नुकतीच पहाट झाली होती. शांत वातावरण थंड हवा होती. आईनं हलकेच त्याला उठवल.
तो उठला.बालक उमललं.गोंडस गोबर्या चेहर्यावर त्यानं पाणी मारलं.
आन्हिकं उरकली . केस चापुन्-चोपुन लावले भांग पाडला. आईला त्यानं 'टाटा' केलं
हातात सत्य घेतलं आणि शाळेसाठी म्हणुन निघाला, गाणी म्हणत,
आपल्याच नादात गुणगुणत. अगदि आनंदात आणि "स्व" च्छंदात. मूर्तिमंत ते बालपणच होतं ,
निरागसता होती ती निसर्गात उमललेली.
आनंदात बागडत चिखलात,कमळावर उड्या मारत,रस्त्यात आवडेल त्या फुलाला हात लावुन पहात तो बालक निघाला.
त्या निरागसतेत स्वच्छ-अस्वच्छ गोष्टीच नव्हत्या. होतं ते निष्पाप, पवित्र बालपण.
हातात सत्य घेउन तो बालक पोहोचला थेट बाजारात्.दुकानात मांडलेली सुंदर खेळणी घ्यायची त्याला इच्छा झाली.
पण दुकानदारान हटकलं."काय रे हवं तुला?" असं विचारलं.
"खेळणी" बालकानं उत्तर दिलं.
"पण मग तु काय देणार मला त्या बदल्यात? काय आहे तुझ्याकडं?" दुकानदारानं सवयीनं विचारलं.
"हे घ्या. हे सत्य आहे माझ्याकडे." बालक बोलला.
"अरे हट्... हे कुठं विकुन पैसे मिळवता येणारेत? ह्याची कुठं बाजारात किंमत आहे ?" दुकानदाराचा चेहरा काळवंडला.
वैतागुन त्यानं ते सत्य दिलं फेकुन्.आणि बालकानं...
...
आपल्याच आनंदात जाउन ते सत्य उचललं. आनंदात, स्वच्छंदात त्या सत्याशी खेळत खेळत तो पुढे निघाला.
कसला अपेक्षाभंग नि कसलं काय? नुस्ता आनंदाचा प्रवास तो. मनात होतं हसु आणि हसुच.
त्याला थोडासाच पुढं गेल्यावर दिसला तो जाणारा एक ग्राहक.
खांद्यावर बारा हत्तींचं ओझं टाकल्यागत त्याचा चेहरा होता.
बालकानं त्यालाही विचारलं "हे घेनाल का? ते देनाल का?"
एवढ्या दगदगीतही एक हसतमुख चेहरा पाहुन ग्राहकालाही थोडं बरं वाटलं. तो म्हणला :-
"हे आहे तर छान बेटा.पण ह्यानं कुठं माझं उपाशी पोट भरतं? ह्यानं कुठं सुरक्षितता मिळते?"
बालकाला ह्यातलं काहिच कळलं नाही.त्यानं हातानं टाळी वाजवुन एक उडी मारली. आणि पुढं चालु लागला.
पुढं भेटला एक शिष्ट माणूस,सुट्-बूट्-हॅट् असा टकारान्त त्रयीचा पोषाख करुन. चार-पाच लोक त्याला सुरक्षा देत जात होते.
तो उद्योजक फोनचर कसलिशी "डील" करत होता.त्या तजेलदार,काहिशा आकर्षक व्यक्तिमत्वाकडे तो आपोआप ओढला गेला.
मुलापाशी जाउन त्याच्यशी थोडं खेळला.मग जाउ लागला. मुलानं त्यालाही हातातलं सत्य दाखवलं.
उद्योजकानं ते काळजीपुर्वक पाह्यलं.पण ह्याचं घाउक उत्पादन होउ शकणार नाही.थोड्याशा नाराजीनच त्यानं ते परत बालकाला.
डोक्यावर टपली मारली, आणि टाटा करत निघुन गेला.
तेव्हढ्यात आला एक वेडसर,विरह-व्याकुळ इसम, अर्धवट दाढी वाढवलेला,अस्ताव्यास्त, आणि नशेत धुत्त.
त्यानं बालकाच्या हातुन ते काढुन घेतलं आणि विचारलं "ह्यानं माझी प्रेयसी परत मिळेल?"
आणि पुन्हा थोड्या वेळानं "नाही" असं स्वतः शीच म्हणुन तो पुढं निघुन गेला.
ते सत्य हलकट, भ्रष्ट पुढार्यानही पाहिलं.
पण ते पाहुन बिछान्यात मध्यरात्री फणा काढुन कधीही दंश करण्याच्या तयारीत असलेला नाग
अचानक झोपमोड करुन तोंडासमोर आल्यावर जितकं दचकायला होइल, तितक्या भितीयुक्त रागानं
त्यानं ते सत्य झाकण्याचा ,दूर सारण्याचा प्रयत्न केला.पण ते त्याच्याच्यानं होइना म्हटल्यावर स्वतःच धूम पळत सुटला.
कमालए बुवा. बालकाला सत्य झेपतं. पण पुढार्याला नाही!
बालकानं फक्त समोर पाहिलं. गोबर्या गालावरचा शेंबुड एका हातानं पुसत, दुसर्या हातानं आपली खाकी चड्डी
सावरत आपल्याच आनंदात काही अंतर तो पुढं गेला.
तिथं बसला होता एक आत्म्-मग्न संशोधक्-सायंटिस्ट. त्याच्या हातातही होतं एक सत्य.
आपल्या पोतडीतुन एक एक सत्य बाहेर काढत तो हातातल्या सत्याला जोडुन पहात होता उत्साहानं.
पण असं करुनही,सत्याला सत्य जोडुनही काहिच घडत नाही म्हणल्यावर किंचित निराश व्हायचा.
पण लगेच पुन्हा आशेनं पोतडितल्या नव्या सत्याला हात घालायचा. तेव्हढ्यात समोरुन येणारा बालक
त्याला दिसला.त्याचे डोळे चमकले.श्वास प्रफुल्लित झाला.डोळ्यात कुतुहल साठले.
त्यानं बाळाच्या डोक्यावरुन हात फिरवला.मस्त खाउ दिला हातावर ठेवुन्.आणि घेतलं त्याच्याकडुन सत्य.
आणि काय कमाल! ते त्याच्या हातातील सत्याशी अगदि बरोब्बर मेळ खात होतं. त्याच्याबरोबर चपखल बसलं होतं.
त्यातुन उपजला होता एक प्रत्य्क्ष, सुंदर, उपयुक्त, मानवजातउपकारक शोध!!
त्याच्याही चेहर्यावर बालकाचच हसु आलं,उत्साही,निरागस्.अगदि तोच्,त्याच बालकाचा चेहरा बनला सायंटिस्टचा.
त्याच्याडोळ्यात हजार सुर्यांचं तेज, शत्-चंद्रांची शितलता, परमोच्च ज्ञानाचा आनंद आणि ज्ञान पुर्णपणे विसरल्यावर
मिळणार्या मुक्तीचा आनंद उमटला.
सायंटिस्ट आनंदाने नाचत त्या शोधाची मुक्त हस्ते उधळण करु लागला.
जगभर तरंग उमटला.जणु येक चमत्कार जाहला.
सृष्टी हर्षानं आंदोळली.सर्वत्र सुखा-समाधानाचं वारं वाहिलं. लोकांना दु:खातुन थोडसं हायसं मिळालं.
त्या शोधानं प्रेमिकाचं व्यंग दूर झालं, त्याला शत-जन्माचं प्रेम मिळालं.
लोकांना त्या शोधाची गरज आहे, असं पाहुन उद्योजकानं तो शोध घाउक प्रमाणात तयार करायला सुरुवात केली.
तो शोध दुकानदाराकडे ठेवला विक्रीसाठी.
त्या शोधरुपी सत्याला किंमत मिळु लागली.दुकानदार पैसे कमवु लागला.
ग्राहकाला नवा शोध त्याच्या किमतीसकट आवडला.त्याच्या अनेक समस्या दूर झाल्या.
पोटही भरलं. सुरक्षितताही मिळाली.
त्याच्या खांद्यात जणु बारा हत्तिंचं बळ आलं!
इकडे दिवस मावळतीला लागला होता.
बालक गेला मनविहारातल्या उत्फुल्ल घरी; नवीन सत्य शोधायला.
सायंटिस्ट कामाला लागला नवा शोध लावायच्या.
सुर्य रात्रीची झोप घेण्या निघाला.
माया नवीन दु:खे, नवीन समस्या शोधु लागली.
थांबलं कुणीच कुणीच नाही. ईश्वरही नाही आणि सैतानही नाही.
प्रतिक्रिया
30 May 2008 - 2:09 pm | अरुण मनोहर
>>>>छान कल्पना. फार खोल अर्थ आहे असे वाटते. सत्य शोधत फिरावे लागेल!
चालू द्या.
काही वेगळा अर्थ निघत असेल तर खुलासा करतो-
>>>त्या शोधानं प्रेमिकाचं व्यंग दूर झालं, त्याला शत-जन्माचं प्रेम मिळालं.-- हे कोणते सत्य होते याचा शोध कसा करायचा असा विचार माझ्या मनात वरील प्रतीसाद लिहीतांना आला होता.
---> सरळमार्गी.
30 May 2008 - 2:27 pm | मन
थेट "सत्या"मुळं नाही, पण त्यातुन लागलेल्या "शोधा"मुळं त्याला मदत झाली.
सत्य म्हणजे कुठलाही विचार, तत्व.
ते आधिचच असत जगामध्ये फक्त आपण त्याची नव्यानं मांडणी करुन उपयुक्त रूप देतो.
ढोबळ मानानं पहायचं तर गुरुत्वाकर्षण न्युटननं "निर्माण" नाही केलं.
फक्त ते तसं असतं, इतकच सांगितलं.(दाखवुन दिलं.)
त्यातुनच पुढे लागला तो राइट बंधूंनी लावलेला विमानाचा "शोध"
त्यांनी न्युटनच्या सत्याचा फक्त मूर्त/उप्युक्त रूप देण्यासाठी वापर केला.
स्वगतः- ह्म्म्म ......निम्मा दिवस होउन गेला लिहुन आणि फारसा प्रतिसाद नाही.
बहुदा भट्टी जमलेली दिसत नाहिये यावेळेस.बहुदा काहितरी "अगम्य" लिहिलय हे.
असो.पुढल्या वेळेस थोडी काळजी,थोडे अधिक कष्ट घेउन जरा नीट लिहावं लागेल.
बाकी, प्रतिसादाबद्दल आभार
आपलाच,
मनोबा
30 May 2008 - 2:54 pm | विजुभाऊ
सुंदर रूपक आहे.
30 May 2008 - 8:02 pm | धनंजय
रूपक आवडले, आशय आवडला.
30 May 2008 - 4:37 pm | वैभव
मस्त लेख आहे.......
30 May 2008 - 5:29 pm | विसोबा खेचर
एका वेगळ्याच ष्टाईलीत कथा लिहिली आहे.. :)
अजूनही येऊ द्या!
तात्या.
30 May 2008 - 5:45 pm | शितल
आवडली रे तुझी कल्पना शक्ती,
खर॑च वेगळ॑च प्रकारे लेखाची मा॑डणी केली आहे.
येऊ दे अजुन छान लिहीत आहेस.
30 May 2008 - 11:38 pm | वरदा
वेगळं आहे... हलकं फुलकं वाचताना मधेच गहन टॉपिक आल्यावर जरा विचार करावा लागला....आवडलं...
30 May 2008 - 11:42 pm | पक्या
ष्टाईल वेगळी -पण इतक ऍबस्ट्रॅक्ट लेखन आवडत नाही आपल्याला. त्यापेक्षा पुरोगामी कथा चांगली वाटली होती.
-- पक्या
2 Jun 2008 - 11:07 pm | मन
धनंजय्,विजुभाउ,अरुण राव, वैभव,तात्या, शितल ताई, वरदा ताई ह्या सगळ्यांचे
आणि एकुण सर्वच वाचकांचे मनःपुर्वक आभार.
अगदि ज्यांनी दुर्बोध लेखन असं म्हणुन कानपिचक्या दिल्यात, त्यांचेही आभार,त्यांच्या प्रामाणिक मताबद्दल
आणी लेखाची दखल घेतल्याबद्दल.
पुढील लेखन दुर्बोध न ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन.
शक्यतो घडलेल्या,किंवा प्रत्य्क्षात घडु शकणार्या घटनांवर लिखाण केलं तर ते दुर्बोध राहील असं वाटत नाही.
म्हणुन त्याच प्रकारचं लिहायचा प्रयत्न असेल.
(म्हणजे मग एका उप्-प्रतिसादात जसं कथेचं स्पष्टीकरण दिलय, तशी कथा " उलगडुन" दाखवावी लागणार नाही.)
आपलाच,
मनोबा
3 Jun 2008 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोष्ट आवडली.
3 Jun 2008 - 10:52 am | प्राजु
लघुकथा चांगली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Jun 2008 - 11:11 am | गणा मास्तर
सुंदर रूपककथा आहे.
मला दहावीतला "मी शांतीचा उपासक आहे" हा धडा आठवला.
भालचंद्र नेमड्यांची कोसला पण काहिशी याच शेलीतली.
स्वगतः- ह्म्म्म ......निम्मा दिवस होउन गेला लिहुन आणि फारसा प्रतिसाद नाही.
बहुदा भट्टी जमलेली दिसत नाहिये यावेळेस.बहुदा काहितरी "अगम्य" लिहिलय हे.
असो.पुढल्या वेळेस थोडी काळजी,थोडे अधिक कष्ट घेउन जरा नीट लिहावं लागेल.
बाकी, प्रतिसादाबद्दल आभार
अरे वाचुन सुन्न होउन गेलो. त्यामुळे प्रतिसाद द्यायला पण विसरलो.