मन्वंतर: एक दृष्यकथा

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
14 Nov 2011 - 4:24 pm

मन्वंतर ही ’जोशी की कांबळे’ हा चित्रपट ज्या कथेवरून घेतला आहे, तीची दृष्यकथा. कथानक तसं सरळसोट आहे. जातीव्यवस्थाग्रस्त भारतीय समाजात माणसाची आयडेंटिटी जातीमुळे कशी अधोरेखित केली जाते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीस तीच ओळख कशी चुकीची आहे हे लक्षात येतं तेव्हा कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं, याचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. जस्टीस जोशींचा मुलगा लहानपणी पळवला जातो आणि अपघाताने तो एका कांबळे कुटुंबात वाढतो. बारा/चौदा(यात लेखकाने घोळ घातलाय) वर्षांनी जोशींना आपला मुलगा कुठे आहे हे कळते आणि ते मुलाला घरी घेऊन येतात. त्यानंतर जे काही जोशी आणि कांबळे कुटुंबियांच्या घरात, मनांत आणि मनामनांत जी वादळे होतात, त्याची थोडक्यात कथा म्हणजे हे पुस्तक आहे.

जोशींच्या घरात ते स्वत:, बायको आणि दोन मुली आहेत. कांबळेंच्या कुटुंबातही नेमके तितकेच लोक आहेत. जोशींचा कांबळे कुटुंबावर यासाठी राग आहे की त्यांनी वेळीच मुलाला पोलिसांकडे सुपूर्त केले असते तर बारा वर्षं त्यांना मुलापासून दूर रहावं लागलं नसतं आनि आता जी आहे ती परिस्थिती उद्भवली नसती. कांबळे कुटुंबाने कोंड्याचा मांडा करताना प्रसंगी स्वत: अर्धपोटी राहून त्याला खाऊ घातलंय त्यामुळं त्यांना मुलाला(आधीचा वेद, नंतर सिद्धार्थ) सोडताना वाईट वाटणं साहजिक आहे. जोशींची बायको तर जन्मदात्री, तिने बराच काळ त्याच्या आठवणीत घालवलाय, त्याच्या अनुपस्थितीत त्याची खुर्ची राखून ठेवलीय, वाढदिवस ही साजरे केले आहेत. त्यामुळे प्रसंगी नमतं घेऊन मुलगा घरी रहावा अशी तिची इच्छा आहे. शेवटी कोणत्या घरी राहायचं, *कर्णाप्रमाणे कर्मवादाची वाट चोखाळायची की कृष्णाप्रमाणे जन्मदात्यांना श्रेष्ठत्व द्यायचं हा निर्णय सिद्धार्थवरच सोपवला जातो.

वास्तविकत: ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा जुना वाद कम संघर्ष आहे. तरी तो मांडताना आक्रस्ताळेपणा टाळलाय हे विशेष करून सांगावंसं वाटतं. पण मग ते करताना दोन्ही बाजूची माणसं अशक्यरित्या समंजसही दाखवली आहेत हे थोडंसं पटत नाही. बारा वर्षांनी मुलगा बारावीत असतो आणि रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा की नाही हा जर प्रश्न उपस्थित होतो तर तो पळवला जात असतानाचं त्याचं वय किमान ५ वर्षे असणं अपेक्षित आहे. इतक्या वयाच्या, सुस्थितीत वाढलेल्या आणि न्यायधीशाचा मुलगा असलेल्या मुलाला आपला पूर्वेतिहास लक्षात नसतो किंवा घरी परत जाण्याचा प्रयत्न करत नाही हे पट्त नाही. इतका वेळ जरी रागात असले तरी संयमाने वागणारे जस्टीस जोशी ऐनवेळी मुलाला रिझर्वेशनचा फायदा घे म्हणून सांगतात आणि रागारागाने मुद्दाम 'कांबळे' आडनांव लावणारा मुलगा स्वतःला ब्राह्मण मानून थेट नकार देतो.

या सगळ्या प्रकारात ज्याच्याभोवती ही कथा फिरते, तो कथानायक संभ्रमात आहे असं वाटतं. त्याला आधीतर तर जोशींकडे यायचंच नसतं. नंतर तो येतो ते जोशींकडे अनुकूल वातावरणात शिकून कांबळे कुटुंबाचा उद्धार करण्याच्या इराद्याने. त्याच्या मनातला विखार जात नाही. कपड्यांत, राहणीत बदल करणं हे त्याला आयडेंटिटी क्रायसिस वाटतं. त्याची मूळं कशात आहेत हेच त्याला उमगत नाही. आधी कांबळे म्हणून आग्रही असणारा नंतर जोशीत्व मान्य करतो पण त्यात त्याची भावनिक आंदोलने म्हणावी तितकी मनाला भिडत नाहीत. सिद्धार्थला सतत मार्गदर्शन करणारे गौतम सर देखिल त्याने काय करावे याचं उत्तर देताना पुन्हा हिंदू पुराण कथांचा आधार घेतात हे त्यांच्या चितारलेल्या व्यक्तिरेखेस विसंगत वाटते. पुस्तकाच्या शेवटीही सिद्धार्थला जोशी कुटुंबाने बौद्ध धर्म स्वीकारावा असंच वाटत राहातं, पण जोशींच्या मते हिंदू धर्म काळानुसार बदलत आलाय तेव्हा त्यांना धर्मांतराची गरज नाही.जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था जितक्या लवकर समूळ नष्ट होईल तितके बरं, यावर मात्र दोघा बापलेकांचं एकमत आहे.

बर्‍याचशा गोष्टी संदिग्ध सोडल्या आहेत. जसे, सिद्धार्थ नक्की १२ वर्षांनंतर सापडला की १४? कारण यावरून त्याचे हरवतेवेळी काय वय असेल आणि तो थोडा का होईना जाणता होता की नाही याबद्दल आडाखे आणि प्रश्न बांधता येतात. तो स्वतः आणि इतरांच्या नावांमधूनही काही वेगळेपण दिसत नाही. एक त्याचं स्वतःचं आणि सरांचं नांव सोडलं, तर कुठेच अगदीच जातीय-धार्मिकवाद दिसत नाही. कांबळे कुटुंबात-मंगेश, लक्ष्मी, छाया अशी नावे आहेत तर जोशींकडे-विक्रम, मालती, रूचा(ऋचा नव्हे),सोनाली अशी आहेत. पाच वर्षाचा मुलगा सुखवस्तू घरातून नवीन कुटुंबात आल्यावरचं स्थित्यंतर कुठेही उल्लेखलेलं नाही. तेच तो एकदा जोशींकडे येऊन कांबळेंकडे परतल्यावर त्याला वाकळ(गोधडी)वर झोप न लागणं, सगळे दंतमंजनाने दात घासत असताना याने मात्र आत जाऊन टूथपेस्ट-ब्रश घेऊन येणं हे त्याचं नवीन घरात कंडीशन झालेलं असणं दाखवतं. हरवला तेव्हा तो नक्कीच ३-५ वर्षांचा असावा. म्हणजे नक्कीच त्याला त्याचं नांव सांगता येत असलं पाहिजे. अशावेळी सिद्धार्थ म्हणवलं जाणं यात काय अर्थ भरला आहे हे कळत नसलं तरी हे नांव वेगळं आहे हे एवढं तरी निश्चितच कळालं असणार. याबद्दलही त्याचे नवीन आईबाप काही भाष्य करत नाहीत. वर्तामानात मात्र त्याला सिद्धार्थच म्हणून घ्यायला आवडतं. आणि वेद नांव का आवडत नाही यावर ऋग्वेदातल्या पुरूषसूक्तात दहाव्या मंडलात कोणापासून कोण निर्माण झालेलं आहे हे दिलंय. म्हणजेच वेद हे नांवच मुळी वर्ण आणि जातीव्यवस्थेचे द्योतक आहे. तेव्हा त्याची जोशी-आई "आता आपल्यातही सिद्धार्थ-गौतम अशी नांवे असतात, तुला आवडते तर राहू दे सिद्धार्थच" म्हणून सगळ्यांना गप्प करते.

जोशींच्या मते, या नेमक्या वर्षी आपण याला आपल्या घरी आणला नसता तर याचं ब्राह्मण्य सिद्ध झालं नसतं, तो दलितच राहिला असता आणि त्यायोगे खचितच रिझर्वेशनच्या कोट्यातून एक जागा सहज त्याला मिळाली असती आणि डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झालं असतं. आता या परिस्थितीस ते कारणीभूत आहेत म्हणून, आणि एखादी इस्टेट विकण्याची झळ सोसली तर त्यांच्याकडे इतकी ऐपत आहे म्हणून ते सिद्धार्थल डोनेशन भरून मेडिकलला पाठवायला तयार होतात. मात्र त्यांनी हीच गोष्ट सोनालीसाठी केलेली नसते.

एक मुद्दा मात्र व्यवस्थितरित्या मांडलेला दिसतो. वेद-सिद्धार्थचा कांबळे ते जोशी हा प्रवास हा अगदीच अचानकपणे किंवा अधांतरी वाटत नाही. जोशांची मुलगी आणि वेदची मोठी बहीण सोनल ही वेळोवेळी त्याच्या संकल्पना कशा खोट्या आणि चुकीच्या आहेत हे दाखवून देते. तिच्या लेखी जाती-धर्म ही अवडंबरं आहेत. ती पांघरून वेद तिच्याकडे गेला तर ती त्याला नक्कीच मदत करणार नाही. पण जर माणूस म्हणून मदत मागायला गेला तर मात्र हमखास करेल. आधी खळखळ करून पण नंतर पटल्यावर तिचं म्हणणं तो पटकन मान्य करूतो.

लेखकाच्या मते चित्रपट लिहिण्यासाठी जी लिहिली जाते, ती दृष्यकथा. कदाचित मी चूक असेन, पण मला हे नाटकाचं पुस्तक असल्यासारखं वाटलं. पण नाटकात असणारी स्वगते आणि प्रसंगांची पूर्वबैठक सांगणारी वर्णने तितकीशी नाहीत. बहुधा फक्त संवाद लिहिण्याचं काम लेखकाचं असावं आणि बाकीचं दिग्दर्शकानं निभावलं असावं. उत्कृष्ट कथा-पटकथा-संवादासाठी झी गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान पुरस्कार "जोशी की कांबळे" ला मिळाला होता. कदाचित दृक्श्राव्य माध्यम नुसत्या पुस्तकाहून अधिक प्रभावीपणे मांडलं गेलं असेल. चित्रपट अजून पाहिला नाहीय, कदाचित पाहिल्यावर वेगळं मत असू शकेल.

लेखक : श्रीधर तिळवे
नवता प्रकाशन
पृष्ठसंख्या:६२

*कर्ण आणि कृष्ण दोघेही जन्मदात्यांच्या घरी वाढले नाहीत. जेव्हा सत्य कळाले तेव्हाही कर्ण पालनपोषण करणार्‍यांच्या घरी राहिला, अर्थात त्याला त्याच्या जन्मादात्रीने स्वीकारले नव्हते हा भाग इथे सोयीस्कररित्या गाळला आहे खरा. पण कृष्ण मात्र जन्मदात्यांकडे परत गेला. कर्ण कर्मदात्यांकडे राहिला म्हणून तो कर्मवाद आणि कृष्णाचा तो जन्मवाद. "देवादिकांनीही अशा वेळेस एकसारखेच आचरण केले नाहीय, तर तू देखिल तुला जो योग्य वाटतो तो पंथ अनुसर" असा सल्ला सिद्धार्थला त्याचे सर देतात.

समाजमाहितीसमीक्षा

प्रतिक्रिया

कथा वेगळ्या वळणाची आहे. कथेत ज्या गाळलेल्या जागा आहेत, त्या चित्रपटात भरल्या गेल्या आहेत का हे पाहणे मनोरंजक ठरेल. म.क. नेहमीच वेगळ्या वातेवरच्या चित्रपटांची ओळख करून देते. हा चित्रपटही पहावा असं वाटतंय.

रेवती's picture

14 Nov 2011 - 8:11 pm | रेवती

हम्म....
एकंदरीतच गोंधळ असलेल्या विषयावरची आणखी गोंधळात पाडणारी कथा आसावी असे समिक्षा वाचून वाटले.
पुस्तक विकत घेऊन वाचावे का हा प्रश्न पडला.:(
म.कचे लेखन बरेच दिवसांनी आले म्हणून बरे वाटले.

नगरीनिरंजन's picture

14 Nov 2011 - 8:52 pm | नगरीनिरंजन

समीक्षा आवडली. कथेतल्या पात्रांचे भावनिक आणि व्यवहारिक हिंदोळे पकडणे खरंच खूप आव्हानात्मक असणार.
तांत्रिक चुकांनी कथेची विश्वासार्हता कमी झाल्यास सगळंच ओढून ताणून असल्यासारखं वाटू शकतं.

एकंदरीतच गोंधळ असलेल्या विषयावरची आणखी गोंधळात पाडणारी कथा आसावी असे समिक्षा वाचून वाटले

असेच म्हणतो.
चित्रपट अर्थातच पाहिला नाही आहे.

अवांतरःया अनुषंगाने एक प्रश्न पडतो की सतत जातीवर बोलल्याने, कथा-नाटकं लिहील्याने जात कधी संपणार? जातीचा उल्लेखच आयुष्यातून काढून टाकणे शक्य नाहीच का?

मस्त कलंदर's picture

16 Nov 2011 - 2:37 pm | मस्त कलंदर

तांत्रिक चुका कदाचित नसाव्यात. हे पुस्तक म्हणजे जसे लिखित नाटक असते, त्याप्रमाणे चित्रपटातले संवाद आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपटात दिग्दर्शकाने मेहनत घेतली असावी असे वाटतेय.

अवांतरःया अनुषंगाने एक प्रश्न पडतो की सतत जातीवर बोलल्याने, कथा-नाटकं लिहील्याने जात कधी संपणार? जातीचा उल्लेखच आयुष्यातून काढून टाकणे शक्य नाहीच का?

खरंय.. :-(
म्हणूनच कदाचित 'जाता जात नाही ती...' असे म्हणत असावेत.

माझीही शॅम्पेन's picture

14 Nov 2011 - 11:02 pm | माझीही शॅम्पेन

कथा आणि समीक्षा दोन्ही आवडल !

*कर्ण आणि कृष्ण दोघेही जन्मदात्यांच्या घरी वाढले नाहीत. जेव्हा सत्य कळाले तेव्हाही कर्ण पालनपोषण करणार्‍यांच्या घरी राहिला, अर्थात त्याला त्याच्या जन्मादात्रीने स्वीकारले नव्हते हा भाग इथे सोयीस्कररित्या गाळला आहे खरा. पण कृष्ण मात्र जन्मदात्यांकडे परत गेला. कर्ण कर्मदात्यांकडे राहिला म्हणून तो कर्मवाद आणि कृष्णाचा तो जन्मवाद. "देवादिकांनीही अशा वेळेस एकसारखेच आचरण केले नाहीय, तर तू देखिल तुला जो योग्य वाटतो तो पंथ अनुसर" असा सल्ला सिद्धार्थला त्याचे सर देतात.

हे तर जबरा ! पण लोक इतिहासाकडे नुसत बघत राहतात आणि आपण स्वत: इतिहास घडवू शकतो हे विसरून जातात

ऋषिकेश's picture

15 Nov 2011 - 9:04 am | ऋषिकेश

छान परिचय. कधी मिळालं तर वाचेन

मला एकुणच कथानक वाचुन कॉनरॅड रिक्टर यांच्या 'द लाईट इन द फॉरेस्ट' या अप्रतिम कादंबरीची आठवण झाली. या कादंबरीतही एका मुळ ब्रिटिश बालकाला अमेरिकेतील मुळ इंडीयन्स वाढवतात. इतके की तो स्वतःला 'इन्डीयन' समजतो व गोर्‍यांचा द्वेष करत असतो. मात्र पुढे आपली भुमी वाचवण्यासाठी इंडियन टोळ्या जे करार करतात त्यात ही मुले पुन्हा आपल्या 'ओरिजिनल' आई-वडिलांकडे जातात.. त्यामुलाचे भावविश्व या कादंबरीत अत्यंत म्हणजे अत्यंतच सुंदर रेखाटले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Nov 2011 - 6:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तकाची ओळख आवडली.

मला परिक्षण वाचतांना आठवण झाली ती संजय पवार यांच्या कोण म्हणतो टक्का दिला या नाटकाची. सामाजिक एकोप्यासाठी पत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय स्त्री अथवा पुरुष घेतल्याशिवाय संबंधित कुंटुंबाला रेशन कार्ड,गॅस, वगैरे देणार नाही. अशी ती कल्पना होती.

मनातल्या मनात : भडमकर मास्तरांनी नाटका-बिटकांचा विषय घेऊन सालं लिहिलं पाहिजे. पण, मास्तरही हल्ली दिसत नाही.

-दिलीप बिरुटे