षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर
वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला
वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे
ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
- प्राजु
+१
सद्य स्थितीला अनुरुप कवीता...
विशेष आवडले.
टचीन्ग ..
>>कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
योग्य भावना योग्य परखड शब्दात मांडल्या आहेत...
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
खरे आहे.
आपण काय करू शकतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.
आज प्रथम मिपावरच "मस्त कलंदर" यांच्यामुळे मुंबई मदतीची गुगल स्प्रेडशीट मिळाली. नंतर नितिन सागर या मुलाने ती केवळ पाच फोन नंबर देऊन चालू केली आणि बघत बघता त्यात २०० हून अधिक माहीतीपूर्ण संदर्भ तयार झाले. म्हणलं तर गोष्ट साधी आहे. त्याने गेलेली माणसे परत येणार नाहीत अथवा दहशतवाद्यांना धडा मिळाला असे म्हणता येणार नाही. पण काहीतरी कन्स्ट्रक्टीव्ह आणि मदत होईल असे एकत्रीत पणे केले गेले यात सर्व काही आले.
असेच माझ्यासकट सर्वांना योग्य ते सुचो इतकीच शुभेच्छा!
समर्पक कविता
कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!" षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ करस्फोटांच्या पार्श्वभूमीवर हे. संताप दाटून येतो आहे...
खरच माफ कर ग भारत भू ! काय कराव तेच कळत नाही आहे. निदान यांनी युद्ध पुकारल तर थोडा तरी सहभाग घेता येइल, पण येतील आता पाठिराखे, लाळ घोटायला. अन सबुरीन घ्या सांगायला.
कविता म्हणून चांगली आहे.
हेच म्हणतो.
एरवी काय करणार सामान्य माणूस षंढत्व टाळण्यासाठी यावर एखादे गद्य वाचण्याची इच्छा आहे. चरफड नैसर्गिक आहे पण उगीच असल्या गलिच्छ परिस्थितीतून जायचे, जगायचे आणि तेही निकम्मेपणाचे षंढपणाचे ओझे आणि गिल्ट घेऊन हे नामंजूर. उगाच स्वतःवर आसूड ओढत रहायचे आणि तेही बिनगाठीचे..
माझं कुटुंब सुरक्षित एवढ्यावरच समाधान मानण्याविषयी माझं म्हणणं आहे की तेवढंच एक समाधान आहे तेही मानायचं नाही का?
त्याउप्पर आपापल्या कुटुंबाची तरी काय सुरक्षितता बाळगणार आहे आपण.. थिअरी ऑफ प्रॉबॅबिलिटीवर आपण जगतोय झालं.
सहमत.
कविता म्हणून चांगली रचना.
आज प्रकाशित केली नसती तरी हेच मत राहिले असते. आज प्रकाशित केल्याने वेगळे काही वाटलेले नाही.
काय? आज तुम्ही कसाबला फाशी द्यायची मागणी केली नाही? षंढ सरकारला शिव्या दिल्या नाही? देशद्रोहीच की तुम्ही !!!!!हे अगोदरच म्हटले गेलेले असल्याने, कवितेच्या स्पिरिटबद्दल (व्यासोच्छिष्टम् न्यायाने) 'गप्प बसायचे ठरवले आहे'. मात्र, कवितेतील एक न कळलेली गोष्ट:
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"यातील रोख (आणि/किंवा लॉजिक) कळले नाही. अधोरेखित शब्दाचा अर्थ (माझ्या अर्धवट माहितीप्रमाणे) 'व्यावसायिक तत्त्वावर शरीरविक्रय करणार्या व्यक्तीस ग्राहक मिळवून देण्याकरिता मध्यस्थाचे सेवाशुल्क म्हणून संबंधित व्यावसायिक व्यक्तीच्या उत्पन्नातील मिळणार्या हिश्श्यावर उपजीविका करणारी व्यक्ती' असा होतो. (संदर्भ मौखिक-पारंपरिक आणि ऐकीव; चूभूद्याघ्या.) संबंधित उदाहरणात अधोरेखित शब्दाचा रोख लोकशाहीकडे आहे हे उघड आहे. तसेच, सामान्य भारतीय हा या उदाहरणातील अपेक्षित व्यावसायिक असावा, अशी शंका येते. मात्र, या व्यवहारातील ग्राहक नेमका कोण, हे स्पष्ट होऊ शकले नाही. बाकी, अधोरेखित शब्दाच्या वापराचा अभिनव प्रयोग सध्याच्या माहौलात सहज खपून जाण्यासारखा. किंबहुना, असा प्रयोग करून पाहण्यासाठी तूर्ताच्या माहौलाइतका दुसरा अनुकूल माहौल नसावा. गंगौघ संततप्रवाही आहे, हस्तप्रक्षालनार्थींचीच काय ती प्रतीक्षा आहे. (बाकी, असे आणखीही प्रयोग करून पहावयाचे झाल्यास, अधोरेखिताच्या ठिकाणी वापरण्याकरिता वृत्तात चपखल बसणारे असे अनेक पर्यायी शब्दही चटकन लक्षात येतात. तूर्तास एवढेच.) एरवी, 'शिमगा आला की कवित्व यायचेच' या न्यायाने, अतिरेकी हल्ल्यांनंतर अशा स्वरूपाच्या कविता येणे अपेक्षितच आहे. त्यामुळे नेमेचि येणार्या अतिरेकी हल्ल्यांप्रमाणे अशा कविता हाही सवयीचाच भाग होऊन बसला आहे. फरक इतकाच, की अतिरेकी हल्ल्यांत मनुष्यहानी होत असल्यामुळे दु:ख होते, काळजी वाटते आणि हे हल्ले थांबावेत म्हणून काहीतरी उपाय सापडावा अशी कळकळ वाटते. कवितांच्या बाबतीत तसा धोका नसल्याने तितक्या तीव्रतेने काही वाटत नाही. तेव्हा चालू द्या. (अतिअवांतर: भगतसिंहप्रभृतींना फाशी दिल्यावर प्रतिक्रिया म्हणून स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेली 'हा! भगतसिंग! हाय हा!' असे काहीसे शब्द असलेली एक कविता पूर्वी जालावर वाचनात आली होती, तीही बर्याच अंशी याच वृत्तात होती, असे काहीसे या निमित्ताने आठवले.)
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधहीयात 'नीषेधही' मधला 'नी' दीर्घ लिहिलेला आहे, असे लक्षात आले. सामान्यतः तो र्हस्व लिहिला जातो, असे निरीक्षण आहे. या ठिकाणी तो दीर्घ लिहिण्याचे कारण केवळ वृत्तात बसावे एवढेच आहे, की यामागे अन्य कोणता प्रघात आहे?
<<<अधोरेखित शब्दाचा अर्थ (माझ्या अर्धवट माहितीप्रमाणे) 'व्यावसायिक तत्त्वावर शरीरविक्रय करणार्या व्यक्तीस ग्राहक मिळवून देण्याकरिता मध्यस्थाचे सेवाशुल्क म्हणून संबंधित व्यावसायिक व्यक्तीच्या उत्पन्नातील मिळणार्या हिश्श्यावर उपजीविका करणारी व्यक्ती' असा होतो. >>>>
हाच अर्थ मलाही ज्ञात आहे. अर्थात हाच अर्थ प्रचलित आहे.
पण
पूर्वीच्या काळी लोहाराच्या/मुरमुरे-फुटाणे फोडण्यासाठीच्या भट्टीसाठी वापरल्या जाणार्या एका तर्हेच्या भात्याला "भाड" असे म्हणत. भाड या शब्दाचा मुळ अर्थ तोच असावा. हा भाता बहूतेक जाडभरड्या कपड्यापासून बनवला जात असावा. पण त्या भात्याच्या हालचालीवरून हा शब्द अश्लिल अर्थाने वापरात आला असावा.
पहिल्यांदा "भाड झोकणे" हा शब्द प्रचलित झाला असावा. त्याचा अर्थ "फुकटात फूटाणे खाण्याच्या लोभापायी कामधाम सोडून दिवसभर नुसतीच भाड झोकत बसणे (भाता हलवू लागणे.)" असा असावा.
भाड या शब्दाचे उच्चारण व त्या तर्हेच्या भात्याची हालचाल बघता हा शब्द जवळजवळ अश्लिल या अर्थानेच वापरात आला.
त्यापुढे या शब्दाचा अर्थ किंवा तो भाता कुणालाच माहीत नसल्याने त्यामूळ शब्दाशी किंवा अर्थाशी काहीही देणेघेणे नसलेले अर्थ वापरात आले असावे.
असो. हा माझा अंदाज आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही.
----------------------------------------------------------------------------
कवितेत हाच शब्द "कचखाऊ" या वृत्तीला आक्रमकतेने रेखाटण्यासाठी पर्यायी शब्द म्हणून वापरला असावा. आणि तो अर्थ ध्वनित करण्यात कवियत्रीला यश मिळाले आहे.
मात्र हा शब्द टाळून दुसरा पर्यायी शब्द वापरला असता तरी चालले असते.
..............................................................................
विशिष्ट समुदायाची व्होटबँक अबाधित राहावी म्हणून सरकार आतंकवादावर योग्य ती कठोर कारवाई करताना कर्तव्यात अक्षम्य कसूर करते, हे खरे आहे. त्यामुळे
लोकशाही आणि लोकशाहीचे सुत्रधार अगदीच "कचखाऊ" (शब्दाचा मुळ अर्थ लक्षात घेता, भाडखाऊ) आहेत, या कवियित्रीच्या मताला माझा दुजोरा आहे.
इथे केवळ वृत्तात बसविण्यासाठी 'नीषेध' असे लिहिले आहे. अशा तर्हेने मुद्दाम र्हस्व-दीर्घ करण्याचे स्वातंत्र्य कवींना असते व त्यालाच (बहुदा) Literary license असे म्हणतात.
चूभूद्याघ्या!
खरंच कोणाला कसली चाड नाहीये.
मी काहीच करु शकत नाही या भावनेने कालपासुन नुसता धुमसतो आहे. स्वतःचीच चीड आणि लाज वाटते आहे. आपण केवळ असेच मरायला जन्माला आलो आहोत का? कोणीही यावे, काहीही करावे आणि मी त्याचा साधा प्रतिकारही करु शकत नाही? अतिरेक्यांनी भारताविरुध्द जिहाद पुकारला आहे आणि आपण मात्र बळी पडण्या शिवाय काहीही करु शकत नाही. असले भेकडा सारखे कुढत रडत जगण्या पेक्षा कालच्या स्फोटांमधे मी मेलो असतो तर बरं झाल असत असे आता वाटत आहे. कारण मला माहीत आहे या अतिरेक्यांवर उलटुन हल्ला करायची ताकद आपल्या पैकी कोणातच नाही. सापाला जर तुम्ही ठेचले नाही तर तो तुम्हाला डसल्या शिवाय रहाणार नाही. पण या हल्याचा कडक शब्दात निषेध करण्या पलिकडे मी काही करु शकत नाही. त्यांच्या छावण्यांवर हल्ले करायला माझा देश म्हणजे काय अमेरीका आहे का? उलट अफजल गुरु आणि कसाब यांना लाडाकोडाने पोसणारा सहिष्णु देशाचा मी नागरीक आहे.
दोस्तहो र्दुदैवाने या वेळेला माझा नंबर लागला नाही, पुढच्या वेळी माझा पण नंबर लागावा या साठी देवाकडे प्रार्थना करा.
ह्म्म्म...
अराजकता... अराजकता... अराजकता. :(
अगं तायडे जिथे रेल्वे प्रवास करत असताना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या बायकोची पर्स लांबवली जाते त्या राज्यात कायदा आणि सुरक्षतेची जरब किती उरली आहे हे सर्व जणांना समजलेच असेल.
संदर्भ :---- http://starmajha.starnews.in/maharashtra/nashik/7272-2011-07-11-10-29-23
असो... देशातील लोकांना आता अश्या स्फोटाची "सवय" झाली आहे,त्यात काही नवे उरले नाही. :( न्यूज चॅनलवाले एक्स्लुजीव न्यूज असे दाखवत त्याचे प्रसारण करत राहणार्,पेपर वाले दुसर्या दिवशी यावर अजुन काही नविन छापणार.)
तेव्हा तुमच्या आमच्या पैकी कोणी यात मेला नाही यासाठी स्वतःच स्वतःचे जिवंत असल्या बद्धल अभिनंदन करा आणि परत पोटाची खळगी भरण्यासाठी रोजच्या जीवघेण्या प्रवासाला सामोरे जा...
मुंबईकरांच्या नशिबी दुखः करायलाही वेळ राहिला नाहीये... पोटासाठी धावणे हेच त्यांना माहित.
बॉम्बस्फोटात हकनाक मृत पावलेल्या नागरिकांना भावपुर्ण श्रध्दांजली......
कठिण प्रसंगी पण योग्य वेळी आलेली कविता वाचून मनाचा क्षोभ झाला. पण प्रक्षोभ होत नाही. :(
+१
+२
बाबा रामदेव किंवा तत्सम कोणितरी ह्या अतिरेक्यांना लपले असतील तिथे किंवा वेळेला दुसर्या देशात जाउन कंठस्नान घालण्यासाठी सशस्त्र फौज का नाही तयार करत ? आम्ही पण होऊ की सामिल.
राग, संताप, शोक, चीड, असहायता, उद्विग्नता, घृणा, निराशा, मानसिक पंगुत्व, तगमग, अस्वस्थता, तुटलेपणा........
(दु:खी)रंगा
बाबाची फौज कशाला ?
सरकारी फौजा काय कमी आहेत का ? तिथेही पराक्रम गाजवता येईल की :)
सरकारी फौजा काय कमी आहेत का ? तिथेही पराक्रम गाजवता येईल कीसरकारी फौजांच्या ट्रिगरवरती राजकारण्यांचे बोट असते.
सरकारी फौजांच्या ट्रिगरवरती राजकारण्यांचे बोट असते.आणि बाबाजींच्या फौजांच्या ट्रिगरवर ? ;-)
ते लष्कर - ए - शिवबा सुरू झालं होतं त्याचं काय झालं पुढे?
>>ते लष्कर - ए - शिवबा सुरू झालं होतं त्याचं काय झालं पुढे?
कॉलिंग अजातशत्रू !!
काय बोलावे काही सुचत नाही.. चीड, वैताग, त्रागा याशिवाय आपण काहीच करू शकत नाही ही भावनाच फार असह्य होतेय..
राघव
खरंच कोणाला कसली चाड नाहीये.
कविता वाचून मनाचा क्षोभ झाला.
प्राजु ताई अतिशय समर्पक प्रासंगिक काव्य
'द वेन्स डे' चित्रपटाची मात्र आठवण झाली.
चेतन
अवांतरः काय? आज तुम्ही कसाबची फाशी माफ करायची मागणी केली नाही? काँग्रेस सरकारला सहानभूती दाखवली नाही? हिंदु दहशतवादी म्हणुन डिवचले नाहीत? अरेरे विचारजंत कसे होणार तुम्ही !!!!!
अतिअवांतरः प्रसंग काय आणि सही काय... अरेरे
द वेन्स डे' चित्रपटाची मात्र आठवण झाली.
अगदी अगदी :---
http://www.youtube.com/watch?v=i-f3sMwRfOA
कदाचीत अतिरेक्यांनी ही म्हणून बुधवारच निवडावा. निव्वळ योगा योग?
अमोल केळकर
अतिअवांतरला सुद्धा +१
जबरा..!
काय लिहिणार?
संताप, चीड, दु:ख,असहाय्यता...
स्वाती
प्राजुताईनी भावना अगदी योग्य शब्दात मांडल्या आहेत...
- वाट्या
निशब्द
दहशतवाद्यांचे हल्ले, निरपराध माणसांचे जाणारे जीव पाहून आदर्श अशा लोकशाही कडून काहीच होत नाही. सामान्य़ माणूस म्हणून आपल्याला काहीच करता येत नाही, हतबलता, अगतिकता, प्रासंगिक कवि्तेतून जबरा उतरली आहे.
-दिलीप बिरुटे
शब्दच नाहीयेत :(
संताप होतो, चीड वाटतेच. नैसर्गिक आहे.
(पण भारतातली लोकशाही मुळातच चुकलेली आहे, हा मुद्दा भरकटलेला आहे. संताप व्यक्त करताना थोडेसे भरकटणे होतेच. पण इतके नको. स्वातंत्र्योत्तर भारतीय सर्वच बेकार उपजले, हा विचार क्षणिक संतापातून उद्भवला असेल, अशी आशा करतो. अनेक उत्तम तन-मन झोकून काम करणारे तुमच्या ओळखीचे भारतीय तुम्हाला आठवतील, आणी त्यांना षंढत्वाच्या आरोपातून तुम्ही मोकळे कराल, अशी आशा करतो.
मराठेशाहीत कितीतरी लढाया झाल्या - काही मराठ्यांनी जिंकल्या, काही हरल्या. "मराठेशाहीला धोका नाही" असा एकही "पूर्ण यशाचा" क्षण नव्हता. एखादा किल्ला हातचा गेल्यावर प्रत्येक वेळी काय होत असेल? मावळ्यांपैकी एखादी प्राजु "षंढ सारे मावळे" अशी निर्भर्त्सना करत असेल काय? खचितच करत असेल. मराठे मुत्सद्दी कारवाया करत असतील त्याची सर्व गुप्त बित्तंबातमी त्या काळातल्या मावळातल्या प्राजुला देत असतील काय? नसतील असे वाटते. तेवढी गुप्तता बाळगण्याचे शहाणपण त्यांच्यापाशी असेल. त्या काळातल्या मावळातल्या प्राजुने सुद्धा शोकसंताप आटोक्यात आल्यावर तारतम्याने बघितले असेल - मधून-मधून एखादी लढाई हरलेल्या मराठ्यांना आणि त्या काळच्या मराठी मुत्सद्द्यांना पुरते षंढ न मानता कमीअधिक कार्यक्षम मानले असेल.)
माझ्या मनातले विचार अगदी अचूकपणे मांडले.
परिस्थिती पूर्णपणे आदर्श नाही, याचा अर्थ अराजक आहे, सर्वच नाकर्ते आहेत असा होऊ नये. पण क्षण असे येतात की त्या क्षणी दुसरं काही सुचत नाही हेही तितकंच खरं. त्या भावनेची प्रातिनिधिक म्हणून कविता चांगली आहे.
माझ्या मनातले विचार अगदी अचूकपणे मांडले.हेच म्हणतो.
असेच म्हणतो.
बहुदा शोकसंताप अजून आटोक्यात यायचा असेल अशी शक्यता आहे ना?
(माझा १६ वर्षाचा भाचा दादरला शिक्षणासाठी राहत आहे. माझा तरी संताप अजून आटोक्यात यायचा आहे.
इथे ज्यांचा संताप आटोक्यात आला आहे त्यांनी सरसकट भारतियांना षंढ म्हणण्यावरून आक्षेप घ्यावा, आणि तारतम्याचे, किंवा शांततेचे आवाहन करावे हे ठीक आहे, पण वरील कंसातील प्रतिसादामागे आपल्याला आतल्या गोटातील काही आश्वासक बातमी असल्यासारखे वाटते आहे. पण ज्यांना अशी बातमी नाही, त्यांनी इतरांच्या आश्वासनांवर अवलंबून राहायचे म्हटल्यावर थोडीफार चिडचीड होणारच. खरे पाहिले तर आता तर मंत्री आश्वासनेही देत नाहीत म्हणूनच हा असा लेख येतो ना?
असो. विषय वाढवण्याचा हेतू नाही. )
>>कंसातील प्रतिसादामागे आपल्याला आतल्या गोटातील काही आश्वासक बातमी असल्यासारखे वाटते आहे. पण ज्यांना अशी बातमी नाही, त्यांनी इतरांच्या आश्वासनांवर अवलंबून राहायचे म्हटल्यावर थोडीफार चिडचीड होणारच.
ती आश्वासक बातमी धनंजय यांनी याच संस्थळावर "एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ" या २६ नोव्हेम्बर हल्ल्यानंतर त्यांनीच लिहिलेल्या लेखातील एका प्रतिसादात दिलेली आहे. (आणि मी ती पुन्हा उद्धृतही केली होती) परंतु ती माहिती आपल्या सर्वांना संताप व्यक्त करताना सोयीची नसल्याने बहुधा तिचा विसर पडत असावा.
काश्मीरात भारतीय सैन्याने ताबारेषेच्या पलीकडे जाऊन अतिरेक्यांचा पाठलाग करावा (म्हणजे आता करत नाहीत), असे आपले काही मित्र आपल्याला सांगतात. भारतीय लष्कर डावपेचास योग्य असा पाठलाग हल्लीच असे करत नाही हे तुम्हाला कोणी सांगितले? मी पलिकडे कारवाई केलेल्या कप्तानाशी बोललेलो आहे. पण हे धोरण भारताने जगजाहीर करावे, असे तुम्हाला वाटते का? "आपण असे करत नाही" असे जगाला सांगून (म्हणजे स्वतःच्या लोकांनाही) मग त्या कारवाया करण्यात मुत्सद्देगिरी आहे. (मी त्या कप्तानाशी अशी भेट झाली आहे, असे सांगणे म्हणजे गौप्यस्फोट नाही. भारत लष्करी तंत्रास योग्य अशा कारवाया करत आहे, हे सर्वच विचारी लोकांना ठाऊक आहे. अफगाणिस्तानातून भारत पाकिस्तानाला शह देत आहे, [हे ठीकच करत आहे], हे जगाभरातल्या वर्तमानपत्रांना माहीत आहे, पण "नेभळट-भारत-संताप"वादी लोकांना ठाऊक नाही.)
परंतु ती माहिती आपल्या सर्वांना संताप व्यक्त करताना सोयीची नसल्याने बहुधा तिचा विसर पडत असावा.
बहुदा विसर सोयीस्कर असावा, असे म्हणायचे असावे. मला याबद्दल अधिक वाद घालायची इच्छा नाही, एवढेच म्हणून सोडून देते.
बाकी २००८ सालच्या धनंजय यांच्या प्रतिसादाचा एक दुवा आपण आज २०११ मध्ये उर्धृत केला तर तिचा परत दुवा द्यावा. आपण लिहीलेला प्रत्येक प्रतिसाद प्रत्येकाकडून वाचलाच जातो असे नसते. तेव्हा दुसर्याला सरसकट ठरवून विसर पडतो असे सुचवण्यापेक्षा परत दुवा दिलेला चांगला ठरेल.
बाकी गरज असल्यास खरडीतून बोलूया.
यास उपप्रतिसाद श्री. विकास यांच्या लेखाखाली दिलेला आहे.
<<<< मराठेशाहीत कितीतरी लढाया झाल्या - काही मराठ्यांनी जिंकल्या, काही हरल्या. "मराठेशाहीला धोका नाही" असा एकही "पूर्ण यशाचा" क्षण नव्हता. एखादा किल्ला हातचा गेल्यावर प्रत्येक वेळी काय होत असेल? मावळ्यांपैकी एखादी प्राजु "षंढ सारे मावळे" अशी निर्भर्त्सना करत असेल काय? >>>
ते मावळे आणि त्यांचे शूर सरदार प्राणपणाने लढत होते.
तळहातावर शीर घेऊन प्रयत्नांची पराकाष्टा करत होते.
तुम्ही - आम्ही काय करतो???
आमचे सरकार काय करते????
निव्वळ सत्ता मिळविण्यासाठी "व्होटबँकांचे" समिकरण जुळवत राहणे, यापलिकडेही सत्ताधार्यांना काही जबाबदार्या आहेत की नाही ?????
एखाद्या तरी फुटपट्टीने मोजायचे म्हटले तरी आमच्यातला शूरपणा/ बाणेदारपणा/देशप्रेमीपणा/समाजप्रेमीपणा उमटून पडतो काय???????
राजकारणीमंडळींना खमठोकपणे जाब विचारू शकणारे पौरुषत्व आमच्यात आहे काय?????????
याचे प्रामाणिक उत्तर जर नाही असे असेल तर मग
आम्ही गुलाम, लाचार, स्वार्थी, मतलबी आहोत की षंढ एवढाच प्रश्न शिल्लक उरतो.
...............................................................................
याचे प्रामाणीक उत्तर तुम्ही स्वतः ठरवून घ्यायचे आहे.
तुमच्या स्वतःच्या मते लोकशाही पूर्णपणे बाद झालेली आहे. हे तुमचे प्रामाणिक मत आहे. मग तुम्ही स्वतःला "गुलाम, लाचार, स्वार्थी, मतलबी आहोत की षंढ" यांच्यापैकी काहीही म्हणून घ्या.
माझे प्रामाणिक उत्तर, की असे नाही. मनुष्य हे काहीसे भित्रे-काहीसे शूर, काहीसे अगतिक-काहीसे समर्थ, काहीसे स्वार्थी-काहीसे परोपकारी, आणि मर्यादित निर्मितिक्षमतेचे असतात. सरसकट मनुष्य पुरते षंढही नाहीत, की वीर्याच्या महापूराने आसमंत भरणारेही नाहीत. पूर्ण षंढ विरुद्ध अमर्याद पौरुष असे दोनच पर्याय आहेत, आणि एक नसेल तर दुसरा आहेच, असे मानणे मला वास्तव वाटत नाही.
तुम्हाला स्वतःला पुरते षंढ म्हणवून घ्यायचा हट्ट असला, तर असू दे. स्वतःला पूर्णपणे परतंत्र मानण्याचे स्वातंत्र्य आहेच की तुम्हाला. तरी बाकीच्या मनुष्यांच्या धडपडणार्या, निराशेबरोबर थोडी आशाही असलेल्या आयुष्यात विष कालवू नका म्हणजे झाले. किंवा विष कालवायचा प्रयत्न केला तर आम्ही "नाही पटत" म्हणू, ते समजून घ्या.
<<<< माझे प्रामाणिक उत्तर, की असे नाही. मनुष्य हे काहीसे भित्रे-काहीसे शूर, काहीसे अगतिक-काहीसे समर्थ, काहीसे स्वार्थी-काहीसे परोपकारी, आणि मर्यादित निर्मितिक्षमतेचे असतात. सरसकट मनुष्य पुरते षंढही नाहीत, की वीर्याच्या महापूराने आसमंत भरणारेही नाहीत. पूर्ण षंढ विरुद्ध अमर्याद पौरुष असे दोनच पर्याय आहेत, आणि एक नसेल तर दुसरा आहेच, असे मानणे मला वास्तव वाटत नाही. >>>
आमचे युवराजपण तसेच म्हणतात. त्यांचे प्रामाणिक मत असे की, मनुष्य हे काहीसे भित्रे-काहीसे शूर, काहीसे अतिरेकी-काहीसे विध्वंसक, काहीसे आत्मघाती-काहीसे खुनी, आणि काहीसे अमर्यादित-काहीसे मर्यादित विध्वसंकक्षमतेचे असतात. त्यामुळे असे बॉम्बस्फोट वगैरे होने निसर्गनियमाला धरूनच आहेत. ९९ टक्के वाचलेत ना, मग १ टक्का मेल्याने असे काय आभाळ कोसळले? सव्वासो कोटीमे सौ-दोसोका आंकडा क्या मायने रखता है ?????
आमचे युवराज पुढे असेही म्हणतात. की टीव्ही कॅमेर्यासमोर धडपडणार्या आमच्या प्रवक्त्यांकडे बघा, किती आवेशाने आमच्या सरकारची बाजू मांडतात.
********
आशावाद वगैरे बाळगणे, बोलायला ठीक आहे. पण त्यासाठी कृतीची गरज असते.
क्रुतीशून्य नेत्यांच्या आशावाद बाळगण्याच्या गोष्टी केवळ पोकळ वल्गना ठरतात, हे तुम्ही समजून घ्यावे.
तुमचे युवराजांशी भांडण असेल तर ते युवराजांशी चालू ठेवा.
उद्धरण तुम्ही माझ्या प्रतिसादातले केलेले आहे, युवराजांच्या प्रतिसादातले नव्हे : "पोकळ वल्गना" म्हणून मला व्यक्तिगत हिणवत असाल, तर तो तुमचा "षंढपणा" म्हणायचा की "पौरुष"?
भावना शब्दबद्ध