नियमांस धरून... (२)

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
28 May 2008 - 7:25 pm

'जागतिक'च्या लोकआवृत्तीचे प्रकाशन कर्णिकांच्या घरी एका साध्या समारंभात झालं तेव्हा तिथं उपस्थित असलेल्यांपैकी एकट्या विश्वनाथ देसायांनाच कर्णिकांच्या प्रकृतीची कल्पना होती. डायलिसीस सुरू होऊल चौदा महिने होत आले होते. मधल्या काळात कर्णिकांच्या या नव्या कादंबरीनं यशाची नवी शिखरं गाठली होती. केवळ खप म्हणून नव्हे; तिनं चर्चेतही भर टाकली होती. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतरचा एकही महिना असा गेला नव्हता की, जेव्हा या कादंबरीच्या अनुषंगानं समाजगटांमध्ये चर्चा झाली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर लोकआवृत्तीच्या प्रकाशनाचा सोहळा संपल्यानंतर कमलताईंचा निरोप घेण्यासाठी नाडकर्णी स्वयंपाक घरात गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची खिन्नता त्यांच्यातील संपादकाच्या नजरेनं बरोबर टिपली.
"वहिनी, इतका सुरेख कार्यक्रम झाल्यानंतरही तुम्ही अशा खिन्न का?"
"..." कमलताईंनी नुसतंच त्यांच्याकडं पाहिलं. ते मौन पुरेसं बोलकं होतं. काही तरी घडतंय हे निश्चित, हे नाडकर्ण्यांच्या ध्यानी आलं. डायनिंग टेबलावरची एक खुर्ची ओढून त्यांनी बैठक मारली आणि बाहेर देसायांना हाक मारली. ते आत आले आणि काही काळातच नाडकर्ण्यांसमोर चित्र स्पष्ट झालं.
आरंभी महिन्याला एकवार करावं लागणारं डायलिसीस आता आठवड्याला एकदा करावं लागत होतं. पेन्शन आणि लेखनाचं मानधन यांच्या जोरावर आर्थिक आघाडी सांभाळली जात असली तरी इथून पुढं ती किती निभावली जाईल याची चिंता करण्याची वेळ आली होती. कर्णिकांनी आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेत काम केलं असल्यानं त्यांना मिळणारी पेन्शन विदेशी चलनातील असली तरी आधीची बचत आता संपत आली होती. यापुढं महिन्याचा खर्च दर महिन्याच्या पेन्शनमधूनच भागवावा लागणार हे दिसत होतं. कमलताईंची घालमेल होत होती. विषय काढला की, कर्णिक लगेचच "आपल्यापुढं खाण्याची चिंता तर निर्माण झालेली नाही ना?" असं विचारून त्यांना गप्प करत. वर "मला हात पसरायचे नाहीत. तुझी सोय आहे. त्याची चिंता करू नकोस," असंही सांगत; त्यामुळं कमलताईंना बोलणं अशक्य व्हायचं. पण या विषयाची तड लावावी लागेल आणि ऐकतील तर फक्त देसायांचं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. अनायासे नाडकर्ण्यांच्या समोर हा विषय खुला झाला आणि त्यांच्या मनावरचं मणामणाचं ओझं एकदम हलकं झालं.
---
सगळा हिशेब केल्यावर जेव्हा देसायांनी दाखवून दिलं की, केवळ पेन्शनवर आयकराची सूट मिळाली तरी, डायलिसिसचा खर्च भागवून नियमित निर्वाहही स्वबळावर शक्य आहे तेव्हा कुठं दरवाजा थोडा किलकिला झाला. हात पसरायचे नाहीत हा कर्णिकांचा हट्ट मोडून काढणं एकट्या देसायांना शक्यही नव्हतं. नाडकर्ण्यांचं वजन कामी आलं.
"आपण एक करू. अर्थमंत्र्यांना सांगू. विदेशी चलनात मिळणाऱ्या पेन्शनवरील आयकर माफ करण्याची तरतूद काही विशिष्ट संस्थांसाठी आहे. त्याच चौकटीचा आधार घेत तुमच्या पेन्शनवरील आयकर माफ केला जावा अशी व्यवस्था करण्यासाठी त्यांना सांगू. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवर्समध्ये ते बसते," नाडकर्ण्यांनी सांगितलं तेव्हा कर्णिकांना मान डोलावण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. पुढच्याच आठवड्यात डायलिसीसचा पुढचा कोर्स आखावा लागेल, असं गोडबोल्यांनी सांगून ठेवलं होतंच.
---
नाडकर्ण्यांनी दिल्लीला सुधीरला फोन केला तेव्हा तो बाहेर पडण्याच्या तयारीतच होता. नाडकर्ण्यांच्या वृत्तपत्राचा विशेष प्रतिनिधी म्हणून राजकीय वर्तुळात उठबस असल्यानं पटेलांपर्यंत त्याला पोचता येणार होतं.
"बाहेर फारसं कुठं काही कळता कामा नये. कर्णिकांवर डायलिसीस सुरू आहे. पैशांची तजवीज आत्तापर्यंत पेन्शनमधूनच झाली आहे. पण यापुढं थोडं अवघड आहे..."
पलिकडं सुधीर सुन्न झाला असावा. नाडकर्ण्यांना ठाऊक होतं की, सुघीरच्या पिढीवर कर्णिकांचा प्रभाव मोठा होता. केवळ कादंबऱ्या आणि नाटकं यामुळं नव्हे किंवा कर्णिकांच्या विनोदी कथांमुळंही नव्हे. सुधीरसारख्यांवर खरा प्रभाव होता तो कर्णिकांच्या विपुल राजकीय उपहासात्मक लेखनाचा. बाईंची राजवट आणि त्यानंतर आघाडी या गोंडस नावांखाली झालेल्या खिचड्यांच्या प्रयोगांनी कर्णिकांची लेखणी इतकी फुलवली होती की त्या काळात कर्णिक हे गंभीर वृत्तीचे कादंबरीकार आणि नाटककारही आहेत हे विस्मृतीतच गेल्यासारखं झालं होतं. पुढं देशानं धार्मिक आधारावरचं धृवीकरण अनुभवलं तेव्हाही त्या राजकारण्यांची खिल्ली उडवण्यात कर्णिक आघाडीवर होतेच. सुधीरच्या पिढीवर या साऱ्याचा प्रभाव जबरदस्त होता.
"पार्सलमधून अर्ज पाठवतो आहे. पटेलांशी बोलून ठेव. उद्या त्यांच्या हाती अर्ज देता येईल असं पहा," नाडकर्ण्यांनी सांगितलं. सुधीरनं होकार भरला. "बाकी काय घडामोडी आहेत?" नाडकर्णी कामाकडं वळले.
"विशेष काही नाही. आज चव्हाणांची प्रेस आहे. रुटीन. कॉमर्स मॅटर्स. शिंदे बहुदा आज येथे येताहेत, त्यांचं पहावं लागेल." प्रदेशाध्यक्षांच्या या दिल्लीवारीत तसं विशेष काही नव्हतं. पण बातमी म्हणून तेवढी घडामोड पुरेशी होती.
"तो येईल आणि परतेल. त्यातून काहीही होणार नाही," नाडकर्ण्यांनी नेतृत्त्वबदलाच्या हालचालींबाबतची त्यांची नापसंती व्यक्त केली आणि फोन बंद केला.
---
"कर्णीकांची मराठी मनावर मोहिनी आहे. वन ऑफ द स्टॉलवर्ट्स ऑफ हिज जनरेशन..." नॉर्थ ब्लॉकमध्ये सुधीरनं पटेलांना गाठून कर्णिकांचा अर्ज त्यांच्या हाती ठेवला. सुधीरसारख्या पत्रकारानं पुढं केलेला अर्ज. त्यामुळं पटेलांनी शांतपणे ऐकून घ्यायला सुरवात केली. कामाचं स्वरूप सांगून झाल्यानंतर सुधीर कर्णिकांचं मोठेपण सांगू लागला तेव्हा स्टॉलवर्ट्स या शब्दानंतरच पटेलांनी त्याला रोखलं.
"इफ इट्स जेन्युईन, वील डू इट. आय नो यू आर नॉट गोईंग टू पुट इन अ वर्ड फॉर एनीबडी..."
"नो सर, इन फॅक्ट, त्यांच्यासाठी शब्द टाकावा इतका मी मोठा नाही. त्यांच्यासारख्यांचं माझी पिढी एक देणं लागते म्हणून..."
"ओह, आय अंडरस्टॅंड. वील डू इट. फॉलोअप ठेव. पांडे वील सी इट थ्रू. आय'ल टेल हिम टू टॉक टू यू" पांडे हा पटेलांचा सचिव. पटेलांनी तिथंच अर्जातील आवश्यक त्या मजकुरापाशी खूण करून शेजारी 'ए' असं इंग्रजीतील अक्षर लिहिलं. खाली शेरा टाकला, "प्रोसेस अकॉर्डिंग टू रूल्स." सुधीरच्या खांद्यावर थोपटत पटेलांनी शेजारीच उभ्या असलेल्या खासदारांकडं मोर्चा वळवला.
---
पंधरवडा उलटून गेला तरी पांडेचा काहीच निरोप न आल्यानं अस्वस्थ झालेल्या सुधीरनं ठरवलं की, प्रत्यक्ष पहायचं. "यू नो सुधीर. सरांनी मार्क केलं आहे त्या अर्जावर. पण त्यांना सगळं कसं नियमांनुसार लागतं. त्यामुळं प्रोसिजरली तो अर्ज प्रोसेस केला जातोय. अॅट प्रेझेंट, अ नोट इज बीईंग प्रिपेअर्ड ऑन दॅट. आय'म ऑल्सो फॉलोईंग इट अप. मी पाहीन तो लवकर जॉईंट सेक्रेटरी आणि सेक्रेटरीकडं कसा जाईल ते."
---
सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं सुधीर नेहमी म्हणायचा. त्याचा अनुभव असाही प्रत्यक्ष स्वतःला घ्यावा लागेल हे मात्र त्याच्यालेखी नवं होतं. महिन्यानंतर त्यानं पुन्हा अर्जाची चौकशी केली तेव्हा तो कर विभागाच्या सचिवांपर्यंत पोचला होता इतकंच त्याला कळलं. बजेटची तयारी सुरू असल्यानं आता पटेलांची भेट मिळणं मुश्कील होतं. त्यामुळं त्यानं कर्णिक कोण, हे काम होणं कसं आवश्यक आहे वगैरे पांडेच्या डोक्यावर बिंबवण्याचा जोरदार प्रयत्न केला. "मी समजू शकतो. पण सरांची कामाची पद्धत तुला मी सांगण्याची गरज नाही. ती वेलनोन आहे." पांडेच्या या विधानांवर सुधीर किती नाही म्हटलं तरी संतापला होताच. तरीही त्याला आवर घालत त्यानं, "पांडेजी, यहा दिल्लीमें प्रोसेस एक्स्पडाईट भी होती है ना. अशी किती उदाहऱणे देऊ तुम्हाला?" त्याच्या या प्रश्नावर पांडेनं आपल्या वाणीत मिठास आणत, "आय'ल पर्सनली एन्शुअर दॅट इट ईज डन विदिन अ वीक,"असं सांगितलं.
आठवड्यात पुन्हा फॉलोअप घेण्याचं दोघांचंही ठरलं.
---
"निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणारे पैसे जनकल्याणाच्या योजनांवर खर्च केले जात असल्यानं त्याला विरोध करण्याचं कारण नाही. किंबहुना यासंबंधी सरकारची बांधिलकी स्पष्ट व्हावी म्हणून निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांपैकी २५ टक्के रक्कम तात्काळ लोककल्याणाच्या योजनांसाठी, २५ टक्के रक्कम शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील पायाभूत संरचनांसाठी वापरण्याचे बंधन टाकणारी तरतूद यासंबंधीच्या कायद्यात केली जाणार आहे. याच अधिवेशनात त्यासंबंधीचे दुरूस्ती विधेयक मांडले जाईल," अशी घोषणा अर्थसंकल्पाच्या भाषणात पटेलांनी केली तेव्हा लोकसभेत बाके दणाणली. अर्थसंकल्प मांडल्यानंतर दूरचित्रवाहिन्यांवर त्यांचा प्रफुल्ल चेहरा झळकत होता. अर्थकारणाला आणखी एक महत्त्वाचे वळण देणारा निर्णय, अशी त्यांच्या या निर्णयाची वाखणणी सर्वत्र होत होती. निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते.
---
दुसरा अर्ज करण्यास किंवा स्मरणपत्र पाठवण्यास कर्णिकांनी नकार देऊन दोन महिने झाले होते. डायलिसीस आता आठवड्यात दोनदा करण्याची गरज होतीच, पण ते आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यानं एकदाच करावयाचं, असं त्यांनी डॉ. गोडबोल्यांना सांगून टाकलं होतं. कमलताईंच्या डोळ्याला धार लागायचीच बाकी होती. अस्वस्थ देसाई आणि नाडकर्णी यांनीही कर्णिकांच्या निर्धारापुढं हात टेकले होते. पण त्यांनी त्यांच्या पातळीवर सुधीरकडून पाठपुरावा सुरू ठेवला होता. नाडकर्ण्यांनी एरवीची त्यांची चौकट बाजूला सारून राज्यातील तिन्ही केंद्रीय मंत्र्यांशी बोलणं करून पाठपुरावा करण्यास सांगितलं होतं. आश्वासनं मिळाली होती; पण त्यातून किती यश येईल याची त्यांना खुद्द खात्री नव्हती. कारण हे तिन्ही मंत्री आणि पटेल यांचा स्तरच अतिशय भिन्न होता.
---
पुणे (प्रतिनिधी) - ज्येष्ठ साहित्यीक राधाकृष्ण कर्णिक यांचं आज दीर्घ आजारामुळं निधन झालं. मराठी मनावर गेली तीस वर्षे अधिराज्य करणाऱ्या या साहित्यीकाच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे...
...पंतप्रधान श्री कांत आचार्य यांनी कर्णिकांच्या 'जागतिक' या कादंबरीचा उल्लेख करून श्रद्धांजली वाहताना सांगितलं की, कर्णिकांसारख्या अर्थतज्ज्ञाची नाळ त्यांच्या साहित्यविषयक जाणिवांमुळे लोकांमध्ये पक्की रुजलेली होती...
---
अंत्यसंस्कार करून देसाई, नाडकर्णी वगैरे मंडळी कर्णिकांच्या घरी परतली, तेव्हा गेटवरच पोस्टमननं सावधपणे देसायांना बाजूला घेतलं.
"अण्णांसाठी आलेलं पत्र आहे. आत जाऊन देऊ शकणार नाही..." त्यालाही भावनावेग आवरत नव्हता. देसायांनी त्याच्या खांद्यावर थोपटत पाकिट हाती घेतलं. यू.जी.आय.एस.चा शिक्का त्यावर होता. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही अक्षरं देसायांच्या पाणावलेल्या डोळ्यांनाही नीट दिसली. देसायांनी पाकिट फोडलं. कागद उघडला. राधाकृष्ण कर्णिक यांची साहित्यसेवा ध्यानी घेऊन त्यांना विदेशी चलनात मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावरील आयकर माफ करण्यात येत असल्याचा निर्णय झाला असल्याची माहिती त्यात संदर्भ क्रमांक आणि तारखेसह देण्यात आली होती. प्रत पुण्याच्या मुख्य आयकर आयुक्तांना पाठवल्याचा उल्लेख होता. खाली सचिवांचा शेरा होता, पुण्याच्या आयकर आयुक्तांशी संपर्क साधण्याचा.
---
"मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःस्पृहपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन."
"मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, संघराज्याचा पंतप्रधान म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीजकरून एरव्ही मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही."

(पूर्ण)

कथाअनुभव

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2008 - 9:39 pm | प्रभाकर पेठकर

क्लिष्ट राजकारण आहे. विषयाच व्याप बराच मोठा आहे. पण दोन भागांत थोडक्यात आटोपला आहे.
राजकिय भाषा, शासकिय भाषा, शासकिय कार्यपद्धती आणि नोकरशाहीतील 'जीवघेणी' दिरंगाई ह्याने अंगावर काटा येतो. ह्यालाच मुत्सदेगिरी म्हणतात का? तसे असेल तर, आग लागो अशा मुत्सदेगिरीला.
त्याच बरोबर भारतासारख्या भरमसाठ लोकवस्तीच्या देशात असे अनेक नामवंत, अस्सल 'गरजू' असतील त्या सर्वांनाच कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणे शक्य असेल का? असाही प्रश्न मनात उभा ठाकतो.
म्हणूनच कदाचित सरकारला 'शासन' असा समर्पक प्रतिशब्द असावा.

लेखन सुंदर आहे. विषयाला व्यवस्थित बांधले आहे. अभिनंदन.

यशोधरा's picture

28 May 2008 - 9:54 pm | यशोधरा

आवडलं अतिशय. सुरेखच जमलंय हे लिखाण.
शासकीय नोकरशाही आणि दिरंगाई यांचे नातेच आहे बहुतेक!!

सुमीत's picture

29 May 2008 - 11:00 am | सुमीत

श्रावण काका, धरण विस्थापितांच्या समस्येला तुमच्या लेखनीने हात घालून तुम्ही त्यांचे विश्व प्रभावी पणे मांडले होते.
आणि आता ही कथा तुमच्यातल्या प्रतिभेला वेगळ्या उंची वर घेऊन गेली आहे.
कथे तले भाष्य, पात्रे, त्यांच्या वागण्याची तर्‍हा अगदी आस पास घडते असेच वाटते, थोड्क्यात लेखनीतून जिंवत पणा तुम्ही यशस्वी पणे मांडला आहे.

स्वाती दिनेश's picture

29 May 2008 - 1:12 pm | स्वाती दिनेश

राजकारणाची गोष्ट अतिशय प्रभावीपणे आणि विषयाचा पसारा मोठा असूनही दोन भागात नीटसपणे बांधली आहे.
कथा आवडली,
स्वाती

सन्जोप राव's picture

29 May 2008 - 10:20 pm | सन्जोप राव

हे असे तंतोतंत कुणाच्या तरी बाबतीत झाल्याचे आठवते आहे. दळवी?
कथा जबरदस्त आहे. पात्रांच्या तोंडचे इंग्रजी संवाद तसेच ठेवल्याबद्दल - त्यांचे ओढूनताणून मराठीकरण करण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल विशेष अभिनंदन.
सन्जोप राव

बिपिन कार्यकर्ते's picture

29 May 2008 - 11:25 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर कथा. तिमचे पूर्वीचे लेखही वाचले होते. छान लिहिता. भाषा सहज वाटली आणि म्हणूनच वाचताना मजा आली.

बिपिन.

विसुनाना's picture

31 May 2008 - 12:12 pm | विसुनाना

'दात असणे' या वाक्प्रचाराचे उत्कृष्ट उदाहरण. कथानक व्यवहारातले. आवडले.

तांत्रिक बाबीतही अत्यंत सरस कथा.

प्रशांतकवळे's picture

31 May 2008 - 6:11 pm | प्रशांतकवळे

खुप सुंदर!

अवघड विषय, सहजतेने मांडलात

प्रशांत

राजे's picture

1 Jun 2008 - 1:26 pm | राजे (not verified)

खुप सुंदर!

अवघड विषय, सहजतेने मांडलात

हेच म्हणतो !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

श्रावण मोडक's picture

2 Jun 2008 - 4:44 pm | श्रावण मोडक

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

2 Jun 2008 - 5:44 pm | भडकमकर मास्तर

छान कथा...

१.परदेशी संस्थेत परदेशी चलनातून पगार आणि पेन्शन...
२. डायलिसिस...
३. नाटककार , कादंबरीकार

...दळवीच वाटताहेत..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/