सिनेमा...सिनेमा!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
22 Jan 2011 - 5:10 pm

`भानुविलास' टॉकीजची परवाच्या अंकातली बातमी आणि आजचा म.टा.मधला अभिजित थिटेचा लेख वाचून माझ्याही आठवणींना धुमारे फुटले.
अभिजितनं "भानुविलास'च्या आठवणी छानच जागवल्या आहेत. आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात. आपल्या बालपणाच्या वेळची शाळा, मित्र-मैत्रिणी, घरं, रस्ते, ते वातावरण, तो गणवेश, सगळं सगळं तसंच राहावंसं वाटत असतो. आपण मात्र खूप बदललेलो असतो. आणि ही बदललेली स्थिती आपल्याला सोडायची नसते. पण जुनंही सगळं हवंहवंसं वाटत असतं. "आम्ही लहान होतो ना, तेव्हा...' अशी आपली टेप सुरू झाली, की ती सध्याची पिढी कशी नालायक आहे आणि आपण कसे ग्रेट होतो, या तात्पर्यापर्यंत आल्याशिवाय थांबतच नाही! माझं गाव, माझं बालपण, माझ्या छोट्या-छोट्या गरजा...सगळ्याचं दळण दळायला आपल्याला फार आवडतं, पण पुन्हा त्या परिस्थितीत कुणी नेऊन ठेवतो म्हटलं, की लगेच आपण दोन पावलं मागे येतो. तर ते असो!
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे "भानुविलास'वरून मला झालेली आमच्या रत्नागिरीतल्या "लता टॉकीज'ची आठवण. हेदेखील तिथलं "भानुविलास'च. अगदी, राजा गोसावींनी तिथे काम केलेलं नसूदे. पण आमच्या लेखी त्याचं माहात्म्य "भानुविलास'एवढंच! रत्नागिरीत तीन थिएटर होती. त्याआधी दोन होती. एक नाटकाचं थिएटर होतं. त्याचं नंतर "श्रीराम' चित्रमंदिर झालं. माझ्या लहानपणापासून मी लता, श्रीराम आणि राधाकृष्ण ही तीन थिएटर्स पाहत आलो आहे. "राधाकृष्ण'चा दर्जा जरा उजवा. तिथे नवे हिंदी सिनेमे लागायचे. नवे म्हणजे मुंबई-पुण्यातल्या रिलीजच्या नंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी आलेले. त्याचं तिकीटही इतरांपेक्षा जरा जास्त होतं. "जरा' म्हणजे "जरा'च! मी कॉलेजात असताना, म्हणजे 90च्या दशकाच्या सुरुवातीलाही तिथलं सर्वांत जास्त तिकीट होतं सहा रुपये! तेदेखील आम्हाला जास्त वाटायचं. असो.
त्यानंतर "श्रीराम'चा नंबर लागायचा. इथे साधारणतः बरे मराठी किंवा दुय्यम दर्जाचे हिंदी सिनेमे लागायचे. कधीकधी तर "राधाकृष्ण'ला खूपच नवा आणि गाजलेला सिनेमा लागलेला असेल, तर "श्रीराम'लाही तोच लावला जायचा. गंमत म्हणजे, दोन्हीकडे रीळ एकच असायचं आणि सिनेमाच्या खेळाच्या वेळा बदलून मग मधल्या वेळेत एक रीळ संपल्यावर ते शेजारच्या "श्रीराम'मध्ये नेलं जायचं. गंमत होती सगळी.
नंतर नंतर हॉलिवूडचे सिनेमे भारतात डब होऊन यायला लागल्यानंतर त्यांनाही "श्रीराम'चाच बऱ्याचदा आश्रय मिळत असे. नाहीतर हमसें ना टकराना, मुकद्दर का बादशहा, जीते हैं शान से, वर्दी, कानून क्‍या करेगा, अशाच चित्रपटांशी "श्रीराम'च्या पडद्याची गट्टी जमायची. "श्रीराम'ने एखाद्या चित्रपटाचा दुसरा आठवडा पाहिलाय, असं क्वचितच झालं असेल!
"लता'चा नंबर तिसरा होता. एक तर हे थिएटर खूप छोटं होतं. साधारणतः सहाशे ते सातशे क्षमतेचं असावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे तिकीट अगदी कमी होतं. माझ्या लहानपणी एकदा त्याचं "रिनोवेशन' झालं, त्यानंतरचं तिकीट होतं एक, दोन, तीन आणि चार रुपये! आमच्याकडे कमल नावाची मोलकरीण होती. तिलाही इथेच सिनेमा बघायला परवडायचं! एक रुपयात! त्या वेळी एक रुपया ही तिची एका घरची दिवसाची कमाई होती!! मी कॉलेजात असतानाही अनेकदा इथे साडेचार ते पाच रुपयांत सिनेमे पाहिले आहेत! "लता' म्हणजे मराठी सिनेमांचं माहेरघर होतं. नवे हिंदी सिनेमे इथे लागलेले मी क्वचितच पाहिलेत. अनेकदा इंग्रजी ढिशूम ढिशूम छाप सिनेमेही लागायचे.
लता टॉकीजमध्ये मी "फुकट चंबू बाबूराव', "जखमी वाघीण', "ठकास महाठक' असे अनेक सिनेमे पाहिलेत. "आज का अर्जुन'ही इथेच पाहिलेला. "लता'मध्ये एक छोटी बाल्कनीदेखील होती. "राधाकृष्ण' आणि "श्रीराम' ही मोठी थिएटर असूनही, तिथे बाल्कनीची सोय नव्हती. त्याउलट "लता'मध्ये ही लक्‍झरी मिळायची. ही बाल्कनी जेमतेम पाच ते सहा रांगांची होती. आपल्या "लक्ष्मीनारायण'च्या "मॅजेस्टी'पेक्षा थोडीशी मोठी. शिवाय तिथे पुढे (माझ्यासारखा) उंच माणूस बसला, की मागच्याला दिसायचं नाही. मग त्याला वाकून, दोन खुर्च्यांच्या आणि डोक्‍यांच्या मधून कसाबसा सिनेमा पाहायला लागायचा. मग मागच्याला दिसावं म्हणून मला खुर्चीत जवळपास झोपूनच सिनेमा पाहण्याची शिक्षा होत असे. (परवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये फुकटात आर-डेक्कनमध्ये बसून (झोपून) सिनेमा पाहिला, तेव्हा ही शिक्षा नाही, हे कळलं! असो.)
घरच्यांच्या धाकात त्या वेळी सिनेमा बघणं म्हणजे दुर्मिळ मेजवानीच असायची. साधारणपणे अकरावीनंतर आम्ही घरच्यांना न जुमानता, न सांगता आणि न सांगण्यासारखे (!) सिनेमे बघायला सुरुवात केली, तेव्हा "लता' आणि "श्रीराम'चाच मोठा आधार मिळाला. "लता'ला तेव्हा इंग्रजी ऍडल्ट सिनेमे लागायला सुरुवात झाली होती. ग्रुपनं जाऊन सिनेमावर भरपूर कॉमेंट करत तो पाहणं हा मोठा सोहळा असे!
चौथीत असल्यापासूनच सिनेमाची गोडी...गोडी कसली, व्यसनच म्हणा...लागलं होतं. शाळेपासून थिएटर जवळच असल्यानं मी आणि एक मित्र मधल्या सुटीत पळून थिएटरवर सिनेमाची पोस्टर बघायला जायचो. "राधाकृष्ण'मध्येच तिथे आणि "श्रीराम'मध्ये लागलेल्या सिनेमातली पोस्टर खिडकीतून दिसायची. "पोस्टर' म्हणजे मोठी नव्हेत. साधारण ए-3 आकाराची, एका काचेच्या चौकटीत लावलेली सिनेमातल्या दृश्‍यांची चित्रं. आता आपण टीव्हीवर "प्रोमो' पाहतो ना, त्याचं छायाचित्ररूप. ती बघून आम्ही तो सिनेमा "भारी' आहे की नाही, हे ठरवायचो. "लता'मध्ये मात्र ही सुविधा नव्हती. तिथे पोस्टर असायची, पण ती बाहेरून तिकीट न काढता दिसायची नाहीत. सिनेमासाठी तिकीट काढून आत गेल्यावरच ती पाहता येत असत. मग सिनेमा सुरू व्हायच्या आधी आणि मध्यंतरातही ती पोस्टर पाहून, कुठला सीन दाखवायचा राहिलाय, याची शहानिशा मी करायचो.
"लता'चे मध्यंतरी काही वाद झाले. त्यानंतर थिएटर बंद पडलं. मग तिथे वेगवेगळी प्रदर्शनं भरायला लागली. आता तर तिथे कायमस्वरूपी कार्यालयच झालं आहे!

आपल्या बालपणातली आठवणींची एकेक स्मारकं उजाड, भकास होताना पाहिली, की काळजात कुठेतरी चरचरतं...

मुक्तकआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

22 Jan 2011 - 6:06 pm | स्वानन्द

छान!

>>आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात.
:)

नन्दादीप's picture

22 Jan 2011 - 6:19 pm | नन्दादीप

मस्त...
मी श्रीराम आणि राधाकृष्ण बघितली आहेत... लता बद्द्ल फारशी माहिती नाहे....असो...मस्त लेख..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jan 2011 - 6:33 pm | निनाद मुक्काम प...

खरच आठवणी ताज्या झाल्या ह्या लेखाने
डोंबिवलीतील टिळक असेच माझा बालपणीच्या आठवणीचा ठेवा आहे .
अमिताभ चे जवळपास सर्व सिनेमे ८०च्य दशकातले इथेच पहिले .
मराठी व हिंदी सिनेमे नवे येथे न चुकता लागायचे .
अशीही बनवाबनवी /गंमत जम्मत /झपाटलेला असे किती तरी सिनेमे इथे पहिले .खास करून गंम्मत जम्मत हा सिनेमा खूप आठवड्याने जेव्हा जाणार होता तेव्हा प्रेक्षकांच्या आग्रहास्तव शेवटचा खेळानंतर हा सिनेमा
१२ ते ३ वाजता परत दाखवला गेला .
तर कयामत से कयामत ते मैने प्यार किया हे अनुक्रमे ३ री व ५ वीत पाहून शाळेतील पपी लव जे त्याकाळच्या पांढरपेशा मध्यमवर्गीय समाजात पापी समजल जायचे .त्याची प्रेरणा मिळाली .
-आजही ती पिवळी तिकीट आठवतात .इंटर्वल ला मिळणारा तेलकट सामोसा नि बटाटेवडे जोडीला थांम्स अप / गोल्ड स्फोट किंवा लिमका सोबतीला क्वालिटी आईस क्रीम व पॉप कोर्न आथवतात .
बाल्कनीचे तिकीट मिळाले नाही तर कधी पितात बसायचे नि मग कोमेंट/शिट्या ह्यांच्या आवाजात शिनेमा पहाणे म्हणजे काय तर ज्या गोष्टी मध्यमवर्गीय सामान्य पामर करू शकत नाही त्या नायकाने रुपेरी पडद्यावर
बिनदिक्कत पणे करताना पाहून क्षणभर आपले क्षणभंगुर आयुष्य विसरून स्वताला नायकाच्या जागी पाहून शृंगार /वीर /करुण अश्या अनेक रसामध्ये चिंब ओलते व्हायचे .
नि शिनेमा संपतांना गर्दीतून टोकीज ते घर असा प्रवास एका कैफात पार पाडत जाणे.
ह्या सर्व गोष्टी आता मल्टी प्लेक्स च्या श्रीमंती बडेजावात कुठेतरी विसरल्या गेल्या आहेत .
राजेश खन्ना /अमिताभ ते अगदी दिलीप /राज /देव ह्या त्रीमृर्ती खर्या अर्थाने भाग्यवान
कारण रसिकांचे जीवापाड प्रेम मिळायचे .सध्या रजनी सोडल्यास इतर कोणत्याही ताऱ्यांच्या नशिबी हे भाग्य नाही .

चिगो's picture

22 Jan 2011 - 8:01 pm | चिगो

"पोस्टर' म्हणजे मोठी नव्हेत. साधारण ए-3 आकाराची, एका काचेच्या चौकटीत लावलेली सिनेमातल्या दृश्‍यांची चित्रं. आता आपण टीव्हीवर "प्रोमो' पाहतो ना, त्याचं छायाचित्ररूप. ती बघून आम्ही तो सिनेमा "भारी' आहे की नाही, हे ठरवायचो.

हे असंच आम्हीपण करायचो. मी पाहीलेला शेवटचा असा पिक्चर म्हणजे "कहो ना प्यार है".. आता हे सगळं बंद झालंय. आमच्या गावात एक टपरी थियेटर होतं. तिथं खाली बसून पण पाहीलेत पिक्चर.. गर्दीच्या चित्रपटांना लय मारामारी असायची. चांगली जागा नाही भेटली तर पडद्याच्या नी आमच्या मध्ये खांब येवून "दुभंगीत" पिक्चर पहायला लागायचा... ;-)

उल्हास's picture

22 Jan 2011 - 9:41 pm | उल्हास

कॉलेज बुड्वुन सिनेमा बघायला जायचो
जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या

श्रावण मोडक's picture

23 Jan 2011 - 1:54 pm | श्रावण मोडक

बेळगावातली 'थेट्रं' आठवली. नावंही आठवतात - आझाद, चित्रा, रिझ, रेडिओ, हंस, स्वरूप, प्रकाश, ग्लोब, रेक्स, रुपाली, कपील, श्रीकृष्ण, बाळकृष्ण ही मूळची तेरा. मग अरूण, त्यानंतर नर्तकी. त्यापुढं बेळगावचा संबंध संपला.
'आझाद'मध्ये अमरशक्ती, 'कपील'मध्ये मुकद्दर का सिकंदर, 'रुपाली'त छोटा चेतन, 'बाळकृष्ण'मध्ये सॅव्हाज हार्वेस्ट, 'हंस'मध्ये एक डाव भुताचा पाहिल्याचं आठवतं. 'अरूण' परवडण्याची क्षमता आली तेव्हा बेळगाव सुटणार हे नक्की झालं होतं. सुरवातीला तिथला बाल्कनीचा दरच मुळी साडेतीन रुपये असा काहीसा होता. बाकीच्यांचे तिकिटांचे दर ९० पैसे, १.३५ रुपये, १.८० आणि २ किंवा २.२५ रुपये असे काहीसे. अर्थात, रुपयाची नोटही नसायची त्या काळी हा भाग वेगळा. जेव्हा मिळायची तेव्हाचा पिक्चर पाहण्यातला आनंद अर्थातच वेगळा.
आझाद, चित्रा, रिझ, रेडिओ ही एक मालिका. मला वाटतं, कृष्णराव हरिहरांची. म्हणजे रिझ तर नक्की त्यांचंच. बाकीची तीनही त्यांच्या काळात होती की नाही हे ठाऊक नाही. श्रीकृष्ण, बाळकृष्ण आणि कपील हे शेजारी. बोगारवेशीत. स्वरूप, प्रकाश आणि नर्तकी हेही शेजारीच; पण शहापुरातले. रुपाली पार लांब, धारवाड रोडवर. एकटंच. तीच गोष्ट 'रेक्स'ची. तेही एकटंच, बोगारवेशेतून जाताना कित्तुर चन्नम्मा चौकाच्या अलीकडं. हंस आणि चित्रा ही शेजारी, भर गावात. बोगारवेशेतून पुढं बाजाराच्या दिशेनं मैलभर अंतरावर असावीत. आझाद आणि अरूण टिळकवाडीत तर ग्लोब स्टेशनाजवळ. रेडिओही तसे स्टेशनाजवळच. रिझ त्याच्या जवळच कुठं तरी.
'ग्लोब'मध्ये रिटर्नचे इंग्रजी चित्रपट लागायचे. हंस मराठीसाठी. चित्रा कानडीसाठी. अरूण हे गावातलं पहिलं ७० एमएमचं थिएटर. तिथं 'शान'चा कल्लोळ झाल्याचं आठवतं.
या थिएटरांची जातकुळी होती. ग्लोब, आझाद ही अगदी कनिष्ठवर्गीय. कामगार, मजूर. बाळकृष्णमध्ये इंग्रजी पिक्चर लागायचे म्हणून ते वरच्या वर्गातलं, एरवी त्याचा अंगाबोंगा असाच कनिष्ठ. आकारही तोकडाच. रेडिओ, रिझ ही कनिष्ठ मध्यमवर्गीय. खासगी पेढीवर कारकुनी करणाऱ्याच्या स्तरासारखी. हंस, चित्रा, प्रकाश, श्रीकृष्ण, रुपाली, स्वरूप हीही त्याच माळेतली, पण सरकारी किंवा बँकेतले कारकून म्हणावेत अशी. रेक्स म्हणजे उतरणीपासून सांभाळून राहिलेला मध्यमवर्गीय. कपील मात्र मध्यमवर्गीय. अरूण मात्र चक्क श्रीमंत. नर्तकी हा उच्च मध्यमवर्गाचा नमुना होता. त्या - त्या ठिकाणी येणाऱ्या चित्रपटांचीही स्थिती तशीच असायची. तिथल्या ब्लॅकवाल्यांचाही स्तर होता. 'अरूण'चा ब्लॅकवाला कधी 'आझाद'मध्ये दिसायचा नाही. 'आझाद'मध्ये ब्लॅकची संधीच मुळात कमी. 'कपील'ला मात्र ब्लॅक तुफान चालायचं. नर्तकी, प्रकाश हेही मागे नव्हते. 'हंस'ला ब्लॅकचा 'मान' फक्त पहिल्या आठवड्यात. नंतर नाही. 'चित्रा'मध्ये मात्र दोनेक आठवड्यापर्यंत ब्लॅक चालायचं.
आता नंतरच्या काळात या गावात आणखी थिएटरांची भर पडली आहे. पण तिथं जाणं काही जमलेलं नाही. :(

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jan 2011 - 5:53 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच!

कलंत्री's picture

23 Jan 2011 - 10:23 pm | कलंत्री

आम्ही लहानपणी नाशिकजवळच्या भगूर येथे राहत होतो. तेथे गावात असे कोणतेही चित्रपटगृह नव्हते.जवळच म्हणजे देवलाली कॅम्पच्या हद्दीवर (अंदाजे) ३ किमी दुर कॅथे नावाचे चित्रपट गृह असायचे. कधी २ वाजता चित्रपट पाहायचा असे ठरायचे आणि आम्ही चालत चालत तेथे जात असू.

जाण्यासाठी २/३ असे वेगवेगळे मार्ग होते.

अ‍ॅडेल्फी मात्र देवळाली कॅम्प मधे होते. (५ किमी) चालत चालतही कधी कधी जात असू.

मात्र कॅथेला जाण्यसाठी आम्हाला सोपे वाटत असे.

चित्रपट पाहुन आल्यानंतर त्या आठवड्याभर चित्रपटाचे रसग्रहण, रसास्वाद आणि बराच उहापोह चाले. या प्रक्रियेमध्ये ज्या कोणी चित्रपट पाहिला नसेल त्याला बरीच हळहळ वाटत असे.

त्याकाळी घरुन १ रुपया मिळत असे त्यात ०.६५ च्या तिकीट, ०.३० चा क्रिमरोल आणि ०.०५ ची शिल्लक असे समिकरण असे. ( आज माझ्या मुलाला १२५ रुपये द्यावे लागतात, त्यात ६५ रु चे तिकिट, ३५ चा मसाला डोसा आणि जाण्यायेण्यासाठी २५ रु असे द्यावे लागते, मेरा भारत महान....).

कॅथे अथवा अ‍ॅडेल्फीला चित्रपट लागल्यानंतर तो चित्रपट डब्यात जात असावा.

चित्रपट येण्याअगोदरच शहरातील चित्रपट गृहातील जाहिराती पाहुन त्यात्या चित्रपटाची पार्श्वभूमी आपोआपच तयार होत असे.

शुक्रवारी चित्रपट बदलत असे आणि अंदाजे बुधवारी भगूरमध्ये गल्लीतील पत्र्याच्या पाटीवल त्याचे पोस्तर बदललेले जाई. पोस्टर बदलत असताना गल्लीतील ५/२५ लोकांचा जमाव ते पाहण्यासाठी जमत असे.

सुदैवाने माझ्या पालकांनी चित्रपट पाहण्यासाठी कधीही मला हट्ट करायला लावले नाही. पाहिजे तेंव्हा मी परवानगी मागे आणि विनासायास मला परवानगी आणि योग्य ते पैसे मिळत असे.

आज दोन्ही चित्रपटगृहे बंद पडलेली आहे आणि सुट्टीमध्ये गेल्यावर त्या बंद झालेल्या ठिकाणी एक चक्कर मारणे असा माझा क्रम असतो हे सांगणे नलगे.

कलंत्री's picture

23 Jan 2011 - 10:26 pm | कलंत्री

आम्ही लहानपणी नाशिकजवळच्या भगूर येथे राहत होतो. तेथे गावात असे कोणतेही चित्रपटगृह नव्हते.जवळच म्हणजे देवलाली कॅम्पच्या हद्दीवर (अंदाजे) ३ किमी दुर कॅथे नावाचे चित्रपट गृह असायचे. कधी २ वाजता चित्रपट पाहायचा असे ठरायचे आणि आम्ही चालत चालत तेथे जात असू.

जाण्यासाठी २/३ असे वेगवेगळे मार्ग होते.

अ‍ॅडेल्फी मात्र देवळाली कॅम्प मधे होते. (५ किमी) चालत चालतही कधी कधी जात असू.

मात्र कॅथेला जाण्यसाठी आम्हाला सोपे वाटत असे.

चित्रपट पाहुन आल्यानंतर त्या आठवड्याभर चित्रपटाचे रसग्रहण, रसास्वाद आणि बराच उहापोह चाले. या प्रक्रियेमध्ये ज्या कोणी चित्रपट पाहिला नसेल त्याला बरीच हळहळ वाटत असे.

त्याकाळी घरुन १ रुपया मिळत असे त्यात ०.६५ च्या तिकीट, ०.३० चा क्रिमरोल आणि ०.०५ ची शिल्लक असे समिकरण असे. ( आज माझ्या मुलाला १२५ रुपये द्यावे लागतात, त्यात ६५ रु चे तिकिट, ३५ चा मसाला डोसा आणि जाण्यायेण्यासाठी २५ रु असे द्यावे लागते, मेरा भारत महान....).

कॅथे अथवा अ‍ॅडेल्फीला चित्रपट लागल्यानंतर तो चित्रपट डब्यात जात असावा.

चित्रपट येण्याअगोदरच शहरातील चित्रपट गृहातील जाहिराती पाहुन त्यात्या चित्रपटाची पार्श्वभूमी आपोआपच तयार होत असे.

शुक्रवारी चित्रपट बदलत असे आणि अंदाजे बुधवारी भगूरमध्ये गल्लीतील पत्र्याच्या पाटीवल त्याचे पोस्तर बदललेले जाई. पोस्टर बदलत असताना गल्लीतील ५/२५ लोकांचा जमाव ते पाहण्यासाठी जमत असे.

सुदैवाने माझ्या पालकांनी चित्रपट पाहण्यासाठी कधीही मला हट्ट करायला लावले नाही. पाहिजे तेंव्हा मी परवानगी मागे आणि विनासायास मला परवानगी आणि योग्य ते पैसे मिळत असे.

आज दोन्ही चित्रपटगृहे बंद पडलेली आहे आणि सुट्टीमध्ये गेल्यावर त्या बंद झालेल्या ठिकाणी एक चक्कर मारणे असा माझा क्रम असतो हे सांगणे नलगे.

गुंडोपंत's picture

24 Jan 2011 - 4:59 am | गुंडोपंत

ओपन एयरला सिनेमा पाहायला मजा यायची पण ते क्वचित व्हायचे.
नाशिकरोड मध्ये रेजिमेंटल आणि बिटको टॉकिज त्याकाळात फॉर्मात होते.
पुढे अनुराधा झाले. ते एसी म्हणून त्याची काय हवा होती, वा!
मधुकर, चित्रा दामोदर वगैरे मेनरोडच्या जवळपासची चित्रपटगृहे.
दामोदरच्या शेजारच्या चित्रपटगृहात देशभक्त कान्हेरेंनी केलेला जॅक्सनचा वध. म्हणून चित्रपट कोणताही असला तरी मला तेथे जातांना फार अभिमान वाटायचा. ते वयही तसं असेल...
(पुर्वी तेथे संगीत नाटके होत, मग तमाशे आणि मग चित्रपट - जणूकाही मनोरंजनाच्या बदलत्या काळाचा साक्षीदार!)
पण अशोक स्तंभावरच्या सर्कल विकास या जुळ्याची मजा मात्र वेगळीच.
पुढे नाशकात विजय ममता आणि महालक्ष्मी वगैरे नवी चित्रपटगृहे आली.

मूळ लेखही छान वाचायला मस्त वाटले.

आपला अभिजित's picture

24 Jan 2011 - 12:37 am | आपला अभिजित

हं...
आपल्या बालपणीच्या आठवणी नेहमीच हृदयाच्या एका कप्प्यात ठेवलेल्या असतात. विशेषतः आपल्या घडण्याच्या वयात चित्रपट आपल्यावर खूपच परिणाम करीत असतात. आपली अनेक स्वप्नं, आशाआकांक्षा आपण पडद्यावरच्या जगात सत्यात उतरवत असतो. त्यामुळेच विशेषतः या वयातलं चित्रपटाचं वातावरण आपल्यासाठी खास असावं.
असो.
सर्वांनी त्यांच्या हळव्या आठवणी सांगितल्याबद्दल धन्यवाद.
श्रावणराव,
बेळगावात मीदेखील बाळकृष्ण, नर्तकी, रेक्‍स अशा थेट्रांत सिनेमे पाहिले आहेत. बेळगाव तर वेड लावणारं शहर आहे. लहानपणी खूप मजा केलेय तिथे!
च्यायला, मोठं व्हायलाच नको होतं!

भडकमकर मास्तर's picture

24 Jan 2011 - 4:11 am | भडकमकर मास्तर

लेख आणी प्रतिक्रिया मस्तच...

अकरावीला एस्पी हॉस्टेलवरून आसपासच्या सर्व थेट्रात सिनेमे पाहायला जात असे त्याची आठवण झाली...लांब रांगेत उभं राहून ऐन वेळी खिडकी बंद होणं, प्रौढांच्या सिनेमाला जाताना दरवान अडवेल अशी धाकधूक बाळगणं वगैरे वगैरे आठवणी जागृत झाल्या...

@ अभिजित...
आणि आपल्या सिनेमा पाहण्याच्या आवडीच्या गोष्टीचं कामात रूपांतर होणं, हे नशीबवान लोकांनाच शक्य आहे....

प्रौढांच्या सिनेमाला जाताना दरवान अडवेल अशी धाकधूक बाळगणं वगैरे वगैरे आठवणी जागृत झाल्या... >>

कुठ अलका का राहुल ?

अभिदा मस्तच !!

थियेटरापेक्षा व्हिडोयो सेंटरात चित्रपट पहाण्यात अनुभवी त्यामुळे ट्यांव .