एव्हाना नातू झाल्याची बातमी चंदावरकर लेन पासून बाभई नाक्यापर्यंत पोहचलीच असावी.
आत्याबाईंचा फोन . दुपारी येउन जाईन .
शशिधरचा फोन दादा इकडे आलेत.
मला तर बाई एकेक धक्केच बसत होते सकाळपासून.
हे आणि शशिधरकडे ! वेलणकर घराण्याचे दोन्ही पुरुषोत्तम गणपती आणि दिवाळीलाच समोरासमोर येतात.आज तर एक मे. दोघंही एका टेबलावर . समोरसमोर. न गुरगुरता. मद्राशी सुनेच्या हातचे दोसे खातायेत.
दोन मिनीटं सुजाथा सुद्धा अय्यो .. म्हणायची विसरली असावी. मी आपली याद्यांच्या कामाला लागली.
=== == ================================= === =====
साडेअकरा वाजता आले घरी एकदाचे.
आल्याआल्या म्हणाले
त्या सुकुमारला फोन लाव बरं उद्या,जरा महत्वाचं बोलायचंय !
मला काही कळेना. मी म्हटलं कशाला हो.
ते नाळेच्या तुकड्याबद्दल बोलायचंय.
मला माहीती होतं सगळं . पण मी आपलं विचारलं.
आता हे काय नविन ?.
मला म्हणतात कसे,
तुला नाही माहिती ते. नविन संशोधन आहे ते . नाळेचा तुकडा गोठवून ठेवतात.पुढे मागे बाळ आजारी पडलं तर जन्मभर कामाला येतं. स्टेम सेल असं नाव आहे .
मी म्हटलं हे बरं आहे की हो.
आधी नाळ तोडायची आणि नाती गोठवायची आणि मग परत तिच नाळ वापरायची आणि हवी ती नाती जोडायची.
क्षणभर तापून लाल झाले पण पटकन म्हणाले
एव्हढ्या सहज तुटेल ती नाळ कसली गं
===============================================================
मला रात्री मधेच उठवलं.
काय गं? नातू काळा असेल की गोरा? (दुपारी बहिणीशी गप्पा मारत बसले होते त्याचा इफेक्ट !)
असेल काळा मद्रासी. मी म्हटलं
(सुकुमार गोरा पिट्ट आहे हे यांना कुठे माहिती असायला)
मग चेहेरा एकदम आध्यात्मिक चेहेरा करून म्हणाले.
म्हणजे तुझ्याइतका पण गोरा नसेल का?
आता मी काही यांच्याइतकी कोकणस्थ गोरी नाहीय्ये पण माझा रंग यांना अजूनही काळाच दिसतो.
जाउ दे .कृष्ण देखील काळाच होता.
अचानक मला चिडवायला लागले.
रात्र काळी घागर काळी.
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
कृष्ण मूर्ती बहु काळी हो माय.
माझ्या एक लक्षात आलं की हे आता चेकाळलेत.
मी पाठ फिरवून झोपले गं बाई. मला नाही सोसत जागरणं आजकाल.
प्रतिक्रिया
6 May 2008 - 1:32 am | बिपिन कार्यकर्ते
I knew it... you wont let us down. अजून येऊ द्या...
बिपिन.
6 May 2008 - 11:16 am | नंदन
चांगलं चाललंय स्वगत.
[अवांतर -- दहिसरकर असल्याने चंदावरकर लेन, बाभई हा भूगोल लगेच लक्षात आला :).]
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 May 2008 - 11:37 am | धमाल मुलगा
वा....रामदास काका,
मस्तच लिहिताय..
एकदम घरगुती वातावरण! छान वाटलं वाचायला...
:)) सह्हीच !
पु.ले.शु. :)
आपला,
- (काळा महाराष्ट्रीय) ध मा ल.
6 May 2008 - 12:40 pm | आनंदयात्री
वेलणकर घराण्याचे पुरुषोत्तम अजुन काय काय करतात ते पाहु :)