तेथे पाहिजे जातीचे!

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
9 Oct 2007 - 8:17 am

एका कोल्ह्याने एकदा, आव आणला सिंहाचा
केला निवाडा झिंगून, दारूबंदीच्या प्रश्नाचा

त्याच्या वरलिया रंगा, भोळे भुलले अजाण
गाती गोडवे ठेवून, सारी अक्कल गहाण

तूच तारक आमुचा- बैल, टोणगे बोलती
लोभी तुकड्याचे श्वान, मागे पुच्छ हलविती

व्यवस्थापन कराया, झाला गडी उतावीळ
शेत नांगराया घेई, जुना गंजलेला फाळ

ढीग दगडगोट्यांचा, नुरे मूठभर माती
एका दाण्याला महाग, झाली मोतियाची शेती

तरी खुर्चीत बसोनी, करी पोकळ गर्जना
पुढे लाचार हुजरे, फक्त डोलविती माना

हाती धरून माकडे, म्हणे तरेन सागर
कुठे पगारी चाकर, कुठे राजा रघुवीर

दोष दुसर्‍याना देई, पराभवात दारूण
लाथा खाऊन शोधाया, निघे दुसरे कुरण

चला माकडेच झालो, नाही खेकडे बरं का!
वर जाणार्‍याना खाली, आता तरी खेचू नका

सिंह-कोल्ह्याच्या कथेची, मनी धरा शिकवण
तेथे पाहिजे जातीचे, येरा हाती धुळधाण!

--अशोक गोडबोले, पनवेल.

कवितावाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

जुना अभिजित's picture

9 Oct 2007 - 3:43 pm | जुना अभिजित

सर्वात आवडलेले कडवे:
हाती धरून माकडे, म्हणे तरेन सागर
कुठे पगारी चाकर, कुठे राजा रघुवीर

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

विसोबा खेचर's picture

9 Oct 2007 - 5:11 pm | विसोबा खेचर

सिंह-कोल्ह्याच्या कथेची, मनी धरा शिकवण
तेथे पाहिजे जातीचे, येरा हाती धुळधाण!

वा गोडबोलेसाहेब, क्या बात है...

तात्या.

विसोबा खेचर's picture

3 Nov 2007 - 9:12 am | विसोबा खेचर

माझ्या कवितांबद्दल शंका असल्यास फोन वर संपर्क साधा --- ९३२२२२२१७७

अशोक गोडबोले.