भारताला आणि भारतीयांना अहिंसात्मक प्रतिकाराची ओळख असली तरी त्याचा राजकीय वापर श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रभावीपणे केला आणि त्याची दखल अख्ख्या जगाने घेतली. पण म्हणजे गांधीजींचा प्रयोग जगात अहिंसात्मक प्रतिकाराचा पहिलाच प्रयत्न होता का? का याआधीही असे लढे लढले गेले होते? त्यात कितपत यश आले होते? वगैरे अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे आपण या ३ लेखांच्या लेखमालेतून शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत. मला मिळालेली माहिती इथे लेखाच्या रूपात मांडत आहे. त्यात मिपाकर अधिकची भर घालतीलच अशी खात्री आहे.
अहिंसेवर आधारित राज्य असा इतिहास बघायला लागलो तर पहिला संदर्भ इसवीसन पूर्व ४७० ते ३९१ मधील चायनामधील 'मोहिझम' या तत्त्वाने राजवट करणाऱ्या 'मोहिस्ट' लोकांना जातो. या मंडळींचा 'युद्ध' या संकल्पनेला विरोध होता. मात्र तो काळ युद्धाचा असल्याने त्यांनी किल्ले मात्र बांधलेले होते. थोडक्यात ही पद्धत 'लढा' या पद्धतीतली नसून "बचाव" या पद्धतीचा अधिक होती असे दिसते. त्यामुळे त्याची अधिक माहिती या लेखात देणे योग्य वाटत नाही.
या इतिहासात पहिल्या ज्ञात अहिंसात्मक राजकीय 'विरोधाचा' मान बहुदा ज्यू मंडळींकडे जातो. 'पाँच्यस पायलट' च्या राजवटीत त्याने सिएस्रा येथे रोमन चिन्हे उभारायची ठरवली होती. त्यातील 'रोमच सम्राट' आणि ' गरूडाचे' चिन्ह ज्यू लोकांमध्ये निषिद्ध समजले जात होते. त्यांनी याचा प्रतिकार करायचा ठरवला. ते एका चौकात जमून निदर्शने करू लागले. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतः पाँच्यस पायलटला यावे लागले. मात्र हा लढा यशस्वी झाला नाही व हे निदर्शने करणाऱ्यांना मारण्यात आले होते. या अयशस्वी विरोधाचे वर्णन मात्र वेगळे-वेगळे केले जाते. काही लेखनात पाँच्यसने सैनिकांच्या गराड्यात या विरोध करणाऱ्यांची सभा घेतली व त्यांना मारण्यात येईल अशी धमकी दिली तेव्हा ज्यू लोकांनी 'लॉ ऑफ तोरा' न पाळण्यापेक्षा आम्ही मरणे पसंत करू असे सांगितले व मरण पत्करले असे वर्णन आहे तर काही लेखांत पाँच्यसने ज्यू गटांत आपले हेर पाठवले होते. व एकीकडे त्यांच्यापुढे भाषण करताना अचानक हेरांनी हल्ला चढवून ज्यूंना मारल्याचे सांगितले जाते.
या अयशस्वी लढ्यानंतर अनेक अयशस्वी प्रयत्न न्यूझीलंड, इंग्लंड इथे झाल्याच्या नोंदी आहेत. मात्र पहिला यशस्वी प्रयत्न म्हणून त्यातील १८१९चे पीटरलूचे शिरकाण प्रसिद्ध आहे. ६०००० ते ८०००० लोकांच्या जमावाने ब्रिटिश संसदेच्या प्रतिनिधित्वाच्या ढाच्यात बदल करावा या मागण्यांसाठी मँचेस्टर येथील 'सेंट पीटर'स फील्ड' येथे शांततामय निदर्शने केली होती. तेव्हाच्या स्थानिक न्यायाधिकाऱ्यांनी सैनिकांना कारवाईचे आदेश दिले. या निदर्शनात १५ जण मारले गेले तर शेकडो जखमी झाले. मात्र याचा परिणाम असा झाला की राज्यकर्त्यांना संसदीय प्रतिनिधित्वाचा ढाचा अखेर बदलावा लागला.
१८३४-३८ मधील त्रिनिदादची गुलामगिरीपासून मुक्ततेचा लढा हा कोणत्याही हिंसक घटने शिवाय (दोन्ही बाजूने) झालेला पहिला बदल म्हणता येईल. ब्रिटीशसरकारने गुलामगिरी संपवणारा कायदा घोषित केला. त्याच्या नुसार १८४०पर्यंत (पुढील ६ वर्षात) गुलामगिरी बंद करणे आवश्यक होते. १ ऑगस्ट १८३४ रोजी वयस्क आफ्रिकन-अमेरिकन जमावापुढे या नव्या कायद्याचे वाचन करण्यासाठी जेव्हा गव्हर्नर उभा राहिला तेव्हा या जमावाने 'Pas de six ans. Point de six ans' (सहा वर्षे नाहीत, सहा वर्षे नकोत) हे एकच वाक्य एकत्रितपणे बोलायला सुरवात केली. यामुळे गव्हर्नरला कायद्याचे वाचन करणे अशक्य होऊन बसले. हा लढा पुढे फोफावत गेला व तोपर्यंत चालला जोपर्यंत सरकारने याला तत्त्वतः मान्यता दिली नाही. शेवटी ब्रिटिशांना कायद्यात बदल घडवून १८३८ रोजी गुलामगिरीतून त्रिनिदादला मुक्त करावे लागले
या शिवाय इतरत्र छोटे लढे यशस्वी होऊ लागले होते. मात्र प्रत्येक लढ्याला यश येतच होते असे नाही. १८३८ मधील चेरकीची हकालपट्टी' किंवा 'अश्रूंची पाऊलवाट'
हे अश्याच अयशस्वी लढ्याचे प्रसिद्ध उदाहरण. 'न्यू एकोटा करारा'नुसार (रेड)इंडियन्सना त्यांच्या 'चेरकी/चेरेकी भुमी'तून (म्हणजे हल्लीचे जॉर्जिया, टेक्सास, टेनेसी, अलाबामा आणि उत्तर कॅरोलिना) पश्चिमेकडील 'इंडियन भुमी'त हाकलण्यात आले होते. बहुतांश इंडीयन्सने त्याला विरोध केला. स्वतःहून भाग रिकामा करण्याची तारीख येऊनही त्यांनी आपले कोणतेही सामान विकले नाही, शिवाय त्यांनी आपले सामान बांधलेही नाही. या कराराला आम्ही मानत नाही असे त्यांनी घोषित केले. मात्र वाट बघून कंटाळलेल्या फौजांनी शेवटी त्यांना (प्रसंगी नेसत्या वस्त्रानिशी) तेथून हाकलले. या मार्गाला अजूनही 'Nu na da ul tsun yi' (ते जिथे रडले) तो मार्ग असे म्हटले जाते.
पहिल्या महायुद्धाच्या आधी, न्यूझीलंड मधील सविनय कायदेभंगही फार गाजला होता. परिहाका हे त्या आंदोलनाचे केंद्र होते. ब्रिटिशांनी तिथे पाय रोवले व तेथील जमिनीवर हक्क सांगायला सुरवात केली. तेथील जनतेने व राजाने याविरोधात लढा सुरू केला. परिहाकाच्या गावकऱ्यांनी हडपलेल्या शेतजमिनी नांगरायला आणि त्याभोवती स्वतःची कुंपणे घालायला सुरवात केली. ब्रिटिश सरकारने ही चळवळ दडपण्यास सुरवात केली. त्यांच्या नेत्यासकट शेकडो जणांना कोणत्याही ट्रायल शिवाय तुरुंगांत डांबले गेले. तरीही चळवळ सुरू राहिली. शेवटी हॉल गव्हर्नमेंटने स्थानिकांविरुद्ध सशस्त्र लढा आरंभला. त्यावेळी झालेल्या हिंसेला वैतागून माओरी राजा ताहिकोने भाषण केले ज्यात म्हटले होते की "आम्ही रक्तपाताला वैतागलो आहोत. एक राजा असून मी माझी शस्त्रे गाडून टाकली आहेत. आता या भूमीवर रक्तपात सहन करणार नाही आणि कोणत्याही रक्तपातात सामीलही होणार नाही... " या भाषणाचा माओरी जनतेवर इतका प्रभाव होता की पुढे झालेल्या पहिल्या महायुद्धात एकही माओरी सैनिक सामील झाला नाही
सविनय कायदेभंग म्हणताना हेन्री थोरो चा उल्लेख होऊ नये असे होणे कठीण आहे. खरंतर तो वेगळ्या लेखाचा विषय असल्याने इथे विस्तार भयाने केवळ उल्लेख करत आहे. जाचक कर भरण्यास नकार देऊन त्याने या पद्धतीची सुरवात केली. पुढे कर न भरल्याने त्याला कैद झाल्यावर 'सविनय कायदेभंग' नावाचा निबंध त्याने तुरुंगात लिहिला होता. या निबंधाचे पुढे महात्मा गांधी, मार्टीन ल्युथर किंग यांनी अनेकदा स्वागत - उल्लेख केलेला आढळतो.
क्रमशः
प्रतिक्रिया
25 Aug 2011 - 1:03 pm | जयंत कुलकर्णी
हे माहीत नव्हते ! असेच चांगले लेख मिपावर येऊ देत ही परमेश्वरापाशी प्रार्थना.
"ज्या माणसाला दुसर्याच्या अंतर्मनात डोकावून त्याचे देवत्व जाणून घेता येत नाही तो खरच या जगात एकटा असतो "
- थोरो.
25 Aug 2011 - 12:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेख.
धन्यवाद.
25 Aug 2011 - 1:23 pm | वाहीदा
I believe that there is an important distinction between the concept of "non-violence" and the Gandhian and Tolstoyan idea of "pacifism".
या विषयी ही महत्वपूर्ण माहीती मिळेल का ?
25 Aug 2011 - 1:31 pm | विनीत संखे
खूप छान माहिती.
लगे रहो.
25 Aug 2011 - 1:42 pm | जाई.
अभ्यासपूर्ण लेख पु.भा.प्र
25 Aug 2011 - 1:54 pm | ढ
अत्युत्तम.
वाचनखूण साठवली आहे.
25 Aug 2011 - 1:56 pm | श्रावण मोडक
आगे बढो. :)
25 Aug 2011 - 2:39 pm | दत्ता काळे
छान. माहितीपूर्ण लेख.
25 Aug 2011 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा
वाचनखूण साठवण्यात आलेली आहे....
25 Aug 2011 - 2:59 pm | गणेशा
लेख अभ्यासपुर्ण ..
पुढील लेख अजुन जास्त विश्लेषक असवा//
25 Aug 2011 - 3:33 pm | विजुभाऊ
भारतातील अशी ज्ञात असलेली चळवळ अकबराच्या काळात झाली होती
फतेपूर सिक्री बांधायला अकबराला लाकूड हवे होते. त्याने खेजडे वृक्षाचे ;लाकुड तोडायचे सैन्याला आदेश दिले. बिश्नोई लोकानी झाडे तोडू दिली नाहीत त्यानी झाडाना मिठ्या मारून झाडे तोडण्यास विरोध केला
25 Aug 2011 - 3:36 pm | विनीत संखे
+१
25 Aug 2011 - 3:42 pm | मुलूखावेगळी
हेच चिपको आंदोलन का?
25 Aug 2011 - 4:30 pm | विजुभाऊ
हेच चिपको आंदोलन का?
त्यावेळेस त्याला हे नाव नव्हते.
बिश्नोई लोक झाडांवर फार प्रेम करतात. वृक्ष हत्या त्याना मनुष्य हत्येपेक्षा मोठे पातक वाटते.
हे लोक झाडे तोडत नाहीत तोडू देत नाहीत. शिकार करू देत नाहीत ( सलमान खान चे चिंकारा प्रकरण याच बिश्नोई लोकानी लावून धरले होते) राजस्थानाच्या मरू भूमीत बिश्नोई शेतकर्यांचे शेते सदोदीत हिरवीगार असतात. त्यांच्या शेतातील खेजडी च्या झाडांखाली जमिनीत पाणी आढळते.
सुंदरलाल बहुगुणानी हिमाचल प्रदेशातील वृक्षतोडी विरुद्ध जे आंदोलन केले त्यात शाळेतील मुले व स्त्रीया यानी झाडाना अशाच मिठ्या मारून वृक्षतोड होउ दिली नाही. त्या आंदोलनाचे नाव चिपको असे पडले.
25 Aug 2011 - 4:54 pm | मुलूखावेगळी
धन्यवाद माहितीबद्दल
26 Aug 2011 - 9:38 am | ऋषिकेश
विजुभाऊ, नव्या माहितीबद्दल आभार
25 Aug 2011 - 7:12 pm | मन१
१. इस ३० ते इस ५००
पहिल्या काही शतकात झालेला ख्रिश्चन धर्माचा प्रसार. येशुला क्रुसावर चढवल्यावर काही वर्षातच त्याचा निकटचा सहकारी व भक्त सेंट पॉल ह्यालाही क्रुसावर चढवण्यात आले. मात्र, त्याने आपली धार्मिक निष्ठा सोडली नाही, लोकांना हिंसेला उद्युक्त केले नाही. हा त्याने रोमन सत्तेविरुद्ध व pagen धर्माविरुद्ध(तत्कालीन ख्रिस्तपूर्व ग्रीको-रोमन् मूर्तिपूजकांविरुद्ध) केलेला नि:शस्त्र प्रतिकारच होता.
२. इस ५२७ च्या सुमारास -- मुस्लिम- मुघल व प्रस्थापित धर्मांच्या सत्तेच्या विरोधात सुरुवातीच्या काळात गुरुनानक ह्यांनी केलेले कार्य्/आंदोलन.
३. इस १२९१च्या आसपास-- ज्ञानेश्वरांनी रुढीवादी सत्तेला आव्हान देत तत्कालिन लोकभाषेत आणलेली गीता.
४. इस १५५०च्या सुमारास-- एकनाथांनी बुरसटलेले विचार दूर सारत (तेव्हाच्या) अस्पृश्याच्या लेकराला जवळ केले ती घटना. ह्या घटनेने पुढे एकनाथांचा बराच छळ झाला. पण त्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले. आपल्या मतावर ते ठाम राहिले. हा ही एक प्रकारचा प्रतिकारच नव्हे काय?
५. इस १६६० नंतर कधीतरी -- गुरु तेघबहादूरः- काही काश्मीरी पंडित वा इतर हिंदुंचा मुस्लिम होण्यासाठी औरंगजेबाच्या आदेशावरुन छळ सुरु होता. हे कळताच गुरु तेघबहादूर ह्यांनी औरंगजेबाकडे निरोप धाडला की "त्या सामन्यांचा छळ करण्यापेक्षा तु माझे मत परिवर्तन करुन दाखव, माझे सर्व अनुयायी तुझ्या म्हणण्यानुसार वागतील. " हे ऐकताच औरंगजेबाने बलप्रयोग सुरु केला. गुरु तेघबहादूर ह्यांनी कुठलाही सशस्त्र प्रतिकार केला नाही. त्यांना अटक झाली. "मी माझा धर्म केवळ जिवाच्या भीतीने बदलणार नाही" असं थेट औरंगजेबाच्या दरबारात सांगितल्याने शिखांचे गुरु तेघबदूर ह्यांना देहांत शासन करण्यात आले. पण आपल्या भूमिका त्यांनी कायम ठेवली. जीवाच्या भयाने त्यांनी गुढघे टेकले नाहित.
हाही अहिंसक प्रतिकारच होय.
६.अर्वाचीन इतिहासातील अमेरिकेतील अहिंसेचे उदाहरण म्हणुन इतिहासप्रसिद्ध "बोस्टन टी पार्टी" कडेही बघता येउ शकेल( इ स १७७३). इथुनच अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली.
बादवे, लेख आवडला .
अवांतरः- १.श्री कृष्णाने आकाशात बसलेल्या तथाकथित सर्वशक्तिशाली इंद्राची पूजा सोडून देउन त्याऐवजी आख्ख्या गोकुळास आपल्याला प्रत्य्कषात दहि-दूध देणार्या व उपजिविकेत हरप्रकारे मदत करणार्या गो-वंशाची पूजा करण्यास सांगितले. इंद्र कोपल्यावर स्वतः गो-वर्धन पर्वत उचलला; हा ही अहिंसक आंदोलनाचाच प्रकार होय.
अवांतर:- २.गौतम बुद्धाचेही तसेच. पण ह्यापैकी एक पुराणपुरुष तर दुसरा इसपूर्व काळातील, दिलेल्या कालमर्यादेत(इ स २५ च्या पुढे ते येत नाहित म्हणुन स्वतंत्र टंकले.)
अवांतर:- ३.बुद्धीला न पटणारे मत स्वीकारण्यापेक्षा फर्मावलेली शिक्षा(विषाचा प्याला ) स्वीकारणारा सॉक्रेटिस.
अवांतरः- ४.सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस त्याच्या हल्ल्य्याची स्पष्ट निंदा करणारे महर्षी कल्याण(http://www.youtube.com/watch?v=1TdFLVcejeA) ह्यांनाही अहिंसक विरोधक म्हणता यावे.
26 Aug 2011 - 9:52 am | ऋषिकेश
काहि काय बरीच उदाहरणे राहिली आहेत त्याबद्दल सहमत. विस्तार भयाने मला जी महत्त्वाची वाटली + आठवली तीच उदाहरणे टाकली आहेत व बाकीची भर मिपाकरांना घालायला सांगितली आहे :)
भर घातल्याबद्दल आभार!
ज्या सहा गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल माझे मतः
सहमत आहे असे धार्मिक प्रतिकार काही ठिकाणी नि:शस्त्र असल्याची उदा आहेत. धार्मिक/धर्माधिष्ठीत प्रतिकार लेखात जाणिवपूर्वक टाळले आहेत.
सहमत आहे. हा ही एकप्रकारचा अहिंसक प्रतिकारच झाला. त्यामुळे समाजात बर्याच स्तरांवर खळबळ माजली हे खरेच आहे.
माहितीबद्दल आभार. ही घटना मला माहित नव्हती
बाकी बोस्टन टी पार्टी ही इतकी महत्त्वाची घटना पूर्णपणे विसरलो. खरंतर ती लेखातच यायला हवी होती इतकी महत्त्वाची घटना आहे.
आभार!
बाकी अवांतरातील सॉक्रेटीस व अन्य शास्त्रज्ञांनी वैयक्तीक पातळीवर अहिंसक लढा दिलाच होता.
मात्र बुद्धाने थेट प्रतिकार केल्याचे म्हणता येईल का?
26 Aug 2011 - 10:48 am | मन१
"वेद थापाडे आहेत", "स्वर्ग मोक्ष ह्या भ्रामक कल्पना आहेत", "यज्ञाने काही तुम्हाला वाटतो तसा देव वगैरे अजिबात प्रसन्न होनार नाही."
हे इ स पूर्व ५०० मध्ये स्पष्ट शब्दात सांगितले ते बुद्धानेच. स्वतःच्या अनुभवाशिवाय कशावरही विश्वास ठेवु नका. यज्ञयागातील हिंसा त्याज्य समजा. हे त्या काळात वैदिक चालीरितींचा प्रचंड पगडा असताना सांगणे म्हणजे थेट विरोध म्हणता यावा. आज प्रचंड वैज्ञानिक प्रगतीमुळे बर्याच गोष्टींची आणि नैसर्गिक घटनांची तर्क संगत माहिती आपल्याकडे आहे. त्या काळात ती अजिबात नसतानाही जे काही घडते ते कुणा एका बाह्य शक्तीच्या इच्छेवर्/लहरीवर घडते हे नाकारणे आणि स्पष्ट शब्दात सांगणे हे तेव्हा मोठेच धैर्याचे काम होते. तेव्हा भारतीय उपखंडात प्रमुख राजसत्ता म्हणजे १६ महाजनपदे होती.(वैशाली, कोसंबी,कोसल्,मगध्,शाक्य वगैरे .) ह्यापैकी काही प्रबळ सतांचे प्रमुख थेट बुद्धाचे जवळचे नातलग होते, परिचित होते, अनुयायी होते.(मगधचा अजातशत्रु, प्रसेनजित वगैरे.)
ह्यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही बुद्धाने आपले मत कायम चर्चेतुन मांडले, "त्रिपिटक " ह्या ग्रंथात बौद्ध मत संपादित केले. बलप्रयोग केला नाही,सैन्य नि फौजफाटा ह्याचा विचारही केला नाही ; तरीही केवळ वैचारिक पातळीवर वैदिक हिंसेला आणि न पटणार्या चालीरितींना विरोध केला. ह्याला थेट विरोध म्हणता यावे.
समाजमान्य जुनाट चालीरितींना विरुद्ध "ब्र" सुद्धा काढणे म्हणजे किती धैर्याचे काम आहे हे आपण महात्मा फुले, आगरकर, र धो कर्वे, गाडगेबाबा ह्यांच्या अनुभवावरुन बघु शकतो. अरे हो, बादवे, मी मागील वाक्यात नाव घेतलेल्या व्यक्तींनीही नि:शस्त्र विरोधच केला; नाही का?
26 Aug 2011 - 1:20 pm | ऋषिकेश
ते आहेच मात्र तुम्ही शेवटच्या ओळीत नाव घेतलेल्यांनी समाजात राहुनच प्रतिकार केला. बुद्धाचे तसे नाहि त्याने नवा मार्ग प्रतिकारासाठी नव्हे तर स्वतःच्या सुखाच्या शोधात स्वीकारला. इथे आपण अहिंसक प्रतिकाराची चर्चा करतोय त्यात बुद्ध कसा बसतो हे कळले नाहि.
त्याचे वेळी हिंदूंजातीव्यवस्थेचा प्रतिकार करताना आंबेडकरांची सुरू केलेली चळवळ व त्यांचा बुद्धधम्मप्रवेश मात्र अहिंसक प्रतिकार म्हणता यावा का?
27 Aug 2011 - 11:02 pm | मन१
स्वतःसाठी शोधला हे खरे . पण प्रस्थापित चालीरितींचा प्रतिकारही केलाच ना. यज्ञ्-याग, मूर्तीपूजा नाकारलीच ना. समाजव्यवस्थेतील कुठल्या घटकाने काय करणे चूक, काय करणे बरोबर हे सांगितलेच ना. अधिक काही लिहु शकत नाही.
26 Aug 2011 - 4:13 pm | इरसाल
दिल्लीतील चांदणी चौकातील शीशगंज हा गुरुद्वारा गुरु तेघबहादूर ह्यांच्या कापलेले शीर तिथे ठेवल्यामुळे (ज्यावेळेस शिरकाण केले तेव्हा ) शीखांमध्ये पूजनीय आहे.
ज्या झाडाजवळ त्यांचे शीर कापले होते त्या झाडाचा ओंडका सदृश तुकडा अजूनही तिथे आहे.
अवांतर: तिथे मिळणारा कडाह प्रशाद म्हणजे एक मोठी पर्वणीच. जर कधी लालकिल्ल्यासाठी दिल्लीत आलात तर लालकिल्ल्यापासून ४/५ मिनिट पायी अंतरावर हा गुरुद्वारा आहे. आणि त्याच्या आजूबाजूलाच चांदणी चौक वसलेला आहे.चांदणी चौकात पराठेवाली गल्लीत एक दुकान आहे तिथे ३५ प्रकारचे पराठे मिळतात
25 Aug 2011 - 4:46 pm | विकास
बरीच नवीन माहिती कळली. अजून असेच लेख येउंदेत. आपण उल्लेख केलेल्या थरो आणि मला वाटते इमरसनचा प्रभाव गांधीजींवर देखील होता. वर वाहिदांनी म्हणल्याप्रमाणे non-violence and pacifism मध्ये फरक आहे असे वाटते.
25 Aug 2011 - 6:10 pm | सहज
नेहमीप्रमाणेच ऋषिकेशचा हाही उत्तम धागा. लेखमाला चांगली होणार.
25 Aug 2011 - 6:42 pm | पैसा
प्रतिसादांमधेही नवी माहिती खूप येते आहे. आणखी वाचायला नक्कीच आवडेल!
25 Aug 2011 - 8:40 pm | प्रभो
छान माहिती रे ...
25 Aug 2011 - 9:52 pm | राजेश घासकडवी
वाचतो आहे.
मला नेहेमीच वाटत आलं आहे, की आंदोलनातली हिंसा ही असते-नसते असं काळंपांढरं नसून ते एक कंटिन्यूअस फंक्शन असतं. आंदोलन कुठच्या पायरीवर आहे यानेही फरक पडत असावा. समाजाच्या एखाद्या मोठ्या घटकाला अन्याय होतो असं वाटलं तर पहिल्याप्रथम 'चला आपण सगळे मिळून जाऊन सरकारला/राजाला/अधिकाऱ्याला सांगूया. इतका मोठा जमाव पाहूनच त्यांचा विचार कदाचित बदलेल.' हा विचार कुठच्याही आंदोलनाबाबतीत होत असावा. तसंच कुठची शस्त्रं हाती आहेत (किंवा कुठचीच नाहीत) यावरूनही अहिंसेचं प्रमाण ठरत असावं.
इतिहासातल्या आंदोलनांचा आढावा घेताना वरील विचार कितपत बरोबर आहे याबद्दलही लिहावं, ही विनंती.
25 Aug 2011 - 10:19 pm | श्रावण मोडक
हेच... हेच... नेहमी सांगत असतो. ग्रे असतं सगळं. ऐकतच नाहीत. पण आता तुम्ही सांगितलं म्हटल्यावर सगळे माना डोलावू लागतील पहा. ;)
ऑन अ सिरियस नोट: सहमत आहेच!!!
26 Aug 2011 - 8:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ, नेहेमीप्रमाणे अभ्यासपूर्ण धागा. मन आणि राजेश यांचे प्रतिसादही आवडले.
१८९२ पर्यंत यू.के. आणि न्यूझीलंडमधल्या महिलांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याचा हक्क (Suffrage) नव्हता. स्त्रियांना हा हक्क देणारे हे दोन दोष 'पहिले'च. आजची महासत्ता असणार्या यू.एस.मधे हा हक्क महिलांना मिळण्यासाठी १९१९ साल उजाडलं आणि (इतर वेळी, विशेषतः स्त्रीवादाच्याही संदर्भात पुरोगामी दिसणार्या) फ्रान्समधे १९४४. अनेक देशांमधे वेगवेगळ्या कालखंडात चालवली जाणारी ही चळवळ संपूर्णपणे अहिंसक होती.
26 Aug 2011 - 10:00 am | ऋषिकेश
बापरे किती महत्त्वाच्या गोष्टी विसरलो होतो!.. खरंच आभार!
@राजेश घासकडवी:
तुमचे म्हणणे बर्याच वेळी खरे असु शकेल. मात्र अश्याही अनेक घटना आहेत जिथे 'जाणिवपूर्वक' हिंसेचा मार्ग टाळण्यात आला आहे. हिंसा आणि अहिंसा ही वेगवेगळ्या वेळी वापरण्यात आली आहे प्रत्येकवेळी तिचे कारण सारखे नाही. कित्येकदा अहिंसक प्रतिकार हा 'हिंसा करणे अशक्य आहे / जमत नाही' या कारणानेही स्वीकारला गेला आहे. कित्येकदा आपल्यात हिंसा करण्याची ताकद नाहि मात्र विरोध करायचा आहे या प्रेरणेतून अहिंसक प्रतिकार झाला आहे. पुढे हे अहिंसात्मक प्रतिकार करण्याचे तंत्र विकसित (?) होत गेले. यावर शेवटच्या व पुढच्या भागांत असे थोडे चिंतनात्मक मत लिहिण्याचा प्रयत्न करतो.
नक्की काय म्हणायचंय ते कळलं नाही :( जरा इस्कटून सांगता काय?
26 Aug 2011 - 8:30 pm | राजेश घासकडवी
याचं विवेचन तुम्ही केलेलं आहेच "कित्येकदा आपल्यात हिंसा करण्याची ताकद नाहि मात्र विरोध करायचा आहे या प्रेरणेतून अहिंसक प्रतिकार झाला आहे." शस्त्रं नाहीत, प्रतिपक्षाबरोबर झुंजण्यासाठी फौज उभं करणं शक्य नाही असं असताना अहिंसक मार्ग हाच एक शिल्लक रहातो. शस्त्रं, सैन्य असली की हिंसा वापरायची की शांततामय मार्ग वापरायचा हे ठरवता येतं.
अहिंसेचा शस्त्र म्हणून वापर (कदाचित वदतोव्याघात असेल हा...) करण्यात आणखीन दोन फायदे असतात. एकदा युद्ध पेटलं की एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर या न्यायाखाली दोन्ही बाजू समसमान पातळीवर येतात. अहिंसेमुळे उच्च नैतिक भूमिका घेता येते. दुसरा फायदा शक्तीप्रदर्शनाचा. अहिंसक लढ्याचा नेता म्हणत असतो की बघा, माझ्या शब्दासाठी इतके लाखो लोक समोर उभे राहून लाठ्या गोळ्या झेलायला तयार झाले आहेत. मी त्यांना काबूत ठेवू शकतो. जर माझ्या (आमच्या) मागण्या मान्य केल्या नाहीत (निदान वाटाघाटी केल्या नाहीत) तर लाखो लोक हिंसकदेखील होऊन सरकारचं वाटोळं करू शकतील. या दोन्ही बाबींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते उदाहरणांसकट लिहिलंत तर आवडेल.
27 Aug 2011 - 4:13 pm | सहज
कोणत्या आंदोलनाबद्दल म्हणत आहात?
गांधीजी यांनी चौरीचौरा येथे आंदोलकांकडून पोलीसांच्या गोळीबारला प्रत्युत्तर देताना पोलीस ठाणे जाळल्याच्या घटनेने व्यथीत होउन आंदोलन मागे घेतले होते. Gandhi felt that he had acted too hastily in encouraging people to revolt against the British Raj without sufficiently emphasizing the importance of ahimsa (non-violence) and without adequately training the people to exercise restraint in the face of attack. He decided that the Indian people were ill-prepared and not yet ready to do what was needed to achieve independence.
On February 12, 1922 the Indian National Congress halted the Non-cooperation Movement on the national level as a direct result of the Chauri Chaura tragedy
म्हणजे एक उदाहरण दिले. अहिंसक आंदोलन + भारत म्हणले की गांधीजीच्या सविनय कायदेभंग, सत्याग्रह इ. आठवण होते म्हणुन 'अहिंसक लढ्याचा नेता म्हणत असतो की बघा' हे ठोस विधान खुपले इतकेच म्हणतो. गांधीजी स्व:ता म्हणत की इंग्रज जेव्हा इथुन जातील तेव्हा ते मित्र म्हणून जावेत. अन्यायाची परिसीमा झाल्यावर मनुष्य काय करु शकतो हे सांगायला अहिंसक लढ्याच्या नेत्याच्या तोंडी कोणी विचारवंताने अप्रत्यक्ष विधाने ठोसली पाहीजेच असे नाही. निदान गांधीजींबाबत नको.
लोकशाही देशात मतदानावर परीणाम होउ शकतो हा संदेश गर्दीवरुन परिणामकाररित्या देता येउ शकतो.
27 Aug 2011 - 4:18 pm | नितिन थत्ते
सहज यांच्याशी सहमत आहे.
अहिंसक नेत्याची धमकी "अशी" नसते.
27 Aug 2011 - 4:44 pm | राजेश घासकडवी
म्हणणं म्हणजे उच्चार करणं नव्हे. हा कृतीतून येणारा संदेश असतो. तो राज्यकर्त्यांपर्यंत पोचतो.
गांधीजींचं उदाहरण तुम्ही दिलंय म्हणून, गांधीहत्या झाल्यावर जो हिंसेचा लोळ उठला त्याहीपेक्षा भीषण लोळ ते जर उपोषणात गेले असते तर उठला असता. हे ब्रिटिशांना चांगलं माहीत होतं. गांधींशी तडजोड करणाऱ्या आंबेडकरांना माहीत होतं.
तुम्ही विशेष वेगळं काही म्हणत नाही. हिंसेची व्याख्या बदललेली आहे. 'आमच्या मागणीला पुरेसा न्याय दिला नाही तर परिणाम वाईट होतील' हे मी मांडलेल्या विधानापेक्षा जास्त जनरलाइज्ड विधान झालं. मुख्य मुद्दा असा आहे की कोणाचंही मतपरिवर्तन करण्यासाठी साम दाम दंड भेद पैकी पहिला सामाचा मार्ग अहिंसात्मक आंदोलनाचा - त्यातून दंडाची 'धमकी' अध्याहृत असते. शक्तीप्रदर्शनाशिवाय साम निरुपयोगी ठरतो.
27 Aug 2011 - 5:34 pm | सहज
अन्यायाची परिसीमा झाल्यावर मनुष्य काय करु शकतो हे सांगायला अहिंसक लढ्याच्या नेत्याच्या तोंडी कोणी विचारवंताने अप्रत्यक्ष विधाने ठोसली पाहीजेच असे नाही. निदान गांधीजींबाबत नको.
घासकडवींचे आकलन, घासकडवींचे मत यापेक्षा याबाबत तरी खुद्द गांधीजींचे खुलासे लक्षात घेणे मला योग्य वाटते.
पुणे करार हा स्वतंत्र विषय आहे. ब्रिटीशांनी सविनय कायदेभंगामुळे आपले काम धंदे बंद पडत होते म्हणुन कायद्याच्या चौकटीत बसेल याकरता तडजोड केली पण त्यांच्या थिंक टँकने गांधीशिवाय भारतातील चळवळ याबाबत विचार केला नसेल असे तुम्हाला वाटते का? उत्तर नको आहे, विषयांतर होईल. फाळणीनंतरच्या हिंसाचाराला त्यांनी दंगलखोर जनतेला काबूत आणण्याकरता उपोषण केले (स्वताचे प्राण पणाला लावले) हे उपोषण सरकार विरुद्ध नव्हते तर स्वताच्या अहिंसेच्या तत्वासाठीच होते, लोकांनी दंगल थांबवावी म्हणुन होती. असेही असुन तुम्हाला अजुन गांधीजींना हिंसेशी जोडायचे असेल तर मी तुमच्या मताशी सहमत नाही याव्यतिरिक्त काही म्हणु शकत नाही.
मी निदान गांधीबाबत तुमच्या ठोस विधानाशी की गांधीजींचा अप्रत्यक्ष संदेश हिंसा होता याच्याशी सहमत नाही.
धन्यवाद. बाकी चालू दे.
28 Aug 2011 - 1:15 pm | ऋषिकेश
असहमत आहे. फौज उभं करण अशक्य असलं तरीही मार्ग दोन्ही शक्य असतात - खुले असतात. त्यापैकी प्रत्येक जण आपल्या राजकीय/सामाजिक/वैयक्तीक जाण+विचार+प्रभाव यांचा वापर करून निर्णय घेतो. अनेक क्रांतीकार्यांपुढेही प्रतिपक्षाबरोबर झुंजण्यासाठी फौज उभं करणं शक्य नव्हते तरीही त्यांनी अहिंसक मार्ग अवलंबलेला नाही. पक्षी स्वतःचे (एकटयाचे) प्राण गेले तरी बेहत्तर असे मानुन ते लढले आहेत.
याचा अर्थ अहिंसक मार्गाने लढताना प्राण जाऊ शकत नाहीत असा नाहि. उलट अधिक शक्यता आहे कारण तुमच्या हातात नसले तरी विरोधकाच्या हातात शस्त्र असुच शकते.
तेव्हा प्रतिपक्षाबरोबर झुंजण्यासाठी फौज उभं करणं शक्य नसलं की अहिंसा हा एकच मार शिल्लक राहतो याच्याशी सहमत नाहि. मात्र असे शक्य नसल्यामुळे काहि वेळा अहिंसक मार्ग चोखाळला गेला आहे हे ही तितकेच खरे.
हे खरं आहे की अहिंसेमुळे उच्च नैतिक भूमिका घेता येते इतकेच नव्हे तर समोरच्याला ती घ्यायला भाग पाडता येऊ शकते. मात्र यात मोठं गृहितक हे आहे की अहिंसेला हिंसेने विरोध होतो आहे. जर अहिंसेला अहिंसकच विरोध झाला तर ही भुमिका घेण कठीण होऊ लागतं.
पुन्हा ठळक शब्दामुळे विधानाला असहमती. वरील प्रकार ही एक शक्यता आहे. होय काहि वेळा असे होऊ शकते. विषेशतः उदा द्यायचे तर संप/बंद वगैरे (वरवर अहिंसक वाटणारी) आंदोलने या स्वरूपाची म्हणता येतील. थोडक्या लोकांसाठी एखाद्या ठाम व्यक्तीसमुहाशी लढताना याप्रकारची नीती अवलंबता येऊ शकते. मात्र अहिंसक आंदोलने नेहमीच या प्रकारच्या लढ्यासाठी केली जातात असा जर समज असेल तर मी असहमत आहे.
वर सहज यांनी दिलेले गांधीजींचे उदा समर्पक आहे. गांधीजींची अनेक आंदोलने हिंसा करण्याची शक्ती असूनही, जाणीवपूर्वक हिंसा टाळून केलेली होती. मात्र त्यांच्या आंदोलनाच्या मागे जर तुम्ही मागण्या मान्य केल्या नाहित तर स्वरूप हिंसक होऊ शकते अशी गर्भित धमकीचे नसायचे. गांधींचं उदा नको असेल (असते काहिंना अॅलर्जी ;) - तुम्हाला आहे असे नाहि ) तर आंबेडकरांचं घ्या त्यांच्या म्हणण्याला वजन देण्यासाठी त्यांनी सामुहिक धर्मपरीवर्तनाचा अनोखा प्रयोग केला. तिथेही समाजाच्या दृष्टीकोनात बदल करताना असे असे करा नाहितर अहिंसक आंदोलन पेटेल असा 'स्टान्स' कधीच नव्हत
तेव्हा प्रत्येक वेळी किंवा तुम्ही म्हणालात तसे अहिंसक नेत्याची भुमिका असेलच असे नाहि. आधी म्हटल्याप्रमाणे हे अहिंसक आंदोलनाचे तंत्र बाळसे धरू लागले त्यायोगे सामाजिक परिवर्तनासोबत राजकीय वापराचे हत्यार म्हणूनही महत्त्व वाढू लागले असे मात्र मला वाटते.
26 Aug 2011 - 7:46 am | ५० फक्त
अतिशय छान माहितीपुर्ण लेख, अजुन येउ द्या अशीच माहिती.
26 Aug 2011 - 8:57 am | प्रचेतस
अतिशय छान माहिती.
वाचनखूण साठवली आहे.
26 Aug 2011 - 7:02 pm | प्राजु
लेख अतिशय सुंदर आहे, माहितीपूर्ण आहे.
असेच लेख मिपावर वाचायला मिळावेत वरचेवर . :)