सुकुमारचा फोन अगदी वेळेवर आला.
पावणे सहाचा गजर आणि त्याचा फोन एकाचवेळी.
ह्यांची सुदर्शन क्रियेची वेळ (हे एक नविनच खूळ सध्या पाळलंय)
फोन उचलून हॅलो म्हणाले आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा.शरु... शरुता ई ..आणि परत मुसमुसणे.
मलाही राहवेना .पण मला हातानेच बेडरूम मध्ये जायची खूण केली.
मी बापडी थांबतेय कशाला.
आज्जी मात्र सरकत सरकत फोनजवळ.दोन मिटांनी बोलण्याचा आवाज आला.सुकुमारशी बोलत होते.आधी बराच वेळ सरकारी आवाजातलं इंग्रजी . आय ऍम गिवन टु अंडरसस्टँड असं तीन वेळा ऐकलं आणि मी हळूच म्हणले अहो.. हिन्दी.. हिन्दी..
आणि झालं ... पुढची दहा मिनीटं हिंदीच्या चिंध्या.
मला कळलं ते एवढंच.
तुम रायलसीमा ब्राम्हन है क्या?
हमारी बेबी को तिखट नही चलता है.
उसको रोज गोड खाता है.मग ...
दोन मिनीटांनी म्हणाले लो, बडी आज्जी से बात करो. फोन आज्जीकडे.
तीस वर्षानंतर ही घरची बाई दुय्यम नागरीक.
आज्जी चं बबडू .. सोनी .संपलं आणि फोन माझ्याकडे.(फोन मला देण्याआधी सोन्याच्या करगोट्याचं काही तरी बोलली ना गं आज्जी.माझा संशय खोटा नाही.मोठ्या आत्याकडे अजून साठा शिल्लक ठेवलाय)
मी पण पहिल्यांदा बोलण्याचा आव आणला.....
हम आयेंगा अमेरिका अशी सांगता झाली तेंव्हा जरा हुश्शं झाल.
तोपर्यंत आजी च्या प्रेमाला पूर आला होता. माय लेकरं आपापसातंच बोलत बसली.
मी चहाच्या बंदोबस्ताला लागले.
===============================================================
चहा पिताना मला म्हणतात कसे
चला...
आज्जीला पणतू झाला. सोन्याची फुलं उधळू या. मी म्हणलं अहो.. आपल्या शशिधर ला मुलगा कुठे झालायं?
झालं . दोन मिनीटं .
मुलगा कसा नालायक .
मुली कशा गुणी.
वगैरे.वगैरे.
आज्जी सोबत री ओढायला तयारंच. मी अंदाज घेतला.
बरं उधळू या फुलं.
माय लेकरांचे चेहेरे खुलले. पण सोनं आहे कुठे घरात ?.
हे म्हणतात कसे नातू मला झालाय मी आणीन .
मी म्हणल आणा आणा..फुलं उधळा.....
मोठ्या वन्संना पण बोलवा.
फुलं वेचायला कुणितरी हवं ना.
पुढची दहा मिनीटं घरात शांतता. यांना अधूनमधून असे धक्के द्यावे लागतात गं
त्या शिवाय वन्संकडला साठा बाहेर येणार नाही गं.
(क्रम पुढे चालू राहील)
प्रतिक्रिया
5 May 2008 - 9:18 am | प्राजु
दोन्ही भाग वाचले. लेखन चांगले आहे. बारकावे अगदी नीट आले आहेत. पुढचा भागाच्या प्रतिक्षेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 May 2008 - 4:21 pm | विसोबा खेचर
म्हणतो..!
रामदासजी, अजूनही येऊ द्या...
तात्या.
5 May 2008 - 10:41 am | धमाल मुलगा
वा! दोन्ही भाग आज एकदमच वाचले.
छान लिहिलंय :)
पु.ले.शु.
5 May 2008 - 10:46 am | आनंदयात्री
वा रामदासराव गृहिणीच्या, मातेच्या भुमिकेतुन चांगले लिहिताय तुम्ही ! येउद्या अजुन.
5 May 2008 - 11:29 am | नंदन
हाही भाग आवडला. लोकसत्तेत दिलीप प्रभावळकरांची अनुदिनी यायची त्यातल्या श्यामल टिपरेंचे प्रकटन आठवले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी