नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली.
आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत. त्यामुळे मागील महीन्यात मी नातवाला पहायला जोडीने तेथे गेलो होतो. वेळ होताच त्यामुळे पहिल्यांदा न्युयॉर्क शहर बघायला घेतले. क्विन्स डोमेस्टीक ऐअर पोर्टवर आमची सामानाची बॅग सापडत नव्हती. म्हणून आम्ही तेथील काउंटरवर उभे असतांना एक मुलगी आमचे नाव पुकारत आली. तिने इंग्रजीत सांगीतले की आमचे सामान 'Lost & Found' मधल्या केबीन मध्ये आहे. आमच्या जावयांना ते लगेच समजले. ते फार हुशार आहेत. येथे येण्याच्या आधी ते भारतात बंगळूरू येथे कामाला होते. मुलगीही तेथेच कामाला होती. तेथेच त्यांनी एकमेकांचे लग्न जुळवले. असो.
तर थोडक्यात आमचे सामान आम्हाला परत विनासायास मिळाले. आम्ही न्युयॉर्क शहर भटकण्यासाठी काही ठिकाणी टॅक्सी केली तर बर्याचदा शहर बससेवा वापरली. शहरबसमधले (City Bus) दरवाजे ड्रायव्हर अॅटोमॅटीक पद्धतीने उघडतो. येथे तिकीट आधीच काढावे लागते. पुण्यातल्या सिटीबससारखे येथे कंडक्टर नसतात. बस लागली तर ड्रायव्हर प्लॅस्टिकची पिशवी देतो.
M9 या क्रमांकाच्या बसने आम्ही ब्रॉडवे येथे फिरत होते. तेथे एका स्टॉपवर आम्ही उतरून पायी पायी उंच इमारती पाहत चाललो असतांना समोरून एक माणसांचा घोळका येत होता. त्यांच्या डोक्यावर गांधी टोप्या होत्या. हातात तिरंगी ध्वज आणि बॅनर्स होते. आमच्या जावयांना तो ध्वज भारताचा वाटला. त्यांनी तसे मला बोलून दाखवले. आमचे 'हे' म्हणाले की कदाचीत तो नायजर या देशाचा ध्वज असावा. (पण नंतर तो भारताचाच ध्वज होता हे समजले. आमच्या जावयांना दुरूनही ध्वज ओळखता आला त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटला. असो.) तो जमाव जवळ आला तर त्यांच्या गांधी टोप्यांवर 'मी आण्णा आहे' असे लिहीलेले होते. म्हणजे ते इंग्रजीत "I am Aana" असेच होते पण वाचकांना समजावे म्हणून मी तसे लिहीले. त्यातील बरेचसे चेहेरे भारतीय होते. आमच्या जावयांनी चौकशी त्यातील लोकांशी चर्चा केली. त्यातून समजले की भारतात त्यावेळी आण्णा हजारेंचे दिल्लीत भ्रष्टाचार, लोकपाल याबाबत उपोषण चालू आहे व येथील भारतीय लोकांनी त्याला पाठींबा म्हणून हा मोर्चा काढला होता. हळूहळू तो मोर्चा पुढे निघून गेला. मलाही त्या मोर्चात जावेसे वाटले पण आम्हाला शहर बघायचे असल्याने तो मोह टाळला.
तो मोर्चा पुढे निघून गेल्यानंतर तेथे एक छोटा ध्वज खाली पडलेला दिसला. तेव्हड्यात आमच्या शेजारी मोर्चा बघत उभा असलेला एक गोरापान अमेरिकन युवक तेथे गेला अन त्याने तो ध्वज उचलला. त्यानंतर तो ध्वज त्याने माझ्या हातात दिला. त्याने मी भारतीय आहे हे माझ्या नेसलेल्या साडीवरून ओळखले असावे असा माझा अंदाज आहे. आम्ही तो ध्वज हातात घेतला व नंतर तो व्यवस्थित घडी घालून आमच्या बॅगेत ठेवला.
एका अमेरिकन युवकाने दुसर्या देशाच्या ध्वजालादेखील योग्य सन्मान दिल्याचे पाहून मला त्याचा अभिमान वाटला.
नंतर आम्ही बरीच अमेरीका पाहिली. त्यांच्यावरचे लेख नंतर कधीतरी.
(सदरहू लेख चुकून काव्यदालनात गेला आहे. माझे हे अस्सेच होते नेहमी. मागेही अमेरिकेत असतांना चुकून एका अमेरिकन तरूणालाच माझे जावई समजून त्याच्यामागे चित्रपटाच्या रांगेत थांबले होते. नंतर जावई बोलवायला आले तर लाजून लाजून चुर झाले मी. कुणी संपादक माझ्या लेखाला योग्यस्थळी हलवण्याचे कष्ट घेईल का? की नविन धागा काढावा लागेल त्यासाठी?)
प्रतिक्रिया
28 Aug 2011 - 12:50 pm | कुंदन
तिकडच्या चकचकीत रस्त्यांवर गाडीचे अॅव्हरेज चांगले मिळत असेल नै ?
28 Aug 2011 - 12:57 pm | पाषाणभेद
गाड्यांबाबत मला फारसे ज्ञान नाही. आमच्या जावयांना विचारले पाहिजे. त्यांना निरनिराळ्या गाड्यांबाबत आवड आहे.
29 Aug 2011 - 2:26 pm | विजुभाऊ
काही प्रश्न :
तिकडच्या चकचकीत रस्त्यांवर गाडीचे अॅव्हरेज स्टेपनीसोबत चागले मिळते की रेग्यूलर टायरसोबत?
तिथे रेग्यूलर टायर एकदम गोटा असतात की नक्षीदार?
मास्तरानी मार्गदर्शन करावे?
--
28 Aug 2011 - 2:07 pm | प्रास
छान असतात.
हा देखिल आवडला.
पुढल्या भागांच्या प्रतिक्षेत.
(पण बहुतेक सवयीने कवितांच्या दालनात प्रकाशित होत असावेत.) ;-)
28 Aug 2011 - 3:06 pm | नगरीनिरंजन
सहमत आहे.
मुक्तपिठीय प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहे याची नोंद घ्यावी. :)
28 Aug 2011 - 3:33 pm | आत्मशून्य
.
28 Aug 2011 - 4:18 pm | धन्या
आयच्या गावात आयरोली, नवी मुंबई चार शुन्य शुन्य चार शुन्य सात !!!
प्रसंगावधान वगैरे म्हणतात ते हेच असावं (किंवा इफेक्ट आणण्यासाठी लेख जाणून बु़जून कविता विभागात टाकला असावा ;) ). असो. आख्ख्या लेखाने जे केलं नाही, ते शेवटच्या ओळीने झालं. बेक्कार हसलो राव कुणी संपादक माझ्या लेखाला योग्यस्थळी हलवण्याचे कष्ट घेईल का? की नविन धागा काढावा लागेल त्यासाठी? हे वाचून.
सातपूर यमायडीशीसह मुंबई पुणे नाशिक सुवर्ण त्रिकोण झालाच पाहिजे !!!
28 Aug 2011 - 9:27 pm | आत्मशून्य
इथे अनेक लोकांनी ओळ अन ओळ एंजोय केलीय राव...... ;)
28 Aug 2011 - 10:20 pm | धन्या
आमचा निर्देश "की नविन धागा काढावा लागेल त्यासाठी?" या क्रांतीकारी प्रश्नार्थक ओळीकडे आहे. उपेक्षितांचे अंतरंग, त्यांची प्रस्थापितांविरुद्ध आंदोलन करण्याची वृत्ती त्याच्यातून व्यक्त होते ;)
28 Aug 2011 - 6:10 pm | मीनल
मस्त आहे लेख. अजून खमंग करता आला असता पण कदाचित त्यातली मजा गेले असती.
28 Aug 2011 - 6:28 pm | धन्या
आम्ही तर बापडे एखादा पदार्थ खमंग झाला की तो खाताना मजा येते असंच समजत होतो :)
28 Aug 2011 - 7:07 pm | श्रावण मोडक
वाट पाहतोय पुढच्या लेखांची. ;)
28 Aug 2011 - 8:20 pm | सहज
व्हॉट हॅपन्स इन मुक्तपीठ मस्ट स्टे इन मुक्तपीठ :-)
बाकी कोणी सर्किटरावांचा अमेरिकावारीवरचा लेख शोधुन दाखवेल काय?
29 Aug 2011 - 2:15 pm | भडकमकर मास्तर
कॉलिन्ग मिभो ...................कॉलिन्ग मिभो....
सर्किटरावांचा अमेरिकावारीवरचा लेख
त्याच लेखामुळे मी प्रथम मिपाकडे वळलो...
28 Aug 2011 - 9:07 pm | यकु
काकू मस्त लेख लिहीलात..
काही लोक एवढी अमेरिका फिरून येतात पण किबोर्ड्मधून त्याबद्दल एक अक्षर काढतील तर शपथ !
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
वर सहजराव म्हणतायत तो लेख पण शोधून द्या राव कुणीतरी - वाचायचाय.
28 Aug 2011 - 9:21 pm | पैसा
आणखी कुठे कुठे फिरलात काकू? तुमचे जावई बरीक हुषार हो!!
28 Aug 2011 - 9:31 pm | प्रकाश१११
पाषाणभेद -सहज सुंदर लेख .मस्त ..!!
28 Aug 2011 - 10:01 pm | राजेश घासकडवी
पुढच्या प्रवासवर्णनाच्या प्रतीक्षेत. या प्रवासाच्या आधारावर तुम्हाला ओबामांचं कुठे चुकतं यावर मतं मांडायचा अधिकार मिळालेला आहेच.
28 Aug 2011 - 11:09 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
29 Aug 2011 - 12:30 pm | कवितानागेश
=))
फार दिवसानी इतका अभ्यासपूर्ण, रोचक, अद्भूत, प्रवासवर्णनपर सांस्कृतिक लेख वाचनात आला.
अभिमान वाटला.
आता विमानाची माहिती, नातवाचे फोटु, शहर, शहरबस आणि त्यातली ती प्लस्टिकची पिशवी याचे फोटु,
अणि अमेरिकन युवकांची माहिती असे धागे काढता येतील!
;)
29 Aug 2011 - 12:31 pm | कवितानागेश
=))
फार दिवसानी इतका अभ्यासपूर्ण, रोचक, अद्भूत, प्रवासवर्णनपर सांस्कृतिक लेख वाचनात आला.
अभिमान वाटला.
आता विमानाची माहिती, नातवाचे फोटु, शहर, शहरबस आणि त्यातली ती प्लस्टिकची पिशवी याचे फोटु,
अणि अमेरिकन युवकांची माहिती असे धागे काढता येतील!
;)
29 Aug 2011 - 12:39 pm | गवि
मस्त.. :)
29 Aug 2011 - 1:10 pm | दिपक
वाह मेजर पाषाणभेदराव ;-)
मस्तच!
29 Aug 2011 - 1:27 pm | स्पंदना
पाभे कुट कुट फिराय्ल लागलासा?
आत्ता तर अॅव्हरेज वर होतात, गाडीच्या ओ, अन आता बाळंतपणा साठी, मुलीच्या ओ, अमेरिकेत. त्ये सगळ र्हाउ दे, बालंत काढ्याच्या बाटल्या ठेवलेत नव्हे बरुबर. त्येव्हढ विसरु नका.
29 Aug 2011 - 5:51 pm | नरेश_
असो.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. आणि हो तिथं आंघोळीकरिता बि स्लरी*चे पाणी वापरले जाते म्हणे. हा उल्लेख कसा काय राहिला? कदाचित वयाचा परिणाम तर नव्हे?
|
|
|
|
|
|
|
*स्थानिक नदीचे नाव ;)
30 Aug 2011 - 1:30 pm | चेतन सुभाष गुगळे
तिथे घामच येत नाही तर आंघोळ कशाला करायची? आणि केलीच समजा तर त्यांनी स्नानवर्णन केल्यास ते अश्लील साहित्य ठरणार नाही का? शिवाय हे काकूं चे स्नानवर्णन असल्यास त्यामुळे लेखाचा टीआरपी वाढण्याची शक्यता नाहीच.
30 Aug 2011 - 4:35 pm | नरेश_
तिथे घामच येत नाही तर आंघोळ कशाला करायची?
हेही खरच म्हणा.
30 Aug 2011 - 4:31 pm | नरेश_
आज्जी झाल्याबद्दल अभिनंदन हं!!
आता डिंक-लाडूची पा़कृ वाचणे आलेच ;)
30 Aug 2011 - 1:04 pm | श्यामल
पाभे, तुमच्या 'हुश्शार जावयाला' यंदा कर्तव्य असलेला एखादा भाऊ आहे का हो ? नाही म्हणजे मलासुद्धा एक उपवर मुलगी आहे. आणि मला सुद्धा अमेरिकेत जायची खूप इच्छा आहे, म्हणून विचारले हो. :wink: ..............
20 Sep 2011 - 4:42 pm | अन्या दातार
ओ काकू, इथं मिपावर सुद्धा अनेक मोष्ट एलिजिबल बॅचलर्स आहेत की. अधिक माहितीसाठी रेवती आज्जी आणि अपर्णा-अक्षय काकूंशी संपर्क करा; तेवढेच त्यांचेही कष्ट वाचतील. ;)
21 Sep 2011 - 9:07 pm | श्यामल
अन्या मेल्या, मिपावर सगळे 'स्वयंघोषित' मोष्ट एलिजिबल बॅचलर्स आहेत. आणि त्यातले किती पाभे काकुंच्या जावयासारखे हुश्शार आहेत आणि अमेरिकेत आहेत?.......... काहीही बोलायचं मेलं ? :wink:
19 Sep 2011 - 10:23 am | चेतन सुभाष गुगळे
मुक्तपीठा वरील लेख आणि नमुनेदार प्रतिक्रिया...
http://72.78.249.107/esakal/20110916/5706983451935661244.htm
20 Sep 2011 - 6:07 pm | स्मिता.
दुव्यावरचा लेख आणि प्रतिक्रिया वाचून भरपूर मनोरंजन झाले. धन्यु.
पाशू काकूंचा अनुभवही आवडला.
19 Sep 2011 - 10:51 am | चित्रगुप्त
अगं पाषू , दहावीत असताना पासूनच तुझ्या मुलीला पुष्कळ जण कशी मागणी घालू लागले होते, त्यांना नाही म्हणता म्हणता तुमची कशी पंचाइत व्हायची, मग शेवटी बंगळुरात तुझा आता जावै झालेल्या श्रीमंत, स्मार्ट मुलानं कशी तिला आर्जवं करून मागणी घातली, तुम्हा सर्वांना तो त्या मोठ्या फाइव्ह स्टार हॉटेलात घेऊन गेला, मग तुम्ही तो परजातीचा असूनही लग्नाला मान्यता दिलीत, वगैरे सगळी हकिगत किट्टीत सांगितलीस, तेही सांग ना सर्वांना एक धागा काढून.
बाकी लग्नात खूपच मज्जा आली होती, मी पण यांच्या मागे लागलेय, की आत्तापासूनच परजातीतला का होइना, एखादा छान श्रीमंत, स्मार्ट आयटी वाला मुलगा हेरून ठेवा आपल्या नेहा साठी.
- चित्रा गुप्ते.
20 Sep 2011 - 2:07 am | पाषाणभेद
चित्रे तू पण ना! अजून तश्शीच आहे बघ. त्या खुपते तिथे गुप्तेच्या नादाला लागून चांगलाच बंगला बांधायला निघालीस की! अगं माझी मुलगी आहेच तशी गुणाची. पण मग आता आपल्या खाजगी गोष्टी कशाला चार लोकांच्यात सांगायच्या मी म्हणते.
तुझी नेहा माझ्या मुलीबरोबरचीच ना ग? मग अजूनही तुला जावई नाही आला? अग बिगरहुंड्याचा जावई मिळायला देखील नशीब लागतं. आता वय निघून जाईल त्या पेक्षा एखाद्या मॅरेज ब्युरोत नाव का देत नाही ग तिचं?
अग, तुला संगायचच राहिलं. माझ्या मुलीने बंगळूरूच्या आधीही इथे हिंजेवडीत नोकरी केलीये. तेथेल्या मुलांनी तर काय नक्को नक्को म्हणून केलं होतं देवा! बंगळूरूच्या जावयानं मात्र तिला खुप काही शिकवले हो. अगदी कन्नडसुद्धा. मला मेलीला त्यांच काय यडगुंडूं यडगुंडूं चालतं ते कळतच नाही. जावई मात्र हुशार हो माझा. आता बहूदा जपानला जाण्याच्या आधी ते इथे येतील तेव्हा भेटवीन मी तुला. तु पण पाहतच राहशील त्यांना.
चल बाई मी काय बोलत बसलीये तुझ्याबरोबर?
तुला नाही काही कामधाम. तुझा नवरा करतोय घरकाम. आता येईलच आमचं ध्यान करून तल्वार म्यान.
चल ठेवते ग आता.
20 Sep 2011 - 2:23 am | शाहिर
हसुन फुटलो..तरी स्प्रिन्ग ..विंटर..सीएजन बद्द ल नाहि लि हिला ?
मुक्त्पीठ हे फक्त अमेरिका रीटर्न म्हातायांसाठीच असता
प्रतिसाद +१
19 Sep 2011 - 11:03 am | ऋषिकेश
ठ्ठो!!!
फु ट लो !!! =0०=
20 Sep 2011 - 3:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पाषू आणि चित्रा गुप्तेचा एखादा फर्मास संवाद येऊदे की ... मुक्तपिठीय गिरण्यांनी हहपुवा झालीच.
चेतन सुभाष गुगळे यांचे आभार. त्या लेखाखालच्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. जिज्ञासू लोकांनी कृपया लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचणे.
21 Sep 2011 - 3:09 pm | वाहीदा
लेख प्रत्येक ओळ न ओळ मजेशीर ! =)) =))
23 Sep 2011 - 11:08 am | सोत्रि
पाभे,
मजा आणलीत!
पु ले प्र.
- (मुक्त पीठ न वापरता गिर्णीत दळलेलेच पीठ वापरणारा ) सोकाजी