वनराणी ..५

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
1 Feb 2011 - 10:29 am

वनराणी..४
आश्रमाच्या पाकगृहात मी अजून प्रवेश नाही केला आहे. वासंतिका ..!! मनू ऋषींच्या अर्धांगिनी, गुरूभार्याच म्हणायला हवं वास्तविक!; त्या पाकगृह सांभाळतात. माझं भोजन पत्रावळीवर वाढून ठेवतात.. मग मी आणि साऊ दोघी भोजन करतो. मुनीवरही आवर्जून विचारपुस करतात माझी. काय कमी आहे इथे? काहीच नाही. मा', बा' तुम्ही दोघे एकदा येऊन बघा.. तुमची शबरी इथे एका ऋषींच्या आश्रमात राहते आहे. रोजचे स्त्रोत्रपठण ऐकते आहे. आप, तेज, पृथ्वी , वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या साक्षीने तिच्या आयुष्याचं ध्येय शोधते आहे.

पुढे वाचा************

"एऽऽऽ साळू....! धाव ..धाव..धाव !!..." साळू आणि मी नदीच्या काठावरून पळत निघालोय.. मी तिच्या मागे पळतेय. साळू खूप जोरात धावते. मला नाही जमत तिच्या बरोबरीने धावायला. नदीकाठची रेती पायांना उगाचच गुदगुल्या करतेय. "शबरी.. तू धाव ना. धाव धाव... मला पकड.. धाव धाव!" "साळू इतकी जोरात नको गं धाऊ.. साळू साळू...! साळू... मी पडतेय.. पडतेय... आऽऽऽऽ!!!" साळू मुखावर पाणी शिंपडते आहे माझ्या. "शबरी.. एऽऽ.. उठ ना गं..! शबरी!!"

माझ्या मुखावर हे पाणी कुठून आलं?? साळू... साळू.... साऽऽऽळू!! साळू कुठे गेली?? इथेच तर होती.. आणि गोर्‍हा...!! ही इथे काय करतेय? आणि हे चेहर्‍यावर पाणी?? "गोर्‍हा.. नदीत डुंबून आलीस वाटतं आणि इथे येऊन शेपूट झटकलस... आणि माझ्या मुखावर पाणी!!हं! "

पण मला अशी अवेळी निद्रा कशी यावी?? इतकी गाढ?? मुनीवर संध्येसाठी बसतील थोड्यावेळात.. गोर्‍हाला साऊजवळ नेऊन बांधते आधी. पण आज.. निद्रा.. अशी!! ती ही इतकी गाढ?? आणि स्वप्नं पडावं ते ही साळूचं?? कशी असेल साळू? तिचा विवाह आधीच झाला होता. माझा नि भोराचा ठरायच्या अधीच!! पण नंतर ती कधीच कशी नाही आली?? तिच्या घरी बरी असेल ना? मी, चंपा आणि साळू आम्ही एकमेकीच्या अगदी जवळ होतो. साळूचा विवाह ठरल्यावर, आम्ही तिघींनी मिळून मातीची भांडी बनवली होती. ती रेतीच्या भट्टीत शेकली होती.. नंतर पांढरी रेती आणि गोंद आटवून त्या भाड्यांवर फ़ुला पानंची नक्षी काढली होती. ते दिवस सुवर्णाचे होते. मा'-बा'ना आमचं किती कौतुक वाटलं होतं. साळू.. माझी वाघिण!! दिसायलाही रूपवान! केतकी इतकी नाही.. पण माझ्या आणि चंपापेक्षा छान!!

एका अर्थाने साळूच कारणीभूत आहे माझ्या इथे येण्याला. ही साळू अशीच एकदा धावता धावता करवंदीच्या जाळीमध्ये जाऊन पडली . सगळे काटेकुटे टोचले होते अंगाला. तिला त्या जाळीतून बाहेर काढेपर्यंत माझा जीव दमून गेला होता. जेव्हा हीला बाहेर काढलं तेव्हा मात्र तिच्या हातापायात, दंडात पाठीत आणि कुठे कुठे.. काटे टोचले होते ते पाहून खूप वाईट वाटलं होतं मला. तिला बाहेर काढून तिच्या अंगावरचे काटे सगळे काढून टाकले.. तिला नक्कीच दुखलं असेल. तिला तशीच धरून धरून मी नदीच्या काठी एका दगडावर बसवलं. साळूला लागलं होतं खूप पण डोळ्यांत अश्रू नाहीत तिच्या.. !! कापर्‍या आवाजात म्हणाली "शबरी..जाऊन वैदूआप्पा कडून औषध घेऊन ये.. मला चालता येत नाहीये." मनांत आलं ,'वैदूआपा!! पण तो तर पाड्यावर आहे. पाड्यावर जायला एक घटिका तरी लागेल.. तोपर्यंत ही साळू अशी .. या अवस्थेत!! छे! छे!! मी नाही हिला सोडून कुठे जाणार. मीच हिला चालवत नेऊ का?' इतक्यात साळूकडे लक्ष गेलं तर ती मुर्छीत झाली होती. काय करावं असा विचार करत असतानाच तिथे नदीच्या पाण्यामध्ये शिरणारे एक ऋषी दिसले मला. मी धावतच त्यांच्यापाशी गेले.
"प्रणाम स्वामी! माझी सखी करवंदीच्या काट्यांमुळे जखमी झाली आहे. ती ग्लानीत आहे आत्ता. मला तिला पाड्यावर घेऊन जायचे आहे .. कृपा करून मला सहाय्य कराल का?"
ऋषींनी एक कटाक्ष टाकला माझ्याकडे .. साळूकडे पाहिले, आणि म्हणाले.."दूर हो.. !! आमच्या समीपही येऊ नकोस. आम्ही अर्घ्य देण्यास आलो आहोत इथे." ऋषी क्रोधीत झाले होते. थोडी भिती वाटली.. पण साळूची अवस्था...! काय करावं सुचत नव्हतं.
"स्वामी... ती कष्टी आहे.. थोडं सहाय्य करण्याची कृपा करा. आपल्या कार्यात बाधा नव्हती आणायची.. पण स्वामी.. तिला घेऊन जाणं माझं कर्तव्य आहे. ती जखमी आहे.. ग्लानीत आहे. आपल्या ईश्वराच्या मनांतही तेच असेल म्हणून या वेळी आपणांस त्याने इथे येण्याचा संकेत दिला आसावा." मला समजतच नव्हतं मी काय बोलत होते. कोणीतरी बोलवून घेत होतं का हे सगळं माझ्याकडून?? पण हा विचार या क्षणी करण्याची ती वेळ नव्हती.. या क्षणी फ़क्त साळू डोळ्यांपुढे होती. स्वामी माझ्याकडे रोखून पहात होते.
"कन्ये.. जे काही आत्ता तुझ्या मुखातून बाहेर पडले, तीच त्या परमेशाची इच्छा असेल. मी सांगतो तसे कर, तिथे नदीच्या काठी काही 'कुमारी'ची रोपं आहेत. त्या रोपांची नागाच्या फ़णीसारखी पाने घेऊन ये काही. त्याच्या आतला रस लाव तुझ्या सखीच्या जखमांवर. काही काळातच तिच्या जखमांचा दाह कमी होईल आणि ती ग्लानीतून बाहेर येईल. मग तिला घेऊन घरी जा.. निघ आता!" असे म्हणून स्वामींची पाठ फ़िरताच मी धावतच 'कुमारी'च्या रोपांकडे गेले, तिथून काही फ़ण्या आणल्या काढून आणि एका दगडाने त्याला छेद देऊन त्याच्या रस आणि आतल मांसल भाग तिच्या जखमांवर लावू लागले. स्वामीजी ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देत होते.
हळूहळू साळू जागी झाली आणी उठून बसली. तिच्या जखामांचा दाह कमी झाला होता. तिच्याशी काही बोलणार इतक्यातच.."कन्ये.. आज जे काही आपलं संभाषण झालं, त्यावरून इतकंच सांगतो... तो परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या जीवनाचं ध्येय कदाचित ईशप्राप्ती आहे. सुखी भव!!" असं म्हणून स्वामी भराभर चालत निघूनही गेले.

आम्ही लहान होतो. स्वामीजी जे काही बोलले त्यातलं फ़ार समजलं असं नाही मात्र .. ते .. जीवनचे ध्येय.. ईशप्राप्ती.. वगैरे.. हे मात्र कायमच लक्षात राहिलं. आणि हो.. कदाचित म्हणूनच मी जसजशी मोठी होऊ लागले तसतशी ईशप्राप्ती म्हणजे नेमकं काय? ईश म्हणजे ईश्वर ना.. मग तो सगळ्यांचा असतो की फ़क्त ऋषीमुनी, तपस्वी यांचा असतो. 'भैरोबा' ला रोज म्हादू शेंदराने माखून, बोकडाची बळी चढवितो. तो आमचा ईश्वर, तर मी त्याला मी प्राप्त करणार का? 'भरोबा' तर पाड्यातच आहे. तो तर रोजच दिसतो. मग?? मग या ऋषीमुनींचा, तपस्वींचा परमेश्वर .... म्हणजे त्यांचा ईश्वर मला प्राप्त होणार का? पण मग तो कुठे सापडेल मला? त्याला शोधू म्हणजे नक्की काय शोधू आणि कुठे शोधू? ... हो.. !! बरोबर... कदाचित तेव्हापासून आपण काहीतरी शोधत होतो. नक्की काय शोधत होतो.. हे समजत नव्हतं. पण मन भरकटत होतं हे नक्की. स्वामी बोलले .. आणि जणू माझी जीवनरेखाच बदलली गेली. आणि अशी भरकटत भरकटत त्या ईश्वराला शोधत मी आज मुनीवरांच्या आश्रामात गेली पाच संवत्सरं ईशप्राप्तीचा मार्ग शोधते आहे.

कथाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

छान रंगलाय भाग प्राजुताई!

प्राजु's picture

1 Feb 2011 - 10:37 am | प्राजु

कुमारी : कोरफड.

हा भाग छोटा असला तरी आवडला :) मस्त लेखन

-टाऋषी

कच्ची कैरी's picture

1 Feb 2011 - 11:13 am | कच्ची कैरी

याआधीचे भाग मी वाचले नाहीत याचा पश्चाताप होतोय कारण हा भागही मस्त वाटतोय.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Feb 2011 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार

प्राजुतै सुंदर लिहिते आहेस, एकदम रसाळ.
पु.भा.प्र.

sneharani's picture

1 Feb 2011 - 2:17 pm | sneharani

प्राजुताई मस्त लिहल आहेस!
:)

आता तुला लिखाणाच्या या विभागातही करियर करायला हरकत नाही. :)
सुंदर लिहितेस.

प्राजु's picture

1 Feb 2011 - 8:49 pm | प्राजु

धन्यवाद.!
अरे गणपा..! कसलं करियर अन काय रे! उगाच काहीही काय!!

अवलिया's picture

2 Feb 2011 - 1:29 pm | अवलिया

मस्त लेखन चालू आहे.. !! :)

यात अजून भर टाकून फक्कडशी कादंबरी लिहुन टाक प्राजु !

काल आईला सांगताना आई सुद्धा हेच म्हणाली , नाना!
पण, एकतर शबरीची कथा म्हणजे फक्त एक वन लायनर आहे..
तिच्या भोवती काल्पनिक कथानक गुंफायचं.. म्हणजे खरंच शिवधनुष्य आहे!
आणि कादंबरी मी लिहावी.. इतकं प्रगल्भ लिखाण माझं नाही!! आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे तेवढे पेशन्सही नाहीत.
पण.. विचार चालू आहे. बघूया.
आपल्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद नाना!

ज्ञानराम's picture

3 Feb 2011 - 10:00 am | ज्ञानराम

अप्रतिम.......