१.
(मी) इतका आळशी (आहे) की कधी महत्वाकांक्षा स्पर्शच करत नाही.
जग आपली काळजी वाहायला समर्थ आहे, मी ती घेत नाही.
दहा दिवस पुरतील इतके तांदूळ पोत्यात आहेत,
चुलीजवळ ढीगभर गवर्या पडलेल्या आहेत,
अध्यात्म आणि मुक्तीच्या व्यर्थ झोलगप्पा का मारायच्या?
भर रात्री छपरावर कोसळणाऱ्या पावसाचा नाद ऐकत
मी मस्त तंगड्या ताणून आरामात पहुडलो आहे.
२.
तारुण्याच्या उंबरठ्यावरच मी शिक्षणाला रामराम ठोकला,
आणि संत होण्याचा ध्यास घेतला.
कठोर वैराग्य पाळत माधुकरी मागत बैराग्यासारखा,
कित्येक वसंत ऋतू उलटले तरी नुसताच इकडे तिकडे भटकलो.
शेवटी घरी परतलो एका अनामिक ओबडधोबड पर्वताखाली स्थिरावण्यासाठी.
आता शांतपणे एका पर्णकुटीत राहतो,
पक्ष्यांच्या चिवचिवाटाचे संगीत ऐकत.
काळे मेघ आहेत माझे सख्खे शेजारी.
खाली एक स्फटिकासारखा झरा वाहतो, जो माझ्या मनाला आणि कायेला ताजेतवाने करतो.
माथ्यावर ताडमाड वाढलेले पाईन आणि ओक आहेत, जे घनदाट छाया आणि आसरा देतात.
दिवसेंदिवस होते वाटचाल मुक्तीकडे, परम मुक्तीकडे....
इथून मुक्काम हलवावा असे मुळीच वाटत नाही.
मूळ काव्य: तायागू र्योकान (१७५८ - १८३१)
भावानुवाद: मूकवाचक (१९७० -???? )
(पुन:प्रकाशित)
प्रतिक्रिया
29 Mar 2011 - 12:20 pm | नगरीनिरंजन
विचारप्रवर्तक!
पहिलं मुक्तक वाचून महत्वाकांक्षा नसल्याबद्दलची बोचणी कमी झाली. :-)
29 Mar 2011 - 12:29 pm | कवितानागेश
आवडले.
29 Mar 2011 - 3:49 pm | मुस्तफा
बढिया !
29 Mar 2011 - 8:17 pm | पैसा
खूप आवडलं. झेन कविता-कथा अगदी थोड्या शब्दात इतका आशय व्यक्त करतात ना!
हा भावानुवाद छान झालाय.
29 Mar 2011 - 10:17 pm | धनंजय
भाषांतर करायला कठिण काव्य आहे.
आशय आवडला.
29 Mar 2011 - 10:43 pm | क्रान्ति
अनुवाद! खूपच आशयघन काव्य आहे हे.
30 Mar 2011 - 10:39 am | बबलु
छान आहे.
भाषांतर ओघवतं केलं आहे.
30 Mar 2011 - 1:08 pm | प्रीत-मोहर
आवड्या :)
1 Apr 2011 - 12:23 pm | प्रकाश घाटपांडे
यक लंबर लई आवाडल. आमच्यावानीच दिस्तोय.
4 Apr 2011 - 11:02 am | विजुभाऊ
दिवसेंदिवस होते वाटचाल मुक्तीकडे, परम मुक्तीकडे....
इथून मुक्काम हलवावा असे मुळीच वाटत नाही.
क्या बात है.
तेरी आखोसें से आजादी चाहता हुं
ख्वाबोंमे तेरे जीना चाहता हुं
5 Apr 2011 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेचा आशय आवडला.......!
अजुन येऊ दे....!
-दिलीप बिरुटे
5 Apr 2011 - 6:13 pm | लिखाळ
छान.. आवडले