बालगंधर्व...

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
10 May 2011 - 8:36 am

मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आलेत असं म्हणतात.. त्याचीच पुन:प्रचिती देणारा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे नितीन देसाई निर्मित आणि रविंद्र जाधव दिग्दर्शित बहुचर्चित "बालगंधर्व".

मुळात बालगंधर्व या विषयाला हात घालण्याचं साहस करणं म्हणजे तसं कठिण. त्यात इतक्या वर्षांनंतर बालगंधर्वांना नव्या पिढीसमोर सादर करणं त्याहून कर्मकठिण. हे धनुष्य पेलायला एखाद्या ताकदवान निर्मात्याची गरज होती. आणि मराठीत सध्या नितीन देसाईंशिवाय दुसरा कोणी हे करायला धजावला देखील नसता.

नितीन देसाई नावाला शोभतील असे मोठाले सेट्स, कौशल इनामदारांचं संगीत, त्याला आनंद गंधर्व, शंकर महादेवन अशा तगड्या गायकांनी चढवलेला स्वरसाज, सर्व कलाकारांचा कसलेला अभिनय, भरगच्च दागिने, उत्तमोत्तम शालू आणि या सर्वांहून सुंदर असे बालगंधर्व साकारलेला सुबोध भावे, कुणाकुणाचं आणि किती कौतुक करावं? स्त्री वेशातला सुबोध भावे इतका देखणा दिसतो की स्वत:ला फ़ार सुंदर म्हणवणा-या स्त्रिया चक्कर येऊन पडाव्या.

कौतुक करायला शब्दसुद्धा कमी पडावे इतकी सुंदर अनुभुती देणारा हा चित्रपट अजिबात चुकवू नये...

संगीतनाट्यविचार

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

10 May 2011 - 10:56 am | ५० फक्त

धन्यवाद परिक्षणाबद्दल, या रविवारी जायचा विचार आहे. कोणि आहे का पुण्यातलं येणारं ?

kamalakant samant's picture

10 May 2011 - 11:27 am | kamalakant samant

चित्रपट फारसा पस॑द पडला नाही.
बालग॑धर्वा॑च्या नाट्यस॑गीताला कुठेही न्याय मिळाला नाही असे वाटते.
कथानक विस्कळीत वाटते.
कुठल्याही गाण्याचा पूर्ण आन॑द मिळत नाही.
सहजच 'र॑गल्या रात्री अशा' या चित्रपटाची आठवण झाली.
तो जास्त उजवा वाटतो.
तरीही सुबोध भावे आणि निर्मात्याचे केलेल्या धाडसाबद्दल कौतुकच.

प्रदीप's picture

10 May 2011 - 12:23 pm | प्रदीप

चित्रपट पाहिलेला नाही, तेव्हा त्यासंबंधी काही लिहीत नाही. पण ह्या चित्रपट- ओळखीविषयी मात्र काही नोंदी आहेत:

१. "मोठाले सेट्स, .............. भरगच्च दागिने, उत्तमोत्तम शालू" हे वाचून अगदी ६०-७० सालातील मराठी वर्तमनापत्रांतून नाटकांची 'परिक्षणे' यायची त्याची आठवण झाली. चित्रपट ह्या माध्यमाविषयीची आपली समज आता त्यामानाने थोडीफार तरी प्रगत झाली आहे असे वाटले होते.

२. "मुळात बालगंधर्व या विषयाला हात घालण्याचं साहस करणं म्हणजे तसं कठिण." एखाद्या व्यक्तिच्या आयुष्याचा सखोल व परिपूर्ण आढावा घेणारी कुठलीली कलाकृति दिग्दर्शकास आव्हानच ठरावे. पण त्याहून बालगंधर्वांच्या विषयी नेमके काय असे होते की त्यात हात घालणे म्हणजे काही (प्रचंड) साहस ठरावे?

नारयन लेले's picture

10 May 2011 - 1:25 pm | नारयन लेले

स्त्री वेशातला सुबोध भावे इतका देखणा दिसतोच शिवाय त्याने पुर्ण मन/जिव ओतुन काम केल्याची पुर्ण जाणिव झाली.त्याला पहुन नक्किच महिलाच काय तर पुरुश देखील आन॑दित झाले आसतिल. एकदातरि हा सिनेमा बघावाच.

सिनेमा तयार करताना ज्या॑चा ज्या॑चा हातभार लागला त्या सर्वा॑चेच आभिन॑दन.

विनित

सर्वसाक्षी's picture

10 May 2011 - 10:04 pm | सर्वसाक्षी

अत्यंत कौतुकास्पद प्रयोग असे म्हटले तर वावगे ठरु नये.

ओघवते व अकृत्रिम कथानक, कुठेही बटबटीतपणा नाही, नको तिथे लांबण नाही, उगाच दु:खाचे वा दारिद्र्याचे प्रसंग नाहीत मात्र त्यांची जाणीव करुन देणारे प्रसंग हाताळण्याचे कसब, भव्यता आणि मराठी चित्रपटांमध्ये या आधी न दिसलेले तंत्रकौशल्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

विशेषतः ध्वनिमुद्रण - नाट्यसंगीतामधली सारंगी काही नाट्यगीतांमध्ये अलगद वेगळी तरंगुन जाते. पखवाजही सुरेख प्रकटला आहे. प्रकाशयोजना अत्यंत समर्पक.

कपडे व सेट यात कुठेही हात आखडता घेतलेला नाही मात्र उगाच भगभगाट नाही.

पात्रयोजना आणि त्यांची कामे चोख. सुबोध भावे याने भूमिकेसाठी घेतलेली मेहेनत दिसुन येते.

शेवटही अत्यंत संयमाने हाताळला आहे.

राहुल देशपांडे पाहुण्या भूमिकेत बाजी मारुन नेतात! डॉ. वसंतराव देशपांडे यांची आठवण काही जागांमध्ये येतेच येते.

एकुण आवर्जुन पाहावा असा चित्रपट.

पक्या's picture

11 May 2011 - 12:31 am | पक्या

http://misalpav.com/node/17954 - इथे आधीच या चित्रपटाविषयी धागा असताना अजून वेगळा धागा काढायची काय गरज होती? जे काही वर लिहीले आहे ते तिथेच प्रतिसादात लिहीले असते तरी चालले असते. अगदी शीर्षक पण आपण तेच दिले आहे टिंबांसहीत.
त्या धाग्यात तात्यांनी चित्रपटाची छान ओळख करुन दिली आहे.

विसोबा खेचर's picture

11 May 2011 - 9:42 am | विसोबा खेचर

असू दे रे पक्या.. त्यालाही लिहावंसं वाटलं म्हणून त्याने लिहिलंन.. कदाचित त्याने माझा धागा पाहिला नसेल..

प्रथम, छान लिहिलंय रे..

तात्या.

तिमा's picture

11 May 2011 - 8:46 pm | तिमा

चित्रपटाविषयी तात्यांच्या धाग्यावर आधीच प्रतिक्रिया दिली आहे म्हणून इथे एक लहानपणापासून छळणारा प्रश्न विचारतो.
बालगंधर्वांच्या जुन्या रेकॉर्डस मधे तबला नीट ऐकू येत नाही. तर हल्लीचे नवीन टेक्निक वापरुन कोणी त्या गाण्यांना सुरेख साथीच्या तबल्याची जोड देऊ शकेल तर फार बहार येईल. असे करणे शक्य आहे का ?