तूही मीही
एकाच देशाचे नागरिक
असे म्हणतोस..
परंतु, मित्रा!
तुझा देश वेगळा,
माझा देश वेगळा..
तुझा देश
मातीचा..
माझा देश
माणसांचा..
तुझ्या देशाची सीमा
काट्यांच्या कुंपणांची..
माझ्या देशाची सीमा
फुलांच्या पाकळ्यांची..
तुझ्या राष्ट्रगीतांत
नुसतेच शब्द..
माझ्या राष्ट्रगीतांत
जिवंत संगीत..
तुझा देश
रक्तरंजित चरित्र,
माझा देश
सुंदरशी कविता..
तुझ्या देशांत
शिरगणती..
माझ्या देशांत
विचारगणती..
तुझा देश
कायद्याचे राज्य..
माझा देश
प्रीतिचे स्वराज्य..
तुझा देश
वर्णतंट्यांचा
माझा देश
इंद्रधनुष्याचा..
तूही मीही
एकाच देशाचे नागरिक
असे ह्मणतोस..
म्हणतही असतील, म्हणू देत..
परंतु, मित्रा!
तुझा देश वेगळा,
माझा देश वेगळा..
-हैयो हैयैयो
(’यॆन् नाडु वेर्रु’ ह्या गाजलेल्या तमिळ कवितेचा अनुवाद.
कवि श्री. अब्दुल् रहुमान्, ’सॊन्द सिर्रैहळ्’ - तमिळभाषेतील कवितासंग्रह)
प्रतिक्रिया
26 Apr 2011 - 1:25 pm | ऋषिकेश
काय बोलणार! अप्रतिम!
__/\__ करतो मुळ कवीला आणि तुम्हालाही!
सांगताना आवडत नाहिये पण एक सुचना कराविशी वाटते: एखाद्या कवीच्या व्यावसायिक रित्या प्रकाशित लेखनाचा (इथे कविता) अनुवाद करून सार्वजनिक रित्या प्रकाशित करताना जर मुळ केखक/कवीची परवानगी नसल्यास तो प्रताधिकार कायद्याचा भंग ठरेल असा अंदाज आहे (अनुवाद उडावा असे वाटत नाही तरिही ) प्रशासनाने अश्या अनुवादांसाठी एकदा खातरजमा करून घ्यावी
26 Apr 2011 - 2:52 pm | नगरीनिरंजन
भावानुवाद आवडला!
26 Apr 2011 - 4:13 pm | गणेशा
स्वैर अनुवाद आवडला ...
’यॆन् नाडु वेर्रु’ मस्त वाटते आहे हे म्हणतानाही .. शब्दाचा अर्थ काय आहे या ..
30 Apr 2011 - 6:44 pm | वाहीदा
तमिळ साहित्यातील बरेचसे इंग्रजीतील अनुवाद वाचले होते पण मराठीतील अनुवाद वाचण्याची मजा काही वेगळीच :-)
'अब्दुल् रहुमान्' हे तामिळ साहित्यातील नावाजलेली व्यक्ती आहे असे आम्ही काही तामिळ भाषिक मित्रांकडून ऐकून आहोत त्यांच्या कवितांचा मराठीतील हा अनुवाद बहुतेक पहिलाच असावा अन तो तुम्ही सुंदर केला आहे .
बेशुबाह (without a doubt) बेहतरीन नज्म लेकीन समझना ही मुश्कील -- क्यूं की जुबान तमील ... अब कहीं जा कर समझमें आयी :-)