प्रभुजींचा जो अवतार आता आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे शेरा. ह्या अवतारात ते एक नाही तर तीन तीन खलनायकांचा सामना करतात.
सिनेमाच्या सुरुवातीला एक मुलगी कुठल्या तरी पार्कींग लॉट मधे एकटीच गाडीच्या दिशेने जाताना दिसते. ती गाडीत बसते तितक्यात तिला समोर काही मास्क घातलेली मंडळी दिसतात. ती प्रचंड घाबरते. घाबरणारच, कारण त्यांनी मिकि माऊस चे मास्क घातलेले असतात. तिची गाडी काही सुरू होत नाही. समोर बघते तर सगळे माऊस गायब. पुन्हा वर बघते, सगळे हजर लगेच पुन्हा गायब. ती गाडीतून बाहेर पडून पळायला लागते, तितक्यात सगळे उंदरासारखे कुठून तरी अचानक प्रकट होतात. ते आता तिला काही तरी करणार इतक्यात दोन हात त्यांना बडव बडव बडवतात. चेहरा दिसत नाही कारण त्या मुलीच्या मागूनच सगळ्यांची पिटाई चाललेली असते. सगळ्यांना पिटुन झाल्यावर मुलीच्या मागून बाहेर येतात मिथुनदा. मुलीच्या मागून लढणे ह्याचा नवीनच अर्थ मिथुनदांमुळे आपल्याला कळतो. सगळ्यांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून पुन्हा एकदा पिटाई सेशन सुरू होतं.
पण ह्यावेळी एक गुंड मिथुनदांना भारी पडतो. तो मिथुनदांना झोडायला सुरूवात करतो. मिथुनदा खाली पडतात. तो गुंड पुढे येत स्वतःच्या चेहर्यावरचा मिकी माऊसचा मास्क काढतो (पण एक क्षण आपल्याला मास्क काढल्याचं कळतंच नाही) त्या मास्कच्या मागे असतो साक्षात मिथुनदा. उभा मिथुनदा पडलेल्या मिथुनकडे रागाने बघतो, एक तलवार काढतो आणि मिथुनदाच्या पोटात खुपसतो. आणि मिथुनदा आपल्या स्वप्नातून जागे होतात. हुश्श्श..
ते आपल्या खोलीतून बाहेर पडतात, दुसर्या खोलीत जातात. तिथे एका बाईला चेनने बांधून ठेवलेलं असतं. ती असते मिथुनदांची बायको. ती ड्रग ऍडीक्टही असते. म्हणूनच तिला बांधलेलं असतं. तिला प्रेमाने भरवून मिथुनदा एका माणसाकडे जातात. त्याचं नाव चंडोला. बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर ने हा रोल केला आहे. मिथुनदा त्याला ड्रग माफियाला संपवायचं वचन देतात. चंडोला त्याला सगळ्या ड्रग माफियांची माहिती असलेली एक फाईल देतो.
ती फाईल घेऊन मिथुनदा घरी येतात. हॉलच्या लालभडक भिंतीवर त्यांच्या स्वर्गवासी बहिणीचा चंदनाचा हार घातलेला फोटो असतो. फोटोच्या बाजुला भिंतीवर खडूने लिहिलेलं असतं "डर इंसान को कमजोर करता है".
मिथुनदा फ्लॅशबॅकमधे जातात.
त्यांचं कुटुंब, म्हणजे ते, बायको, बहिण आणि एक पोपट (पक्षी) खूप खूप खुश असतात. त्यांची बहिण एक अत्यंत लाडावलेली, बिंडोक, मठ्ठ आणि अति आगाऊ मुलगी असते. बायको सोज्वळ वगरे. फ्लॅशबॅक मधे आपण पोचतो तो दिवस मिथुनदांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस असतो. बहिण गिफ्ट म्हणून त्यांच्या कडे एक प्लेट कांदा भजी मागावी तसा एक भांजा मागते. आढेवेढे घेत मिथुनदा तयार होतात. तयार होता म्हणजे हो म्हणतात, उगाच कल्पनाशक्ती ताणू नका. त्यांनी हो म्हटल्याबरोबर ती आचरट कार्टी भैय्या आणि भाभीला बेडरून मधे ढकलते आणि म्हणते "तो जाओ...". घ्या मारुतीचं नाव आणि व्हा सुरू.
बेडरूममधे अर्थातच एक गाण्याचा सिक्वेन्स पार पडतो. ह्या गाण्यात "जीस लडकी पे दिल आया है वो बडी पटाखा है" असं मिथुनदा स्वतःच्याच बायको विषयी म्हणतात.
दुसर्या दिवशी कळतं की मिथुनदांची बायको पोलिस इंस्पेक्टर आहे. इंस्पेक्टर शिवानी. ती पोलिस स्टेशन मधे जायला निघते. इकडे असरानीने एका हवालदाराचा रोल केला आहे. तो सायकल वरून येतो. सायकल स्टँडला लावताना कैक वेळा पडते. शेवटी तो वैतागुन तिला म्हणतो "अरी ओ १८५७ की छप्पन छुरी तेरा कोई कॅरेक्टर है के नहीं? क्यों सरकार की तरह गिरती है बार बार?". ह्यात गिरणारी म्हणजे गिरी हुई आणि गिरणारी म्हणजे सरकार असे दोन विनोद आहेत. तसेच, गिरे हुए लोग मतलब सरका असा छुपा विनोदही असू शकतो. हम है अंग्रेजोंके जमाने के जेलरका बेटा अंग्रेजोंके जमानेका हवालदार अशी तो स्वतःची ओळख करून देतो.
पोलिस स्टेशन मधे हिरवीणीच्या कॉलेजचे प्रिंसिपल तक्रार करतात की आमच्या कॉलेज मधे सर्रास ड्रग विकी सुरू आहे. कमिशनपसून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना सांगितलं, कुणीच ऐकत नाही. बाई बंदोबस्त करायचं वचन देते आणि साध्या वेषात कॉलेजात पोचते. तिकडे ड्रग विकी करणार तरूण दिसतो.
शिवानी त्याच्याकडे ड्रग्ज मागते तर तो तिलाच जवळ ओढतो. आणि नंतर पुढची २० सेकंदं मिथुनची बायको त्याला फक्त गुद्दे मारते. पोटावर, पाठीवर, पायावर, डोक्यात, मानेवर.. बसून, उभं राहून, उडी मारून... गुद्देच गुद्दे. मिथुनच्या बायकोशी पंगा घेतल्यावर अजून काय होणार? लग्नाला ३ वर्ष झाली तरी प्रत्यक्ष मिथुनदांनी सुद्धा अशी गुस्ताखी केली नाही तर हा कोण उपटसुंभ? भोग लेका आता कर्माची फळं. इंस्पेक्टर शिवानी त्या ड्रग विकणार्याला पुन्हा गुद्देच गुद्दे मारते आणि यथेच्छ कुदवून झाल्यावर बेड्या ठोकते. तो चिडून तिला धमकी देतो "देख लुंगा तुझे, तुम जानती नहीं मै बल्लू बकरा का भाई हुं". मिथुनचीच बायको ती, डायलॉग हे तर तिचं हक्काचं कुरण. ती आता त्याला शब्दाचा मार देते "बकरा का भाई है ह्या बकरी की औलाद... blah blah blah blah"
इथे एंट्री होते व्हिलन, बल्लू बकराची "कानून हमारे लिये एक रब्बर की गुडिया है और पुलिस कठपुतलीयां. कानून सरकार ने बनाया और अपराध शैतान नें". बकराची आयटम त्याच्याहून महान "जब १००० इंसान मरते है तो अंडरवर्ल्ड में एक बकरा पैदा होता है". बकरा टाळ्या वाजवतो.
बकराला खबर मिळते की शिवानीने त्याच्या भावाला पकडलंय. ह्या बकराचं वैशिष्ट्य म्हणजे तो दारू पीत असताना त्याला काही वाईट खबर मिळाली की तो हातातला ग्लास संपवतो आणि मग दचकतो. उगाच ग्लास हातातून सटकून दारू नको वाया जायला.
मिथुन बागेत झाडांना पाणी घालत असतो. तितक्यात बकराची माणसं त्याला एक गिफ्ट देऊन जातात. मिथुनदा गिफ्ट उघडतात. त्यात असतो त्यांचा लाडका पोपट (पक्षी). बहीण किंचाळून घरात पळते. पोपटाच्या पिंजर्यावर डोकं आपटून रडू लागते. पिंजर्यात तिला एक चिठ्ठी दिसते. ती घेऊन बाहेर येते. तोवर इकडे मिथुन त्या पोपटाला बागेतच गाडून वगरे मोकळा झालेला असतो.
(पोपट गाडताना मिथुनदा)
चिठ्ठीत लिहिलेलं असतं की माझ्या भावाला सोड नाही तर अशीच अवस्था तुझ्या बायकोची होईल. हे ऐकून मिथुनदा चवताळतो, त्याच्या एका हाताचा पंजा नागाच्या फण्यासारखा वर वर येऊ लागतो. हे बघून त्यांची बहीण त्यांना मानेनेच नाही म्हणते. मिथुनदा सावरतात. हताशपणे मिथुनदा चिठ्ठी टाकून घरात जातात.
सिनेमात व्हि. सि. आर. नावाचा अजून एक व्हिलन आहे. त्याची दोन मुलं मिथुनदा आणि त्यांच्या बहिणीसमोर एकाचा खून करतात. शिवानी साक्षीदार म्हणून म्हणून मिथुनला बोलावते. पण बहिणीला व्हि. सि. आर. ने किडनॅप केल्यामुळे मिथुनदा खोटी साक्ष देतात आणि व्हि. सि. आर. ची मुलं सुटतात.
पुढे बकराचा भाऊ त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मिथुनदांच्या बहिणीला ड्रगचा ओव्हरडोस देऊन ठार करतो. मिथुनदांचा फणा पुन्हा वर येतो. पण आता थांबवणारं कुणी नसतं बहिणीची चिता मिथुनदांच्या डोळ्यात पेटते.
मिथुनदा नागासारखे कराटे खेळून, सुपरमॅन सारखे उडून बकर्याच्या भावाला मारतात.
(मिथुनदांचा अजून एक अवतार - सुपरमॅन)
त्याच्या ह्या पराक्रमामुळे चंडोला त्यांना बोलावून घेतो आणि म्हणतो की मी तुला ओळखलं. तूच शेरा आहेस. कारण ज्या प्रकारे बकराचा भाऊ मेला तसं कराटे स्किल जगात कुणाकडेच नाही. प्लीज ड्रग्ज माफियांना संपवण्यासाठी मला मदत कर. मिथुनदा त्याला नम्रपणे नकार देतो.
आत व्हिलनची माणसं शिवानीला पकडून नेतात आणि तिला ड्रग्जची सवय लावतात. ह्यामुळे पेटून उठलेले मिथुनदा एकेकाचा खून करायला सुरुवात करतात. व्हि. सि. आर. आणि बकराला आपले सापाचे कराटे खेळून ठार करतात. संपूर्ण मारामारीच्या दरम्यान मिथुनदांच्या हातवार्यांना नागांच्या फुत्कारण्याचा आवाज बॅकग्राउंड साउंड म्हणून वापरला आहे.
तर, ह्या दोघांना मारल्यावरही बराच वेळ शिल्लक असल्याने अजून एका व्हिलनची एंट्री होते. तो दुसरा तिसरा कुणी नसून असतो आपला बॅड बॉय गुलशन उर्फ चंडोला उर्फ ब्लॅकी - द बिग बॉस. आपल्या मार्गातील काट्यांना हटवण्यासाठी त्याने चंडोला बनून शेराचा उपयोग केलेला असतो.
शिवानी हळू हळू बरी होत असते. असरानी एकदा जयला पकडून लेक्चर देतो की असा कसा तू नामर्द की बायकोवर अत्याचार केलेल्यांना काहीच करत नाहीस. त्यावेळी जय त्याला आपली कहाणी ऐकवतो. पुन्हा फ्लॅशबॅक.
इथे आपल्याला कळतं की मिथुनदा पूर्वश्रमीचे गुन्हेगारी जगताचे बादशाह शेरा होते.
प्रतिस्पर्ध्यांनी आई आणि भावाचा खून केल्यावर ते वाममार्ग सोडून सन्मार्गाला लागलेले असतात. शेरा आता मेलेला असतो. त्याच्या जागी जय खुराना जन्म घेतो. मरणार्या आईला त्यांनी खूनखराबा न करण्याचं वचनही दिलेलं असतं. म्हणूनच ते चंडोला ला नकार देतात.
ह्या सिनेमात इतके फ्लॅशबॅक आहेत की वर्तमानात येण्या ऐवजी भूतकाळातच सिनेमा का उरकत नाहीत असा प्रश्न पडतो.
शिवानी बरी होत असल्याने ब्लॅकीला टेंशन येतं की ती आपल्या माणसांना ओळखेल, म्हणून तो तिला मारण्याचा प्लॅन करतो. पण तिथे ऐन वेळी जय उर्फ शेरा पोचतो. पुढे काय होतं ते सांगायला नकोच.
मिथुनचा सिनेमा असल्याने त्याचा शेवटही साजेशा डायलॉगने होतो जो फक्त मिथुनच्या बाबतीतच ऐकवला जाऊ शकतो "शेरा ने अपने आप को कानून के हवाले कर दिया. उसे उम्रकैद की सजा हुई. मगर अच्छे बरताव के कारण उसे पांच साल में ही छोड दिया गया." उम्रकैद वरून डायरेक्ट ५ वर्ष? काय बोलणार आपण पामर?
नेहमीप्रमाणेच ह्या चित्रपटातही डायलॉग्ज की खैरात आहे:
१. अब मौत का ऐसा खेल होगा के मौत का भी कलेजा काप जाएगा.
२. अपना नाम जय से बदलकर पराजय कर दो.
३. मां की लाशपर दिया वचन मैने बहन की लाशपर तोड दिया.
४. ये अगर नंगा होकर गरम तव्वे पर बैठ जाये तो भी उसकी बात का यकीन मत करना.
५. सबर के फल नसीब के झाड पर लटक लटक के सड गये.
आता सिनेमातली काही निवडक दॄष्य:
(नागराज मिथुनदा)
आणि हे सिनेमाचं पोस्टर
पुढच्या परीक्षणापर्यंत क्रमशः
आपला
(मिथुनभक्त) ऍडी जोशी
प्रतिक्रिया
25 Aug 2011 - 9:58 am | अर्धवट
आयच्च्या गावात... फुस्स्स्स्स्स्स्स्स्स..
मेलो मेलो मेलो
25 Aug 2011 - 10:07 am | सहज
मिठून्दाचा पोशाख पाहून स्टिव्हन सिगल ब्रो ची आठवण झाली. ड्वोळे पाण्वाले!
फोटो - जालावरुन
25 Aug 2011 - 10:21 am | मृत्युन्जय
पहिल्या दोन भागांप्रमाणेच सुंदर. पण जस्टिस चौधरीची सर नाही याला.
25 Aug 2011 - 10:24 am | असुर
"एओइउस्द्फ्झ्च्क्ष्क्फ्द्सोइउएफ्म्ब्स्क्किचुन्ह्व्चुब्वोस्क्म्क्षोक्ष्स..."
परिक्षण वाचून एकदाच असला काहीतरी आवाज आला आणि नंतर आम्ही शहीद झालॉ!! :-)
दहा वर्षांपूर्वी पायला होता हा पिच्चर!! पण शेरा आणि नागाचं नातं काय कळ्ळं नाय.. इतक्या फुस्सफुस्सीनंतर मग मिथूनभैंना 'नागा' नाव का नाय दिला ये सवाल मेरेकू दस साल से खायेला है.. प्लिज्ज एक्शप्लेन!!
बादवे, तुम्ही बूस्टर लावला का हृदयाला??
--असुर
25 Aug 2011 - 10:32 am | प्रीत-मोहर
ह्या आदिला कुणीतरी किड्नॅप करा रे. इतकी कसली मेली हसवायची सवय/ मिथुनभक्ती म्हणते मी.
अरे इथे शिरेस प्रसंगात हसले ना रे मी :( माझ्या टीममेटस नी माझी धुलाई करायची बाकी ठेवलीये
25 Aug 2011 - 10:33 am | गवि
एक प्लेट कांदा भजी मागावी तसा एक भांजा मागते
दुसर्या दिवशी कळतं की मिथुनदांची बायको पोलिस इंस्पेक्टर आहे.
ह्या बकराचं वैशिष्ट्य म्हणजे तो दारू पीत असताना त्याला काही वाईट खबर मिळाली की तो हातातला ग्लास संपवतो आणि मग दचकतो.
ह्या सिनेमात इतके फ्लॅशबॅक आहेत की वर्तमानात येण्या ऐवजी भूतकाळातच सिनेमा का उरकत नाहीत असा प्रश्न पडतो.
ठो ठो..
अरे किती जबरी पंचेस मारतोस रे. हपीसात केवढी पंचाईत होते तोंड दाबून हसताना.. मिथुनदांचे आणि बायकोचे गुद्दे यापुढे काहीच नाहीत.
आता पिच्चर पाहिलाच पाहिजे मिळवून.
तुझ्या चित्रपटपरीक्षणाची आता चटक लागली आहे. पुढच्या मिथुनरत्नाची वाट आतुरतेने पाहतोय.
बाकी तो मिथुनदांचा "सुपरमॅन" वाला फोटो अगदी अशोक सराफसारखा दिसतोय..
25 Aug 2011 - 10:35 am | मनराव
हि लेख मालिका अशीच चालू राहू देत........मिथूनदाचे सगळे पिक्ट्चर येऊ देत......... गुंडा, गनमास्टर जी१ आणि असे बरेच.............................
मिथुनचा पंखा.....
25 Aug 2011 - 10:54 am | दिपक
=)) =))=))=))=))
25 Aug 2011 - 11:36 am | प्रास
आदि, लई भारी राव!
फुस्स्स्स्स्स्स! :-)
25 Aug 2011 - 11:42 am | मिसळलेला काव्यप्रेमी
त्यांचं कुटुंब, म्हणजे ते, बायको, बहिण आणि एक पोपट............. (पक्षी)
=)) =))
25 Aug 2011 - 11:46 am | स्वानंद
आम्ही ही मिथुनभक्त झालो आजपासुन :)
25 Aug 2011 - 11:53 am | स्वाती दिनेश
लै भारी परिक्षण..
मस्त!
स्वाती
25 Aug 2011 - 12:48 pm | गणपा
नागराज पोझेस लैच भारी.
=)) =))
सध्या नुसते फोटुच पाहुन लोळतोय. लेख अजुन वाचायचाय
25 Aug 2011 - 1:12 pm | मुलूखावेगळी
मिथुनायण १-३ सर्व भाग मस्त
25 Aug 2011 - 1:38 pm | जाई.
+१
25 Aug 2011 - 1:34 pm | सोत्रि
आदि,
ह्या सगळ्या चित्रपटांच्या eCopy तुझ्याकडे आहेत का?
असल्यास, 31 ला मुंबइला येत आहे तेव्हा Copy करुन घेइन म्हणतो !
बाकी परिक्षण: अ फ ला तु न !
- (परम मिथुनभक्त) सोकाजी
25 Aug 2011 - 2:09 pm | विजुभाऊ
सोकाजी परीक्षण वाचतानाच डोक्याला मुंग्या आल्या . पिक्चर पाह्यची आपली बौद्धीक ऐपत नाही
25 Aug 2011 - 2:09 pm | विजुभाऊ
सोकाजी परीक्षण वाचतानाच डोक्याला मुंग्या आल्या . पिक्चर पाह्यची आपली बौद्धीक ऐपत नाही
25 Aug 2011 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार
आदिभौ जबर्यादस्त रे !
बाकी ह्या चित्रपटात आपल्याला आवडलेला सगळ्यात खत्तरनाक शॉट हा आहे :-
मिथुन भक्तांसाठी :-
@सोत्रे :- शेरा जालावर अर्थात तू-नळी वर उपलब्ध आहे.
27 Aug 2011 - 11:48 am | Pain
लिंक दे रे
25 Aug 2011 - 2:13 pm | नंदन
'नव्वदोत्तर कालखंडातील क दर्जाच्या चित्रपटांतील सामाजिक आणि सांस्कृतिक प्रेरणांचा आणि तदनुषंगिक विसंगतींचा घेतलेला सांगोपांग धांडोळा' ह्या विषयावर मानद डॉक्टरेट अॅडीभौंना बहाल करण्यात यावी अशी नम्र सूचना ह्या प्रतिक्रियेद्वारे केल्या गेलेली आहे.
25 Aug 2011 - 2:26 pm | असुर
अनुमोदन्स!!!!
--असुर
25 Aug 2011 - 2:47 pm | यकु
+१
सहमत!
25 Aug 2011 - 7:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅड्याचं बरं चाललेलं नंदनला बघवत नाहीये बहुतेक!
25 Aug 2011 - 3:41 pm | विकाल
मि ली ट री रा ज......
रेलचेल आहे ओ.... हा घ्या नेक्स्ट.....!!!
ज्जे ब्बात...........!!!!!!!!
25 Aug 2011 - 7:05 pm | मन१
फुटलो....
25 Aug 2011 - 7:21 pm | पैसा
मी मिथुनचा "प्यार झुकता नहीं" सुद्धा पाहिलाय. हा कसा राहिला?
आदि, भीषण लिहिलयंस!!! असली कथा मनमोहन देसायांच्या शिनुमात पण कधी आली नसेल!!!
:D
25 Aug 2011 - 8:31 pm | रेवती
वेळ जात नसलेल्या एखाद्या व विकांताला काय करावे प्रश्न अॅडीने चुटकीसरशी सोडीवला आहे.
आता मिथूनजींचे शिनेमे पाहीन म्हणते.
परिक्षण आवडले पण पहिला भाग जास्त जमून आला होता.
25 Aug 2011 - 8:37 pm | प्रभो
मिथुनसहस्त्रनाम लवकर येऊ दे रे भौ!!
25 Aug 2011 - 9:48 pm | मराठे
"काही खाताना अथवा पिताना हा लेख वाचू नये" असं ढिस्क्लेमर टाका आता आदीभाऊ!
>> ती प्रचंड घाबरते. घाबरणारच, कारण त्यांनी मिकि माऊस चे मास्क घातलेले असतात.
>> बहिण गिफ्ट म्हणून त्यांच्या कडे एक प्लेट कांदा भजी मागावी तसा एक भांजा मागते.
अरे काय हे! हे वाचून चहाचे फवारे उडाले सगळ्या क्युबिकलात...
25 Aug 2011 - 11:45 pm | आशु जोग
छान हा रजनीचा बाप दिसतोय
25 Aug 2011 - 11:58 pm | चेतन सुभाष गुगळे
इथे पार्किंग आहे, गाडी आहे, माऊस आहे, प्रचंड घाबरलेली नायिका देखील आहे, पण मिथुन्दा नाहीत. नायिका स्वत:च लढते.
जरूर पाहा :-
http://www.youtube.com/watch?v=_1J3KP6AIfQ
26 Aug 2011 - 9:07 am | ५० फक्त
हे पण मस्तच, पण एक विनंती थोड्या थोड्या अंतराने टाका, तोच तोच पण जाणवतोय किंवा मध्येच एखादा दुसरा हिरो पकडा, चवीत बदल म्हणुन.
27 Aug 2011 - 12:02 am | आशु जोग
>> ढिस्क्लेमर टाका आता आदीभाऊ!
ढिस्क्लेमर म्हनजे काय ?
स्पेलिंग चुकले की काय
27 Aug 2011 - 5:43 am | अंतु बर्वा
गुगलबाबाला विचारुन दमलो... कुठेच सापडत नाहीये ऑनलाईन. कुणाकडे दुवा असल्यास कृपया द्यावा...
27 Aug 2011 - 5:38 pm | फारएन्ड
हे ही आवडले! हा पिक्चर नक्कीच बघणार :)
उगाच कल्पनाशक्ती ताणू नका. >>>
ह्या सिनेमात इतके फ्लॅशबॅक आहेत की वर्तमानात येण्या ऐवजी भूतकाळातच सिनेमा का उरकत नाहीत>>>
आणि सर्व फोटो महान :D
29 Aug 2011 - 8:24 am | स्पंदना
बघितला आहे हा पिक्चर.
त्यात मिठुन सरळ हात पाय न वापरता ते पहिला एक मेका त गुंतवुन मग मारा मारी का करतो हा प्रश्न पडला होता. माझी मुल तर लोळत होती बघताना निम्मा वेळ, .
वरच्या मिथुनच्या कमेंट सुद्धा ऐकायच्या सहनशक्तीला सलाम भाउ !
29 Aug 2011 - 8:32 am | सहज
>पहिला एक मेका त गुंतवुन मग मारा मारी का करतो हा प्रश्न पडला होता
वेल तर्क असा आहे की फोटो क्रमांक ५ - (नागराज मिथुनदा) पाहीला तर एक पाय वर घेण्याने त्यांनी त्यांच्या दक्षीण दिशेने येणार्या रावणसेनेवर वायुअस्त्र व गंधास्त्र दोन्हीचा प्रभावी वापर केला असावा असे वाटते आहे म्हणून काही वेळा अशी गुंतागुंत करणे त्यांना उपयुक्त ठरत असावे. बाकी तज्ज्ञ बिकाकाका सांगतीलच.
29 Aug 2011 - 12:34 pm | स्पंदना
>वायुअस्त्र व गंधास्त्>>>>>
मिथुन्दांचे हिडन अस्त्र?