संवयी

हेरंब's picture
हेरंब in जनातलं, मनातलं
25 Apr 2008 - 6:16 pm

माणूस हा संवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. यापैकी कांही सभोवतालच्या परिस्थितीमुळे लागतात, कांही आनुवंशिक असतात तर कांही मुद्दामहून लावून घेतलेल्या असतात. प्रत्येक आईवडिलांना (स्वतःला नसल्यातरी) आपल्या मुलांना आदर्श संवयी लागाव्या असे वाटत असते. प्रत्यक्षांत मात्र तसे होत नाही. संवयी चांगल्या की वाईट हे ठरवण्यापेक्षा त्यांचे फक्त निरीक्ष्ण करणे जास्त मनोरंजक ठरेल.
सकाळी उठण्याचे प्रकारच पहा, लवकर उठणारे, अतिलवकर उठणारे, उशीरा उठणारे आणि चक्क बारा वाजता उठणारे! त्यातले पोटप्रकार आणखी मजेशीर. जाग आल्यावर पटकन उठणारे, कधी न संपणारी ५ मिनिटांची सवलत मागणारे तर कांही उठवल्यावर शहामृगासारखी उशीत मान खुपसून बसणारे.
एकदा उठल्यावर तर नाना तर्‍हा ! दांत घासणारे, न घासणारे. पोट म्हणजे पाण्याचे पिंप असावे असे पाणी पिणारे. चहाशिवाय पुढचे कुठलेच काम न होणारे. वर्तमानपत्र न मिळाल्यास अस्वस्थ होणारे. कधी एकदा आंघोळ करतोय असे वाटण्यापासून ते आंघोळ ही एक शिक्षा आहे असे मानणारे. प्रातर्विधीमधे सुद्धा मिंटोका काम घंटेमे पासून ते जुम्मे के जुम्मेपर्यंत अनेक प्रकार आहेत. पण त्यापेक्षा आपण अधिक चांगल्या विषयाकडे म्हणजे जेवणाकडे वळू या.
उदरभरणापासून ते चाखत माखत खाणार्‍या खवैयांपर्यंत अनेक नमुने बघायला मिळतात. माणूस खातो किती यापेक्षा तो कसे खातो यावरुन त्याच्या स्वभाववैशिष्ठ्यांबद्दल बरेच आडाखे बांधता येतात. कांहीजण व्यवस्थित नीटसपणे जेवतात तर बरेचसे आपल्याबरोबर किडामुंगीलाही जेवू घालतात, चेहेर्‍यालाही भरवतात आणि शेवटी तर त्यांचे ताट बघायला लागू नये म्हणून आजुबाजूचे लवकरच आवरते घेतात.
लहानपणी आपण चालायला लागलो की सर्वांना किती आनंद होतो! त्या लुटुलुटू चालण्याचे पुढे अनेक वैचित्र्यपूर्ण चालींमधे रुपांतर होते. शिस्तीत चालणे, डुलत डुलत चालणे, पोंक काढून चालणे, वाघ मागे लागल्यासारखे चालणे, रस्ता आपल्याच बापाचा असल्याप्रमाणे चालणे, उडत उडत चालणे असे सर्वसाधारण प्रकार तर बघायला मिळतातच पण वाटेत येणारी प्रत्येक वस्तु ठोकरणे, समोरुन येणार्‍यास मुंगीस मुंगीने भिडावे तसे कडमडणे, येणार्‍या जाणार्‍या वाहनांनाच हूल देणे असेही प्रकार पहावयास मिळतात.
बोलणे ही एक कला आहे. पण बोलताना ज्या विविध लकबी आपण पहातो त्याही मजेदार असतात. राजधानीच्या वेगापासून ते बैलगाडीच्या वेगाने बोलणार्‍या व्यक्ति असतात. सहज बोलणे, नाटकी बोलणे, नारोशंकराच्या घंटेसारखे मोठ्या आवाजांत बोलणे, कायम तिरकसच बोलणे, दुसर्‍याला बोलूच न देणे हे मुख्य प्रकार, तर बोलत असताना तोंडाच्या, ओठांच्या विचित्र हालचाली, हातवारे करणे, डोळे मिचकावणे हे प्रकारही दृष्टीस पडतात.
हंसण्याच्या संवयींचे तर असंख्य प्रकार! गडगडाटी हंसणे, चोरटे हंसणे, फिसकन हंसणे, खिंकाळणे, बायकी आवाजात हंसणे, हिस्टेरिकल हंसणे याबरोबरच अजिबात आवाज न करता हंसणे, ओठ वाकडे करुन छदमी हंसणे, काही सेकंदापुरते स्मित करुन लगेच गंभीर होणे, डोळ्यात पाणी येईपर्यंत हंसणे असे प्रकार तर खरेच पण डोळ्यांत पाणी असताना खोटे खोटे हंसणे ही कला विशेष!
या सवयींपेक्षा वेगळ्या आणि खास भारतीय संवयी म्हणजे चारचौघांसमोर नाकात बोटे घालणे, नखे कुरतडणे, पचकन थुंकणे, खाकरुन बेडके काढणे, शिंकरणे आणि रस्त्याच्या कडेलाच विधि करणे. लोकांना किळस वाटणाऱ्या संवयींचे उदात्तीकरण करणारेही कधी दिसतात. शरीराच्या कुठल्याही द्वारातून बाहेर वायु सोडताना " हरि ओम" म्हणणारी माणसे अन्य कुठल्या देशात भेटणार ?
शेवटी जाता जाता सांगायची खास संवय म्हणजे टीका करण्याची! आपल्या देशात तर तो जन्मसिद्ध हक्क आहे. येताजाता आजुबाजूच्या परिस्थितीवर, राजकारणावर, क्रिकेटवर, नातेवाईकांवर, शेजार्‍यांवर, एकूणच सर्व व्यवस्थेवर टीका करत रहायचे पण उपाय सांगायचा नाही. कुठल्याही कामात विघ्न मात्र आणायचे. हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !!

राहणीप्रकटनलेख

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 6:43 pm | मनस्वी

खूप आवडला. सवयी छान टिपल्या आहेत. अजून सवयी पण वाचायला आवडल्या असत्या.

मला चालताना आमचे हे उंट म्हणतात.

वरदा's picture

25 Apr 2008 - 6:49 pm | वरदा

डोळ्यात पाणी येईपर्यंत हंसणे ही मी...
हे सगळं आपण रोज पहातो तुम्ही छान लिहीलय्..एकदम सहज...

स्वाती राजेश's picture

25 Apr 2008 - 7:49 pm | स्वाती राजेश

जबरदस्त निरीक्षणशक्ती...
छान लिहिले आहे. ह.ह.पु.वा.:)स
काही यातील सवयी आमच्यासुध्दा आहेत.....पण त्यापेक्षाही भयानक सवयी वाचून मजा आली.

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 8:08 pm | इनोबा म्हणे

शरीराच्या कुठल्याही द्वारातून बाहेर वायु सोडताना " हरि ओम" म्हणणारी माणसे अन्य कुठल्या देशात भेटणार ?
तुमच्या निरीक्षणशक्तीला आम्ही दाद(खाज,खुजली नव्हे) देतो.

ह. हा. पु. वा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

धनंजय's picture

25 Apr 2008 - 8:15 pm | धनंजय

> हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !!
हाहा!

सहज's picture

26 Apr 2008 - 2:39 pm | सहज

खुसखुशीत लेखन आवडले. जंगलकथा नंतर अजुन एक मजेशीर लेखन वाचायला मिळाले.

पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत!!

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Apr 2008 - 5:46 pm | ब्रिटिश टिंग्या

>>हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !
हा हा हा! हे विशेष आवडले :)

आनंदयात्री's picture

26 Apr 2008 - 5:52 pm | आनंदयात्री

खुमासदार लेखन आवडले :)))

देवदत्त's picture

26 Apr 2008 - 9:45 pm | देवदत्त

चांगले निरीक्षण.
आणखी काही सवयी...
बस लोकल मध्ये बसले असताना बाजुचा पुस्तक किंवा जास्त करून वर्तमानपत्र वाचत असल्यास त्यात डोकावणे, किंवा त्याची पुरवणी वाचण्यास मागणे.
काम करताना स्वतःशीच बोलणे
काही गमतीशीर सांगितल्यास समोरच्याला टाळी मागणे...

चतुरंग's picture

26 Apr 2008 - 10:07 pm | चतुरंग

हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !!
हे बाकी भारीच!;))

एखाद्याकडे सतत रोखून बघत राहणे. थुंकी उडवून बोलणे असेही प्रकार करणारे आढळतात.
आमच्या कालेजात एक आसामी होती त्याला दर थोड्या वेळाने मानेला झटका देण्याची सवय होती. त्याला आम्ही 'स्क्वेअरकट अभिजीत' म्हणायचो;)

चतुरंग

विवेक काजरेकर's picture

27 Apr 2008 - 11:41 am | विवेक काजरेकर

मस्तच लिहिलंय :-)

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 12:27 pm | वेदश्री

धमाल लेख.. अत्यंत आवडला ! आणखीन सवयी वाचायला आवडतील.

आमच्या एका सरांना शिकवताना त्यांच्या शर्टच्या चौथ्या बटनाशी खेळायची सवय होती. बटन असलं म्हणून काय झालं.. त्याचाही काही जीव असतो की नाही? एकदा त्यांच्या एका शर्टाचं चौथं बटन अशाच त्यांच्या खेळात तुटलं.. त्यांना पुढचं शिकवायलाच जमलं नाही !!!

शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिकवताना सारखं पँट वर ओढायची सवय होती. ( खूप विचित्र दिसतं ते ! ) सेंड ऑफच्या दिवशी आम्ही दहावी-अ च्या विद्यार्थ्यांनी काँट्रो करून त्यांना एक बेल्ट विकत घेऊन दिला होता त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव.. खत्तरी..

एखाद्या मुलीसोबत बसलेल्या मित्राकडे/सहकर्मचार्‍याकडे सिगारेट किंवा माचीस/लायटर मागायच्या पोरांच्या काय काय एकेक पध्धती असतात.. ह. ह. पु. वा होते अगदी. असो.

विसोबा खेचर's picture

28 Apr 2008 - 9:26 am | विसोबा खेचर

लेख मस्तच आहे! सवयी अगदी छान टिपल्या आहेत. वाचायला मौज वाटली... :)

हेरंबराव, अजूनही असेच छोटेखानी छान छान लेख येऊ द्या, ही विनंती...

आपला,
(सवयींचा गुलाम) तात्या.