झन झन झन झन पायल..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
31 Mar 2011 - 9:51 pm

झन झन झन झन पायल.. (येथे ऐका)

पं मल्लिकार्जून मन्सूर..!

काय बोलू मी त्यांच्याबद्दल..? सिंहगडावरच्या देवटाक्याच्या पाण्याइतकाच स्वच्छ, शुद्ध, निर्भेळ आणि सात्विक माणूस. गवई म्हणून जितका मोठा, त्याहूनही अधिक एक सहृदयी माणूस..!

सोबत मन्सूरअण्णांच्या नटबिहागाचा दुवा दिला आहे. दूरदर्शनवरील कुठल्याश्या कार्यक्रमातील हे ध्वनिमुद्रण आहे. मन्सूरअण्णांना नटबिहागाची फर्माईश केली गेली आहे आणि अक्षरश: पुढच्याच क्षणी मन्सूरअण्णांनी 'झन झन झन झन पायल..' ही बंदिश सुरू केली आहे. गाण्यातली सिद्धीच म्हटली पाहिजे ही..! अगदी पहिल्या स्वरापासून, पहिल्या समेपासूनच गाण्यात रंग जमवण्याची विलक्षण हातोटी या कलाकाराला लाभली होती.

गाण्याच्या सुरवातीलाच,

झन झन झन झन पायल मोरी बाजे
जागे मोरी सास ननदिया
और दोरनिया जठनिया..

(दोरनिया, जठनिया हे शब्द कानाला खूप गोड लागतात. 'ननदिया' म्हण्जे नणंद आणि 'जठनिया' म्हणजे 'जाऊबाई' हे मला माहित्ये परंतु 'दोरनिया' म्हणजे काय, हे कृपया येथील धनंजयसारख्या भाषातज्ञांनी समजावून दिल्यास मला आवडेल.)

असं म्हणताना मन्सूरअण्णा 'जठनिया' शब्दावर जी काही तानकृती करून समेवर येतात ते श्रोत्यांना अक्षरश: अचंब्यात पाडतं. त्यानंतर मध्यलयीच्या त्रितालात जमवलेल्या लहानश्या आलापातून, ताना-हरकतीतून प्रत्येक वेळेला 'झन झन झन झन..' चा मुखडा पकडून समेवर आलेले मन्सूरअण्णा..! अभिजात संगीतातील क्लिष्टपणा वगळून ते रंगतदार करणं ते हेच..!

सुरवातीची काही वर्ष ग्वाल्हेर गायकीची उत्तम तालीम लाभलेल्या मन्सूरअल्यांनी त्यानंतर भुर्जिखासाहेबांकडून जयपूर गायकीची रीतसर तालीम घेतली आणि त्यावर हुकुमत मिळवली. गोड, सुरीला गळा, दमसास, गाण्यातील लयदारपणा, बुद्धीवाद, तानेतील पेचदारपणा, नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार असलेली-गळ्यात कुठेही अटकाव नसलेली पेचदार, लचिली परंतु अत्यंत सुरीली, दाणेदार अशी तान, सहजसुंदर असा तार षड्ज ही मन्सूरअण्णांच्या गायकीतील मर्मस्थळं, शक्तिस्थळं..!

आणि या सार्‍याच्या उपर त्यांच्या गाण्यातील सहजता.. अगदी सहज एखाद्याशी गप्पा माराव्यात, काही संवाद साधावा अशी गायकी. असं वाटतं की मन्सूरअण्णा गात नाहीयेत तर आपल्याशी मस्त बोलताहेत, तो राग सहज सोपा करून समजावून सांगताहेत, त्यातली सौंदर्यस्थळं अगदी जाता जाता उलगडून दाखवताहेत..!

मन्सूरअण्णांच्या गायकीचे वरील वर्णन आणि त्यांचे गाणे एखाद्याला खूप साधे आणि सोपे वाटेल, परंतु त्यामागे असलेली त्यांची विद्या ही अतिशय अवघड आहे, दुर्लभ आहे हेही लक्षात घेतले पाहिजे..!

वयाची ऐशी ओलांडल्यानंतर कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेला हा शुद्ध सात्विक देवाघरचा वैष्णव एके दिवशी खरंच देवाघरी निघून गेला आणि हिंदुस्थानी रागसंगीताचा हा उत्साहाचा झरा कायमचा आटला..!

असो..

अशी माणसं एखाददाच होतात, पुन्हा पुन्हा होत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यकर.

संगीतआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रास's picture

31 Mar 2011 - 10:07 pm | प्रास

दोरनिया = देवरानी असावे.

दोरनिया जठनिया म्हणजे मोठ्या दिराची बायको, मोठी जाऊ.....

मल्लिकार्जुन मन्सूर, अत्यंत आवडीचे गायक.

अप्रतिम गायकी....

राजशेखरांनी फारच छान साथ दिली आहे इथे....

आभारी आहे तात्या या श्रवणीय नट-बिहागाबद्दल....

अवांतर -

शुद्ध सात्विक देवाघरचा वैष्णव

तसा पंथांचा गायकीशी काही संबंध नाही पण मल्लिकार्जुन अण्णा पक्के लिंगायत शैव..... पण शेवटी हरीहर ऐक्यामुळे काय फरक पडतो म्हणा.... आमच्यासाठीही ते वैष्णवच.... :-)

विसोबा खेचर's picture

31 Mar 2011 - 10:10 pm | विसोबा खेचर

... पण शेवटी हरीहर ऐक्यामुळे काय फरक पडतो म्हणा.... आमच्यासाठीही ते वैष्णवच....

हे मस्त.. :)

तात्या.

राही's picture

31 Mar 2011 - 11:33 pm | राही

दोरनिया म्हणजे देवरानी अर्थात देवराची म्हणजे धाकट्या दिराची बायको. जठनिया म्हणजे जेठानी अर्थात थोरल्या (ज्येष्ठ ) दिराची बायको. मराठीमधे नवर्‍याच्या भावासाठी दीर हा एकच शब्द आहे आणि त्याच्या म्हणजे दिराच्या बायकोसाठी जाऊ हा एकच शब्द आहे. पण हिंदी/गुजरातीत मात्र नवर्‍यापेक्षा मोठ्या भावांना जेठ तर धाकट्यांना देवर म्हणतात. त्यांच्या बायकांनाही जेठानी-देवरानी असे दोन वेगळे शब्द आहेत.

प्रास's picture

31 Mar 2011 - 11:37 pm | प्रास

अच्छा, असं आहे होय.....

आमचं आपलं मराठीपण सुटेना ना इथेही....

माहितीबद्दल (माझ्याकडूनही) धन्यवाद!

छ्छुंदरसिंग's picture

1 Apr 2011 - 12:50 am | छ्छुंदरसिंग

मित्रा!
उत्तम!
खरे म्हणजे "झन झन झन पायल" ही चीज खरी लोकप्रिय केली ती उस्ताद फैयाझ अली खान साहेब यांनी!
पण्,मल्लिकार्जुन मन्सूर यांनी त्यात खरा जीव ओतला!
लता मंगेशकरांनी देखिल ती फार सुरेख गायली आहे(चित्रपट्-बुझदिल्,सं.-सचिन देव बर्मन)
तसेच्,सचिनदा ह्यांनी देखील ही चीज बंगाली मध्ये फार उत्तम गायली आहे.(बघा-यु टुयूब)
अलिकडे,उल्हास कशाळकरांनी देखिल गायलेली आहे.(मल्लिकार्जुन ह्यांचा प्रभाव ठायीठायी दिसतो)
पण्,मल्लिकर्जुन ते मल्लिकर्जुन!
-छछु!

तर्री's picture

1 Apr 2011 - 9:20 am | तर्री

पु. ल. नी अण्णांच्या तोडीचे वर्णन केले आहे च. तात्यानी नटबिहागचे !
लेक आवडला / दुव्याबद्द्ल आभार.

तिमा's picture

3 Apr 2011 - 11:58 am | तिमा

वा तात्या वा. छान लिंक दिलीये.मल्लिकार्जुन हे तपस्वी होते. त्यांची आठवण काढल्याबद्दल आभार.
या देशातल्या खर्‍या गुणी लोकांची अजुन कदर होते या जाणिवेने बरे वातले.