कालिंदीच्या तीरी वाजते पावरी
प्रवाहात बुडे घागर
राधाराणी जरा सावर ||
नंदाचा नंदन सावळा श्रीहरी भलता खट्याळ बाई
गोधने डोलवी, गोपिका भुलवी, गोजिरा, वेल्हाळ बाई
सूरमोहिनीत जाशील विरून
वेळीच मनाला आवर
राधाराणी जरा सावर ||
दहीदूधलोणी भरलेले माठ फोडून करतो चोरी
गोपसखे जमवून हा छेडतो, किती याची शिरजोरी
तक्रारी कृष्णाच्या किती ग कराव्या,
यशोदेला नाही पाझर
राधाराणी जरा सावर ||
कशाला फुकाच्या कागाळ्या, रुसवे? खेळ हा हवासा वाटे
जरा होता कान्हा नजरेच्या आड, उरात काहूर दाटे
जागता छेडतो, स्वप्नात वेढतो
चोहिकडे याचा वावर
राधाराणी जरा सावर ||
प्रतिक्रिया
22 Aug 2011 - 1:38 pm | जाई.
जन्माष्टमीच्या मुहुर्तावर उत्तम काव्याची भेट दिलीत
22 Aug 2011 - 6:41 pm | शुचि
सुंदर!!!
सूरमोहिनीत जाशील विरून
वेळीच मनाला आवर
22 Aug 2011 - 11:39 pm | ५० फक्त
''तक्रारी कृष्णाच्या किती ग कराव्या,
यशोदेला नाही पाझर''
हे लॉजिक समजलं नाही जरा एक्स्पेल्नवता का ? किती ही तक्रारी केल्यातरी यशोदा प्रेमानं लाडानं कान्हाला नेहमी पाठीशी घालते असं असताना,' यशोदेला नाही पाझर' हे कसं ? या ऐवजी यशोदेला फार पाझर' असं काहि बसतंय का बघा की,
अर्थात हे म्हणजे दुधीची भाजी आहे म्हणुन उपाशी राहणा-यानं अण्णा हजारेंच्या उपासाबद्दल बोलण्यासारखं आहे, पण जरा खटकंलं म्हणुन.
23 Aug 2011 - 11:39 am | मृगनयनी
जरा होता कान्हा नजरेच्या आड, उरात काहूर दाटे
जागता छेडतो, स्वप्नात वेढतो
चोहिकडे याचा वावर
खूपच सुन्दर...... :) :) :)