"ईन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा!"
परवा एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे बाजूच्या एका टेबलावरून कोणीतरी कुणालातरी म्हटलेले हे उद्गार कानी पडले आणि मला एकदम अब्दुल खानची आठवण झाली. "ईन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा!" हा त्याचा तकियाकलाम (पालुपद) होता. मधली वीस-पंचवीस वर्षे जणू वितळून गेली आणि जसे आत्ताच त्याला भेटून आल्यासारख्या आठवणी जाग्या झाल्या!
अब्दुल खान हा माझा जुना मित्र आणि एकेकाळचा रूममेट! त्यावेळी मी नुकतेच एम्.बी.ए. संपवले होते. पण कोर्सवर्क संपले तरी कमीतकमी सहा महिन्यांचा तरी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्याशिवाय डिग्री द्यायची नाही असा आमच्या युनिव्हर्सिटीचा एक नियम होता. त्यामूळे आम्ही विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांना ऍप्रेंटिसशिप साठी अर्ज पाठवले होते. त्यात माझी एका न्यूयॉर्कच्या इन्व्हेस्टमेंट कंपनीत निवड झाली होती. प्रत्यक्ष वॉल स्ट्रीटवर काम करायला मिळणार याचा मला विलक्षण आनंद झाला होता. त्या आनंदातच मी माझा बाडबिस्तारा (दोन बॅगा, एकीत कपडे आणि दोन्-चार भांडी, आणि दुसरीत पुस्तके! स्टुडंटकडे आणखी संसार काय असणार!) घेऊन न्यूयॉर्कमध्ये दाखल झालो होतो. नदीपल्याडच्या न्यूजर्सीत एका गुजुभाईच्या सुमार मोटेलमध्ये तात्पुरता उतरलो होतो. रहाण्यासाठी जागा शोधत होतो आणि त्या काळातही न्यूयॉर्कमध्ये ती मिळणे किती दुरापास्त आहे याचा अनुभव घेत होतो. माझ्या अपेक्षा अगदीच माफक होत्या पण त्या पूर्ण करणार्या जागादेखील माझा स्टुडंट बजेटच्या बाहेर होत्या.
करता-करता कामाचा पहिला दिवस उजाडला आणि कंपनीत जाऊन हजर झालो. पहातो तो तिथे माझ्यासारखेच आणखी आठ-दहा इंटर्न्स आले होते. एकमेकांची ओळख झाली आणि गप्पा सुरू झाल्या. त्यावेळेलाच मी जाहीर करुन टाकले की मी शहरात नवीनच आहे आणि जागा/ रुममेट शोधत आहे. कुणाला गरज असेल अथवा जागेविषयी काही माहिती असेल तर सांगा. थोड्या वेळाने त्यातील एक एशियन दिसणारा मुलगा माझ्या जवळ आला.
"माय नेम इज इक्बाल", त्याने हात मिळवला. मी ही माझं नांव सांगितलं.
"व्हेअर आर यू फ्रॉम?"
'बॉम्बे", मला त्याचा रोख कळला होता.
"आय ऍम फ्रॉम कराची" त्याने हिंदीतून सुरवात केली. "तभी तुमने कहा की रहनेके लिये मकान ढूंढ रहे हो, कुछ लीडस मिलें है?"
मी नकारार्थी मान हलवली.
"तुम कहां रहते हो?" मी चौकशी केली.
"यहींपर क्वीन्स में! मेरी बहन और बहनोई के साथ!"
"अच्छा है! काश मेराभी कोई बहनोई यहां होता!' माझं फ्रस्ट्रेशन बोललं. त्याने गोड हसून विषय बदलला.
दुसर्या दिवशी आम्ही आपापल्या कामात मग्न असतांना इक्बाल माझ्या टेबलाजवळ आला.
"सलाम आलेकुम" आज त्याने देशी सुरवात केली, 'कैसे हो? कुछ मकानकी बात बन पायी?"
"नही, अभीतक नही."
"मेरे पास एक लीड है, इफ यू आर इंटरेस्टेड!"
"ऑफ कोर्स, आय ऍम इंटरेस्टेड, इक्बाल! तुम्हें क्या लगा मैं मजाक कर रहा हूं?" मी तडकून बोललो.
"माशाल्ला, ऐसी तो बात नही भाई! देखो, मेरे पहचानका एक आदमी है, जो रुममेट ढुंढ रहा है. अगर तुम्हें इंटरेस्ट हो तो बात करा दूं......"
"कहां है जगह?" माझे डोळे लकाकले. लांडग्याला भक्ष्य दिसल्यागत!!
"मेरे नजदीकही है क्वीन्समें, ऍस्टोरियामें! एरिया सेफ है, ज्यादातर ग्रीस और सायप्रसके लोग रहते है, फॅमिलीवाले है. अपार्ट्मेंटभी अच्छा है, टू-बेडरूम, फर्निश्ड है. एक रूम तुम्हे मिलेगी, लिव्हिंगरूम, किचन और बाथरूम शेअर करनी पडेगी"
"तो कब बात करा रहे हो?" माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी खाली गळेल की काय अशी मला भीती वाटू लागली. पण इक्बाल थोडा घुटमळला.
"लेकिन एक बात है. पहलेही क्लिअर करना चाहता हुं." त्याचा आवाज सिरियस झाला.
"क्या बात है? पैसे बहुत मांग रहा है क्या?" मी माझ्या मनातली भीती बोलून दाखवली.
"नही वो बात नही" इक्बाल परत घूटमळला, "वह आदमी हमारे पाकिस्तानसे है. और तुम तो इंडियासे हो, इसलिये..."
"तो क्या हुआ? वैसेभी इस न्यूयॉर्क में अगर कोई गोरा या काला रुममेट मिल जाता तो मै क्या करता? यह कमसे कम अपनी जबान में तो बोलेगा!"
"तो फिर ठीक है. मै आजही उससे बात करके मुलाकात पक्की कर लेता हूं. लेकिन अगर तुम्हारा काम हो गया तो मुझे एक लंच तुम्हारी तरफसे मुफ्त", इक्बाल मिश्किलपणे म्हणाला.
"अरे मेरे बाप, मेरा ये काम तू कर दे. मैं लंच क्या, तेरी शादीभी करा दूंगा!!"
दोन दिवसांनी इक्बालने ठरवल्याप्रमाणे तो आणि मी अपार्टमेंट पहाण्यासाठी गेलो. एका इमारतीच्या दुसर्या मजल्यावर जाऊन एका दरवाजाची इक्बालने बेल दाबली.
"हू इज इट?' आतुन एक कठोर घोगरा आवाज आला.
"मैं इक्बाल हुं, जी" दरवाजा उघडला गेला.
"सलाम आलेकुम इक्बालमियां" आता आवाज बराच मॄदू झाला होता.
"आलेकुम सलाम जी, खानसाहब! वो आपके मेहमान लेके आया हूं"
"आवो, अंदर आवो!"
आम्ही आत गेलो. त्या माणसाने माझ्याशी शेकहँड केला. माझ्या हाताचे तुकडे कसे पडले नाहीत कोण जाणे. कळ डोक्यात गेली.
"आय ऍम खान अब्दुल खान पठाण. इक्बालके साथ काम करते हो?"
"जी हां"
"रूममेट बनना चाहते हो?"
"अगर आपकी मर्जी हो तो"
त्याला माझं उत्तर आवडलं असावं. त्याने आम्हाला जागा दाखवली. आम्ही अपार्ट्मेंट पाहिलं. स्वच्छ! फर्निश्ड!! मला खूपच पसंत आलं. त्याने सांगितलेलं भाडंही माझ्या आवाक्यातलं होतं. माझी खुशी त्याने जाणली असावी. तो गंभीर आवाजात बोलला,
"मुझे पता है की मैं किराया कम बोल रहा हूं. इसलिये की मेरी एक शर्त है. मैं रातको काम करता हूं इसलिये दिनमे सोता हूं. मुझे दिनमें यहांपर पूरी शांती चाहिये. अगर तुम्हें दिनमें टीव्ही देखनेका या दोस्तोंके साथ पार्टियां करनेका शौक है तो अपनी बात जमनेवाली नही"
"खानसाब, दिनमें तो मैं कामपर होता हुं, रातको लौटुंगा. और वैसेभी इस शहरमें नया हूं. ये इक्बाल छोडकर और कोई दोस्त तो है नही" मी काही झालं तरी आता हे डील क्लोज करणारच होतो.
"तो फिर ठीक है, पहले हफ्तेका किराया लाये हो?"
मी चेक फाडला. त्याने अपार्ट्मेंटची चावी माझ्या हातात ठेवली. माझा आनंद गगनात मावेना. मी जायला उठलो.
"अभी चाय लेकेही जाना."
"नही, उसकी क्या जरूरत है?", मी.
"नीचे बैठ जावो!" त्या आवाजाला विलक्षण कठोरता आली, "चाय... लेके... जाना...".
मी दचकून इक्बालकडे पाहिले. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. त्याने डोळ्यानेच मला खाली बसायची खूण केली. आम्ही केशर आणि मध घातलेला पठाणी चहा घेतला. चहा संपल्यावर कप खाली ठेवत अब्दुलखान निरोप देत परत मॄदु आवाजात म्हणाला,
"अब तुम्हारे पास चाबी है, जब जी चाहे मूव्ह हो जाना. देर शामसे आये तो मै घरपे रहूंगा नही, पर तुम कभीभी आ जाना! इन्शाल्ला! सब ठीक हो जायेगा!!"
आम्ही बाहेर पडलो. माझी अस्वस्थता ओळखून इक्बाल म्हणाला,
"सॉरी यार, एक बात तुमसे कहना तो भूल गया. इन पठानोंमे अगर कोई उनकी दी हुयी खातिरदारीको इन्कार करता है तो वे अपना पर्सनल इन्सल्ट समझते हैं. सब पाकिस्तानी यह बात जानते है. मै ये भूल गया के हालांकि तुम और हम जबान एकही बोलते है लेकिन तुम इंडियन हो, तुम्हे ये बात पता न होगी! मेरा खयाल है की शायद उसे भी पता था की इंडियन होने के नाते तुम इस बातसे वाकिफ न होंगे, इसलिये उसने खाली जबानही चलायी. अगर तुम्हारी जगह पर मैं ऐसा कुछ बोलता तो वह छुराही निकालता!!"
"परमेश्वराऽऽ! कुठल्या लफड्यात मी येउन पडलोय!!" मी एक दीर्घ सुस्कारा सोडला...
यथावकाश मी त्या अपार्ट्मेंटमध्ये स्थिरावलो. सुरवातीला मी आणि अब्दुलखान एकमेकांना भेटण्याचे प्रसंगच आले नाहीत. दिवसा मी सकाळी लवकर ऊठून कामावर जाई, तेंव्हा अब्दुलखान घरी आलेला नसायचा. कामावर शिकण्यासारखे खूप काही असल्याने मला रात्री परत यायला उशीर होई तेंव्हा तो कामावर गेलेला असायचा. पहिला आठवडा असाच गेला. त्यानंतरच्या पहिल्या रविवारी घडलेली गोष्ट!!
रविवारची सुट्टी असल्याने मी थोडासा उशीराच उठलो. पहातो तर अब्दुलखान त्याच्या खोलीत येऊन झोपला होता. मी ही माझं आवरून कपडे लॉन्ड्री वगैरे करायला बाहेर पडलो. जवळपास काय-काय मिळतं याचा अंदाज घेतला. बाहेरच जेवलो आणि दुपारी एक-दीडच्या सुमारास परत आलो. पहातो तर अब्दुलखान जागा झालेला होता. किचनमध्ये काहीतरी करत होता. मला पाहताच म्हणाला,
"चाय पिवोगे?"
"जरूर!", याखेपेस नाही म्हणण्याची चूक मी करणार नव्हतो. सुर्याचे घाव झेलायला सोबत इक्बालही नव्हता...
माझ्यापुढे चहाचा कप ठेवून तो समोर येऊन बसला. सहा फूट उंची, गोरा वर्ण - रापून तांबूस झालेला! भक्कम शरीर- अडीचशे पौंड वजन असावं! हिरवे भेदक डोळे! केस बारीक कापलेले, दाढी शेव्ह केलेली पण भरघोस मिश्या राखलेल्या! अगदी कान्होजी जेध्यांच्या चित्राची आठवण करून देणार्या!!
"तो कहांसे हो तुम सुलेश?" त्याने सुरवात केली. मी माझं नांव त्याला सांगितलं होतं पण एकतर त्याच्या ते लक्षात नव्हतं किंवा त्याला फिकीर नव्हती. त्याच्या दॄष्टीने मी सुलेश होतो आणि अजूनही आहे...
'बॉम्बेसे"
"तुम इंडियन तो लगते नही!"
"मतलब?"
"इंडियन्स आर शॉर्ट, डार्क ऍन्ड थिन! तुम तो तीनो नही हो! पारसी हो क्या?"
"जी नही, मै महाराष्ट्रियन हूं" मी त्याला समजेल अशा शब्दांत सांगायचा प्रयत्न केला.
"ये कौम तो मुझे पता नही है"
"हमें मराठी भी कहते है".
"मराठी...मराऽऽठी.... मराऽऽठा...हां हां मराठा!!! शिवाजी?"
"जी हां!", मी.
आता बघा! या दिलेरखानाला महाराष्ट्र माहिती नव्हता पण शिवाजी बरोब्बर माहिती होता...
"पहाडोंवाला मुल्क है तुम्हारा?"
"हां, लेकिन आपको शिवाजी कैसे पता?" माझं आश्चर्य!
"अरे हमारे यहां जनरेशन्स से दादा-परदादा बताते आये हैं तुम्हारे सूरमा शिवाजी और उसके पहाडी मुल्कके बारेमे! कहते है, पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!"
माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांचा एक हाडवैरी, एका सर्वस्वी परक्या अमेरिकेत माझ्यासमोर गात होता...
"सुभानल्ला! फिर तो तुम तो हमारे जैसेही हो यार!"
"आपके जैसे?" मला काही कळेना.
"हां, हां, हमारे जैसे! समशेरबहाद्दर!! हमारे मुल्कमें एक कहावत है,
"सिख, मराठा, पठान, गोरखा,
ये है असिजीवी |
बाकी सब तो मसीजीवी ||
"मतलब समझे? की पूरे हिन्दोस्तांमे सिर्फ सिख्ख, मराठा, पठान और गुरखा ये चारही कौमें ऐसी है जो दुश्मनके खून पर जिया करती है. बाकी सब कौमें मसीजीवी, मतलब, स्याही पर जिया करती है..."
अब्दुलखान उठून उभा राहिला, आणि म्हणाला,
"वाह, वाह, बडी खुषी हुई आज पहले बार एक मराठासे मिलके! आवो, गले मिल जावो!" असं म्हणून मला आलिंगन दिलं.
तेंव्हापासून त्याने मला एक रूममेट म्हणुन न वागवता एक मित्र म्हणून वागवायला सुरवात केली. आमच्यात एक नविनच मैत्रीचा बंध निर्माण झाला. आम्ही दोघंही १९४७ नंतर जन्म झालेले! त्यामुळे तो त्याच्या देशाचा नागरीक आणि मी भारताचा! आम्ही दोघंही परस्परांबद्दल बरंच काही नवीन शिकत होतो. आमचे दोघांचेही काही पूर्वग्रह होते, आपापल्या समाजाने करून दिलेल्या समजुती होत्या. त्यामुळे कधीकधी खूप गंमत व्हायची! माझ्या दृष्टीने त्याचा देश पाकिस्तान आणि माझा हिंदुस्तान! पण त्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्याच्या बोलण्यात म्हणजे फाळणीपूर्व भारत हा हिन्दोस्तां, आणि फाळणीनंतर त्याचा पाकिस्तान आणि माझा इंडिया! त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! तसा धार्मिक होता, कधीकधी नमाज पढतांना दिसायचा! सुट्टीच्या दिवशी क्वचित कुराणेशरीफही वाचायचा!! मी हिन्दू असल्याचे त्याने ताडले होते. पण कधीही स्वतःहून धर्मावरची चर्चा चुकुनही सुरू करीत नसे. त्याच्यामते व्यक्तिस्वातंत्र्याला, मित्राचं मन जपण्याला जास्त महत्त्व असावं!! तरीसुद्धा गोंधळ हे व्हायचेच!! एकदा अशीच गंमत झाली....
(क्रमशः)
स्पष्टीकरणः नेहमीचंच स्पष्टीकरण! हे आमचंच आहे, कुठनं ढापलेलं/ ढकललेलं नाही, वगैरे, वगैरे....:))
प्रतिक्रिया
25 Apr 2008 - 12:02 pm | स्वाती दिनेश
या दिलेरखानाला महाराष्ट्र माहिती नव्हता पण शिवाजी बरोब्बर माहिती होता...
अभिमानाची भावना!
माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांचा एक हाडवैरी, एका सर्वस्वी परक्या अमेरिकेत माझ्यासमोर गात होता...
इथे वाचताना आमच्या ही अंगावर काटा उभाराहिला..
तुमच्या अब्दुल खान ला पुढे वाचायला उत्सुक,
स्वाती
25 Apr 2008 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर
श्री. पिवळा डांबिस,
अतिशय सुरेख लिहीले आहे. अभिनंदन.
उत्सुकता वाढली आहे. लेखाच्या पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
25 Apr 2008 - 12:16 pm | मनस्वी
वाचताना आपोआप मान ताठ झाली.
साध्या सोप्या भाषेत सुंदरच लिहिलंय डांबिसकाका.
पुढचे लवकर लिहा!
25 Apr 2008 - 12:21 pm | विसुनाना
मा. पि. डांबिस, व्यक्तीचित्र दर्जेदार आहे.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत...
हे 'पिडा' नाव आता बदललेत तर बरे नाही का होणार?असो. नावात काय आहे म्हणा!
25 Apr 2008 - 12:25 pm | आनंदयात्री
डांबिसकाका मस्त लेख, ओघावती गुंगवुन टाकणारी लेखनशैली. लेख खुप आवडला. मिपाला अजुन एक व्यक्तिचित्र किंग मिळाला.
25 Apr 2008 - 2:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अब्दुल खानाचे व्यक्तिचित्र, काय जब्रा उभं केलं राव !!!
अतिशय सुरेख..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
अवांतर काय लिहू तुम्ही आमची बोलतीच बंद केली राव :)
25 Apr 2008 - 12:28 pm | प्रमोद देव
मस्तच लिहिलंय! दुसरे शब्दच नाहीत!
डोळ्यासमोर उभा राहिला तुमचा तो पठाण मित्र!
"सिख, मराठा, पठान, गोरखा,
ये है असिजीवी |
बाकी सब तो मसीजीवी ||
हे तर खासच!
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
25 Apr 2008 - 12:36 pm | विसोबा खेचर
पण त्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्याच्या बोलण्यात म्हणजे फाळणीपूर्व भारत हा हिन्दोस्तां, आणि फाळणीनंतर त्याचा पाकिस्तान आणि माझा इंडिया! त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! तसा धार्मिक होता, कधीकधी नमाज पढतांना दिसायचा!
वा डांबिसा, सुरेखच लिहिलं आहेस रे...
औरभी लिख्खो...
तात्या.
25 Apr 2008 - 1:28 pm | नंदन
छान ओघवत्या शैलीत लिहिलं आहे...पुढचा भागही लवकर येऊद्या!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
25 Apr 2008 - 1:48 pm | नारदाचार्य
पुढच्या भागांना मुदत किती हवी आहे ते? असे एकेक भाग टाकून आमचा चक्का करून ठेवणाऱ्यांचा निषेध, निषेध, निषेध. पुढचे भाग न देणाऱ्यांचा त्यापुढे जाऊन निषेध, निषेध, निषेध.
नारद एवढेच करू शकतो. नारायण, नारायण...
बाकी व्यक्तिचित्र उत्तम रंग जमवते आहे. आता पुढे लवकर कूच करा.
25 Apr 2008 - 1:57 pm | लिखाळ
डांबिसकाका,
व्यक्तिचित्र दर्जेदार आणि सुंदर. शिवाजीमहाराजांबद्दलचा प्रसंग काटा आणणारा. महाराष्ट्रात जन्म झाल्याचे बरे वाटले :).
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत,
--लिखाळ.
25 Apr 2008 - 11:52 pm | कोलबेर
पुढचा भाग लवकर टाका
26 Apr 2008 - 11:33 pm | गोट्या (not verified)
"महाराष्ट्रात जन्म झाल्याचे बरे वाटले "
१००% सहमत.
छान सुरवात झाली आहे !
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
25 Apr 2008 - 2:10 pm | स्वाती राजेश
व्यक्तीचित्र छान आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
अवांतरः सरफरोश मधील खान आठवला.
25 Apr 2008 - 2:29 pm | मनस्वी
मला यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी.. मधला प्राण आठवला. :)
25 Apr 2008 - 2:19 pm | भडकमकर मास्तर
वावा...आज फार उत्तमोत्तम लेख वाचायचा योग आहे.....हे सारे एकदम फिल्मसारखे डोळ्यापुढे उभे राहते...
फार छान डांबिसकाका.....
प्लीज लवकर टाका हो पुढचा लेख....
25 Apr 2008 - 4:06 pm | सहज
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!
25 Apr 2008 - 6:40 pm | शितल
चित्र डोळ्या समोर उभे राहते, आणि पठाण आपला ही आओळ्खीचा वाटु लागतो,
पुढचा भाग लवकर वाचायला मिळु दे, हा भाग डोक्यातुन जाण्या आगोदर.
25 Apr 2008 - 6:58 pm | वरदा
काय जबरदस्त लिहिता हो तुम्ही..तो पठाण माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला...शिवाजी राजे एवढे फेमस आहेत तिथे हे मला माहीत नव्हतं सॉलीड अभिमान वाटला..
25 Apr 2008 - 7:11 pm | अनामिका
डांबिसकाका!
वाह वाह!सुभानअल्ला!
अख्खा पठाण आणि त्यांच्याबरोबर तुमचा चाललेला सुसंवाद ,तुमचे अपार्टमेंट सगळेच क्षणभर डोळ्यासमोर चलचित्रासारखे तरळुन गेले ."महाराजांच्या" वास्तव्याने पावन झालेल्या "महाराष्ट्रभुमीत "जन्माला आले याचा आज खर्या अर्थाने अभिमान वाटला. आणि पाठीचा कणा आपसुकच ताठ झाला.
पुढिल भाग वाचण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या मीतीला.
लवकर लिहा.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत असलेली "मी मराठी"
"अनामिका"
25 Apr 2008 - 8:01 pm | धनंजय
पंडितमैत्री तर होतेच, समविचारी लोकही भेटतात.
"सिख, मराठा, पठान, गोरखा,
ये है असिजीवी |
बाकी सब तो मसीजीवी ||"
असा काही वाक्प्रचार मराठीत आहे काय? पठानांमधला, गोरख्यांमधला, शिखांमधला कोणी शिवाजी महाराजांसारखा लढवय्या असेलच. अब्दुल खान यांना जसे शिवाजीमहाराजांबद्दल माहिती होते, आदर होता; तशी माहिती, तसा आदर मलाही या योद्ध्यांबद्दल असावा असे मनोमन वाटते. पण अब्दुल खान यांच्या चौफेर ज्ञानापेक्षा माझे ज्ञान फारच तोकडे आहे, याबद्दल खेद वाटतो. कदाचित या क्रमशः व्यक्तिचित्रातून, पिवळा डांबीस यांच्या प्रभावी लेखणीतून ही माहिती कळू लागेल.
("मसीजीवी"वरून आठवले - माझ्या पूर्वजांच्या आठ पिढ्या, म्हणजे थेट पेशवाईपर्यंत तरी नोकरशाहीत होत्या. किंवा पुस्तकी शिक्षणाच्या व्यवसायात. आणि आताही चुलते-मामे सर्व एक तर खर्डेघाशी करणारे किंवा सुशिक्षित नोकर. तलवार सोडा, साधी गोफणसुद्धा फिरवता येत नाही कोणाला. तरी अब्दुल खानसाहेबांनी आम्हाला असिजीवी म्हटले तर उगाचच जरा बरे वाटते. न कमावलेले स्नायू थोडे फुरफुरले.)
25 Apr 2008 - 8:32 pm | इनोबा म्हणे
"अरे हमारे यहां जनरेशन्स से दादा-परदादा बताते आये हैं तुम्हारे सूरमा शिवाजी और उसके पहाडी मुल्कके बारेमे! कहते है, पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!"
डांबीसकाका अगदी अंगावर काटा उभा राहीला हो! मस्तच लिहीताय.
एकदा अशीच गंमत झाली....
हे बरंय तुमचं. उत्कंठा वाढवून क्रमशः काय टाकताय हो? जरा पटकन द्या पुढचा भाग.
टि.व्ही.सिरीयल बघणं कमी करा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
25 Apr 2008 - 8:59 pm | चतुरंग
तुम्ही एकदम छुपे रुस्तुम निघालात! बरेच दिवसांनी आता एकेक अनुभव पोतडीतून बाहेर काढता आहात.
एकदम चित्रदर्शी लिखाण. वाचता वाचताच अब्दुल खान मनात कुठेतरी घर करून बसला.
शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठ्यांबद्दल त्याचे मत वाचून तर छाती अभिमानाने भरुन आली!
(अवांतर (स्वगत) - एक करा बुवा, पुढच्या भागाची वाट मात्र बघायला लावू नका. ते पेटंट तात्यांचं आहे म्हणा!;))
चतुरंग
25 Apr 2008 - 9:15 pm | मदनबाण
काका मस्तच !!!!!
अगदी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे व त्या पठाणाची अदब अनुभवतोय असे मला वाटले.....
त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!!
जबरदस्त निरिक्षण..... अजुन काय बोलु शब्दच नाही माझ्या जवऴ.
(भाग २ ची वाट पाहणारा)
मदनबाण
26 Apr 2008 - 1:07 am | मुक्तसुनीत
....असे या लिखाणाच्या बाबतीत म्हणावेसे वाटते. एखाद्या व्यक्तिचा दिलदारपणा, मनाचा मोठेपणा कळण्याकरता अनुभव घेणारासुद्धा त्या जातीचा असला पाहिजे. "शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकावा". त्यामुळे , लेखाचा हा आरसा , अब्दुलखानाइतकेच डांबिसखानाच्या दिलदारीचेही प्रतिबिंब दाखवतो आहे :-) बाकी या व्यक्तिच्या लकबी, छोटी छोटी वैशिष्ट्ये या सर्वगोष्टी फारच सुरेखरीतीने चित्रित झाल्या आहेत.... !
26 Apr 2008 - 1:43 am | बगाराम
वा 'सुलेश' राव!
फारच सुंदर अनुभव कथन. नेमक्या शब्दात अब्दुलला छान उभे केले आहे.
पुढचा भाग लवकर टाका.
-बगाराम
26 Apr 2008 - 6:10 am | सुनील
फार सुंदर लिहिलेत हो डांबिसकाका. आता फार वेळ लावू नका पुढच्या भागाला. लवकर येउद्यात!
केशर आणि मध घातलेला चहा हे कल्पना बाकी फक्कड.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Apr 2008 - 9:13 am | पिवळा डांबिस
आम्ही प्रत्यक्ष तो चहा प्यालो आहोत!!
अजूनही दूध्-साखरेच्या चहाचा वीट आला तर आम्ही तसा चहा करून पितो!!!
26 Apr 2008 - 2:39 pm | नीलकांत
मस्त लिहीले आहे हो. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
नीलकांत
27 Apr 2008 - 9:24 am | प्रशांतकवळे
सहज, सुंदर आणी मस्त लिखाण!
पुढच्या भागाची वाट पहाणारा
प्रशांत
27 Apr 2008 - 10:48 am | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
27 Apr 2008 - 11:18 am | डॉ.प्रसाद दाढे
मला यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी.. मधला प्राण आठवला
मलाही..
सु॑दर लेखन, पण एकच वाईट गोष्ट..क्रमशः
27 Apr 2008 - 11:26 am | स्वाती दिनेश
पण एकच वाईट गोष्ट..क्रमशः
क्रमशः ठराविक काळाच्या क्रमाक्रमाने आले तर ठीक हो,पण अति वाट पहायला नका बाबा लावू सुलेशबाबू..
आता आम्ही तुम्हाला पि. डां. न संबोधता सुलेशबाबू म्हणणार..
27 Apr 2008 - 12:16 pm | विवेक काजरेकर
फारच आवडलं. पुढील भागाच्या प्रतीक्षेत
इन पठानोंमे अगर कोई उनकी दी हुयी खातिरदारीको इन्कार करता है तो वे अपना पर्सनल इन्सल्ट समझते है
मी नोकरीनिमित्त कुवेत मधे आलो तेंव्हा कुवेती लोकांबद्दल मला असंच सांगण्यात आलं होतं. काही अंशी ते खरंही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण त्यांना काही ऑफर केलं तर ते नाकारण्याचं स्वातंत्र्य ते खुशाल घेतात. X(
28 Apr 2008 - 5:29 pm | धमाल मुलगा
क्या बात है!
जनाब डांबीसखाँ, मज़ा आ गया..
इस नाचिज के हातों जवाब आने में चंद घंटोंकी देरी हो गयी, इस गुस्ताख़ी के लिये कीई दरख्वा़स्त-ए-मुआफि कबुल हो |
बाकी हे पठाण लोक असतात बडे़ दिलखुलास !
आहे त्यांचा अनुभव आहे...एकदम 'जमलं तर सूत नाही तर भूत' असला प्रकार असतो !
खरंच काटा आला अंगावर!!!!
:) एक नंबर !!!!
वा:! आमच्या मोहसिनखाँसारखंच अगदी!
हे पठाण म्हणे, पाकिस्तानात येड्यात गणले जातात, आपल्याकडे सरदार जसे तसंच. पण इतका विचारी माणूस बघून हे खरं नाही वाटतं!!!!
डांबीसकाका,
मस्त लिहिताय, मजा येते वाचायला, और भी आने दो .......
आपला,
-धमालुद्दीन खाँ
5 May 2008 - 9:06 pm | यशोधरा
>>>माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांचा एक हाडवैरी, एका सर्वस्वी परक्या अमेरिकेत माझ्यासमोर गात होता...
>>>सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी |
बाकी सब तो मसीजीवी ||
खरच!! वाचतानाही इतका अभिमान वाटला!!
25 Mar 2021 - 7:54 pm | pspotdar
कदाचीत तुम्हाला पण आवडेल
26 Mar 2021 - 4:30 am | अनन्त अवधुत
सगळे भाग एकत्रच वाचले.छान आहे.
@pspotdar लेख मुख्य बोर्डावर आणल्याबद्दल धन्यवाद!
26 Mar 2021 - 5:08 am | सुक्या
थांकु हो pspotdar सायेब ..
पिडाकाकांचा हा लेख वाचलाच नव्हता ...
26 Mar 2021 - 8:37 am | ॲबसेंट माइंडेड ...
खुप छान लिहीलंय.