आत्ममग्न

चित्रा's picture
चित्रा in जे न देखे रवी...
16 Mar 2011 - 8:04 am

प्रियकरामागून जातेस
नीऑन रंगांच्या दरवाज्यातून
बेदरकारपणे -
होतेस स्वार - गार वार्‍यावर,
मागे उडणारी रंगीत वस्त्रे
सावरण्याची शुद्ध नाही तुला
कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?
*
एकटीच असतेस
पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर
निर्विकारपणे -
शहारतेस - गार वार्‍याने,
पारदर्शक वस्त्रांतून काटकुळे अंग
दिसू नये याची शुद्ध नाही तुला
कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?
*

शांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Mar 2011 - 11:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?

व्वाह.......

टारझन's picture

16 Mar 2011 - 12:04 pm | टारझन

हायफंडु आहे बॉ :)

- बाउन्सर

ज्ञानराम's picture

16 Mar 2011 - 12:14 pm | ज्ञानराम

सही ....

सहज's picture

16 Mar 2011 - 12:20 pm | सहज

ही कविता तर जाहीरातीचे बोर्ड (billboard)* पाहून त्यावर रचली असेल तर भन्नाट!!

सलाम!!

अभिव्यक्तीच्या नव्या व्याख्या, नव्या सीमा इ इ कृपया थोडे समजवून सांगावे.

*(मुसु गुर्जींचा शिष्य) सहज

मुलूखावेगळी's picture

16 Mar 2011 - 12:36 pm | मुलूखावेगळी

छान
पन कोनावर लिहिली आहे?

५० फक्त's picture

16 Mar 2011 - 12:45 pm | ५० फक्त

माफ करा, पहिलं कडवं समजलं पन

एकटीच असतेस
पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर

याचा संदर्भ लागला नाही, वेश्यावस्तीचा संद्रर्भ आहे का, या पांढ-या गजाच्या खिडकीला ?

गणेशा's picture

16 Mar 2011 - 3:39 pm | गणेशा

अरे बापरे वेश्यावस्ती चा संधर्भ ? पांढर्‍या खिडक्या आनि याचा संभंध असतो का हे मला नविनच आहे
कविता थोडीदार कश्यावर आहे हे विचार करायला लावणारी आहे हे नक्की. पण आपला प्रतिसाद ही तसाच आहे ...

तसा अर्थ घेवुन रसग्रहण सांगितले तरी आवडेल मात्र.

असो

मी कशी वाचली कविता दे देतो ..
कविता कश्यावर आहे या पेक्शा ती आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो असे वाटते मला..

कविता (पहिले कडवे).. पावसाच्या सरीवर आधारीत आहे .. असे मी वाचले ..
ती सर आपल्या प्रियकराबरोबर- पावसाबरोबर त्याच्या मागुन जाते .. मागील रंगीत वस्त्रे कदाचीत प्रकाशामुळे/इंद्रधनुष्यामुळे असलेले रंग असतील असे वाटते ..

कविता ( दूसरे कडवे ) म्हणजे पावसात भीजणारी एक शुद्ध हरपलेली वेल वाटते ..
पांढरे गज म्हणजे पावसाच्या सरी आणि भिजणारी ती वेल असा अर्थ मी घेतला ..

असो कविता आवडली मात्र ...

अवांतर :
१. एकाच कवितेचे वेगवेगळे अर्थ वाचकांनी सांगितले की कधी कधी कवी/कवयित्री ला ही आनंद होतो .
२. निऑन रंग कसा असतो हे मात्र मला माहित नाही .. कसा असतो तो ?

तरीही मुळ अर्थ कवयित्री ने सांगितल्यास छान वाटेलच

प्रसाद गोडबोले's picture

20 Oct 2022 - 10:24 am | प्रसाद गोडबोले

अनाकलनीय कवितेचे अनाकलनीय अर्थ लावण्याची गणेशाची अप्रतिम हतोटी वादातीत आहे !
पांढरे गज म्हणजे पावसाच्या सरी हे तर मला बापजन्मात सुचले नसते =))))

आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो

हे मात्र एकदम भारी लिहिलंय गणेशाने.
मला ही कविता वाचुन एकदम ही एखाद्या फेमीनिस्ट मुलीवर लिहिलेली आहे की काय असे वाटले. एखादी फेमीनिस्ट जी की तारुण्यात , कोवळ्यावयात एकदम उच्छृंखल पणे वागत आहे , वाट्टेल ते करत आहे , बेदरकारर्पणे एकदम योलो लाईफ जगत आहे , कोणासोबतही जात आहे , नुसता बॉडी काऊंट वाढवत आहे , सावरण्याची शुध्द सोडा, साधा सावरण्याचा विचारही जिच्या मनाला स्पर्श करत नाहीये तिचावर पहिलं कडवं लिहिलं आहे .
अन दुसर्‍या कडव्यात जवानी सरुन गेल्यावर , ३५-४० मधील एकाकी फेमीनिस्ट रेखाटली आहे असे वाटले. पांढरे गज म्हणजे स्वकृर्तृत्वावर घेतलेल्या घराच्या खिडक्या असाव्यात , पण त्या घरात सोबत कोणीच नाही, प्रेम करणारा नवरा नाही, जीव लावणारी पोरं बाळं नाहीत , दोन डझन शुज आहेत , कपाटभरुन कपडे आहेत , पण कितीही रिव्हीलिंग कपडे घातले तरी त्यामागे वय सरुन गेलेलं एकाकी शरीर , त्याचं काळंकुट्टं वास्तव लपवता येण्यासारखं नाहीये , आधीही त्या देहाची शुध्द नव्हती अन आता शुध्द आली तरी काही उपयोग नाहीये . असा अर्थ मला जाणवला .

असो.

जुनी सुंदर कविता परत एकदा मेन पेज वर आणल्या बद्दल धन्यवाद !.

चित्रा's picture

16 Mar 2011 - 5:04 pm | चित्रा

दुर्बोध आहे हे मान्य आहे. मात्र कविता बिलबोर्ड बघून सुचली नाही :)
गणेश यांचा अर्थ माझ्या मनातल्या अर्थाशी बराचसा मिळताजुळता आहे. थोडा फरक एवढाच आहे:

पहिल्या कडव्यातली ती म्हणजे संध्याकाळच्या सूर्यामागे जाणारी त्याची प्रभा. (ऋग्वेदातली उषःसूक्ते ही बरीच प्रसिद्ध आहेत. यांचे मराठी भाषांतर काही वर्षांपूर्वी मी वाचल्याचे स्मरते. तेव्हापासून उषा ही तरूणी, नवयौवना असे केलेले ते वर्णन डोक्यात होते. )

अलिकडेच आम्ही काढलेले हे तीन फोटो देते आहे.

संधिप्रकाशाचे रंग बघता बघता दोन मिनिटात काळोख झाला होता.

दुसर्‍या कडव्यातली ती सुचली एका थंडीच्या दिवसांमध्ये गोठलेल्या फांदीवरून.

कवितेला आधी "सूक्ते" असे नाव देणार होते. पण नंतर बदलले.

वारकरि रशियात's picture

16 Mar 2011 - 5:13 pm | वारकरि रशियात

चित्राताई,

उषा वेगळी (सुर्योदयाच्या आधीची) आणि वरील प्रकाशचित्रासंबंधाने तुम्ही लिहिले आहे ती संध्या (सुर्यास्ता नंतरची)

पण कविता (आणि प्रेरक प्रकाशचित्रे) छान. आभार

चित्रा's picture

16 Mar 2011 - 5:48 pm | चित्रा

अगदी बरोबर. पण अर्थात गल्लत केली नव्हती. उषा पहाटेचीच. म्हणून ती कल्पना संधिकाळापर्यंत खेचली.

अर्थात बाकी अर्थ नव्हते असे नाही. 'आधुनिकोत्तर' तरुणीही कुठेतरी मनात होती. :)

सूर्य हा प्रियकर आणि त्याच्या मागे जाणारी सांजवेळची त्याची किरणे त्याची प्रेयशी मस्तच वाटले वाचुन ..
फोटो ही छान ..
दूसर्‍या कवितेशी (कडव्याशी) लागलेला बरोबर अर्थ छान वाटले.
तरीही ह्या दूसर्या कडव्यामुळे पहिल्या कवितेला तसा अर्थ लागला माझा नाहि तर तुम्ही सांगितलेले एकदम पटते आहे..
आणि निऑन कलर कसला असतो ते कळाले नसले तरी आता कळाले या सांजवेळे मुळे ...

लिहित रहा .. वाचत आहे ...

सहज's picture

16 Mar 2011 - 7:26 pm | सहज

खुलासा आल्यावर व ती प्रकाशचित्रे पाहील्यावर अजुन आवडली.

फोटो व त्याखाली कविता असे लिहायला हवे होते.

मेघवेडा's picture

16 Mar 2011 - 5:59 pm | मेघवेडा

सुंदर कल्पना.. (अर्थात विश्लेषणानंतरच समजली)

आधी 'निऑन रंगाचे दरवाजे' म्हणजे मलाही बिलबोर्ड्सच वाटले होते.

मुक्तसुनीत's picture

16 Mar 2011 - 7:16 pm | मुक्तसुनीत

कविता आवडली. मलाही बिलबोर्ड्सबद्दलच वाटली होती. तुम्ही सांगितलेली पार्श्वभूमी सुद्धा छानच.

रेवती's picture

16 Mar 2011 - 7:23 pm | रेवती

दोन्ही कडवी तरुण मुलीवर केलेली असावीत असा अंदाज वाचल्यावर केला.
गणेश यांनी सांगितलेला अर्थ खुपच आवडला.
फोटू छानच.
कविता वेगळी वाटली.
निऑन रंगाच्या दरवाजाचा उल्लेख मनाची पकड घेणारा आहे.

पैसा's picture

16 Mar 2011 - 7:32 pm | पैसा

कवितेतली लय आवडली. पण तू पार्श्वभूमी सांगितल्यावर कविता नीट कळली!

(सकाळी घाईघाईत वाचली तेव्हा कोणी प्रतिक्रिया लिहिल्या नव्हत्या. मला एकदा पुसटंस वाटलं की हल्लीच झालेल्या 'वॉर्डरोब मालफंक्शन' च्या घटनांशी याचा काही संबंध आहे की काय?)

माझीही शॅम्पेन's picture

16 Mar 2011 - 7:32 pm | माझीही शॅम्पेन

मलाही एका उशरुंखल / बिनधास्त मुलीबद्दल लिहिले आहे अस वाटल ,
पहिल्या कडव्यात प्रेमात बेहोश होऊन प्रिकराचया मागे सगळ सोडून गेलेली एक मुलगी
पण (दुसर्या कडव्यात) धोका होऊन वेश्या व्यासायात / शोषण होऊन कृश झालेली अस काहीस वाटल

(नीओन लाइट मुळे कनफूसड)

फोटो बघितल्यावर कविता एकदम नीट समजली.
आधी नीट नव्हती समजली. आधी पुण्यामध्ये मुलांच्या मागे बाईक्सवर चिकटून बसलेल्या, आणि वस्त्र (पक्षी टॉप्स) नीट सांभाळता न येणार्‍या तरूणी, या संदर्भातली असावी असे वाटले.
कविता आवडली.

नैसर्गिक संदर्भ माहीत नसताना अशा स्त्रियांची चित्रे कल्पून कविता खूप आवडली.

संदर्भचित्रे बघितल्यानंतर कविता पुन्हा वाचली आणि पुन्हा खूप आवडली.

चित्रा's picture

16 Mar 2011 - 10:32 pm | चित्रा

कविता आवडल्याचे कळवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. यामुळे खूपच बरे वाटले, एवढेच म्हणते.

कवितेचे निघणारे अर्थ वेगवेगळे असू शकतात आणि ते काढण्याचा अधिकार वाचकांना असतोच असे मला वाटते. गणेशा यांचे "कविता कश्यावर आहे या पेक्षा ती आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो असे वाटते मला.. " हे मला आवडले. त्यामुळे प्राजु, पैसा, माझीही शॅम्पेन, तुम्हाला (आणि खरे तर सर्वांनाच) लागलेले सर्व अर्थ चालू शकावे. सहज, मुक्तसुनीत आणि मेघवेडा यांना बिलबोर्डाचा भास झाला, तोही चालेल. आणि स्त्रियांची जी जी रूपे नजरेसमोर आली तीही चालावीत. (माझ्या मनात दुसर्‍या कडव्यात सर्व भोग भोगून त्यातून बाहेर पडलेल्या प्रौढेचेही रूप होते. )

चित्रगुप्त's picture

14 Jun 2022 - 8:05 pm | चित्रगुप्त

या कवितेतले पहिले कडवे वाचून मनःचक्षुंसमोर एक 'बेदरकार' मुक्त, अवखळ अशी तरुणी तरळली, तर नंतरच्या कडव्यात पुढे अनेक वर्षांनंतरची तीच स्त्री, पण आता एकाकी पडलेली, वृद्ध, रुग्ण, अशी असलेली वाटली. तरुणपणी ऐन तारुण्याच्या भरात "कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? अशी बेदरकार वृत्ती, तर वृद्धपणी हताशा, उद्विग्नता यामुळे "कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?" ही स्थिती.
चित्रः
Angelo Caroselli - Allegory of Youth and Old Age (१६०० - १६१५)
.

राघव's picture

20 Oct 2022 - 12:49 am | राघव

आपल्या चित्रकलेच्या व्यासंगाला मानाचा मुजरा! त्रिवार _/\_

कर्नलतपस्वी's picture

15 Jun 2022 - 7:04 am | कर्नलतपस्वी

कवीता वाचली, थोडी कळाली,प्रतीसाद वाचले मग दोन तीन वेगवेगळ्या रूपात दिसली.
छायाचित्रे परदेशातली दिसतात.
एकूण काय कवीता आवडली.