निरोप नाही, फक्त आभार!

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
15 Jul 2011 - 6:14 am

परवाच्या बाँबस्फोटासह नुकत्याच घडून गेलेल्या क्लेशदायक घटना ऐकल्या; अगतिक, हताश व्हावं अशा जळजळीत कविता वाचल्या, लेख आणि प्रतिसाद वाचले, आणि परदेशात नेहेमीच वाटणारी असहाय्यता उफाळून आली. पण वाईटातून चांगलंही काही घडतं आहे हे दर्शवणार्‍या काही गोष्टी नजरेला पडल्या. व्यवस्थेतली केवळ छिद्रंच शोधण्यापेक्षा काही आशादायक कणही गोळा करावे, आणि त्या कणांचं जाणीवपूर्वक हव्या त्या ठेव्यात रुपांतर करावं अशी शिकवण देणारे माझे आजोबा आठवले.

आजोबा व्यवसायाने सर्जन होते, ब्रिटिशांच्या काळात शिकलेले आणि नंतर स्वतंत्र भारतात त्यांच्या हॉस्पिटलमधले पहिले 'नेटिव्ह' मेडिकल ऑफिसर. अकरा भाषा जाणणारे, त्यांपैकी सहा भारतीय भाषा अस्खलित बोलू शकणारे आणि तीन भाषांमध्ये दीर्घकाव्ये लिहिणारे आजोबा. मला आठवतात ते क्वचित लाड करणारे पण बरेचदा शिस्तीचे धडे देणारे, त्यांच्याकडे संस्कृत आणि तत्वज्ञान शिकायला येणार्‍या लोकांना घनगंभीर आवाजात मुद्दे पटवून देणारे. Sitting idle is not rest, change of work is rest असं शिकवणारे.

आजोबा वयाच्या ८२व्या वर्षी गेले, अखेरीला alzheimer's disease मुळे थोडीशी विस्मृतीची बाधा झाली असली तरी बरेचदा विचार अतिशय तर्कसंगत आणि बुद्धी तल्लख होती. त्याच सुमारास मी नुकताच नोकरीला लागलो होतो, आणि कार्यालयात काही मनाविरूद्ध घडलेल्या गोष्टींविषयी एकदा तणतणत घरी बोलत होतो. माझा संताप थोडा निवळल्यावर आजोबांनी मला त्यांच्या बरोबर बाहेर फिरायला बोलावलं. आम्ही बाहेर पडलो. नावालाच काठी टेकत, पण ताठ कण्याचे आजोबा मला सांगत होते: "अरे बाबा, आयुष्यात सगळंच आपल्याला हवं तसं, हवं तेंव्हा मिळालं असतं, तर काही मजा नाही रे! आता माझ्याकडेच बघ..आयुष्य संपेल अशा भोज्याला पोहोचलो आहे, पण...." मग बराच वेळ आजोबा आधी थोडंसं आपल्याविषयी, पण बरंचसं आयुष्याविषयी बोलले, आणि मग त्यांनी जे काही सांगितलं त्यातला मला कळलेला (निदान कळलं असं वाटलेला!) एक मुद्दा (जो मला आजच्या परिस्थितीत relevant वाटतो, तो) मी आठवून आठवून इथे माझ्या तोकड्या शब्दांत मांडतोय (काव्य गुण शोधण्याच्या फंदात पडू नका, तो प्रयत्नही या मुक्तकात नाही!):

काही अनोळखी, काही परिचितांना पाहिले
सुखात आनंदताना, दु:खात आक्रंदताना
आणि माझे मला उमजले
आयुष्याचे अर्थ नाना

इथल्या प्रत्येक क्षणाने
मी आहे तसा केलंय मला
हरएक आधीचा क्षण
घडवतो पुढच्या क्षणाला
आपण आज करू
ते आकार देतं भविष्याला

आयुष्य अनंत प्रवाह आहे
भलं-बुरं दोन्हीचा
दुरान्वयाने प्रत्येक आनंद
आहे पुत्र दु:खाचा
काही क्षण उणावू, तर मी नसेन 'मी'
'संपूर्णं स्वत:' साठी सारेच क्षण वेचा

देश माझा, माझी माती
माझी माणसं, सखे-सोबती
हात देऊन आधाराला
वेळोवेळी सारी नाती
आकाराला आणलं मला
मनासारखा प्रवास झाला
दिसू लागे आता पार
निरोप नाही, फक्त आभार!

दु:ख होतं जुनं जेंव्हा सुख येतं नवं
आयुष्याला दोन्ही एकसारखंच हवं

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2011 - 6:35 am | राजेश घासकडवी

वेगळ्या जातकुळीचं मुक्तक आवडलं. अजून काहीतरी येईल अशी आशा लावणारं. तुमच्या आजोबांविषयी तुम्ही अजून खोलवर लिहावं ही विनंती.

यकु's picture

15 Jul 2011 - 7:26 am | यकु

सहमत
बहूगुणी कृपया लिहाच!
हे खूपच भावलं.

प्राजु's picture

15 Jul 2011 - 8:39 am | प्राजु

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2011 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>वेगळ्या जातकुळीचं मुक्तक आवडलं. अजून काहीतरी येईल अशी आशा लावणारं. तुमच्या आजोबांविषयी तुम्ही अजून खोलवर लिहावं ही विनंती

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

सहज's picture

15 Jul 2011 - 7:29 am | सहज

आवडले.

चित्रा's picture

15 Jul 2011 - 8:42 am | चित्रा

मुक्तक आणि आजोबांची आठवण आवडली.
तुमच्या लिहीण्यामागची भावना समजते. विचारांना दिशा देत असताना मनात असलेल्या भावनेचा ओलावा समजतो, जाणवतो. तेव्हा धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

15 Jul 2011 - 9:45 am | स्वाती दिनेश

मुक्तक आणि आजोबांची आठवण आवडली.
चित्रसारखेच म्हणते,
अजून आठवणी लिहा ही विनंती.
स्वाती

श्रावण मोडक's picture

15 Jul 2011 - 9:45 am | श्रावण मोडक

आवडले!

मस्त कलंदर's picture

15 Jul 2011 - 10:55 am | मस्त कलंदर

खूप छान लिहिलंय. तुमचे अनुभव आणि तुमच्या आजोबांबद्दलही अजून वाचायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2011 - 11:19 am | बिपिन कार्यकर्ते

सर, अतिशय उत्तम असं मुक्तक. आणि त्यामगची तुमची तळमळ / तगमग इत्यादींचा अंदाज लावून देणारं. तुम्ही नियमित लिहावं आणि तुमच्या आजोबांबद्दल तर नक्कीच विस्तृतपणे लिहावं ही विनंती.

खुप छान ... एकदम मनातील लेखन ..

निरोप नाही, फक्त आभार! कविता वाचुन शिरवाडकरांची शेवटची कविता आठवली ..

पल्लवी's picture

15 Jul 2011 - 3:16 pm | पल्लवी

आवडले. :)

गणपा's picture

15 Jul 2011 - 3:31 pm | गणपा

काका मुक्तक फार फार आवडल.
इतरांसारखच म्हणतो की लिहिते रहा.

मेघवेडा's picture

15 Jul 2011 - 4:03 pm | मेघवेडा

असंच म्हणतो. तळमळ जाणवते. काका, आपण अजून लिहावंत अशी विनंती. :)

कवितानागेश's picture

16 Jul 2011 - 10:57 pm | कवितानागेश

आवडले.
:)

बहुगुणी's picture

15 Jul 2011 - 5:10 pm | बहुगुणी

आजोबांबद्दल लिहायची इच्छा बरेचदा होते, पण माझं लिखाण थिटं पडेल याची खात्री आहे, आणि विस्कळित काहीतरी लिहून त्या (निदान माझ्या दृष्टीने) उत्तुंग, आणि माझ्यासह कित्येकांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणार्‍या व्यक्तिमत्वावर अन्याय होईल याची जाणीव आहे. (अर्थात्, असल्या न्याय-अन्यायाला आजोबांनी कस्पटाचीही किंमत दिली नसती हेही तितकंच खरं!) तेंव्हा लिखाण जेंव्हा व्हायचं तेंव्हा होईल मी धारिष्ट्य केलं तर, पण तोपर्यंत निदान माझ्याकडे असलेलं त्यांचं एक अप्रकाशित, हस्तलिखित दीर्घकाव्य आहे मेघनादावर लिहिलेलं, ते आंतर्जालावर प्रकाशित करायची इच्छा नक्कीच आहे. बघुया कधी जमतंय ते. (इथेच केलं असतं क्रमशः प्रकाशित, पण ज्यांना अशा लिखाणात रस नाही त्यांच्या माथी हे लिखाण मारण्यात मिपाची बँडविड्थ अडकवावी की नाही, याबाबतीत थोडासा संदेह आहे.)

गणपा's picture

15 Jul 2011 - 5:31 pm | गणपा

(इथेच केलं असतं क्रमशः प्रकाशित, पण ज्यांना अशा लिखाणात रस नाही त्यांच्या माथी हे लिखाण मारण्यात मिपाची बँडविड्थ अडकवावी की नाही, याबाबतीत थोडासा संदेह आहे.)

काय काका.. किति काळ लोटला तुम्हाला मिपावर?
अहो अश्या लोकांना फाट्यावर मारायला शिका. :)
विनोद सोडा पण नक्की लिहा. इथे (काही कारणाने) न जमल्यास अनुदिनीवरतरी नक्की टाका आणि दुवा द्या.

मस्त कलंदर's picture

15 Jul 2011 - 5:52 pm | मस्त कलंदर

तुमच्या मताचा आदर आहे, तरीही तुम्ही लिहावंच असं वाटतं. काही गोष्टी शब्दबद्ध न केल्या गेल्याने ज्या त्या माणसासोबतच राहतात. आजवर तुमच्या आजोबांची ही आठवण फक्त तुम्हा एकट्याला माहित होती. ती लिहिताना तुम्ही पुन्हा एकदा आजोबांच्या मनोमन सन्निध गेलात आणि आम्हाला चांगलं काहीतरी वाचायला मिळालं. या लेखनाने लेखक आणि वाचक दोघांनाही आनंद दिला आहे. त्यामुळे ज्यांना आवडणार नाही, असे लोक तुमचे धागे उघडणार नाहीत असं समजूयात आणि जे लोक वाचण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी , स्वतःसाठी आणि तुमच्या आजोबांसाठी लिहा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jul 2011 - 6:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आजोबांबद्दल जरूर लिहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2011 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या आजोबांचे लेखन इथेच टाका.
वाट पाहतोय.

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

16 Jul 2011 - 12:55 am | श्रावण मोडक

लिहा... म्हणजेच इथं प्रकाशित करा. बाकी विचार करू नका. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Jul 2011 - 7:40 am | बिपिन कार्यकर्ते

द गुड शुड बी अ‍ॅग्रेसिव्ह! :)

धमाल मुलगा's picture

15 Jul 2011 - 5:59 pm | धमाल मुलगा

आयुष्य अनंत प्रवाह आहे
भलं-बुरं दोन्हीचा
दुरान्वयाने प्रत्येक आनंद
आहे पुत्र दु:खाचा
काही क्षण उणावू, तर मी नसेन 'मी'
'संपूर्णं स्वत:' साठी सारेच क्षण वेचा

खरंय. किती साधे शब्द किती मोठी गोष्ट बोलून जातात.

(इथेच केलं असतं क्रमशः प्रकाशित, पण ज्यांना अशा लिखाणात रस नाही त्यांच्या माथी हे लिखाण मारण्यात मिपाची बँडविड्थ अडकवावी की नाही, याबाबतीत थोडासा संदेह आहे.)

छ्छे:! ह्याला काही अर्थ आहे राव? :(
हे म्हणजे तुम्हीच ठरवायचं की अशा लिखाणात लोकांना रस नाही, आणि ज्यांना खरोखर आवडतं आहे, त्यांच्यावर मात्र अन्याय करायचा! नॉट चालिंग बॉस :)

हृदयात लक्कन काहीतरी हललं. काय बोलू? किती सुसंस्कार केले आहेत आजोबांनी आपल्यावर, त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल विस्तृत लिहून न्याय द्यावा.

आणि अतिशय सुरेख मुक्तक.
आजोबांविषयी अजून लिहा, मी तर म्हणेन त्यांचं व्यक्तिचित्र काही भागात इथे टाकलंत तर फारच आवडेल.
ज्यांच्यापासून स्फूर्ती मिळेल अशा लोकांबद्दल वाचायला मला वाटते प्रत्येकालाच आवडेल. ज्यांना आवडणार नाही त्यांची काळजी आपण कशाला करायची.
---------------------
अण्णामामाविषयी लिहिताना माझ्या मनात लिहू की नको, जमेल की नाही, शब्द तोकडे पडतील का अशाच काहीशा भावना होत्या. परंतु तो लेख लिहिल्यानंतर आज मला अतिशय बरे वाटते आहे की त्या व्यक्तिमत्त्वाला मी थोडातरी न्याय माझ्याकडून देऊ शकलो.

मुक्तक खूपच आवडले. आणखी लिहा.

तिमा's picture

15 Jul 2011 - 8:22 pm | तिमा

तुम्ही बहुगुणी तर आजोबा सहस्त्रगुणी असले पाहिजेत. लेखन आवडले. अजून येऊ द्यात.
लिखाणामुळे 'बँडविड्थ अडते हा एक गैरसमज आहे असे मला एका संगणक तज्ञाने सांगितले आहे.

सहज's picture

16 Jul 2011 - 9:07 am | सहज

कृपया जरुर लिहा. चांगल्या लेखनामुळे बँडविड्थ अडत नाही उलट मोकळी होते. काही लेखक तरी चांगले लेखन पाहून आपले अतिकिरकोळ धागे टाकायला बिचकतील. वाचकही चांगले लेखन पाहून किरकोळ धाग्यांना फाट्यावर मारेल.

सुधीर काळे's picture

16 Jul 2011 - 4:04 pm | सुधीर काळे

व्यवस्थेतली केवळ छिद्रंच शोधण्यापेक्षा काही आशादायक कणही गोळा करावे, आणि त्या कणांचं जाणीवपूर्वक हव्या त्या ठेव्यात रुपांतर करावं
आपल्या आजोबांचे सुरेख विचार!

अर्धवट's picture

18 Jul 2011 - 8:23 am | अर्धवट

ठिक आहे, नका लिहू.. च्यायला आग्रेव करून घेतायत उगाच.. ;)

चांगलं लिहिताय म्हणतोय तर भाव खाता होय.

आनंदयात्री's picture

19 Jul 2011 - 1:59 am | आनंदयात्री

मुक्तक फार छान झालंय. पुनर्वाचनात एखादे आवाज न करता, इथे तिथे बसत उडणारे फुलपाखरु निरखुन पाहिल्यासारखे वाटले, रंगेबीरंगी.

दुरान्वयाने प्रत्येक आनंद
आहे पुत्र दु:खाचा

या ओळी विशेष भावल्या. धन्यवाद.