अंधार मिठी

sneharani's picture
sneharani in जनातलं, मनातलं
7 Dec 2010 - 11:13 am

रिमझिम पाण्याच्या संगीतासारखं चाललेलं माझं जीवन असं अचानक अंधारानं मिठी मारल्यासारखं का झालयं? काही कळेनास झालयं..!सुखामगं दु:ख अन् दु:खामागं सुख येतं असं म्हणतात पण ह्या सुखदु:खाच्या अष्टौप्रहर खेळात दु:खाचाच खेळ जास्त वेळ चालतोय्..असं किती दिवस चालणार आहे?
का आज माझी सखी मला सोडून जाणार आहे म्हणून मनाची घालमेल चाललीये. खोलवर रुजलेला दु:खाचा काटा आज परत त्याच दुखण्याची अनुभुती देणार आहे असचं वाटतय आज!दुरावा म्हणू की ताटातूट? हव्या असणार्‍या व्यक्तींशीच का होते ताटातूट...!दरवेळी विधाता का असे धक्के देत राहिलाय मला. आतापर्यंतच्या आयुष्यातील नाती, त्यातील आनंद, सुख पुर्णत्वाच्या दिशेनं कधी झुकलचं नाही अन् झुकलं जरी तरी त्याला पुर्णत्व लाभलं नाही! माहितेय मला हे जग नश्वर आहे, कोणीच सदासर्वकाळ साथ देऊ शकत नाही! तरीही मन आपेक्षा करतच आहे!तशा नात्याच्या गाठी सुटत राहिल्या पण कुठल्याच वेळी मनानं अशा विरहाच्या प्रहाराची तयारी केली नव्हती! नाहीतरी प्रहार अचानक होतात.
**************
"ताई केवढा मोठा हा वाडा? एवढ्या मोठ्या घरात आपण तिघीचं कशा गं?अन् आत्या अशी सारखी माझ्या रागानं का बघते?"
"अग माजे सोना, हा वाडा आपल्या आईबाबांचा! अन् तु कशाला आत्याकडं लक्ष देतेस?"
"ताई आईबाबा का ग आपल्याला सोडून गेलेत? आत्याला सांगितलं नाही त्यांनी मी छोटी आहे, माझी काळजी घे म्हणून?"
"अगं ते दुर गेलेत का गेलेत माहित नाही. ते गेले... तेव्हा हा वाडा मला खायला उठला होता. आणि आत्याचं कशाला पाहिजे तुझी काळजी घ्यायला, मी आहे की तुझ्याकडे बघायला!"
"ताये, वाडा खायला उठला होता म्हणजे ग?"
"जाऊ दे आता तुला कळणार नाही, कळेल नंतर्!आता प्रश्न बास कर. झोप बघू"
कितीतरी प्रश्न मी विचारायची ताईला अन् ती जमेल तेवढी उत्तरं द्यायची.
ताई!! वयानं मोठी होती म्हणून ताई पण आईचचं दूसरं रुप! आई असती तर ती अशीच असती!आईबाबा गेले त्यावेळी खूप लहान होते!आईच्याप्रेमाला पारखी झाले होते पण आई भेटत राहिली ताईच्या मुर्तीमंत प्रेमातून!खुप देखणी, सालस, प्रेम करणारी, मायेनं जवळ घेणारी माझी ताई...!
कुठल्या जन्मीचे मर्मबंध होते तिच्याशी कुणास ठाऊक!माझी दु:ख, व्यथा, निराशा या गोष्टींना शेवटचा विराम मिळण्याचं माझं हक्काचं ठिकाण म्हणजे ताई..!

कितीतरी गोष्टी असतात आपल्या हक्काच्या! पण दैव असं काही खेळतं की गोष्ट हूलकावणी देऊन जाते दूर...!खूप दूर...! परत कधीच न मिळण्यासाठी! मग होणारं दु:ख इतकं सलतं की अश्रुंचं खळकन आगमन व्हावं!आईबाबांचं प्रेम असच पारख झालं होतं.काही काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात. आईच्या जाण्यानं आत्याचं येणं. आत्या कधी सरळ बोललीच नाही माझ्याशी! मी आल्यावर आईबाबा गेले हीच गोष्ट तिच्या मनात घर करून राहिली होती नव्हे मनात धरून ठेवली होती. मग त्याचा राग कधी कधी काढायची माझ्यावर कधी शब्दातून...तर कधी कृतीतुन...!मग मलाही सवय झाली तिची! आईबाबांचं जीवनी असणं, त्यांचा मायेच्या हाताचा स्पर्श पाठीवर असणं किती महत्वाच असतं नाही? शाळेतल्या मैत्रिणींना सोडायला-न्यायला त्यांचे आईवडील यायचे. मला कधीतरी सोडायला ताई अन् आत्या यायची. न्यायला आत्याच यायची. पण त्यातही फरक असायचा, त्यांचे पालक त्यांना कौतुकानं विचारपूस करत, लाडानं उचलून घेत पण आत्या....आत्या पुढं अन् मी तिच्या मागनं...!ती मख्ख चेहर्‍यानं पुढं चालायची.तिला काही सांगायचीसुध्दा मला त्यावेळेस धास्ती वाटायची.मग घरी आल्यावर शाळेतल्या सगळ्या गमती जमती सांगायच्या त्या ताईला!ताईच्या मागून इकडून तिकडे..तिकडून इकडे! माझं सार विश्वच ताईभोवतालीच फिरायचं..!

*************
असेच दिवस सरत गेले! आत्यानं ताईचं लग्न ठरवलं.पण या गोष्टीनं मन अस्वस्थ झाल होतं!काहितरी हरवणार आहे नक्की असं वाटत होतं! काय हरवेल? प्रेम हरवेल? कोण देतय इतक प्रेम?ताई! ताई... जाईल माझ्यापासून दूर्? होय..होय आता माझं विश्वच पारखं होणार होतं माझ्यासाठी!
आई नाही, बाबा नाहीत आता ताईही जाणार्?अजून अजून साथ हवीय तुझी असं मन आक्रंदत होतं.पण काळ थांबणार होता थोडीच? ताई चालली माझ्यापासून दूर...!ती गेल्यानंतर वाडा खायला उठणं म्हणजे काय ते अनुभवास आलं

लग्नाआधीचे चार दिवस, चार दिवसातला प्रत्येक क्षण, प्रत्येक घडी आजही आठवतेय्!खुप खूप बोललो होतो दोघीजणी...अगदी मध्यरात्रीपर्यंत जागून बोलायचो! काय बोलत होतो ते शब्दनशब्द आज नाहीत आठवत्...विस्मृतीत गेलेत ते शब्द...पण त्यावेळची भावना, ते उत्कट प्रेम आज ही तितकचं उल्हसित करतयं मनाला!
"ताय्डे मलापण घेऊन चल की तुझ्याबरोबर! इथं आत्याकडं ठेवून जाणार होय मला"
"मलापण तुझीच काळजी आहे ग, मी तुला नेइन तिकडे पण नंतर आधी तिथल्या लोकांची मला ओळखतरी व्हायला हवी की नाही? आणि तु आत्याला काही उलटून बोलु नकोस....."
किती गोष्टी सांगितल्या तिने!अन् मग नंतर डोळ्यातले अश्रू..!दोघींच्याही..!मुकसंवाद साधत होते ते अश्रु!तिच्या काळजीच्या मिठीतील ती तीव्रता...तो आवेग..आज ही आठवतयं!
**********
काळ पुढे सरकत होता... वाड्याच्याशेजारच्या आमच्या घरात आत्यानं एक कुळ ठेवलं. भाडेकरू रहायला आले.इथल्या शाळेत त्यांना बदली मिळाली होती. त्यांची मुलगी माझ्याच वयाची, मी तिला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी ती खूप छान हसली...अगदी पुर्वीची ओळख असल्यासारखी! मग माझीही कळी खुलली!ताईनंतर या वाड्यात माझ्याकडं पाहून हसणार मला कोणीतरी भेटलं होतं! मग ती कॉलेजवरून आल्या आल्या मला भेटायला यायची.एव्हाना माझं शिक्षण दहावीवरच थांबवल होतं आत्यानं! मला म्हणायची घरची कामं कोण करणार? सहाजिक मी घरीच असायचे.तर माझी ही नवीन सखी सूंदर होती स्वभावानं अगदी गोड. दोघींच एकमेकीशी खूप छान पटायचं. ती मला कादंबर्‍या आणून द्यायची तिच्या कॉलेजमधून! मग पुस्तकांच्या संगतीत एका वेगळ्याच मस्तीत वेळ निघून जायचा.बघता बघता दोन वर्ष हिच्या संगतीत अगदी चांगली गेली. पण ही स्थिती, हा काळ असाच थोडी राहणार होता? तो पुढे सरकत निघून गेला पण जाता जाता कितीतरी बदल करून गेला...तिच्या वडिलांच्या हाती बदलीचं पत्र पडलं! झालं पुन्हा वाडा निद्रेत जायला तयार झाला....!पुन्हा एकटीचं तेच जीवन...! बोलायला कोणी नाही...मायेची माणसं नाहीत...!अंधार्‍या वाड्यातला येणारा पुढचा दिवस मला उद्यापासून अंधाराच वाटणार आहे...!
**************
जन्माला येताना एकटचं याव लागत जातानाही एकटच जावं लागतं पण मधला काळ जगायला प्रेमाच माणूस लागतं. मग ते प्रेम कुठल्याही रुपात आयुष्यात असावचं. आईबाबा, बहीण, मैत्रिण, नवरा....कोणतरी हव मायेची पखरण करायला! नसेलच काही तर जोडलेली नाती असावीत....!
आज ठरवलयं सखी निरोप घ्यायला येईल त्यावेळी खूप जीवाला लावून घ्यायचं नाही...ती गेल्यानंतर असेल चार दिवस अंधार आपल्या आयुष्यात्...पण उजेडाची तिरीप भेटेल दुसर्‍या कुठल्याही रुपात फक्त मधले दिवस असचं जगले पाहिजेत...एकटीने...एकटीनेच!पुन्हा तोच काळोख अनुभवायचा आहे.
रिमझिम पाण्याच्या संगीतासारखं चाललेल्या माझ्या जीवनाला पुन्हा अंधाराची मिठी पडतेय....! पुन्हा...!

कथाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

पियुशा's picture

7 Dec 2010 - 11:20 am | पियुशा

खुप सुन्दर लिहिले आहेस !
निशब्द !

अवलिया's picture

7 Dec 2010 - 11:24 am | अवलिया

चांगले लेखन ! :)

लिहित रहा...

टारझन's picture

7 Dec 2010 - 11:27 am | टारझन

छान ग .. मस्त ग ..

यशोधरा's picture

7 Dec 2010 - 11:38 am | यशोधरा

लिखाणाची शैली आवडली.

इंटरनेटस्नेही's picture

7 Dec 2010 - 12:52 pm | इंटरनेटस्नेही

चांगले लेखन आवडले.. :) शब्दसंग्रह समृद्ध आहे तुमचा. :)

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2010 - 2:17 pm | नगरीनिरंजन

नि:शब्द.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Dec 2010 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार

वेगळ्याच धाटणीचे लेखन आवडले :)

छान लिहिलंयस. सुंदर लेखनशैली आहे. लिहित राहा. :)

सूड's picture

7 Dec 2010 - 2:52 pm | सूड

+१

स्पा's picture

7 Dec 2010 - 2:57 pm | स्पा

+२

श्रावण मोडक's picture

7 Dec 2010 - 3:15 pm | श्रावण मोडक

पुलेशु...

स्पंदना's picture

7 Dec 2010 - 3:49 pm | स्पंदना

तुम भी चलो , हम भी चले ।
चलती रहे जिंदगी ।
ना जमी मंजील ना आसमां
जिंदगी है जिंदगी ।

का कुणास ठाउक पण वरच वाचत असताना या ओळी आठवल्या. काय लिहिलय ! अचानक भोवताल स्तब्ध झाला.
पुलेशु.

जन्माला येताना एकटचं याव लागत जातानाही एकटच जावं लागतं पण मधला काळ जगायला प्रेमाच माणूस लागतं.
वा... क्या बात है |
अप्रतिम लेखन झालं आहे. :)
असेच लिहीत रहा...

प्राजक्ता पवार's picture

7 Dec 2010 - 4:26 pm | प्राजक्ता पवार

छान लिहिलंयस . लेखन आवडले .

पर्नल नेने मराठे's picture

7 Dec 2010 - 5:35 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख लिहिलेय जसे काहि माझ्या मनातलेच .......

स्मिता.'s picture

8 Dec 2010 - 2:18 pm | स्मिता.

खूप सुरेख लिहिलंय, आवडलं....

जन्माला येताना एकटचं याव लागत जातानाही एकटच जावं लागतं पण मधला काळ जगायला प्रेमाच माणूस लागतं.
हे वाक्य तर अगदी मनाला भिडलं. वाक्याचा पूर्वार्ध म्हणजे नेहमीचे घासलेले शब्द, पण उत्तरार्धातले साधे शब्द बरंच काही सांगून जातात... मनात घोळत राहतात.

योगेश सुदाम शिन्दे's picture

8 Dec 2010 - 2:27 pm | योगेश सुदाम शिन्दे

छान ...

हे आवडल ...
जन्माला येताना एकटचं याव लागत जातानाही एकटच जावं लागतं पण मधला काळ जगायला प्रेमाच माणूस लागतं. मग ते प्रेम कुठल्याही रुपात आयुष्यात असावचं. आईबाबा, बहीण, मैत्रिण, नवरा....कोणतरी हव मायेची पखरण करायला! नसेलच काही तर जोडलेली नाती असावीत....!

माजगावकर's picture

9 Dec 2010 - 12:18 am | माजगावकर

छान लिहिलंय..

असंच लिहित रहा..

sneharani's picture

9 Dec 2010 - 4:41 pm | sneharani

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.
वाचकांचेसुध्दा आभार.

सुहास..'s picture

13 Dec 2010 - 5:06 pm | सुहास..

जन्माला येताना एकटचं याव लागत जातानाही एकटच जावं लागतं पण मधला काळ जगायला प्रेमाच माणूस लागतं. मग ते प्रेम कुठल्याही रुपात आयुष्यात असावचं. आईबाबा, बहीण, मैत्रिण, नवरा....कोणतरी हव मायेची पखरण करायला! नसेलच काही तर जोडलेली नाती असावीत....! >>>>

व्वा !! मधला काळ जे सुख देऊन जाते त्या सुखाचा आनंद आणि त्याकरिता ऊठणारे काहुर अतिशय छान रंगविले आहे.

छान लिहिलंय...एकटेपणाची जाणीव वेगळ्याच पद्धतीने व्यक्त केलीये.

आंसमा शख्स's picture

14 Dec 2010 - 9:55 am | आंसमा शख्स

एक्दम बरोबर. हेच वाटले वाचून.