षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर
वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला
वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे
ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
- प्राजु
प्रतिक्रिया
14 Jul 2011 - 2:48 am | चित्रा
बर्याच जणांच्या भावना चांगल्या शब्दबद्ध केल्या आहेत.
14 Jul 2011 - 6:16 pm | मूकवाचक
+१
14 Jul 2011 - 3:06 am | वारा
सद्य स्थितीला अनुरुप कवीता...
विशेष आवडले.
टचीन्ग ..
>>कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
14 Jul 2011 - 3:51 am | विकास
योग्य भावना योग्य परखड शब्दात मांडल्या आहेत...
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
खरे आहे.
आपण काय करू शकतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.
आज प्रथम मिपावरच "मस्त कलंदर" यांच्यामुळे मुंबई मदतीची गुगल स्प्रेडशीट मिळाली. नंतर नितिन सागर या मुलाने ती केवळ पाच फोन नंबर देऊन चालू केली आणि बघत बघता त्यात २०० हून अधिक माहीतीपूर्ण संदर्भ तयार झाले. म्हणलं तर गोष्ट साधी आहे. त्याने गेलेली माणसे परत येणार नाहीत अथवा दहशतवाद्यांना धडा मिळाला असे म्हणता येणार नाही. पण काहीतरी कन्स्ट्रक्टीव्ह आणि मदत होईल असे एकत्रीत पणे केले गेले यात सर्व काही आले.
असेच माझ्यासकट सर्वांना योग्य ते सुचो इतकीच शुभेच्छा!
14 Jul 2011 - 4:47 am | निनाद
समर्पक कविता
स्फोटांच्या पार्श्वभूमीवर हे. संताप दाटून येतो आहे...
14 Jul 2011 - 7:23 am | स्पंदना
खरच माफ कर ग भारत भू ! काय कराव तेच कळत नाही आहे. निदान यांनी युद्ध पुकारल तर थोडा तरी सहभाग घेता येइल, पण येतील आता पाठिराखे, लाळ घोटायला. अन सबुरीन घ्या सांगायला.
14 Jul 2011 - 8:00 am | नितिन थत्ते
कविता म्हणून चांगली आहे.
14 Jul 2011 - 11:19 am | गवि
हेच म्हणतो.
एरवी काय करणार सामान्य माणूस षंढत्व टाळण्यासाठी यावर एखादे गद्य वाचण्याची इच्छा आहे. चरफड नैसर्गिक आहे पण उगीच असल्या गलिच्छ परिस्थितीतून जायचे, जगायचे आणि तेही निकम्मेपणाचे षंढपणाचे ओझे आणि गिल्ट घेऊन हे नामंजूर. उगाच स्वतःवर आसूड ओढत रहायचे आणि तेही बिनगाठीचे..
माझं कुटुंब सुरक्षित एवढ्यावरच समाधान मानण्याविषयी माझं म्हणणं आहे की तेवढंच एक समाधान आहे तेही मानायचं नाही का?
त्याउप्पर आपापल्या कुटुंबाची तरी काय सुरक्षितता बाळगणार आहे आपण.. थिअरी ऑफ प्रॉबॅबिलिटीवर आपण जगतोय झालं.
14 Jul 2011 - 11:25 am | स्वानन्द
सहमत.
14 Jul 2011 - 7:42 pm | श्रावण मोडक
कविता म्हणून चांगली रचना.
आज प्रकाशित केली नसती तरी हेच मत राहिले असते. आज प्रकाशित केल्याने वेगळे काही वाटलेले नाही.
14 Jul 2011 - 9:00 pm | पंगा
हे अगोदरच म्हटले गेलेले असल्याने, कवितेच्या स्पिरिटबद्दल (व्यासोच्छिष्टम् न्यायाने) 'गप्प बसायचे ठरवले आहे'.
मात्र, कवितेतील एक न कळलेली गोष्ट:
यातील रोख (आणि/किंवा लॉजिक) कळले नाही.
अधोरेखित शब्दाचा अर्थ (माझ्या अर्धवट माहितीप्रमाणे) 'व्यावसायिक तत्त्वावर शरीरविक्रय करणार्या व्यक्तीस ग्राहक मिळवून देण्याकरिता मध्यस्थाचे सेवाशुल्क म्हणून संबंधित व्यावसायिक व्यक्तीच्या उत्पन्नातील मिळणार्या हिश्श्यावर उपजीविका करणारी व्यक्ती' असा होतो. (संदर्भ मौखिक-पारंपरिक आणि ऐकीव; चूभूद्याघ्या.)
संबंधित उदाहरणात अधोरेखित शब्दाचा रोख लोकशाहीकडे आहे हे उघड आहे. तसेच, सामान्य भारतीय हा या उदाहरणातील अपेक्षित व्यावसायिक असावा, अशी शंका येते.
मात्र, या व्यवहारातील ग्राहक नेमका कोण, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
बाकी, अधोरेखित शब्दाच्या वापराचा अभिनव प्रयोग सध्याच्या माहौलात सहज खपून जाण्यासारखा. किंबहुना, असा प्रयोग करून पाहण्यासाठी तूर्ताच्या माहौलाइतका दुसरा अनुकूल माहौल नसावा. गंगौघ संततप्रवाही आहे, हस्तप्रक्षालनार्थींचीच काय ती प्रतीक्षा आहे.
(बाकी, असे आणखीही प्रयोग करून पहावयाचे झाल्यास, अधोरेखिताच्या ठिकाणी वापरण्याकरिता वृत्तात चपखल बसणारे असे अनेक पर्यायी शब्दही चटकन लक्षात येतात. तूर्तास एवढेच.)
एरवी, 'शिमगा आला की कवित्व यायचेच' या न्यायाने, अतिरेकी हल्ल्यांनंतर अशा स्वरूपाच्या कविता येणे अपेक्षितच आहे. त्यामुळे नेमेचि येणार्या अतिरेकी हल्ल्यांप्रमाणे अशा कविता हाही सवयीचाच भाग होऊन बसला आहे. फरक इतकाच, की अतिरेकी हल्ल्यांत मनुष्यहानी होत असल्यामुळे दु:ख होते, काळजी वाटते आणि हे हल्ले थांबावेत म्हणून काहीतरी उपाय सापडावा अशी कळकळ वाटते. कवितांच्या बाबतीत तसा धोका नसल्याने तितक्या तीव्रतेने काही वाटत नाही.
तेव्हा चालू द्या.
(अतिअवांतर: भगतसिंहप्रभृतींना फाशी दिल्यावर प्रतिक्रिया म्हणून स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेली 'हा! भगतसिंग! हाय हा!' असे काहीसे शब्द असलेली एक कविता पूर्वी जालावर वाचनात आली होती, तीही बर्याच अंशी याच वृत्तात होती, असे काहीसे या निमित्ताने आठवले.)
यात 'नीषेधही' मधला 'नी' दीर्घ लिहिलेला आहे, असे लक्षात आले. सामान्यतः तो र्हस्व लिहिला जातो, असे निरीक्षण आहे.
या ठिकाणी तो दीर्घ लिहिण्याचे कारण केवळ वृत्तात बसावे एवढेच आहे, की यामागे अन्य कोणता प्रघात आहे?
15 Jul 2011 - 6:14 pm | गंगाधर मुटे
<<<अधोरेखित शब्दाचा अर्थ (माझ्या अर्धवट माहितीप्रमाणे) 'व्यावसायिक तत्त्वावर शरीरविक्रय करणार्या व्यक्तीस ग्राहक मिळवून देण्याकरिता मध्यस्थाचे सेवाशुल्क म्हणून संबंधित व्यावसायिक व्यक्तीच्या उत्पन्नातील मिळणार्या हिश्श्यावर उपजीविका करणारी व्यक्ती' असा होतो. >>>>
हाच अर्थ मलाही ज्ञात आहे. अर्थात हाच अर्थ प्रचलित आहे.
पण
पूर्वीच्या काळी लोहाराच्या/मुरमुरे-फुटाणे फोडण्यासाठीच्या भट्टीसाठी वापरल्या जाणार्या एका तर्हेच्या भात्याला "भाड" असे म्हणत. भाड या शब्दाचा मुळ अर्थ तोच असावा. हा भाता बहूतेक जाडभरड्या कपड्यापासून बनवला जात असावा. पण त्या भात्याच्या हालचालीवरून हा शब्द अश्लिल अर्थाने वापरात आला असावा.
पहिल्यांदा "भाड झोकणे" हा शब्द प्रचलित झाला असावा. त्याचा अर्थ "फुकटात फूटाणे खाण्याच्या लोभापायी कामधाम सोडून दिवसभर नुसतीच भाड झोकत बसणे (भाता हलवू लागणे.)" असा असावा.
भाड या शब्दाचे उच्चारण व त्या तर्हेच्या भात्याची हालचाल बघता हा शब्द जवळजवळ अश्लिल या अर्थानेच वापरात आला.
त्यापुढे या शब्दाचा अर्थ किंवा तो भाता कुणालाच माहीत नसल्याने त्यामूळ शब्दाशी किंवा अर्थाशी काहीही देणेघेणे नसलेले अर्थ वापरात आले असावे.
असो. हा माझा अंदाज आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही.
----------------------------------------------------------------------------
कवितेत हाच शब्द "कचखाऊ" या वृत्तीला आक्रमकतेने रेखाटण्यासाठी पर्यायी शब्द म्हणून वापरला असावा. आणि तो अर्थ ध्वनित करण्यात कवियत्रीला यश मिळाले आहे.
मात्र हा शब्द टाळून दुसरा पर्यायी शब्द वापरला असता तरी चालले असते.
..............................................................................
विशिष्ट समुदायाची व्होटबँक अबाधित राहावी म्हणून सरकार आतंकवादावर योग्य ती कठोर कारवाई करताना कर्तव्यात अक्षम्य कसूर करते, हे खरे आहे. त्यामुळे
लोकशाही आणि लोकशाहीचे सुत्रधार अगदीच "कचखाऊ" (शब्दाचा मुळ अर्थ लक्षात घेता, भाडखाऊ) आहेत, या कवियित्रीच्या मताला माझा दुजोरा आहे.
1 Aug 2011 - 11:04 am | सुधीर काळे
इथे केवळ वृत्तात बसविण्यासाठी 'नीषेध' असे लिहिले आहे. अशा तर्हेने मुद्दाम र्हस्व-दीर्घ करण्याचे स्वातंत्र्य कवींना असते व त्यालाच (बहुदा) Literary license असे म्हणतात.
चूभूद्याघ्या!
14 Jul 2011 - 8:41 am | सूड
खरंच कोणाला कसली चाड नाहीये.
14 Jul 2011 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार
मी काहीच करु शकत नाही या भावनेने कालपासुन नुसता धुमसतो आहे. स्वतःचीच चीड आणि लाज वाटते आहे. आपण केवळ असेच मरायला जन्माला आलो आहोत का? कोणीही यावे, काहीही करावे आणि मी त्याचा साधा प्रतिकारही करु शकत नाही? अतिरेक्यांनी भारताविरुध्द जिहाद पुकारला आहे आणि आपण मात्र बळी पडण्या शिवाय काहीही करु शकत नाही. असले भेकडा सारखे कुढत रडत जगण्या पेक्षा कालच्या स्फोटांमधे मी मेलो असतो तर बरं झाल असत असे आता वाटत आहे. कारण मला माहीत आहे या अतिरेक्यांवर उलटुन हल्ला करायची ताकद आपल्या पैकी कोणातच नाही. सापाला जर तुम्ही ठेचले नाही तर तो तुम्हाला डसल्या शिवाय रहाणार नाही. पण या हल्याचा कडक शब्दात निषेध करण्या पलिकडे मी काही करु शकत नाही. त्यांच्या छावण्यांवर हल्ले करायला माझा देश म्हणजे काय अमेरीका आहे का? उलट अफजल गुरु आणि कसाब यांना लाडाकोडाने पोसणारा सहिष्णु देशाचा मी नागरीक आहे.
दोस्तहो र्दुदैवाने या वेळेला माझा नंबर लागला नाही, पुढच्या वेळी माझा पण नंबर लागावा या साठी देवाकडे प्रार्थना करा.
14 Jul 2011 - 10:24 am | मदनबाण
ह्म्म्म...
अराजकता... अराजकता... अराजकता. :(
अगं तायडे जिथे रेल्वे प्रवास करत असताना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या बायकोची पर्स लांबवली जाते त्या राज्यात कायदा आणि सुरक्षतेची जरब किती उरली आहे हे सर्व जणांना समजलेच असेल.
संदर्भ :---- http://starmajha.starnews.in/maharashtra/nashik/7272-2011-07-11-10-29-23
असो... देशातील लोकांना आता अश्या स्फोटाची "सवय" झाली आहे,त्यात काही नवे उरले नाही. :( न्यूज चॅनलवाले एक्स्लुजीव न्यूज असे दाखवत त्याचे प्रसारण करत राहणार्,पेपर वाले दुसर्या दिवशी यावर अजुन काही नविन छापणार.)
तेव्हा तुमच्या आमच्या पैकी कोणी यात मेला नाही यासाठी स्वतःच स्वतःचे जिवंत असल्या बद्धल अभिनंदन करा आणि परत पोटाची खळगी भरण्यासाठी रोजच्या जीवघेण्या प्रवासाला सामोरे जा...
मुंबईकरांच्या नशिबी दुखः करायलाही वेळ राहिला नाहीये... पोटासाठी धावणे हेच त्यांना माहित.
14 Jul 2011 - 10:56 am | पप्पु अंकल
बॉम्बस्फोटात हकनाक मृत पावलेल्या नागरिकांना भावपुर्ण श्रध्दांजली......
14 Jul 2011 - 10:59 am | विसुनाना
कठिण प्रसंगी पण योग्य वेळी आलेली कविता वाचून मनाचा क्षोभ झाला. पण प्रक्षोभ होत नाही. :(
14 Jul 2011 - 11:50 am | बिपिन कार्यकर्ते
+१
14 Jul 2011 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार
+२
बाबा रामदेव किंवा तत्सम कोणितरी ह्या अतिरेक्यांना लपले असतील तिथे किंवा वेळेला दुसर्या देशात जाउन कंठस्नान घालण्यासाठी सशस्त्र फौज का नाही तयार करत ? आम्ही पण होऊ की सामिल.
14 Jul 2011 - 5:27 pm | चतुरंग
राग, संताप, शोक, चीड, असहायता, उद्विग्नता, घृणा, निराशा, मानसिक पंगुत्व, तगमग, अस्वस्थता, तुटलेपणा........
(दु:खी)रंगा
14 Jul 2011 - 6:04 pm | शाहरुख
बाबाची फौज कशाला ?
सरकारी फौजा काय कमी आहेत का ? तिथेही पराक्रम गाजवता येईल की :)
14 Jul 2011 - 6:07 pm | परिकथेतील राजकुमार
सरकारी फौजांच्या ट्रिगरवरती राजकारण्यांचे बोट असते.
14 Jul 2011 - 6:10 pm | शाहरुख
आणि बाबाजींच्या फौजांच्या ट्रिगरवर ? ;-)
14 Jul 2011 - 6:15 pm | नितिन थत्ते
ते लष्कर - ए - शिवबा सुरू झालं होतं त्याचं काय झालं पुढे?
15 Jul 2011 - 1:03 am | आनंदयात्री
>>ते लष्कर - ए - शिवबा सुरू झालं होतं त्याचं काय झालं पुढे?
कॉलिंग अजातशत्रू !!
14 Jul 2011 - 11:16 am | राघव
काय बोलावे काही सुचत नाही.. चीड, वैताग, त्रागा याशिवाय आपण काहीच करू शकत नाही ही भावनाच फार असह्य होतेय..
राघव
14 Jul 2011 - 11:22 am | जगड्या
खरंच कोणाला कसली चाड नाहीये.
कविता वाचून मनाचा क्षोभ झाला.
14 Jul 2011 - 11:42 am | चेतन
प्राजु ताई अतिशय समर्पक प्रासंगिक काव्य
'द वेन्स डे' चित्रपटाची मात्र आठवण झाली.
चेतन
अवांतरः काय? आज तुम्ही कसाबची फाशी माफ करायची मागणी केली नाही? काँग्रेस सरकारला सहानभूती दाखवली नाही? हिंदु दहशतवादी म्हणुन डिवचले नाहीत? अरेरे विचारजंत कसे होणार तुम्ही !!!!!
अतिअवांतरः प्रसंग काय आणि सही काय... अरेरे
14 Jul 2011 - 11:52 am | मदनबाण
द वेन्स डे' चित्रपटाची मात्र आठवण झाली.
अगदी अगदी :---
http://www.youtube.com/watch?v=i-f3sMwRfOA
14 Jul 2011 - 12:36 pm | अमोल केळकर
कदाचीत अतिरेक्यांनी ही म्हणून बुधवारच निवडावा. निव्वळ योगा योग?
अमोल केळकर
14 Jul 2011 - 5:28 pm | चतुरंग
अतिअवांतरला सुद्धा +१
14 Jul 2011 - 12:09 pm | विसोबा खेचर
जबरा..!
14 Jul 2011 - 12:11 pm | स्वाती दिनेश
काय लिहिणार?
संताप, चीड, दु:ख,असहाय्यता...
स्वाती
14 Jul 2011 - 1:21 pm | वाटाड्या...
प्राजुताईनी भावना अगदी योग्य शब्दात मांडल्या आहेत...
- वाट्या
14 Jul 2011 - 1:55 pm | गणेशा
निशब्द
14 Jul 2011 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दहशतवाद्यांचे हल्ले, निरपराध माणसांचे जाणारे जीव पाहून आदर्श अशा लोकशाही कडून काहीच होत नाही. सामान्य़ माणूस म्हणून आपल्याला काहीच करता येत नाही, हतबलता, अगतिकता, प्रासंगिक कवि्तेतून जबरा उतरली आहे.
-दिलीप बिरुटे
14 Jul 2011 - 7:51 pm | जातीवंत भटका
शब्दच नाहीयेत :(
14 Jul 2011 - 9:00 pm | धनंजय
संताप होतो, चीड वाटतेच. नैसर्गिक आहे.
(पण भारतातली लोकशाही मुळातच चुकलेली आहे, हा मुद्दा भरकटलेला आहे. संताप व्यक्त करताना थोडेसे भरकटणे होतेच. पण इतके नको. स्वातंत्र्योत्तर भारतीय सर्वच बेकार उपजले, हा विचार क्षणिक संतापातून उद्भवला असेल, अशी आशा करतो. अनेक उत्तम तन-मन झोकून काम करणारे तुमच्या ओळखीचे भारतीय तुम्हाला आठवतील, आणी त्यांना षंढत्वाच्या आरोपातून तुम्ही मोकळे कराल, अशी आशा करतो.
मराठेशाहीत कितीतरी लढाया झाल्या - काही मराठ्यांनी जिंकल्या, काही हरल्या. "मराठेशाहीला धोका नाही" असा एकही "पूर्ण यशाचा" क्षण नव्हता. एखादा किल्ला हातचा गेल्यावर प्रत्येक वेळी काय होत असेल? मावळ्यांपैकी एखादी प्राजु "षंढ सारे मावळे" अशी निर्भर्त्सना करत असेल काय? खचितच करत असेल. मराठे मुत्सद्दी कारवाया करत असतील त्याची सर्व गुप्त बित्तंबातमी त्या काळातल्या मावळातल्या प्राजुला देत असतील काय? नसतील असे वाटते. तेवढी गुप्तता बाळगण्याचे शहाणपण त्यांच्यापाशी असेल. त्या काळातल्या मावळातल्या प्राजुने सुद्धा शोकसंताप आटोक्यात आल्यावर तारतम्याने बघितले असेल - मधून-मधून एखादी लढाई हरलेल्या मराठ्यांना आणि त्या काळच्या मराठी मुत्सद्द्यांना पुरते षंढ न मानता कमीअधिक कार्यक्षम मानले असेल.)
14 Jul 2011 - 9:36 pm | राजेश घासकडवी
माझ्या मनातले विचार अगदी अचूकपणे मांडले.
परिस्थिती पूर्णपणे आदर्श नाही, याचा अर्थ अराजक आहे, सर्वच नाकर्ते आहेत असा होऊ नये. पण क्षण असे येतात की त्या क्षणी दुसरं काही सुचत नाही हेही तितकंच खरं. त्या भावनेची प्रातिनिधिक म्हणून कविता चांगली आहे.
14 Jul 2011 - 9:39 pm | Nile
हेच म्हणतो.
14 Jul 2011 - 10:30 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
15 Jul 2011 - 3:16 am | चित्रा
बहुदा शोकसंताप अजून आटोक्यात यायचा असेल अशी शक्यता आहे ना?
(माझा १६ वर्षाचा भाचा दादरला शिक्षणासाठी राहत आहे. माझा तरी संताप अजून आटोक्यात यायचा आहे.
इथे ज्यांचा संताप आटोक्यात आला आहे त्यांनी सरसकट भारतियांना षंढ म्हणण्यावरून आक्षेप घ्यावा, आणि तारतम्याचे, किंवा शांततेचे आवाहन करावे हे ठीक आहे, पण वरील कंसातील प्रतिसादामागे आपल्याला आतल्या गोटातील काही आश्वासक बातमी असल्यासारखे वाटते आहे. पण ज्यांना अशी बातमी नाही, त्यांनी इतरांच्या आश्वासनांवर अवलंबून राहायचे म्हटल्यावर थोडीफार चिडचीड होणारच. खरे पाहिले तर आता तर मंत्री आश्वासनेही देत नाहीत म्हणूनच हा असा लेख येतो ना?
असो. विषय वाढवण्याचा हेतू नाही. )
15 Jul 2011 - 8:11 am | नितिन थत्ते
>>कंसातील प्रतिसादामागे आपल्याला आतल्या गोटातील काही आश्वासक बातमी असल्यासारखे वाटते आहे. पण ज्यांना अशी बातमी नाही, त्यांनी इतरांच्या आश्वासनांवर अवलंबून राहायचे म्हटल्यावर थोडीफार चिडचीड होणारच.
ती आश्वासक बातमी धनंजय यांनी याच संस्थळावर "एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ" या २६ नोव्हेम्बर हल्ल्यानंतर त्यांनीच लिहिलेल्या लेखातील एका प्रतिसादात दिलेली आहे. (आणि मी ती पुन्हा उद्धृतही केली होती) परंतु ती माहिती आपल्या सर्वांना संताप व्यक्त करताना सोयीची नसल्याने बहुधा तिचा विसर पडत असावा.
काश्मीरात भारतीय सैन्याने ताबारेषेच्या पलीकडे जाऊन अतिरेक्यांचा पाठलाग करावा (म्हणजे आता करत नाहीत), असे आपले काही मित्र आपल्याला सांगतात. भारतीय लष्कर डावपेचास योग्य असा पाठलाग हल्लीच असे करत नाही हे तुम्हाला कोणी सांगितले? मी पलिकडे कारवाई केलेल्या कप्तानाशी बोललेलो आहे. पण हे धोरण भारताने जगजाहीर करावे, असे तुम्हाला वाटते का? "आपण असे करत नाही" असे जगाला सांगून (म्हणजे स्वतःच्या लोकांनाही) मग त्या कारवाया करण्यात मुत्सद्देगिरी आहे. (मी त्या कप्तानाशी अशी भेट झाली आहे, असे सांगणे म्हणजे गौप्यस्फोट नाही. भारत लष्करी तंत्रास योग्य अशा कारवाया करत आहे, हे सर्वच विचारी लोकांना ठाऊक आहे. अफगाणिस्तानातून भारत पाकिस्तानाला शह देत आहे, [हे ठीकच करत आहे], हे जगाभरातल्या वर्तमानपत्रांना माहीत आहे, पण "नेभळट-भारत-संताप"वादी लोकांना ठाऊक नाही.)
15 Jul 2011 - 8:22 am | चित्रा
परंतु ती माहिती आपल्या सर्वांना संताप व्यक्त करताना सोयीची नसल्याने बहुधा तिचा विसर पडत असावा.
बहुदा विसर सोयीस्कर असावा, असे म्हणायचे असावे. मला याबद्दल अधिक वाद घालायची इच्छा नाही, एवढेच म्हणून सोडून देते.
बाकी २००८ सालच्या धनंजय यांच्या प्रतिसादाचा एक दुवा आपण आज २०११ मध्ये उर्धृत केला तर तिचा परत दुवा द्यावा. आपण लिहीलेला प्रत्येक प्रतिसाद प्रत्येकाकडून वाचलाच जातो असे नसते. तेव्हा दुसर्याला सरसकट ठरवून विसर पडतो असे सुचवण्यापेक्षा परत दुवा दिलेला चांगला ठरेल.
बाकी गरज असल्यास खरडीतून बोलूया.
15 Jul 2011 - 10:00 pm | धनंजय
यास उपप्रतिसाद श्री. विकास यांच्या लेखाखाली दिलेला आहे.
15 Jul 2011 - 10:27 pm | गंगाधर मुटे
<<<< मराठेशाहीत कितीतरी लढाया झाल्या - काही मराठ्यांनी जिंकल्या, काही हरल्या. "मराठेशाहीला धोका नाही" असा एकही "पूर्ण यशाचा" क्षण नव्हता. एखादा किल्ला हातचा गेल्यावर प्रत्येक वेळी काय होत असेल? मावळ्यांपैकी एखादी प्राजु "षंढ सारे मावळे" अशी निर्भर्त्सना करत असेल काय? >>>
ते मावळे आणि त्यांचे शूर सरदार प्राणपणाने लढत होते.
तळहातावर शीर घेऊन प्रयत्नांची पराकाष्टा करत होते.
तुम्ही - आम्ही काय करतो???
आमचे सरकार काय करते????
निव्वळ सत्ता मिळविण्यासाठी "व्होटबँकांचे" समिकरण जुळवत राहणे, यापलिकडेही सत्ताधार्यांना काही जबाबदार्या आहेत की नाही ?????
एखाद्या तरी फुटपट्टीने मोजायचे म्हटले तरी आमच्यातला शूरपणा/ बाणेदारपणा/देशप्रेमीपणा/समाजप्रेमीपणा उमटून पडतो काय???????
राजकारणीमंडळींना खमठोकपणे जाब विचारू शकणारे पौरुषत्व आमच्यात आहे काय?????????
याचे प्रामाणिक उत्तर जर नाही असे असेल तर मग
आम्ही गुलाम, लाचार, स्वार्थी, मतलबी आहोत की षंढ एवढाच प्रश्न शिल्लक उरतो.
...............................................................................
15 Jul 2011 - 10:46 pm | धनंजय
याचे प्रामाणीक उत्तर तुम्ही स्वतः ठरवून घ्यायचे आहे.
तुमच्या स्वतःच्या मते लोकशाही पूर्णपणे बाद झालेली आहे. हे तुमचे प्रामाणिक मत आहे. मग तुम्ही स्वतःला "गुलाम, लाचार, स्वार्थी, मतलबी आहोत की षंढ" यांच्यापैकी काहीही म्हणून घ्या.
माझे प्रामाणिक उत्तर, की असे नाही. मनुष्य हे काहीसे भित्रे-काहीसे शूर, काहीसे अगतिक-काहीसे समर्थ, काहीसे स्वार्थी-काहीसे परोपकारी, आणि मर्यादित निर्मितिक्षमतेचे असतात. सरसकट मनुष्य पुरते षंढही नाहीत, की वीर्याच्या महापूराने आसमंत भरणारेही नाहीत. पूर्ण षंढ विरुद्ध अमर्याद पौरुष असे दोनच पर्याय आहेत, आणि एक नसेल तर दुसरा आहेच, असे मानणे मला वास्तव वाटत नाही.
तुम्हाला स्वतःला पुरते षंढ म्हणवून घ्यायचा हट्ट असला, तर असू दे. स्वतःला पूर्णपणे परतंत्र मानण्याचे स्वातंत्र्य आहेच की तुम्हाला. तरी बाकीच्या मनुष्यांच्या धडपडणार्या, निराशेबरोबर थोडी आशाही असलेल्या आयुष्यात विष कालवू नका म्हणजे झाले. किंवा विष कालवायचा प्रयत्न केला तर आम्ही "नाही पटत" म्हणू, ते समजून घ्या.
16 Jul 2011 - 9:09 am | गंगाधर मुटे
<<<< माझे प्रामाणिक उत्तर, की असे नाही. मनुष्य हे काहीसे भित्रे-काहीसे शूर, काहीसे अगतिक-काहीसे समर्थ, काहीसे स्वार्थी-काहीसे परोपकारी, आणि मर्यादित निर्मितिक्षमतेचे असतात. सरसकट मनुष्य पुरते षंढही नाहीत, की वीर्याच्या महापूराने आसमंत भरणारेही नाहीत. पूर्ण षंढ विरुद्ध अमर्याद पौरुष असे दोनच पर्याय आहेत, आणि एक नसेल तर दुसरा आहेच, असे मानणे मला वास्तव वाटत नाही. >>>
आमचे युवराजपण तसेच म्हणतात. त्यांचे प्रामाणिक मत असे की, मनुष्य हे काहीसे भित्रे-काहीसे शूर, काहीसे अतिरेकी-काहीसे विध्वंसक, काहीसे आत्मघाती-काहीसे खुनी, आणि काहीसे अमर्यादित-काहीसे मर्यादित विध्वसंकक्षमतेचे असतात. त्यामुळे असे बॉम्बस्फोट वगैरे होने निसर्गनियमाला धरूनच आहेत. ९९ टक्के वाचलेत ना, मग १ टक्का मेल्याने असे काय आभाळ कोसळले? सव्वासो कोटीमे सौ-दोसोका आंकडा क्या मायने रखता है ?????
आमचे युवराज पुढे असेही म्हणतात. की टीव्ही कॅमेर्यासमोर धडपडणार्या आमच्या प्रवक्त्यांकडे बघा, किती आवेशाने आमच्या सरकारची बाजू मांडतात.
********
आशावाद वगैरे बाळगणे, बोलायला ठीक आहे. पण त्यासाठी कृतीची गरज असते.
क्रुतीशून्य नेत्यांच्या आशावाद बाळगण्याच्या गोष्टी केवळ पोकळ वल्गना ठरतात, हे तुम्ही समजून घ्यावे.
17 Jul 2011 - 7:06 am | धनंजय
तुमचे युवराजांशी भांडण असेल तर ते युवराजांशी चालू ठेवा.
उद्धरण तुम्ही माझ्या प्रतिसादातले केलेले आहे, युवराजांच्या प्रतिसादातले नव्हे : "पोकळ वल्गना" म्हणून मला व्यक्तिगत हिणवत असाल, तर तो तुमचा "षंढपणा" म्हणायचा की "पौरुष"?
17 Jul 2011 - 7:13 am | प्रियाली
अं? पौरुषाचा संबंध काय? सरसकट सर्वांना आधीच षंढ म्हणून जाहीर केले आहे ना? ;) पुरुष आहेतच कोण आता?
17 Jul 2011 - 9:07 am | गंगाधर मुटे
क्रुतीशून्य नेत्यांच्या आशावाद बाळगण्याच्या गोष्टी केवळ पोकळ वल्गना ठरतात, हे तुम्ही समजून घ्यावे.
या वाक्यात "पोकळ वल्गना" म्हणून तुम्हाला व्यक्तिगत हिनविले आहे का? (तुम्ही कृतिशून्य नेते आहात काय?)
मी व्यक्तीगत पातळीवर उतरत नाही कारण या देशाच्या दुर्दशेला किंवा वाढलेल्या दहशतवादाला किंवा मुंबईत झालेल्या बाँबस्फोटाला तुम्ही व्यक्तीगत जबाबदार नाहीत.
व्यक्तीगत पातळीवर येणे सर्वांनीच टाळले पाहिजे.
.......................
<<<<< तुमचा "षंढपणा" म्हणायचा की "पौरुष"? >>>>>>
बॉम्बस्फोट होतात, माणसे किड्यामाकोड्यासारखे मरत्तात, शासन ढिम्म आहे, प्रशासन मख्ख आहे,
अशा परिस्थितीत या देशाचा एक नागरीक म्हणून मला जर संताप वगैरे काहीच येत नसेल ते मर्दानगीचे लक्षण नक्कीच नाही, असे मला वाटते.
16 Jul 2011 - 7:31 pm | स्वानन्द
उदाहरण बरोबर आहे.. पण एक फार मोठा फरक आहे तो सरकारच्या विश्वासार्हतेचा!! सरकारला खरेच या घटनांचे हवे तितके गांभीर्य आहे की नाही अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यात दोष कुणाचा?
नवनवे भ्रष्टाचार उघडकीला येत असताना आणि अधिआधिक वारंवारतेने हल्ले होत असताना... असा विचार लोकांनी केला तर त्यात त्यांचे चुकले असे ही म्हणता येत नाही. दरवेळी संशयाचा फायदा सरकारला मिळेल याही भ्रमात सरकारने असू नये.
14 Jul 2011 - 9:56 pm | पंगा
'ला पिला दे साक़िया, पैमाना पैमाने के बाद, होश की बाते करूंगा होश में आने के बाद'ची चाल या कवितेला फिट्ट बसते.
गाऊन पहावी.
27 Jul 2011 - 9:29 am | सोत्रि
पंगा,
एक्दम चपखल.
- (साकिया) सोकाजी
15 Jul 2011 - 11:13 pm | इंटरनेटस्नेही
अतिशय उत्तम कविता. आवडली.
16 Jul 2011 - 6:50 am | रेवती
कविता चांगली झाली आहे. संताप मागल्या स्फोटाच्यावेळी फारच झाला होता. यावेळी असहाय्य वाटलं आणि नंतर त्या बातमीपासून स्वत:ला वेगळं केलं.
सुरक्षेत अतोनात वाढ हा पर्याय आहेच्......पण पोलिसांना त्यांचं काम करू देणारे शासनही हवे.
जून २७ चा इंडीया टुडे चाळला फक्त.........फारच वाईट.
16 Jul 2011 - 12:58 pm | योगप्रभू
इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट पॅसिफिकेशन, इन्स्टंट रिअॅक्शन.. सगळं कसं इन्स्टंट झालंय. ही कविताही त्यापैकीच एक.
बरं भावनांचा क्षोभ झाला म्हणून एकदम टोक गाठायचे का? उद्वेगापोटी आपण काहीही लिहून जातो का? सचिन शून्यावर बाद झाल्यावर ' म्हातारं झालंय ते. संघातून हाकलून द्या' इतक्या लेव्हलच्या प्रतिक्रिया आणि त्याने शतक झळकवले की ' सचिन इज गॉड' असल्या महान उदातीकरणाच्या प्रतिक्रिया. म्हणजे एक तर हे टोक किंवा ते टोक. विचारांचा पेंड्युलम मध्ये स्थिर होऊच द्यायचा नाही का?
अर्थात या भारतीय मानसिकतेचे आश्चर्य वाटत नाही म्हणा. एक तर बेफाट कल्पना किंवा मग आत्मपीडन. १९६२ च्या चीन आक्रमणाच्या वेळी आपल्या कवींनी 'हटवा मागे पिशाच्च पिवळे' असल्या हास्यास्पद ओळी रचल्या होत्या. नंतर पराभव पाहिल्यावर 'जरा ऑंख मे भरलो पानी' म्हणून लागले रडायला.
मला प्रामाणिकपणे असे वाटते, की ज्यावेळेस समाजाने दौर्बल्य झटकून खंबीरपणे उभे राहायचे असते त्यावेळेस 'सगळी लेकरे षंढ आहेत' असले विचार अवसानघात करतात. त्यामुळे कविता आवडली नाही आणि पटलीही नाही.
'रात्रीच्या गर्भात वसे उद्याचा उषःकाल' हे वेळोवेळी घडत असते. 'वन्ही तो चेतवावा, चेतविताच चेततो' असे समर्थ रामदास म्हणून गेले आहेत. एकीकडे वयाची ८० ओलांडलेला म्हातारा निबर कातडीच्या मस्तवाल पोळांशी झुंज घेतोय तिथे मायभूची लेकरे षंढ कशी असतील?
16 Jul 2011 - 1:54 pm | मराठी_माणूस
सहमत
त्यात परदेशात (सुरक्षीत) बसुन मायभुमीच्या लेकराना षंढ म्हणण्याचा निषेध
22 Jul 2011 - 12:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>त्यात परदेशात (सुरक्षीत) बसुन मायभुमीच्या लेकराना षंढ म्हणण्याचा निषेध.
यात परदेशात असण्याचा किंवा नसण्याचा काय संबंध? एखादा माणूस सध्या परदेशात आहे म्हणून त्याला टीका करण्याचा अधिकार नाही का? आणि परदेश सुरक्षित आहे म्हणून त्यांना हा हक्क नाही हे तर खूपच मजेदार आहे. त्या हिशोबाने पुणे हे मुंबई पेक्षा जास्त सुरक्षित आहे. कोल्हापूर तर फारच, कारण अजूनतरी तिथे अतिरेकी हल्ला झाला नाही. मग कोल्हापूर किंवा पुण्यात राहणाऱ्या माणसाला या परिस्थितीमुळे प्रक्षोभित होण्याचा हक्क नाही का? की कमी आहे ?
कधी कधी मला परदेशी राहण्याऱ्या भारतीयांवर टीका करणाऱ्यांच्या मनात असूया आहे असे वाटते. तुमच्या मनात ती नसावी केवळ वैचारिक गोंधळ असावा ही अपेक्षा.
अजून एक :- विषयाला फाटे फुटू नयेत म्हणून सांगतो. माझा आक्षेप परदेशाच्या मुद्द्याला आहे. षंढ म्हणण्याचा निषेध करण्याला नाही. तो ज्याला हवा त्याने करावा.
22 Jul 2011 - 12:58 pm | मराठी_माणूस
हा ऊंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. कारण तिथे बसुन काहीच करायचे नसते आणि काय करायला पाहीजे ह्याचे फुकट सल्ले असतात.
22 Jul 2011 - 2:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही इथे बसून काय करता आहात हे कळले तर आनंद होईल. आणि तुम्ही काही करत नसाल तर इतरांना दोष देण्याचा नैतिक हक्क आहे का तुम्हाला?
उद्या समजा तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळाली आणि १-२ वर्षांसाठी गेलात तर त्या काळात काही बोलणार नाही का भारतातल्या प्रश्नांवर ??
22 Jul 2011 - 3:26 pm | मराठी_माणूस
तुम्ही इथे बसून काय करता आहात हे कळले तर आनंद होईल
तुम्ही तिथे बसून काय करता आहात हे कळले तर जास्त आनंद होईल
उद्या समजा तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळाली आणि १-२ वर्षांसाठी गेलात .....
बर्याचदा जाउन आलो , पण कोणावरही टीका केली नाही
22 Jul 2011 - 3:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>> तुम्ही तिथे बसून काय करता आहात हे कळले तर जास्त आनंद होईल
मी इतर कुणाला "उंटावरून शेळ्या हाकणारा" म्हटले नाही. त्यामुळे मी काही करतो किंवा नाही हे सांगून काय फरक पडणार? तुम्हाला मुद्दा कळत नाही आहे की उगाच पडती बाजू झाकायला काहीतरी युक्तिवाद करत आहात.
खरे तर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. तुम्ही इथे राहूनही काहीही करत नाही आहात. नाही तर प्रतिप्रश्न न करता मला किमान १-२ गोष्टी तरी सांगितल्या असत्या.
आणि हो, मी इथे आहे तिथे नाही.
>>बर्याचदा जाउन आलो , पण कोणावरही टीका केली नाही
टीका केली नाहीत तो तुमचा वैयक्तिक निर्णय झाला. त्या दरम्यान टीका करण्याचा हक्क तुम्हाला होता की नाही (तुमच्याच मते) हा माझा प्रश्न आहे.
22 Jul 2011 - 5:56 pm | मराठी_माणूस
मी इतर कुणाला "उंटावरून शेळ्या हाकणारा" म्हटले नाही
छान. मि ही ज्यानी हाकल्या त्यानाच म्हटले , तुम्हाला म्हटले नाही . उगाच स्वतः:वर कशाला ओढुन घेताय.
त्यामुळे मी काही करतो किंवा नाही हे सांगून काय फरक पडणार?
मलाही लागु
उगाच पडती बाजू झाकायला ......
हे उगीच डीवचणे झाले. अर्थातच मला काही फरक पडत नाही.
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे वादच संपला
त्या दरम्यान टीका करण्याचा हक्क तुम्हाला होता की नाही
हक्क असला वा नसला तरी काही तारतम्य आणि संकेत पाळायचे असतात
27 Jul 2011 - 9:54 am | सोत्रि
योगप्रभू,
अगदी सहमत, शब्दाशब्दाशी सहमत.
सध्याच्या अनागोंदी परीस्थितीत सरकारवर दडपण आणून जनहितार्थ काम करयाला भाग पाडणे गरजेचे आहे.
अण्णा हजारेंची लोकपाल बिलासाठीची चळवळ हे काहीतरी करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आहे, नुसते षंढ-षंढ म्हणुन धाय मोकलण्यापेक्षा आता 'सामाजिक उठाव' करणॆ गरजेचे आहे. इजिप्त, ट्युनिशिया इथल्या जनतेने ते दाखवून दिले आहे, तिथली जनता (खरोखरीच षंढ असणारी आणि नसणारी) रस्त्यावर उतरली आणि सत्ता उलटवुन टाकली.
खाली कोणीतरी "उंटावरून शेळ्या हाकणे" असा प्रतिसाद टाकला आहे. बहुतांशी त्या प्रतीसादाशीही सहमत. हे म्हणजे मस्त पक्वान्ने खाउन वर स्वीट डीश खाउन, ढेकर देत देत, "अरेरे किती गरीब लोक हे, ह्यांच्यासाठी कोणीच काही करत नाही, 'कोणीतरी' काहीतरी करा रे ह्यांच्यासाठी, मला खुप राग येतोय आणि उद्विग्नताही येतेय कोणिच काही करत नाहे म्हणुन....ऑऑऑब्ब्ब" असे आहे.
- (जमीनीवरचा शेळीहाक्या) सोकाजी
27 Jul 2011 - 10:30 am | जयंत कुलकर्णी
जेव्हा एखादी चर्चा होते किंवा वाद होतो तेव्हा मला या वाक्यांची फार मजा वाटते.
१ तुला त्यातले काय कळते ?
२ त्यांच्या जागी बसून बघ कसे होते ते.
३ नुसती चर्चा करून काय होणार ? करत तर काहीच नाही तुम्ही.
४ लोका सांगे ब्रह्म्ज्ञान स्वतः कोरडे पाषाण.
५ तुम्ही नुसते उंटावरून शेळ्या हाकणार.
६ त्यातले तज्ञ असताना तुम्ही कशाला शहाणपणा सांगताय ?
इ. इ. इ.
हे सगळे पाळायचे म्हटले तर आपल्या हातात फक्त मतदानाचा हक्क उरतो. ते केल्यावर गुपचूप घरी पडावे. कारण वरील वाक्ये आपल्या तोंडावर कोणीही केव्हाही फेकू शकतो. उदा. त्रिलोकेकर साहेबांना असे विचारता येईल की त्यांनी हजारेंना आत्तापर्यंत एखादेतरी पत्र लिहीले आहे का? का त्यांच्या कार्याला भेट दिली आहे का ? नसेल तर त्यांनी बोलू नये असेही म्हणता येईल. पण त्यांनी तसे केले नाही याचा अर्थ असा नाही की ते म्हणत आहेत ते चूक आहे. कारण जगातल्या प्रत्येक गोष्टीचा उगम हा विचार आहे. त्यामुळे जरी त्यांनी त्या चळवळीत भाग घेतला नसेल तरीही एक नागरीक म्हणून, एक माणूस म्हणून त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मी त्यांना असे म्हणू शकत नाही की तुम्ही नुसती बडबड करत आहात. ते जे काम करत आहेत त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या गोष्टींवर परिणाम होतच असतो.
कदाचित मला काय म्हणायचे आहे ते मी नीट मांडू शकलो नसेन. पण जरा विचार केलात तर माझे म्हणणे आपल्याला पटण्याची शक्यता आहे. विनंती आहे की चर्चेत शक्यतो अशी वाक्ये टाळावीत व वस्तुस्थितीला, इतिहासाला व तर्काला जास्त महत्व द्यावे.
27 Jul 2011 - 11:48 am | सोत्रि
जयंतजी,
मला ह्या प्रतिसादातुन स्वतःला डिफेंड करायचे नाही. तुमचे मुद्दे मान्य.
हा मुद्दा मला आधिच्या प्रतिसादात अधोरेखित करायचा होता. आधीचा पुर्ण प्रतिसाद "क्रियेवीना वाचाळता व्यर्थ आहे" ह्या उक्तीचे समर्थन करणारा होता. आता तो थोडासा अतिरंजीत झाला असु शकेल पण भावना मोकळ्या होत्या, कोणाला नावे ठेवण्याचा किंवा 'टोचवण्याचा' उद्देश अजिबात नव्हता.
- (इतीहासकार आणि तर्कतीर्थ) सोकाजी
27 Jul 2011 - 11:58 am | जयंत कुलकर्णी
आपल्या सगळ्यांचा उद्देश चांगलाच आहे या बद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही. मला फक्त आपल्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची होती की जेव्हा एखादा हातगाडीवाला पंतप्रधानांवर कडवट टिका करेल तेव्हा आपण त्याचेही म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. तुला रे काय कळतय त्यातले असे म्हणून कसे चालेल ? ऐकले म्हणजे चर्चा चालू होते व अनेक मुद्दे नव्याने मिळतात किंवा कदाचित त्यातून मार्गही सापडू शकतो.
ही आपल्यावर किंवा आपल्या प्रतिक्रियेवर टिका नाही. हे एक निरिक्षण आहे.
असो.
कॉकटेल बद्दल काही शंका आहेत त्या आपल्याला व्यनितून विचारणार आहे.
:-)
16 Jul 2011 - 1:42 pm | गंगाधर मुटे
आता कुणी कुणाचे कान पकडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये
ते दान का मिळाले? जे टाळले सदा
असले पुन्हा नव्याने सहसा घडू नये
शोधेन मीच माझा, रस्ता पुन्हा नवा
त्या मूक दर्शकांनी सहसा रडू नये
निद्रिस्त मीच केल्या माझ्याच जाणिवा
संवेदनेवरी या मीठ रगडू नये
सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?
झाले अता पुरेसे, ते बोलले बहू
बाळंत होत ना ती, चर्चा झडू नये
19 Jul 2011 - 4:08 pm | सुधीर काळे
प्राजक्ता,
अतीशय 'वृत्त'बद्ध आणि अर्थपूर्ण अशी कविता लिहून तू तर 'छक्का'च मारला आहेस. (कोटी मुद्दाम वापरली आहे!)
सुंदर कविता. प्रत्येक कडव्यातली प्रत्येक ओळ अर्थपूर्ण आहे. कुठलीही ओळ कमी नाहीं किंवा कुठलीही ओळ जास्त नाहीं. अगदी सुयोग्य लांबीची मस्त कविता. छान चाल लावून 'आकाशवाणी'वर रोज सार्या महाराष्ट्राला/ भारताला ऐकवावी अशी ही कविता आहे. त्यातल्या त्यात शेवटचे कडवे मस्त आहे!
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
अशाच अर्थपूर्ण कविता रचत जा.
20 Jul 2011 - 10:21 pm | चन्द्रशेखर गोखले
प्राजूजी तुमची कविता म्हणजे भीषण उपहास.. सद्यपरिस्थितीचा.. खरोखरच मला वाटतं मायभूमीलाच श्रद्धांजली वहायला हवी..अशी वेळ आली आहे.
21 Jul 2011 - 8:51 pm | इरसाल
समर्पक ......
22 Jul 2011 - 2:22 am | प्राजु
ज्यांना ही कविता पटली आणि ज्यांना नाही पटली त्या सर्वांचे मनापासून आभार.
एक गोष्ट इथे नमूद करू इच्छीते, ही कविता कोणाही एका व्यक्तीवर नाहीये. ही कविता देशाचं सुरक्षा धोरण, ते ठरवणारी खुर्चीतली मंडळी आणि या दहशत वादाला उत्तर न देता, शांतपणे बसून राहणारं सरकार यांच्यासाठी होती/आहे.
ज्यांना पटली त्यांना धन्यवाद ज्यांना नाही पटली, तरी छान छान! (यात माझं काहीच जात नाहिये.)
मी अमेरिकेत राहते, म्हणून मी देशाच्या सद्द्यपरिस्थितीवर बोलू नये असे म्हणणार्या लोकांना योग्य जागी मारण्यात आलेले आहे. जिथे जन्म घेतला, जिथे बालपण गेलं, जिथे शिक्क्षण झालं... त्या मातीबद्दल बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे मला. अगदी तिथे राहणार्या लोकांइतकाच!
आपण षंढ आहोत की नाही (फिजिकली नव्हे), हे विचार करायला प्रत्येकाला देवाने योग्य ती बुद्धी दिलेली आहे. कविता नक्की कशावर आहे हे समजण्याचीही बुद्धी आहेच सर्वांकडे. त्यामुळे षंढ म्हंटल्यामुळे मी कोणाची माफी वगैरे नक्कीच नाही मागणार. तशी कोणी अपेक्षाही करू नये. कवितेतले मत माझे आहे.. आणि ते तसेच राहिल. त्याच्याशी कोणी सहमत व्हावे अशी इच्छा अजिबात नाही.
असो.. या कवितेवरचा माझा शेवटचा प्रतिसाद!
धन्यवाद!
22 Jul 2011 - 2:46 am | इंटरनेटस्नेही
अतिशय समतोल प्रतिसाद प्राजुतै!
23 Jul 2011 - 7:42 pm | श्रावण मोडक
हा खुलासा केल्याबद्दल धन्यवाद.
या खुलाशाने कवितेतील 'षंढ सारी लेकरे' ही शब्दरचना, किंवा तिच्या प्रकाशनाचा नेमका काळ, एवढेच अधोरेखीत होते आणि आत्ताच्या खुलाशानुसार देशाची सुरक्षा ठरवणाऱ्यांना 'षंढ' म्हटले या तथ्याने ही कविता तात्कालीक संतापाचा बुडबुडा ठरते.
देशाच्या सुरक्षा धोरणावर कवितेतून आक्षेप घ्यायला माझी हरकत नाही, पण ही कविता त्या धोरणाचा आक्षेप आहे असे मानायचे असेल तर ही कविता पोरवयाचीही नाही. कारण या धोरणाविषयी प्राजु यांना काय कळते हा प्रश्न आहे. 'दहशतवादाला उत्तर न देता शांतपणे बसून राहणारं सरकार' हे किंवा असे मत असण्याचा प्राजु यांना अधिकार आहे. पण इथेही हे कोणी सांगितलं, असा प्रश्न आहेच. एकूणच ही दोन्ही मतेच राहतात, आणि ही मते व्यक्तिसापेक्ष बदलत जातील. आणि म्हणूनच या कवितेतील 'षंढ' या शब्दाच्या संदर्भात झालेल्या टीकेला प्राजु स्वतःच अधिक वजन प्राप्त करून देतात. मग या अधोरेखील केलेल्या मुद्यांसंदर्भात, षंढ या शब्दाच्या योजनावरून कोणी कवयित्री परदेशस्थ असण्याचा मुद्दा काढला (म्हणजे, तू तर तिथं आहेस. तुला यातलं काय माहितीये, तुला हा टीकेचा अधिकार नाही, असा मुद्दा काढला) तर, तोही बुडबुडाच असतो पण, तोही अधिकार या पद्धतीच्या लेखनातून निर्माण झालेला असतोच.
मात्र, तुम्ही अमेरिकावासी आहात म्हणून तुम्हाला भारताविषयी बोलण्याचा अधिकार नाही, हे नामंजूर. आज भारतात नाहीत म्हणून ते भारतीय नव्हेत, इतकी भारतीयत्वाची व्याख्या संकुचित नाही आणि नसावीही. प्रत्येकाला मते असणार, ती व्यक्त होणारही. त्यांना फाट्यावर मारण्याचे अधिकारही प्रत्येकाला असतो. त्यांचा वापर करता येतोच. त्यामुळे, काही कळत नसताना दहशतवादविरोधी धोरणाला हरकत घेणे हे एक मत असते आणि ते फाट्यावर मारता येते; त्याचप्रमाणे, तुम्ही अमेरिकावासी असल्याने तुम्हाला काय अधिकार हा प्रश्नदेखील एक मत आहेच, ते फाट्यावर मारता येतेच.
एकूण, तुम्ही - आम्ही एकमेकांना फाट्यावर मारत राहू. सार्वजनिकामध्ये एक चांगला करमणूकप्रधान राडा केल्याचे श्रेय सर्वांना मिळेल.
आधी आपणच 'सारी लेकरे' असं म्हणायचं आणि मागाहून आपल्या वैयक्तीक मताचे आरोपण कवितेवर करत त्याचा संकोच करू पहायचा हा लिहिलेल्या मजकुराविषयीचा प्रामाणिकपणा नव्हे. यापेक्षा, 'होय, तो माझा संताप आहे, त्यातून व्यक्त झालेली ती प्रतिक्रिया आहे' असा खुलासा अधिक श्रेयस्कर ठरला असता.
आधी म्हटल्याप्रमाणे ही कविता आता चांगली रचना नाही. ती मताची पिंक आहे. फरक इतकाच की पिंक टाकताना फवारा उडलेला नाही, पिंक धारदार योग्य ठिकाणी गेली आहे.
27 Jul 2011 - 10:01 am | सोत्रि
मोडक
अतिशय सडेतोड, यथायोग्य आणि संयमित प्रतिसाद.
(मी तुमचा पंखा झालोय ह्या प्रतिसादानंतर.)
_/\_ _/\_ _/\_
- (पंखा) सोकाजी
23 Jul 2011 - 8:09 pm | प्रियाली
या दोन्ही वाक्यांतून असे दिसते की केवळ सरकारात असणारी (फारतर देशाची सुरक्षा व्यवस्था पाहणारी) माणसेच फक्त मायभूमीची लेकरे आहेत आणि त्यांनाच षंढ म्हटले आहे. तसे असल्यास मिपावरील अनेकजण षंढ नसल्याची शक्यता वाढलेली आहे आणि बहुतेक परदेशस्थ मिपाकर षंढ नसल्याची शक्यता दिसते पण याच बरोबर ते मातृभूमीची लेकरेच नसण्याचीही शक्यता मोठी दिसते. या सर्वाला सुदैव म्हणावे की दुर्दैव?
सध्या तरी कविता नको पण खुलासा आवर असे म्हणावेसे वाटले. :( यापेक्षा तो एक भावनिक आवेग होता त्याला शब्दशः घेण्याची तसदी घेऊ नये इतके म्हटले असते तर पुरेसे झाले असते पण या खुलाशाने गोंधळ निर्माण झाला आहे.
याच्याशी मात्र सहमत!
23 Jul 2011 - 8:54 pm | पंगा
...एका गोष्टीचा अजूनही खुलासा झाला नाही. (अर्थात, आग्रह नाही - शेवटी, You don't owe the world an explanation - पण तरीही, कुतूहल आहे.) लोकशाही ही नेमकी 'भाडखाऊ' कशी?
हे कोणताही खुलासा न देऊन अधिक प्रभावीरीत्या करता आले असते, असे वाटते. असो. ज्याचीत्याची पद्धत निराळी.
अगदी. (माझ्यापुरतेच बोलायचे झाले, तर कोठल्यातरी सोम्यागोम्याने मला षंढ म्हटल्याने मी षंढ ठरतही नाही, आणि 'मी तसा नाही' हे ठसवण्यासाठी मला त्याविरुद्ध पुरावा (प्रात्यक्षिक वगैरे?) देण्याची गरजही भासत नाही.)
माफी मागूही नये आणि मागावी अशी अपेक्षाही कोणी करू नये.
तसेही, माफी मागण्याने नेमके काय साध्य होते? An insincere apology is worse than no apology.
26 Jul 2011 - 1:57 pm | अजातशत्रु
असेच म्हणतो.
लोकशाही ही नेमकी 'भाडखाऊ' कशी ?
हे समजले नाहि
22 Jul 2011 - 6:24 pm | मूकवाचक
कै. शहीद हेमन्त करकरे यान्ची एक मुलगी अमेरिकेत स्थायिक झाली आहे. दुसरी युके मधे शिकते आहे.
कै. शहीद विजय साळसकर यान्ची मुलगी उच्च शिक्षणासाठी युके मधे होती असे कालच वाचले.
त्या मिपा सदस्य आहेत असे क्षणभर गृहीत धरून मान्यवर मिपा सदस्यान्च्या मते भारतात घडणार्या घडामोडीबद्दल आपल्या (टोकाच्या वगैरे पकडून) प्रतिक्रिया देण्याचा नैतिक अधिकार या तीन आजी/ माजी परदेशस्थ व्यक्तीना कितपत आहे/ असावा?
23 Jul 2011 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवीने खुलासे करत बसू नये असे माझे मत होते.
-दिलीप बिरुटे
24 Jul 2011 - 12:24 pm | सुधीर काळे
प्राजक्ता,
तुझी कविता सुरेख आहे व ती मला खूप आवडली.
इथे झालेली टीका मनावर घेऊन 'मिपा'करांवर रागावू नकोस. अशाच चांगल्या आणि अर्थपूर्ण कविता लिहीत जा व इथे पोस्ट करत जा.
24 Jul 2011 - 6:37 pm | नरेशकुमार
मला पन एक कविता सुचते आहे.
.
एक दोन तिन चार
टेररीस्ट झालेत फार
.
पाच छे सात आठ
टेररिस्टाला करुन सपाट
.
नौ दहा अकरा बारा
टेररीस्टाचे वाजवु बारा.
.
तेरा चौदा पंधरा सोळा
टेररिस्टाविरुद्ध होउ गोळा
,
सतरा अठरा एकोनिस विस
टेरस्टाचा पाडु किस.
24 Jul 2011 - 7:31 pm | स्वानन्द
अप्रतीम बडबड गीत!! :D
25 Jul 2011 - 6:29 pm | इरसाल
सतरा अठरा एकोनिस विस
टेरस्टाचा पाडु किस.
टेररीस्टाचा घेवू कीस
हे यमक जुळतं का पहा ?
25 Jul 2011 - 7:01 pm | मूकवाचक
जगाला प्रेम अर्पावे ...
(यमक पण जुळले आणि मूळ काव्याच्या आशयातली चूकही दुरूस्त झाली.)
26 Jul 2011 - 4:56 pm | सुधीर काळे
प्राजक्ता,
आज तुझी ही कविता 'चितपावन' या संस्थळावर 'एका अज्ञात कवी कविता' म्हणून प्रसिद्ध झाली. मी त्यांना ती तू लिहिली आहेस असतीकळविले आहे. लोकांच्या प्रतिक्रियाही चांगल्या आहेत. नंतर सार्या प्रतिक्रिया एकत्र करून तुला कळवेन.
27 Jul 2011 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार
"राजकारण आणि क्रिकेट ह्यातले सगळ्यांना सगळे कळते" असे आमचे कणेकरगुर्जी म्हणतात ते काय खोटे नाही.
28 Jul 2011 - 4:07 pm | सुधीर काळे
प्राजक्ता,
'चितपावन' संस्थळावर तुझी कविता गाजत आहे....
आजच एकाने पूर्ण कवितेचे शब्द माझ्याकडे मागितले आणि मी ती ते तिथे डकवलेही!