पोहोचलो ते भावंडांसह. शेलारवाडी तशी घरापासून-चिंचवडपासून अगदीच जवळ, जेमतेम १० किमी. इथे बरेचवेळा येणे झालेलेच होते. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडीमुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणतात पण वास्तविक ही लेणी आहेत पायथ्याच्या शेलारवाडीला खेटून. समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत. वर जायला उत्तम पायर्‍या बांधलेल्या आहेत पण खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही काहिशी दमछाकच होते. २० मिनिटातच लेण्यांपाशी पोहोचलो. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना. पण अत्यंत साधीसुधी. इथे नक्षीकाम वगैरे अत्यंत थोडकेच. कदाचित निधीच्या अभावामुळे इथे जास्त संस्करण होवू शकले नसावे. डावीकडच्या पहिल्या विहारामध्ये आता विठ्ठ्ल रखुमाईच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. पाठीमागेच त्या कोरलेल्याही दिसतात. कदाचित शिवकालानंतर हा बदल झालेला असावा. १. पायथ्यापासून दिसणारी लेणी Image removed. २. विहारातील आजच्या मूर्ती. Image removed. ३. Image removed. नंतर काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये छोटेखानी कक्ष, त्यात झोपण्यासाठी खोदलेले ओटे अशीच यांची रचना. ४. विहार Image removed. ५. विहार Image removed. ६. विहार Image removed. उजवीकडच्या बाजूला एका विहारावर एक ब्राह्मी प्राकृतात एक शिलालेख कोरलेला आहे,. आजमितीला तो बराचसा जीर्ण झालेला आहे. जवळचा पाण्याची टाकी पण आहेत. या विहाराशेजारीच येथील एकमेव चैत्यगृह आहे. आज त्याचे रूपांतर शिवमंदिरात झालेले आहे. हाच येथील सुप्रसिद्ध घोरावडेश्वर महादेव. हे चैत्यगृह पण अगदी साधे. सभामंडप, त्यात असलेले ओटे आणि आत गर्भगृह अशी याची रचना. सभामंडपातही एक शिलालेख कोरलेला आहे. गर्भगृहात आज शिवलिंगाची स्थापना झालेली दिसत असली तरी तिथल्या मूळच्या स्तूपाची हर्मिकेची चौकट आजही तिथे स्पष्ट दिसते. घोरावडेश्वर देवस्थान पंचक्रोशीतल्या भाविकांचे श्रद्धास्थानच, दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा असते. ७. चैत्यगृहाशेजारील शिलालेख कोरलेला विहार Image removed. ८. पूर्वीचे चैत्यगृह, आजचे शिवमंदिर Image removed. ९. चैत्यगृहातील सभामंडपातील कक्ष Image removed. १०. तिथल्या कक्षावर असलेला कोरीव लेख Image removed. ११. घोरावडेश्वर महादेव Image removed. १२. शिवलिंगाच्या वर दिसत असलेली हर्मिकेची चौकट Image removed. बाहेरील शिलालेखात कोरलेला मजकूर याप्रमाणे. सिधं धेनुकाकडे वायवस हालकियस कुडुबिकस उसभ णकस कुडुबिणिय सिअगुत णिकाय देयधमं लेणं सह पुते- ण णं(द)गहपतिणा सहो धेनुकाकट येथे वास्तव्यास असलेल्या शेतकरी असलेल्या ऋषभनकाची पत्नी श्रीयगुप्ती हिने हे लेणे गृहपती असलेल्या आपल्या नंद नावाच्या पुत्रासह धर्मार्थ दान केले आहे. धेनुकाकट ही तत्कालीन बौद्ध संघाची वस्तू. कदाचित आजचे डहाणू. आंध्रप्रदेशातही सातवाहनांचे धेनुकाकाट्क(धन्यकाकाटक) नावाचे एक शहर होते. प्रस्तुत शिलालेखातील धेनुकाकट नेमके कुठले याचा उलगडा होत नाही. हालिक म्हणजे हल-नांगर धरणारा अर्थात शेतकरी. म्हणजे सामान्य जनतेचाही लेणीनिर्मितीस हातभार लागलेला होता हे येथे स्पष्ट होते. चैत्यगृहाच्या पुढे एक विहार व एक पाण्याचे टाके असून त्यापुढे कड्याला लगटून चालत गेल्यास वरच्या बाजूला एक बर्‍यापैकी प्रशस्त विहार खोदलेला आहे. पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी छोटेसे प्रस्तरारोहण करून वर जावे लागते. इथली गुहा बर्‍यापैकी मोठी असून विहारातील खोल्यांमध्ये गणपती, शिवलिंग, देवी इत्यादींची स्थापना झालेली दिसते. इथल्या लेणीमध्ये जे थोडेफार अलंकरण दिसते ते इथेच. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात व सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. अर्थात नक्षीकाम तसे ओबडधोबडच आहे. १३. कातळारोहण करून गेल्यावर वरच्या टप्प्यात असलेला प्रशस्त विहार Image removed. १४. विहारात असलेले ऩक्षीकामाने सजलेले कक्ष. Image removed. १५. स्तंभांवर कोरलेली गजशिल्पे. Image removed. तिथून परत उतरून पहिल्या टप्प्यापाशी आलो. लेण्यांच्या एका बाजूला पुणे मुंबई दृतगती महामार्ग आणि दुसरीकडे जुना पुणे मुंबई महामार्ग आणि त्यापुढे इंद्रायणी, बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आणि समोर गजाननाची प्रचंड मूर्ती असा सुरेख नजारा दिसतो. जेमतेम अर्ध्या तासात ही सर्व लेणी पाहून होतात पण ती जुन्या नव्याचा संगम दाखवून मनाला नक्कीच तृप्त करतात. १६. वरून दिसणारा निसर्गरम्य देखावा Image removed. १७. सोमाटणेफाटा येथे असलेली गजाननाची मूर्ती. Image removed. १८ परतीच्या वाटेवर कॅमेर्‍यात बंद केलेले फुल Image removed.

वाचन 17305 प्रतिक्रिया 0