सध्या इजिप्तमध्ये घडत असलेल्या घटनांची जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचत आहे त्यानुसार इजिप्तच्या जनतेने अभूतपूर्व एकजुटीने उठाव करून अध्यक्ष मुबारक यांना पायउतार होण्यास भाग पाडले आहे. मुबारक यांनी उपाध्यक्षांकडे सत्ता सोपविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सदर घटनाक्रमात इजिप्तच्या लष्कराची भूमिका महत्त्वाची ठरली. निदर्शने करणार्या लोकांवर शस्त्र चालवण्यास सैन्याने नकार दिला. त्यामुळे मुबारक यांना पर्यायच उरला नाही.
या निमित्ताने (अहिंसक) असहकाराच्या तत्त्वाचे प्रात्यक्षिकच तेथे दिसून आले.
एखादे जुलमी सरकार अन्यायाने देशाच्या जनतेवर राज्य करते. हे जुलमी राज्यकर्ते संख्येने नेहमी कमी असतात. परंतु शासनयंत्रणा हे त्यांचे बळ असते. आणि शासन यंत्रणेचे रेल्वे, पोस्ट, दूरसंचार कर्मचारी हे त्या देशाचेच नागरिक असतात. तसेच दमनयंत्रणा चालवणारे पोलीस, सैन्य हेही त्या देशातलेच नागरिक असतात. नागरिक स्वतःच्याच बांधवांविरुद्ध शस्त्रे उगारतात आणि जुलूम करण्यात राज्यकर्त्यांना सहकार्य करतात.
असे सहकार्य करण्याचे जर नागरिकांनी नाकारले तर जुलमी राज्यकर्त्यांना क्षणभरही राज्य करता येणार नाही असा विचार गांधींनी सांगितला. [तो बहुधा टिळकांनाही अभिप्रेत होता पण त्यांनी एक्स्प्लिसिटली सांगितला नाही].
(A hundred thousand Englishmen can't control three hundred million Indians if the Indians refuse to co-operate)
जर रेल्वे, बस चालवणार्यांनी ती चालवली नाही, पोस्ट दूरसंचार बँका यांतील कर्मचार्यांनी सरकारशी असहकार पुकारला तर राज्य यंत्रणा चालणे अशक्य होईल. त्यातूनही जर दमन यंत्रणेनेही सहकार्य करण्याचे नाकारले तर सरकारची पुरती नाकेबंदी होईल.
दमनयंत्रणा जितकी असहकारात उतरेल तितकी यशाची खात्री वाढेल. परंतु ती जरी उतरली नाही तरीही सरकारी कारभार चालणे अशक्य होईल.
त्यासाठी सरकार + दमन यंत्रणा चालवणार्या कर्मचार्यांना असहकारास उद्युक्त करणे यासाठी चळवळ करण्याची कल्पना होती.
या सगळ्या कल्पनेत हिंसेला तसा काही थारा नाही. अगदी दमन यंत्रणेलासुद्धा सरकारविरुद्ध हिंसा करण्याची गरज नाही. सध्याच्या इजिप्तमधील घटनांत सुद्धा सैन्याने मुबारक यांच्यावर बंदुका रोखल्याची माहिती पुढे आलेली नाही. त्यांनी फक्त "जनतेच्या मागण्या न्याय्य आहेत" असे म्हणून कारवाईस नकार दिला आहे.
सुरुवातीच्या काळात गांधींनी देशातल्या लोकांना सरकारी नोकर्या सोडा, सरकारी सन्मान, पदव्या परत करा वगैरे आवाहन केले. सिव्हिल डिसोबिडिअन्स असे नाव त्याला दिले होते.
भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी ठरवले त्यात नौदलातल्या सैनिकांनी केलेला उठाव हेही एक महत्त्वाचे कारण होते. हा त्यांनी सरकारशी पुकारलेला असहकारच होता.
जयप्रकाश नारायण यांनीही असेच असहकाराचे आवाहन केले होते (असे सांगितले जाते).
असहकाराचा पहिला डेमो १० मे १८५७ रोजी मंगल पांडेने (आणि त्याच्यावर शस्त्र चालवण्यास नकार देणार्या सैनिकांनी) दिला. परंतु त्यावेळी होळकर आणि इतर संस्थानिकांनी इंग्रजांशी सहकार्य केले म्हणून तो अयशस्वी झाला.
प्रतिक्रिया
11 Feb 2011 - 11:29 pm | नितिन थत्ते
वरील लेख सध्याच्या परिस्थिती / माहिती वर आधारित आहे.
11 Feb 2011 - 11:37 pm | मनिष
"सिव्हिल डिसोबिडिअन्स" ही कल्पना थोरो (http://en.wikipedia.org/wiki/Henry_David_Thoreau) ह्याची आहे. त्याच्या विचारांचा गांधीजींवर खूप प्रभाव होता.
11 Feb 2011 - 11:39 pm | नितिन थत्ते
धन्यवाद. मला हे नाव आठवत नव्हते.
11 Feb 2011 - 11:59 pm | गोगोल
लेखाचा उद्देश कळला नाही.
12 Feb 2011 - 12:06 am | आळश्यांचा राजा
गांधीजींच्या संदर्भात यापूर्वी इथे (वारंवार) झडलेल्या चर्चांचा संदर्भ या लेखाला असावा.
पॉइंट इज व्हेरी वेल मेड.
12 Feb 2011 - 12:08 am | विकास
चांगला आढावा.
सध्या इजिप्तमध्ये घडत असलेल्या घटनांची जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचत आहे त्यानुसार इजिप्तच्या जनतेने अभूतपूर्व एकजुटीने उठाव करून अध्यक्ष मुबारक यांना पायउतार होण्यास भाग पाडले आहे.
हे जितके सत्य आहे तितकेच प्रदीप यांनी येथे दिलेल्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, मुबारक पराकोटीचे क्रूर नसल्याने ते शक्य झाले. म्हणूनच जे "तहरीर स्क्वेअर" मध्ये होऊ शकले ते "तिआनमेन स्क्वेअर" मध्ये होऊ शकले नाही. असे म्हणताना त्या जनतेच्या अथवा नि:शस्त्र लढ्याचे महत्व कमी करायचा हेतू नाही.
असे सहकार्य करण्याचे जर नागरिकांनी नाकारले तर जुलमी राज्यकर्त्यांना क्षणभरही राज्य करता येणार नाही असा विचार गांधींनी सांगितला.
बरोबरच आहे. वर मनिषने म्हणल्याप्रमाणे जरी ते विचार (असहकार चळवळ) थरोच्या लेखनातून स्फुरली असली तरी ती वास्तवात आणायचे श्रेय गांधीजींकडेच जाते. नाहीतर तसे आत्ताच १५० वर्षे झालेले "अन डू धीस लास्ट" हे जॉन रस्कीनचे पुस्तक पण गांधीजींना अर्थकारणावरून स्फुर्तीदायक ठरल्याचे त्यांनीच म्हणले आहे. तरी देखील त्या सर्वांचे भारतीयकरण गांधीजींनी कौशल्याने केले होते आणि त्यात स्वतःचे वैचारीक योगदानही केले होते.
तो बहुधा टिळकांनाही अभिप्रेत होता पण त्यांनी एक्स्प्लिसिटली सांगितला नाही
टिळकांना सनदशीर मार्गाने लढा हवा होता. हिंसक मार्गाने नाही. म्हणूनच ऐन तरूणपणी देखील वासुदेव बळवंत फडक्यांशी संपर्क येऊनही त्या मार्गाला ते आकर्षित होऊ शकले नाहीत. पण ब्रिटीशांना कसे खेळवायचे आणि त्यातून काय पदरात पाडून घेयचे ह्याचे दोघांचे (टिळक-गांधी) विचार वेगळे असावेत. टिळकांना स्वातंत्र्य स्वतःच्या हयातीत स्वातंत्र्य मिळणार नाही याची खात्री होती, ते तसे बोलूनही दाखवायचे आणि त्याला घाई न करता थांबायची, तयारी देखील होती. पण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळाल्यावर टिकवण्यासाठीची दिशा/मानसिकता ठरवायचे काम ते स्वतः करत होते, असेच त्यांना देखील वाटत होते.
जयप्रकाश नारायण यांनीही असेच असहकाराचे आवाहन केले होते (असे सांगितले जाते).
असेच केले होते. जॉर्ज फर्नांडीस यांनी केलेला रेल्वे संप आजही त्याकाळातील नोकरदार आठवू शकतात. आणिबाणी होण्याचे कारण अंशतः ते देखील होते.
भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी ठरवले त्यात नौदलातल्या सैनिकांनी केलेला उठाव हेही एक महत्त्वाचे कारण होते. हा त्यांनी सरकारशी पुकारलेला असहकारच होता.
खरे आहे. आणि त्यासाठी, "सरकारशी असहकार न ठेवता, सैन्यात भरती व्हा," असे म्हणणार्या स्वातंत्र्यवीरांना अत्र्यांनी "रिक्रूटवीर" देखील म्हणले होते आणि तमाम लोकांनी नावे ठेवली होती. (दोन्ही उपाधी त्यांना अत्र्यांनीच दिल्या आहेत). अर्थात त्याचे कारण नंतर कळले...
त्यासाठी सरकार + दमन यंत्रणा चालवणार्या कर्मचार्यांना असहकारास उद्युक्त करणे यासाठी चळवळ करण्याची कल्पना होती.
हे पारतंत्र्यात आणि (आणिबाणीसकट) हुकूमशाही असलेल्या देशांमधे केले तर समजू शकतो. पण जर हेच शस्त्र म्हणून लोकशाहीत कसेही आणि कुणिही वापरायचे ठरवले तर ते योग्य नाही असे वाटते. "जर-तर" होईल पण स्वतः गांधीजींनी ते तसे वापरले असते असे वाटत नाही.
असहकाराचा पहिला डेमो १० मे १८५७ रोजी मंगल पांडेने (आणि त्याच्यावर शस्त्र चालवण्यास नकार देणार्या सैनिकांनी) दिला.
त्याला असहकार म्हणावे का हे कळत नाही. मात्र नंतरच्या काळात तुरूंगातील क्रांतीकारी राजबंद्यांनी केलेली उपोषणे, निषेध मात्र नक्कीच असहकारात मोडतात असे वाटते.
12 Feb 2011 - 12:45 am | मुक्तसुनीत
लेख आवडला. विकास यांनी या लेखाचा घेतलेला आढावा सुद्धा.
काही गोष्टी समजून घ्यायला आवडतील :
अशा प्रकारच्या व्हायला कुठल्या प्रकारची परिस्थिती कारणीभूत होते ? आर्थिक हलाखी, बेकारी, एकंदर नैराश्य हे घटक तर सर्वत्र सदासर्वकाळ आढळतातच. खुद्द मुबारक यांची राजवटच तीस वर्षे एकछत्री चालू होती. असे असताना , लाखो लोकांनी ठरवल्याप्रमाणे काही आठवडे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन कसे केले असेल ? त्याचे को-ऑर्डीनेशन कुणी आणि कसे केले असेल ? या आंदोलनामागची काही तात्कालिक कारणे आहेत काय ?
12 Feb 2011 - 1:53 am | अर्धवटराव
असहकार हे खरोखरच प्रचंड ताकतीचे हत्यार आहे. इजिप्तच्या जनतेला सलाम.
इथे एक प्रश्न पडतो. इतक्या मोठ्या आंदोलनाला चालवायला तेव्हढ्या वकुबाचा नेता लागतो. जनता आपणाहोउन आंदोलन करु शकते, पण निर्नायकी अवस्थेततली आंदोलने सफल होताना दिसत नाहि. जनतेला नेत्याच्या स्मृती तरी हव्यातच ( संभाजी आणि राजारामच्या मृत्युनंतर शिवछत्रपतींचे स्वराज्य टिकवण्यासाठी जनतेने निर्नायकी लढा दिला असं इतिहासकार म्हणतात. या लढ्यामागे भोसल्यांच्या दोन पिढ्यांचे आदर्श, त्यांच्याबद्दलची भक्ती जनतेपुढे होती) इजिप्तबद्दल असे म्हणतात कि तिथे असे सर्वमान्य, कणखर विरोधीपक्षाचे नेत्रुत्व नाहि. मुबारक़ पायउतार झाल्यानंतर जी राजकीय पोकळी निर्माण होईल ति चांगल्या तर्हेने भरुन निघायला तिथे योग्य पर्याय नाहि. तरीही जनतेने हे आंदोलन यशस्वी केले?
अर्धवटराव
12 Feb 2011 - 6:40 am | गुंडोपंत
हा उठाव नक्की जनतेचाच होता का या विषयी मला शंका आहेत.
अवांतरः
होस्नी हे अमेरिकेला (अजून अज्ञात असलेल्या कारणाने) नकोसे झाले होते. अशा प्रसंगात तात्कालिक लाभ उठवण्यासाठी इंग्लंड आणि अमेरिका आपापली माध्यमे कोणत्याही स्तराला जाऊन वापरतात. हव्या त्या(च) बातम्या वर आणल्या जातात. हव्या त्या अफवा पसरवल्या जातात. त्यासाठी तज्ञ लोकांची मोठी फौज कार्यरत असते. त्यामुळे मला तरी हे ' पाश्चात्यांनी घडवून आणलेले' सत्तांतर वाटते. यात त्यांचा नक्कीच स्वार्थ दडलेला आहे. तो नंतर बाहेर येईलच. अन्यथा अमेरिकेला काही 'तसा' फायदा नसलेल्या देशाचा इतका पुळका कधीही येत नाही. राष्ट्राध्यक्ष वगैरे असल्या भानगडीवर भाष्य करत आहेत याचा अर्थ वेगळा आहे हे समजायला हवे.
त्यांना जनतेची, स्वातंत्र्याची वगैरे फार काळजी पडलेली आहे यावर माझा काडी इतकाही विश्वास नाही. हा निव्वळ तेलाच्या आणि सत्तेच्या राजकारणाचा हा एक भाग आहे.
याच प्रसंगात सौदी अरेबियाच्या राजांनी होस्नी यांना पाठिंबा दिला होता. हे या घटनेला अजून पैलू आहेत सांगून जात नाही का? हे पैलू बहुदा खनिज तेल आणि इस्रायल यांच्या संदर्भातले असावेत.
तेंव्हा असहकार वगैरे वरवरचा भाग आहे. थत्तेंसारखी माणसे असल्या वरवरच्या दिखाऊ बातम्यांवर विश्वास ठेऊन गांधीजींच्या तत्वांचा काथ्याकूट करण्यात वेळ घालवतात हे बघून वाईट वाटले.
ओबामांना वर-वरच्या भाषणात टाळ्या मिळवायला गांधीजींचे मुद्दे उपयोगी पडतात यापेक्षा त्यांचा फार उपयोग असतो असे दिसत नाही. अन्यथा ही तत्वे आचरणात दिसली असती. पण सत्य निराळे आहे हे तरी तुम्ही डोळे उघडून पाहा.
तत्पेक्षा त्यांनी याची तेल+ अमेरिकन ज्यु + इस्रायेल+ सौदी आणि तेलाची बाजारपेठ अशी कारणी-मिमांसा शोधणारा लेख लिहिला असता तर आवडले असते.
12 Feb 2011 - 8:02 am | नितिन थत्ते
>>हा उठाव नक्की जनतेचाच होता का या विषयी मला शंका आहेत.
असेच म्हणतो. तसा खुलासा लेखावर पहिलाच प्रतिसाद देऊन केला आहे.
>>तेंव्हा असहकार वगैरे वरवरचा भाग आहे. थत्तेंसारखी माणसे असल्या वरवरच्या दिखाऊ बातम्यांवर विश्वास ठेऊन गांधीजींच्या तत्वांचा काथ्याकूट करण्यात वेळ घालवतात हे बघून वाईट वाटले.
ठीक आहे. आपला वेळ फुकट गेला असल्यास क्षमस्व.
>>तत्पेक्षा त्यांनी याची तेल+ अमेरिकन ज्यु + इस्रायेल+ सौदी आणि तेलाची बाजारपेठ अशी कारणी-मिमांसा शोधणारा लेख लिहिला असता तर आवडले असते.
माझा या विषयावर अभ्यास नाही. आपणच लिहिले तर वाचायला आवडेल.
12 Feb 2011 - 1:25 pm | गुंडोपंत
अच्छा अच्छा तो खुलासा असा मानायचा होय? ठिक आहे मानला!
ठीक आहे. आपला वेळ फुकट गेला असल्यास क्षमस्व
कस्चं काय साहेब? आमचा वेळ काय नि त्याला किंमत ती काय? आम्ही आपली ज्योतिष वाली मंडळी. बसलो एकदा मांडी ठोकून गुरूचा सात्विकपणा पाहात - की बस्लो २-४ तास.
तुम्ही लोक म्हत्त्वाचे! तुम्ही काय बसता काय आमच्या सारखे वेळ घालवत?
तुम्ही शोधणार शिष्टीमचे दोष नाय तर नवीन बसवून देणार. त्याला डॉलरात तासावर पेमेंट!
म्हणून म्हंटलं तुमचा वेळ असा वरवरच्या दिखाऊ गोष्टींवर कश्ग्शाला घालवता?
(येकदा लिव्हा की तुमची ती साप शिष्टीम कशी अस्ते त्यावर. नवीन लोकांनी त्यात काय काय करू नये. काय प्रश्न असतात कसे सोडवायचे? ट्रेनिंग कुठे घ्यायचे?)
आमचा काही फार अभ्यास नायी बॉ या विष्यावर. तुमी इंटरनॅशनल फार, तुमीच लिहा ना. तेव्हढीच आम्हालाही ज्ञानात भर.
12 Feb 2011 - 4:26 pm | निनाद मुक्काम प...
गुंडो पंत आपल्या मताशी मी सहमत आहे कि उठाव हा खरच जनतेचा होता का ?
पुढे कधीतरी वॉर ऑफ फोर्थ जनरेशन बद्दल लिहीन सविस्तर (अजून त्यावर वाचन चालू आहे .)
बाकी थत्ते ह्यांनी वेळ वाया घालवला असे वाटत नाही .
कारण ह्या घटने कडे पाहण्याचा त्यांचा तो दृष्टीकोन होता .
त्यात तथ्य असू शकेन .काही अंशी .
असहकाराचे तत्व हे प्रभावी हत्यार नक्कीच आहे (जनतेचा पाठिंबा हवा )
अर्थात हुकुमशहा कोण आहे ह्यावर अवलंबून आहे .
बाकी चीन मध्ये हुकुमशाही नसून साम्यवादी सरकार आहे .त्यांच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते व त्यांचे समाजात पसरलेलं जाळे / व्यापारी व समाजातील इतर वर्गाशी संबंध व सैन्य हे मदतीला असल्याने तो उठाव यशस्वी झाला नाही .
अवांतर
३१ डिसेंबर ला स्वाती दिनेश .केसू ह्यांच्या कडे मी होतो .रात्री दिनेश ह्यांच्याकडे एका तेलियाने हे पुस्तक पहिले .मध्यरात्री उठून मी ते सकाळ पर्यत वाचत होतो .
सौदी /इजिप्त /अमेरिका व ज्यू राष्ट्र ह्या प्रकरणी लिहायला मला नक्की आवडेल .(पण विषयाचा आवाका खूपच मोठा /क्लिष्ट आहे .) त्यामुळे अजून वाचन करावे लागेल (ह्या विषयासाठी लेखकाची अर्थ शास्त्राची पार्श्व भूमी हवी .असे मला वाटते .जी माझी नाही .)
12 Feb 2011 - 10:08 am | अमोल केळकर
इजिप्तच्या जनतेला ' मुबारक हो ' !
अमोल केळकर
12 Feb 2011 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार
बळच कुठलातरी बादरायण संबंध जोडून गांधीची स्तुती आणि उदोउदो करायचा प्रयत्न कदाचित गांधी भक्तांना आवडुन जाईल असे लेखन बघता वाटते.
बाकी निर्नायकी लढा होता म्हणुनच तेथील जनता इतक्या लवकर विजय मिळवु शकली. अन्यथा गांधी सारखा एखादा नेता असता तर हातात धुपाटणेच आले असते.
असो... स्वतःच्या वैयक्तिक भांडणात गांधीनी संपूर्ण देशाला ओढले असे आपले आमचे एक मत आहे.
बाकी चालु द्या.
12 Feb 2011 - 4:07 pm | नगरीनिरंजन
>>स्वतःच्या वैयक्तिक भांडणात गांधीनी संपूर्ण देशाला ओढले असे आपले आमचे एक मत आहे.
सहमत आहे. शिवाय त्याच सुमारास आग्नेय आशियातले देशही स्वतंत्र झाले तेही गांधींच्या असहकारामुळेच काय?
13 Feb 2011 - 9:06 am | अर्धवटराव
>>स्वतःच्या वैयक्तिक भांडणात गांधीनी संपूर्ण देशाला ओढले असे आपले आमचे एक मत आहे
हे वाक्य उपहासात्मक आहे कि याला काहि ऐतिहासीक संदर्भ आहे ? मला याविषयी कधीच काहिच वाचायला/ऐकायला मिळालं नाहि. थोडं डिट्टेलमध्ये सांगा ना राव.
अर्धवटराव
12 Feb 2011 - 4:36 pm | सुधीर काळे
नितिन,
आज मी कुठेतरी जालावर वाचले कीं हे सत्तांतर कदाचित् "कुदेता"सुद्धा असू शकेल. कारण रीतसर नेमलेले आणि शपथ ग्रहण केलेले उपराष्ट्राध्यक्ष ओमार सुलेमान सत्तेवर न येता फील्डमार्शल महंमद हुसेन तांतावी हे Supreme Council of the Armed Forcesचे प्रमुख म्हणून सत्तेवर आलेले आहेत! ते आधी संरक्षणमंत्री, संरक्षणविषयक उत्पादनखात्याचे मंत्री आणि इजिप्तच्या सैन्याचे सरसेनानी होते आणि आता मुबारक यांच्या गमनापासून इजिप्तचे सर्वेसर्वा झालेले आहेत. प्रत्येक लष्करशहाप्रमाणे त्यांनीही घटनादुरुस्ती व निवडणुका वगैरेबद्दल घोषणा केलेल्या आहेत, पण यापुढे काय-काय होईल हे पडद्यावर पहाणेच इष्ट आणि मनोरंजक ठरणार आहे.
रस्त्यावर जे मीही पाहिले ते नक्कीच गांधीजींची आठवण करून देणारे होते, पण आतापर्यंत इजिप्तमध्ये राजेशाही किंवा हुकुमशाहीच सत्तेवर होती. या आधी नासेर यांनीही कुदेताच्याच मार्गाने सत्ता मिळविली होती.
आजपर्यंत सैन्यातील अधिकार्यांना अधिकृत व अनधिकृत मार्गाने भरपूर कमाई दिली जात होती व अनेक privilegesसुद्धा होते! ते आपली 'सोय' करून घेतल्याशिवाय सत्ता सोडणार नाहींत अशा बातम्याही येत आहेत.
मुबारक हेही हवाईदलातील उच्च अधिकारी होते व १९७३च्या युद्धाचे 'हिरो' होते!
बघू पुढे काय होते ते!
12 Feb 2011 - 5:47 pm | अवलिया
कै च्या कै !
मला पहा अन फुलं वहा !!
12 Feb 2011 - 9:22 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ.
असो.
13 Feb 2011 - 5:19 pm | सुधीर काळे
आगे-आगे देखिये होता है क्या!
13 Feb 2011 - 2:31 am | अविनाश कदम
इजिप्तच्या आंदोलनात असहकार वगैरे कुठे होता कळत नाही.
आर्थिक विषमता, बेकारी व भ्रष्टाचारी आणि जनतेच्या प्रती उर्मट असलेल्या वर्गाविषयी व त्यांच्या पाठीराख्या हुकुमशाही सत्तेविरुद्धचा असंतोष अभिव्यक्त करण्यासाठी एकत्र येण्याचा एक मार्ग जनतेने स्विकारला. लाखोंनी एकत्र येऊन येवढ्या व्यापक प्रमाणात व्यक्त केलेला असंतोष (अहिंसक मार्गाने) व त्यातून पुढे आलेली मुबारकच्या राजिनाम्याची मागणी ही घटनाच सत्ताधार्यांना हादरवून गेली. अर्थात हे पहिलं पाउल आहे अजून बराच पल्ला गाठायचा आहेच.
13 Feb 2011 - 8:29 am | सहज
असहकार तत्व यातला 'सिव्हील' डिसओबीडियन्स भाग खरोखर या इजिप्त मधील चळवळीतील उल्लेखनीय भाग वाटला.
मोठ्या प्रमाणावर जनता सार्वजनीक जागी येते तेव्हा एक प्रचंड कचरा, पसारा झाला असतो, त्याची विल्हेवाट ह्या आंदोलनकर्त्यांनी स्वताची जबाबदारी समजुन साफ करणे. (थायलंडमधे आंदोलनकर्त्यांनी बँकाकचा विमानतळ ताब्यात घेतला होता, त्यांच्या टिव्ही कव्हरेजमधे आजुबाजुला दिसत असलेला कचरा त्यापार्श्वभूमीवर हे उल्लेखनीय)
आंदोलनात जेव्हा मुबारक यांच्या सत्ताधारी पक्षाचे कार्यालय जाळले गेले तरी मोठ्याप्रमाणावर खाजगी मालमत्ता, गाड्या, सरकारी कार्यालये, उपकरणे जाळपोळ करण्यात आंदोलनकर्त्यांनी आपले आद्य कर्तव्य मानले नाही. उलट इजिप्तमधील लायब्ररीज, म्युझीयम यांचे रक्षण करण्यासाठी पहारा दिला. (ट्युनिशीया, इराक मधील सामान्य जनतेच्या वर्तनापेक्षा वेगळे दृश्य)
इजिप्त मधे सकारात्मक बदल घडवून आणायची इच्छा या जनआंदोलनात दिसली पण यापुढे काय होइल हे काळच ठरवेल.
२००९ मधील इराणमधील निवडणू़कांनंतर झालेली प्रदर्शने , ट्युनिशीया मधील सत्ताबदल, इजिप्तमधील मुबारकविरोधी आंदोलन म्हणले तर एकमेकांशी तसा संबध नसलेली आंदोलने. म्हणले तर एकमेकांपासुन थोडीशी प्रेरणा घेतलेली किंवा चुकांपासुन शिकलेली वाटतात.
अरब जगतात सर्वत्र असंतोष व जनआंदोलने जगाला परवडणारी नाहीत असेच वाटते.
इजिप्त मधील जनतेला शुभेच्छा!
14 Feb 2011 - 8:30 pm | सुधीर काळे
-- Egypt military says it has dissolved parliament, suspended constitution, will run country for 6 months or until elections
CNN Breaking News
वरील बातमी वाचल्यावर अनेक हुकुमशहांच्या 'कुदेता'नंतरच्या अनेक पहिल्या-वहिल्या भाषणांची आठवण झाली. हे भाषण त्या सर्व आधीच्या भाषणांना अपवाद ठरो! इडा-पिडा टळो.....!
लक्षणे कांहीं चांगली दिसत नाहींत.
14 Feb 2011 - 10:00 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
14 Feb 2011 - 11:18 pm | अविनाशकुलकर्णी
हे कसे वाट्चाल करतात ते पहाणे महत्वचे
14 Feb 2011 - 11:32 pm | घाटावरचे भट
बिना असहकार नहीं उद्धार....
(आम्हाला यापेक्षा जास्त वैचारिक प्रतिक्रिया देता येत नाहीत)
15 Feb 2011 - 7:54 am | राजेश घासकडवी
जनतेचा असंतोष वाढत गेला की चॅनेलाइज व्हायला एखाद्या माध्यमाची गरज पडते. भारतात ते गांधी असतील, इजिप्तमध्ये इंटरनेटने आणलेल्या माहिती व परस्परसंबंधांमुळे ते आलं असेल. एकदा का ते माध्यम सापडलं की जागृत जनता बाणासारखी लक्ष्याच्या दिशेला अलाइन होते. (बाह्य चुंबकीय परिमाणाखाली लोखंडाचे कण अलाइन होतात त्याची आठवण झाली). मग जुलमी सरकारच्या शक्तिस्थानाशी (सैन्य, पोलिस) सामना करण्याऐवजी, आपल्या शक्तीस्थानावरून (सरकार चालण्यासाठी सरकार जनतेवर विसंबून असते) लढा देणं कधीकधी अधिक परिणामकारक ठरतं.
इजिप्तमधल्या या चळवळीतून तिथल्या जनतेचं तसंच इतरही एकाधिकारशाही पीडित जनतेचं भलं होवो ही शुभेच्छा.
16 Feb 2011 - 3:20 pm | सुधीर काळे
ट्युनीशिया आणि इजिप्तमध्ये ऐतिहासिक राज्यक्रांती झाली त्यातून दोन्ही राष्ट्रांत आणि मध्यपूर्वेतील इतर राष्ट्रांत लोकशाही पद्धतीची राज्यव्यवस्था यावी असे कुठल्याही लोकशाहीप्रधान राष्ट्रातील लोकांना वाटेल.
अमेरिकेतील यूएसए टुडे आणि गॅलप या लोकमताची चाचपणी घेण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या संघटनेने घेतलेल्या चाचपणीत अमेरिकन लोकांचे मत जवळ-जवळ ५०-५० असे दुभागलेले आहे असे आढळून आले.
Americans are about evenly divided, 47% to 44%, in their views of whether the events in Egypt will result in democracy taking hold in other Middle Eastern countries. There is also no consensus as to whether the situation in Egypt will help create peace in the broader Middle East region or aid U.S. anti-terror efforts.
सविस्तर वृत्तांत वाचा http://tinyurl.com/5sfl6lo या दुव्यावर!
हे अमेरिकन लोकांचे मत आहे. इतर मतप्रवाहही वाचायला आवडेल.
16 Feb 2011 - 5:28 pm | विकास
बहरीन आणि इराण मध्ये देखील निदर्शने चालू आहेत. सर्व मध्यपूर्वेतील सत्ताधीश सध्या (स्वतःच्या) काळजीत पडले आहेत. This could be heaven and this could be hell! :-)
अवांतरः
अमेरिकन लोकांचे मत जवळ-जवळ ५०-५० असे दुभागलेले आहे असे आढळून आले.
मला वाटतयं अमेरिकन लोकांची मतभिन्नता ही इजिप्त नक्की कुठे आहे अथवा इजिप्त म्हणजे नक्की काय आहे या संदर्भात असावी! ;)
असो. कल्पना आहे की जरा अतिशयोक्ती आहे. पण इथल्या सर्वसामान्य माणसास बर्याचदा उर्वरीत जगातले काहीच माहीत नसते, असे पाहीले आहे. अगदी वैयक्तीक उदाहरणः माझ्या बरोबर गेले काही वर्षे काम करणारी एक मॅनेजर माझी चांगली सहकारी आहे. खूप स्मार्ट आहे वगैरे. तीला मी कायम भारतात जात असतो हे तिथून आणलेल्या गिफ्टस वरून देखील माहीत आहे. कधी कधी काही सणवार पण बोललेलो असेन... तरीदेखील मधे तिने मला विचारले त्यावरून समजले की तीला मी इजिप्तमधला वाटतो! आता हे अगदी टोकाचे उदाहरण समजू नका. बॉस्टन सारख्या भागात ही अवस्था आहे, इतर ठिकाणचे विचारूच नका. न्यूयॉर्क टाईम्सने क्लिंटनच्या काळात जेंव्हा एक सर्वे केला होता, तेंव्हा लक्षात आले की अनेकांना "मॅडलीन आलब्राईट" नामक व्यक्तीच माहीत नव्हती. तिथे इजिप्तचे कशाला बोला....;) अर्थात हे सर्वसामान्यांचे झाले. मात्र इथले जे जाणते असतात त्यांचे ज्ञान/माहीती आश्चर्यकारक (अमेझिंग) असते हे देखील तितकेच वास्तव आहे आणि अशांच्या जीवावरच हा देश पुढे जात आहे.
16 Feb 2011 - 5:35 pm | विजुभाऊ
काही दिवसांपूर्वी १४ फेब्रुवारीला पेट्रोल विकत घेउ नका . पेट्रोल विकत घेतले नाही तर पेट्रोलिअय कंपन्याना जरब बसेल असे आवाहन करणारे एक इमेल फिरत होते.
तो सुद्धा एक असहकाराचा प्रकारच होता.
असहकार हा गांधीनी शोधलेला प्रकार नसून त्यानी त्याचा वापर मात्र करून घेतला.
काही लोकांचे गांधी द्वेष्तेपणाचे प्रतिसाद या धाग्यावर का आले असावे याचा अंदाज करणे अवघड आहे.
त्यान बहुधा जळीस्थळी गांधी दिसत असावेत
16 Feb 2011 - 8:24 pm | प्रदीप
मूळ चर्चाप्रवर्तकास ह्या सर्व एपिसोडमध्ये गांधी दिसले, तेव्हा गांधी विरोधकांना आयतेच खाद्य मिळाले ना?
-- (नितीन थत्ते, चर्चा मांडतांना )
ह्यावरून जी. ए. च्या एका कथेतील एक तिरकस उल्लेख आठवला. कोण्या एका आजोबांना अगदी नातीचा शेंबूडही धोतराच्या सोग्याने पुसता पुसता जगात सगळीकडे कसे मांगल्य भरून राहिले आहे, असे काहीसे वाटत रहाते!
16 Feb 2011 - 8:24 pm | प्रदीप
मूळ चर्चाप्रवर्तकास ह्या सर्व एपिसोडमध्ये गांधी दिसले, तेव्हा गांधी विरोधकांना आयतेच खाद्य मिळाले ना?
-- (नितीन थत्ते, चर्चा मांडतांना )
ह्यावरून जी. ए. च्या एका कथेतील एक तिरकस उल्लेख आठवला. कोण्या एका आजोबांना अगदी नातीचा शेंबूडही धोतराच्या सोग्याने पुसता पुसता जगात सगळीकडे कसे मांगल्य भरून राहिले आहे, असे काहीसे वाटत रहाते!