षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर
वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला
वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे
ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
- प्राजु
प्रतिक्रिया
6 Aug 2011 - 5:36 am | अभिजीत राजवाडे
उस्फुर्त कविता आहे.
आर्त...