काल विकिपिडियाचा दहावा वाढदिवस जगभरात साजरा करण्यात आला. भारतात खुद्द मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी, पुणे, बंगळूरू, म्हैसूर, कोलकाता अशा नव्वदएक ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. त्यातल्या एका कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग मला लाभला. त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे:
दि पझल केकः
विकिमिडियाचे चीफ ग्लोबल डेव्हलपमेंट ऑफिसर बॅरी न्यूस्टेड केक कापताना:
कार्यक्रमाची सुरूवात जिमी वेल्स यांच्या एका व्हिडिओ संदेशाने झाली. विकिच्या वाढीस त्याच्या वाचकांचा आणि माहितीत भर घालणार्या सदस्यांचाही हातभार आहे. जिमी यांनी सर्वांचे या प्रसंगी अभिनंदन केले आणि त्याच बरोबर आभारही मानले. त्या नंतर बॅरी न्यूस्टेड यांनी विकिच्या वाटचालीचा आढावा घेतला.
२००१ सालचं भारताबद्दलची माहिती सांगणारं पान असं दिसत होतं: [फक्त दोन ओळी आणि त्यातही चुका.]
आणि आता पहा बरं:
भारतीय भाषांमध्ये आकडेच पाहायचं तर हिंदी आणि तेलुगूनंतर मराठीचा नंबर लागतो. परंतु मराठीत माहितीत भर घालणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे त्यांनी आवर्जून नमूद केलं. विकिमध्ये भर घालताना काही अडचणी येतात का, असतील तर नक्की कशा प्रकारच्या आणि त्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलची छान चर्चाही झाली.
त्यातले काही मुद्दे:
[विकी जगभरातल्या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेतः]
१. विकी केवळ ६० कर्मचारी आणि ४५० सर्व्हरच्या साहाय्याने इतका मोठा कार्यभार पेलून आहे.
२. विकिपिडिया खरंतर विकिमिडियातर्फे चालवलं जातं आणि आता केवळ पिडियाच नव्हे तर इतर प्रोजेक्ट्सकडेही लोकांना वळवायचं पुढचं उद्दिष्ट आहे. त्यांचे इतर प्रोजेक्ट्सः
कॉमन्स, विकिन्यूज, विक्शनरी,विकिकोट, विकिबुक्स, विकिसोर्स, विकिस्पेसीज, विकिवर्सिटी, आणि मेटाविकि.
३. जगभराच्या तुलनेत भारत हा वाचकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त झपाट्याने वाढत आहे. [fastest growing region in terms of readership]
४. विकिमध्ये चुकीची माहिती दिल्यास, इतर वाचक व स्वयंसेवी काम करून अॅडमिनस्ट्रेटर बनलेले त्या माहितीची लगेच नोंद घेतात. ती माहिती फ्लॅग होऊन ती परस्पर उडवली न जाता त्या सदस्याला त्यासंबंधी पत्र पाठवले जाते. सात दिवसांत ती माहिती काढून टाकली नाहीतर उडवली जाते.
५. अशा वेळेस वादग्रस्त माहिती दिल्यासही सात दिवसांची वाट पाहिली जाते का, यावर अशी वादग्रस्त पाने व प्रोजेक्ट्स अर्ध अथवा पूर्णसुरक्षित [semi/full protected] ठेवले जातात. तिथली माहिती सतत निरिक्षणाखाली असते. उदा. विकिइंडिया हा पूर्णसुरक्षित प्रोजेक्ट आहे. तसेच इस्त्रायल-पॅलेस्टाईनची बरीच पानेसुद्धा.
६. अशी पावलं उचलल्याने सहसा कायदेशीर बाबींना तोंड द्यावं लागत नाही. सगळे सर्व्हर्स आणि बरेचसे कर्मचारी अमेरिकेत आहेत. तरी जे अमेरिकेत राहात नाहीत त्यांना वेळ पडल्यास आणि ते त्या वादग्रस्ततेस कारणीभूत असल्यास ते कायद्याच्या कचाट्यात कदाचित सापडू शकतात.
७. कार्यक्रमास आलेल्या एका उत्साही कन्नड काकांनी आपल्या अप्रकाशित पुस्तकाबद्दल काही विकिपाने लिहिली होती व त्याचे लेखक म्हणून आपलं पान तयार केलं होतं. तेव्हा त्यांना स्वतःसाठी पान तयार करू नये असा विकिसंदेश आला होता. हे त्या काकांनी सांगताच सदस्यपान आणि व्यक्तिंसाठीची पानं यात कसा भेदभाव आहे आणि तो कसा हाताळायला हवा यावर न कंटाळता सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं.
८. संपादन करणं अवघड वाटत असेल अथवा आपण आधीच्या माहितीचं वाटोळं करू असं वाटत असेल तर सँडबॉक्स वापरून आधी पूर्वदृश्य करूनच माहिती प्रकाशित कशी करावी हे अगदी उदाहरणासहित दाखवलं.
जरी तिथे बॅरीचं भाषण चालू असेल तरी, कार्य्क्रमाला उपस्थित असणार्या मुंबईतील काही विकि स्वयंसेवकांनीही त्याला वेळोवेळी साहाय्य केलं. त्यामुळे कार्यक्रमात छान खेळीमेळीचं वातावरण होतं. उदाहरणादाखल तयार केलेलं 'सेमिनार हॉल व्हीजेटीआय' हे पान उदाहरण चालू असतानाच चुकीचे म्हणून एक-दोघांकडून फ्लॅग होऊन आलं. साहजिकच अशी अनावश्यक पानं किती झटपट काढून टाकली जातात हे न सांगताच कळलं.
भारतात प्रोग्रॅम असल्याने भारतीय भाषांचा विषय निघणं साहजिक होतं. विकिचे अंगिका भाषेचे विकि अॅडमिनिस्ट्रेटर कुंदन अमिताभ यांनी कोणकोणत्या भाषांमधून विकि उपलब्ध आहे, आणि कोणकोणत्या भाषा अजून येत आहेत याबद्दल सांगितलं. त्याचबरोबर फक्त इंग्रजीतच नाही, तर सगळ्यांनी आपापल्या मातृभाषेत विकित भर घालण्यासाठी आवाहन केलं. टंकनासाठी इन्स्क्रिप्ट कळफलक एकदा लक्षात ठेवला की झालं असं त्यांचं म्हणणं होतं. [अर्थात यावर तिथे चांगलाच काकू झाला. फोनेटिक्सवर आधारित गुगल टूल्स, बरहा, गमभन वापरू नयेत असं त्यांचं म्हणणं , तर आम्हा वापरकर्त्यांचं तो कळफलक लक्षात राहात नाही, वर आम्हाला इंग्रजी की-लेआऊट सवयीचा झाल्याने तिथं लिहिण्याचा वेग जास्त असं मत होतं.]
कुंदन अमिताभ:
पुण्याच्या या मुलाने विकिचा २.३ जीबीचा ऑफलाईन बॅक-अप घेतलाय. त्याने तो नानापेठेतल्या एका छोट्या शाळेत दिलाय. आंतरजालाच्या जोडणीशिवाय आणि आता सवय झाल्यानं कुणाच्याही मदतीशिवाय त्या शाळेतली मुलं त्यांना हवी ती माहिती विकिवरून शोधून काढतात. कोणतीही नवी कल्पना समोर मांडून, तिला सरकारने आर्थिक मदत करावी आणि सरकारनेच चालवावी अशा अपेक्षेने तिची वाट लावून घेण्यापेक्षा असं स्वतः पुढाकार घेणं खरंच प्रशंसनीय, नाही का?
टीआयएफआरच्या संगणक विभागाचे प्रमुख नागार्जुन सर GNU लायसन्स बद्दल सांगताना:
बॅरीने येताना कपड्यांवर लावता येतील अशी बटनं आणली होती:
मी यातलं तिरंग्याचं-त्यावर देवनागरीत विकिपिडिया लिहिलं आहे ते आणि एक विकि ग्लोबचं अशी दोन बटन्स घेतली. (फोटो काढायचा कंटाळा!!!)
लॅपटॉपवर लावण्यासाठीची स्टिकर्सही होती. त्या माझ्या दुसर्या बटनावर हेच चित्र आहे.
बॅरीच्या भाषणानंतर बरेचजण निघून गेले होते. शेवटी उपस्थितवृंदः
प्रतिक्रिया
16 Jan 2011 - 4:48 pm | मस्त कलंदर
विकिग्लोब अंमळ जास्तच मोठा झालाय. कुणी संपादक त्याला छोटा करू शकेल का?
16 Jan 2011 - 5:15 pm | कुंदन
सुरेख वृत्तांत .....
धन्यवाद ग मके.
16 Jan 2011 - 6:18 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम कार्यक्रम झाला की... मस्त!
16 Jan 2011 - 8:18 pm | गणपा
मस्त ग.
छान वृत्तांत दिलास कर्यक्रमाचा.
16 Jan 2011 - 9:33 pm | चित्रा
माहितीपूर्ण लेख झाला आहे. विकिमीडीयावर सध्या देणगी द्या म्हणून बातमी असते. http://wikimediafoundation.org/wiki/Donate
16 Jan 2011 - 9:47 pm | इन्द्र्राज पवार
लेख माहितीपूर्ण झालेला आहेच, पण त्याशिवाय पुढील प्रोजेक्टमध्ये विकिन्यूज, विक्शनरी यांचा समावेश करण्यात आला आहे याची माहिती मिळाली. अन्य प्रोजेक्टसमवेत या दोन घटकांविषयी विशेष औत्स्युक्य राहिल.
पूर्णपणे खाजगी पातळीवर आणि स्वयंसेवकांमार्फत चालविणे हे विकिटीमने करून दाखविले आहे, सतत दहा वर्षे....पुढील वाटचालीसाठी विकिला हार्दिक शुभेच्छा.
इन्द्रा
17 Jan 2011 - 4:34 am | Nile
विकी च्या बड्डे च्या मकी ला शुभेच्छा! ;)
17 Jan 2011 - 5:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मकीला शुभेच्छा!
केक कधी मिळणार?
17 Jan 2011 - 6:11 am | सहज
धन्यु मकी.
--------------------------
विकिमीडीयाला देणगी देण्यासाठी ही लिंक - http://wikimediafoundation.org/wiki/Donate
17 Jan 2011 - 8:38 am | स्वानन्द
धन्यवाद :)
17 Jan 2011 - 9:13 am | प्राजु
उत्तम वृत्तांत!!
17 Jan 2011 - 11:45 am | ५० फक्त
धन्यवाद मस्त कलंदर, अतिशय छान रिपोर्ट,
मला पण या माहीतीच्या उपक्रमाशी जोडुन घ्यायचं आहे, मार्गदर्शन कराल का ?
हर्षद.
18 Jan 2011 - 8:52 am | निनाद
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%...
येथे तुमचे लॉग इन बनवा.
तुमच्या आवडत्या विषयाचा शोध घ्या
मराठी विकी लेख वाचू लागलात की, लिखाण कसे केले पाहिजे याची जाणीव होतेच.
काही गवसले तर उत्तम नसेल तर भर घालणारे काही लिहा.
फक्त एक लक्षात ठेवा पानांमध्ये भरपूर दुवे असले पाहीजेत. दुवे देण्यासाठी चौकोनी कंस वापरले जातात. उदा. [[पक्षी]] पक्षी हा शब्द विकीच्या पानावर दुवा म्हणून दिसेल. त्या नावाचा लेख असेल तर तो निळ्या रंगात दिसेल, नसल्यास लाल. अर्थातच आपला लेख संपूर्ण निळा करण्याचे प्रयत्न करा. त्यातून एक लेखांचे जाल उभे राहात जाईल.
अधिक माहिती http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4... येथे आहेच!
मराठी विकिवर स्वागत आहे!
17 Jan 2011 - 11:57 am | स्वाती दिनेश
छान झालेला दिसतो आहे कार्यक्रम..
स्वाती
17 Jan 2011 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त माहितीपुर्ण आढावा घेतला आहे. खुपशी नवी माहिती मिळाली :)
विक्शनरी तर अतिशय उत्तम उपक्रम आहे.
धन्स ग मके.
17 Jan 2011 - 6:25 pm | अवलिया
असेच म्हणतो
17 Jan 2011 - 12:23 pm | जागु
छान वृ.
17 Jan 2011 - 1:33 pm | पिंगू
छान वृतांत मकीताई.. विकिला दहाव्या वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
- पिंगू
17 Jan 2011 - 4:58 pm | प्राजक्ता पवार
माहितीपूर्ण लेख.
17 Jan 2011 - 6:53 pm | प्रियाली
मराठी विकीचे खंदे कार्यकर्ते अभय नातू, संकल्प द्रविड वगैरे होते का उपस्थित? असल्यास फोटूत दाखवा बरें?
बाकी, विकीचे अभिनंदन आणि मकीचे धन्यवाद.
विकी -मकी जोडी बरी दिसते. ;)
17 Jan 2011 - 6:54 pm | ऋषिकेश
च्यामारी! मंडळी कुठेकुठे जाऊन येतात आणि आम्ही घर आणि हाफीस केलं तरी दमलो बुआ म्हणून घरात लोळत पडतो ;)
मस्त वृत्तांत
17 Jan 2011 - 9:28 pm | कलंत्री
अतिशय सुंदर असा वृतांत.
आजच अशी बातमी वाचली की विकीपिडीया ऐवजी विकीइंडीया असे नविन भारतासाठी / भारतीय भाषांसाठी नामकरण होणार आहे. गुगलमध्ये कोणताही शोध घेतांना विकीचे नाव येतेच येते.
18 Jan 2011 - 12:39 am | डावखुरा
खुपच छान माहिती...
18 Jan 2011 - 12:39 am | डावखुरा
खुपच छान माहिती...
18 Jan 2011 - 12:47 am | निनाद मुक्काम प...
खूप चांगली माहिती दिली आहे पण सध्या मराठीच्या शाळांची होणारी भ्रूणहत्या पाहता पुढच्या दशकात आभासी जगतात मराठी कितपत वाचले जाईल विकी वर ?
विशेष करून इंग्रजीचा पर्याय असतांना असा प्रश्न पडतो .
18 Jan 2011 - 8:37 am | निनाद
पुढच्या दशकात आभासी जगतात मराठी कितपत वाचले जाईल विकी वर ?
आपल्या भाषेसाठी आपण आपले काम करू या.
काळाला काय करायचे ते करू देत!
18 Jan 2011 - 6:09 am | मदनबाण
छान माहिती...
18 Jan 2011 - 8:35 am | निनाद
मस्त कलन्दर,
छान वृत्तांत दिलात, आवडला.
सर्वांनीच आपल्या विकिवर भर घालत राहणे जरुरीचे आहे.
गगनविहारी विमान आणि त्या संदर्भातली पाने यावर मोठी भर घालू शकतील.
पण गगनविहारीं सारखे असे अनेक विविध विशेषज्ञ येथे आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा, असे सुचवावेसे वाटते.
अगदी सी, जावा, किंवा 'एच टी एम एल' या भाषांविषयी माहिती देणारा आणि वापर मराठीतून समजावून सांगणारा एकएक लिहायला काय हरकत आहे?
आपल्या मराठी विकिवर अगदी रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र असली अगदी प्राथमिक पानेही अपूर्ण आहेत. या क्षेत्रांत पोस्ट-ग्रॅज्युएट असलेले लोक येथे आहेत. *
'आपल्या विषयाचे प्राथमिक पान तरी सुव्यवस्थित असले पाहिजे' इतके तरी आपला स्वार्थ म्हणून कराच! अगदीच काही नाही तर जगात जेथे कुठे असाल त्या आपल्या गावाचे पान तर पुर्ण करा. हे विकिच्या दहाव्या वाढदिवसाबद्दल सर्वांना आवाहन.
*(या विषयासाठी लागणारे मराठी शब्द आणि मराठी संज्ञा विज्ञानाच्या मराठीच्या पुस्तकात किंवा मराठी विश्व कोशात आहेत. शास्त्रीय मराठी संज्ञांचा सुमारे १५७ पानांचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री लिखीत एक लघु पुस्तकही पीडीएफ स्वरुपात जालावर कुठेतरी उपलब्ध आहे, त्याचाही लाभ घ्या!)
18 Jan 2011 - 10:56 am | मस्त कलंदर
प्रियालीताई, मराठी विकीचे कुणी आलं नसावं. कारण हे नेहमीचं वक्ता-श्रोता सत्र नसल्याने सगळेचजण योग्य तिथे आपापलं मत देत होते. मराठी विकिबद्दल कुणीच बोललं नाही.
हर्षद, तुम्हाला निनाद यांनी उत्तर दिलंच आहे..
सविस्तर प्रतिसादासाठी निनाद यांचे आभार..
खरंतर कार्यक्रम आहे हे त्या कॉलेजात कुणालाच माहित नव्हतं. मलाही आयत्यावेळी कळालं आणि मी संक्रांतीच्या सुटीवर संक्रांत आणून तिथे गेले. योग्य पब्लीसिटी केली असती तर आणखीही लोक लाभ घेऊ शकले असते असं वाटून गेलं.
1 Feb 2011 - 1:27 am | मराठे
आज बघतोय हे पोस्ट! बराच उशीर झाला हे माहिती आहे पण तरीही ...
काही हरकत नाही. तुम्ही स्वतः तिथे जाउन तिथला वृतांत्त इथे लिहिलात हे ही नसे थोडके.
आजकाल आंतरजालीय नागरीकांना गूगल आणि विकीपिडीया शिवाय आंतरजालाची कल्पनाही करवणार नाही.
1 Feb 2011 - 1:33 am | धनंजय
वृत्तांताबाबत धन्यवाद.
1 Feb 2011 - 2:41 am | नंदन
उत्तम वृत्तांत. ऋग्वेदातल्या 'आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतः' (सार्या दिशांनी चांगले, कल्याणकारी विचार आम्हांल प्राप्त होवोत असा साधारण अर्थ - चूभूद्याघ्या) ह्या प्रार्थनेचं हे आधुनिक, मूर्त रुप म्हणावं लागेल. काही उणीवा (उदा. माहितीत भर घालणार्या सदस्यांत कमी असलेले स्त्रियांचे प्रमाण) अर्थातच आहेत, पण एकंदरीत लाभाच्या दृष्टीने नगण्यच.
1 Feb 2011 - 7:13 am | विंजिनेर
इथे मला एक प्रामाणिक शंका आहे - मला स्वतःला विकीपिडीया वापरायला लागल्यापासून (गेले ६-७ वर्षे) हा प्रश्न पडतोय की
१. सामान्य ज्ञान वाढविण्यापलिकडे/ कुतुहल शमना पलिकडे विकीचा किती उपयोग आहे?
२. विकीवरील माहितीची उपयुक्तता/विश्वासार्हता किती आहे?
अ. कधीही/कुणालाही* बदलता येणारी माहिती - हे दोन्ही बाजूंनी बघता येईल.
ब. लेखनकर्त्याचे त्या त्या विषयातले ज्ञान आणि पात्रता.
क. जालीय संदर्भांचा तुटवडा/ संदर्भांची ग्राह्यता (उदा. कित्येक विषयांना वर्तमानपत्रातील फुटकळ बातमीचा संदर्भ दिला जातो - त्याला संदर्भ म्हणावे का असा प्रश्न पडतो)
३. सशुल्क संदर्भग्रंथ उदा एन्सायक्लोपिडियाच्या तुलनेत विकीची "किंमत"
४. विकीला मान्यता (कुणाची हा मुद्दा आहेच पण मुद्दाम सांगत नाहीये)
काही लोकांना हे अतीव नकारात्मक मुद्दे वाटण्याची शक्यता आहे पण इलाज नाही.
1 Feb 2011 - 11:35 am | दिगम्भा
लेख व वृत्तान्त उत्तमच जमला आहे. माहिती व फोटो आवडले. त्याबद्दल मक चे कौतुक केलेच पाहिजे.
परंतु, एक छोटीशी बाब म्हणजे विकिपीडियाचा सर्रासपणे विकि/विकी असा उल्लेख केलेला खटकला. अगदी त्यामागची प्रेमाची भावना लक्षात घेऊनही.
खरे तर विकी हा प्रकार किंवा साधन किंवा जाति (जॉनर या अर्थी) आणि विकिपीडिया यात फरक आहे, किंबहुना विकिपीडिया हा विकी हे साधन वापरून बनवलेला/केलेला आहे.
विकी ही जेनेरिक किंवा जातिवाचक संज्ञा आहे - कोणालाही संपादित करता येईल असे जालपृष्ठ - व विकी वापरून कोणीही कसल्याही प्रकारच्या व विषयावरील दस्तऐवजाचा (डॉक्युमेंटचा) सामूहिक सहभागाने विकास करू शकतो व असे अगणित विकी जालावर दिसतात.
अर्थात विकिपीडिया हे त्याचे सर्वात यशस्वी, लोकप्रिय व सुप्रसिद्ध उदाहरण आहे यात शंकाच नाही.
(ही संज्ञा व प्रत्यक्ष अशा प्रकारचे संपादनीय जालपृष्ठ वॉर्ड कनिंगहॅम यांनी बनवले व विकीपीडियाचे श्रेय अप्रत्यक्षपणे व काही प्रमाणात त्यानाही जाते असे मला वाटते.)
- दिगम्भा