तेथे कर माझे जुळती
आज २६/११/२०१०! मुंबईच्या ’शिरकाणा’ला दोन वर्षें झाली. छत्रपती शिवाजी टर्मिनस, रंगमंदिर गल्ली, मरीन ड्राइव्ह, ट्रायडेंट व ताजमहाल हॉटेल अशा अनेक जागी 'प्रेमळ' शेजारी देशातून आलेल्या अतिरेक्यांनी थैमान घातले! रंगमंदिर गल्लीत करकरे, कामटे व सालसकर हे तीन मोहरे पडले. त्याचे कारण म्हणजे करकरेंची बुलेटप्रूफ गाडी ते वापरू शकले नव्हते.
विनीताताई कामटेंच्या "To the last bullet" या पुस्तकातील माहितीनुसार करकरेंनी सांगितलेल्या कारवाया करण्यात आल्या नव्हत्या व त्या करण्याता आल्या नव्हत्या हे करकरेंना 'कंट्रोल रूम'मधून कुणी सांगितलेच नाहीं. त्यामुळे सांगितलेली कारवाई झाली असेलच असे गृहीत धरून हे तीघे साध्या गाडीत बसून रंगमंदिर गल्लीत गेले व AK-47च्या गोळ्यांना बळी पडले. पण पडता-पडता कामटेंनी त्यांच्या AK-47ने कसाबला जखमी मात्र केले. त्याचा फायदा नंतर त्याच्या अटकेत झाला.
त्या काळरात्री ओंबळे यांनी असामान्य धैर्य दाखविले.
त्यांना वायरलेसवरून कळले होते कीं अतिरेकी 'स्कोडा' गाडीतून पळाले असून 'मरीन ड्राइव्ह'च्या दिशेने येत आहेत. तेवढ्यात 'स्कोडा' वेगात त्यांच्या समोरून गेली. ओंबळेंनी आपल्या मोटरसायकलवरून तिचा पाठलाग गेला. इतर पोलिसांनी रस्त्यावर अडथळे उभे केले होते. गाडीचा वेग कमी झाल्यावर ओंबळेंनी आपली मोटरसायकल 'स्कोडा'समोर घातली त्यामुळे अतिरेक्यांना ती उजवीकडे वळवावी लागली व गाडी विभाजकावर आदळून थांबली. ओंबळे यांनी धावत जाऊन गाडीतील दोघांपैकी कसाबवर छलांग मारली व त्याच्या AK47 बंदुकीची नळी (Barrel) त्यांनी आपल्या दोन्ही हातांत घट्ट पकडून धरली. Barrel ओंबळेंच्या बाजूला असल्यामुळे कसाबने त्यांच्या पोटात गोळ्या मारल्या. ओंबळे कोसळले पण शुद्ध हरपेपर्यंत त्यांनी ती नळी सोडली नाहीं. त्यामुळे कसाब इतर कुणावर गोळ्या झाडू शकला नाहीं. दरम्यान इतर पोलिसांनी दुसर्या अतिरेक्याला (इस्माईल) ठार कले व कसाबला पकडण्यात ते यशस्वी झाले. अटक झालेल्या कसाबकडून हा हल्ला पाकिस्तानच्या भूमीवरूनच केला गेला होता हे सिद्ध करण्यात भारत सरकार यशस्वी झाले. पण त्यापायी ओंबळेंच्या सारख्या मोहर्याला स्वतःचा प्राण गमवावा लागला.
पण जीव देणार्या या वीरांइतकाच पण आगळा-वेगळा पराक्रम केला 'ताज'चे जनरल मॅनेजर श्री करमबीर सिंग कांग यांनी.
स्वत:ची पत्नी व दोन मुलगे मृत्यू पावले आहेत हे माहीत असूनही ते आपल्या पोस्टवरून हलले नाहींत व आपल्या कर्मचार्यांना धीर देऊन, मार्गदर्शन करून त्यांनी हॉटेलमध्ये रहाणार्या हजारो पाहुण्यांचे प्राण वाचविले.
१९६५ व १९७१ सालच्या दोन्ही युद्धात सक्रीय भाग घेतलेल्या मेजर जनरल साहेबांचे-जगतार यांचे-करमबीर सिंग कांग हे सुपुत्र होते. वडिलांच्या फौजेतील बदली होणार्या नोकरीमुळे त्यांना अनेक शाळांमध्ये शिकावे लागले पण जातील तिथे त्यांनी जिवश्च-कंठश्च मित्र जोडले. कांगसाहेब 'ताज'च्या सेवेत गेली १९ वर्षें होते. अवघड कामे नेहमीच त्यांना दिली जात व ते ती कामे यशस्वीरीत्या पार पाडत. त्यांच्या टीममध्ये असलेल्या प्रत्येकाकडून ते उत्तम रीतीने काम करून घेत. ते अतीशय लोकप्रिय 'बॉस' होते व त्यामुळे त्यांच्या सहाय्यकांना कामावर जावेसे वाटे व ते अत्यंत उत्साहाने कामावर येत. जिथे-जिथे ताज हॉटेल लंगडत चालायचे तिथे यांना पाठवण्यात येई व ते चालवायला घेतल्यानंतर वर्षाभरात ते हॉटेल अत्यंत कार्यक्षम होत असे.
ताजमध्येच काम करणार्या नीती माथुर यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. एकाच कंपनीत नवरा-बायकोंनी काम करू नये म्हणून नीतीबाईंनी 'ताज' सोडून 'ग्रिंडलेज'मध्ये नोकरी धरली. पुढे पहिल्या मुलाचा-उदयचा-जन्म झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली व त्या पूर्णपणे मुलाबाळांत रमून गेल्या.
२६/११ रोजी ताजवर हल्ला झाला तेंव्हां ते वांद्र्याच्या "लँड्स एंड"मध्ये कुठल्याशा सेमिनारच्या व्यवस्थापनात गुंतले होते. 'ताज'वर हल्ला झाला आहे असे कळताच ते ताबडतोड तिथे आले तोपर्यंत अतिरेकी आत घुसलेच होते व त्यामुळे त्यांना सहाव्या मजल्यावर अडकलेल्या आपल्या कुटुंबियांपर्यंत जाता आले नाहीं. हताश होऊन त्यांनी बहरीन येथे असलेल्या आपल्या वडिलांना फोन करून सारी परिस्थिती सांगितली. "त्यांना मदत करू शकत नसलास तर इतरांना मदत कर. एका अस्सल शिखासारखा धैर्याने संकटाचा सामना कर" असे सांगितल्यामुळे त्यांना धीर आला व स्वतःची दोन मुले मृत्युमुखी पडली असूनही धैर्याने लढलेल्या शीख गुरूंचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन आपले कर्तव्य त्यांनी पार पाडले.
दरम्यान अतिरेक्यांना त्यांच्या पाकिस्तानमधील श्रेष्ठींकडून आज्ञा येतच होत्या, "आगी लावा, सगळ्यांना दिसू द्या तुमचे 'कर्तृत्व', दिसेल त्याला गोळी घाला" वगैरे व त्य सर्व आज्ञा पार पाडल्या गेल्या! ताजच्या खिडक्यांतून बाहेर पडणारे आगीचे लोट सार्या जगाने पाहिले!
त्यावेळी ज्या-ज्या मित्रांनी त्याना फोन केले त्या सर्वांना त्यांनी एकच विनंती केली, "माझे कुटुंबीय सुखरूप रहावेत म्हणून प्रार्थना करा".
पण या सर्वांनी अशी प्रार्थना करूनही त्यांची पत्नी व मुले वाचली नाहींत. त्यांनी सुरक्षेसाठी बाथरूमचा आश्रय घेतला होता व शेवटी ते तीघे तिथेच गुदमरून निधन पावले. पत्नीचा व मुलांचा देह हाती आल्यानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांनी केला व ते हॉटेलवर परतले व "हॉटेल लवकरात लवकर पुन्हा सुरू करायचे" ध्येय समोर ठेऊन त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले व विक्रमी वेगाने हॉटेल पुन्हा सुरू केले.
Economic Times ने ठेवलेला Corporate Citizen of the Year हा सन्मान त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आला. तसेच २००९ सालचे अतीशय श्रेष्ठ समजले जाणारे "Best of the Best" Hotel सन्मानांपैकी Virtuoso Hotelier of the Year हा सन्मानसुद्धा त्यांना त्यांच्या कामावरील निष्ठेसाठी व ताज हॉटेलला जगातल्या उत्तम हॉटेल्समधील एक हॉटेल बनविण्याबद्दल देण्यात आला. हा समारंभ लास वेगस (Las Vegas) येथे झाला. त्या वर्षी या सन्मानाचे नामांकन मिळणारे ते एकमेव भारतीय होते.
अशी माणसे देव क्वचितच बनवतो!
हे सर्व वाचल्यावर "गड आला पण सिंह गेला" या शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध उद्गारांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीं व मग तोंडातून शब्द बाहेर पडतात, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती"
(Pakista Defence या संस्थळावरील "Karambir Singh Kang, saviour of Taj Hotel on 26/11" हा एलिजाबेथ फ्लॉक यांचा 'फोब्स इंडिया'तील लेख, 'To The Last Bullet" या पुस्तकातील माहिती, इतर वृत्तपत्रे, नियतकालिके यातील माझे वाचन तसेच विकिपीडियावरून मिळविलेल्या माहिती यावरआधारित)
प्रतिक्रिया
25 Nov 2010 - 11:20 pm | विलासराव
>>>अशी माणसे देव क्वचितच बनवतो!
खरय काका.
25 Nov 2010 - 11:39 pm | यकु
समयोचित लेख लिहील्याबद्दल काळेसाहेबांचे अभिनंदन.
क्षणभर त्यांच्याकडे पाहात राहून शहीदांचे स्मरण आणि
"खरंच असं घडलं? एवढ्या सहज हे चार मोहरे पडले?" हा प्रश्न
आणि
.
.
.
.
.
.
तीच चिरपरिचीत अस्वस्थता!!!
25 Nov 2010 - 11:39 pm | विकास
समयोचीत लेख!
२६/११ च्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
असे वाईट वाटत असतानाच त्याच बरोबर स्फुर्तीदायक घटना आणि त्यात असामान्यत्व दाखवणार्या व्यक्ती पाहील्या की देश खर्या अर्थाने कुणामुळे चालत आहे हे समजते.
27 Nov 2010 - 7:26 am | सुधीर काळे
<<देश खर्या अर्थाने कुणामुळे चालत आहे हे समजते. >>
१०० टक्के सहमत!
भारताची प्रगती भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक गुशौर्यामुळेकर्तव्याप्रती असलेल्या श्रद्धेमुळे क्रियाशीलतेमुळे झालेली आहे व होत आहे आणि तीही असे कमी प्रतीचे राजकीय नेतृत्व असूनही (in spite of poor political leadership) असे मी माझ्या इथल्या व इतर ठिकाणच्या लि़खाणात खूपदा लिहिले आहे!
26 Nov 2010 - 12:36 am | रन्गराव
हे मोहरे नक्की कुणासाठी कामी आले ते कळत नाही.
कंदहार हायजॅकच्या वेळची एक गोष्ट आठवते. कारगील युद्धातले शहीद अजय अहुजा आपल्याला आठवत असतील. ज्यांचा पूर्ण देशाने शहीद म्हणून गौरव केला, त्यांच्या पत्नीचा ह्याच देशवासियांनी कसा अपमान केला ते वाचून अंगावर काटा येतो. - http://www.dailypioneer.com/145600/The-truth-behind-Kandahar.html ह्या लेखातील खालील भाग वाचा.
On another evening, there was a surprise visitor at the PMO: The widow of Squadron Leader Ajay Ahuja, whose plane was shot down during the Kargil war. She insisted that she should be taken to meet the relatives of the hostages. At Race Course Road, she spoke to mediapersons and the hostages’ relatives, explaining why India must not be seen giving in to the hijackers, that it was a question of national honour, and gave her own example of fortitude in the face of adversity.
“She has become a widow, now she wants others to become widows. Who is she to lecture us? Yeh kahan se aayi?” someone shouted from the crowd. Others heckled her. The young widow stood her ground, displaying great dignity and courage. As the mood turned increasingly ugly, she had to be led away. Similar appeals were made by others who had lost their sons, husbands and fathers in the Kargil war that summer. Col Virendra Thapar, whose son Lt Vijayant Thapar was martyred in the war, made a fervent appeal for people to stand united against the hijackers. It fell on deaf ears.
काय मिळवलं त्यांनी आपले प्राण गमवून? आणि कुणासाठी मेले ते? म्हणतात ना शिवाजी महाराज जन्मावेत पण शेजाराच्या घरात, तस आमच आहे.
26 Nov 2010 - 1:00 am | अपूर्व कात्रे
ही बातमी मीही वाचली होती. फारच दुर्दैवी क्षण होता. पण यात लोकांनाही दोष देण्यात अर्थ नाही. याबाबतीत सर्व देशाची संस्कृती वेगवेगळी असते. काही देशांमध्ये (उदा. इस्रायेल) अश्या घटनांमध्ये सरकार आणि नागरिक फार कठोर भूमिका घेतात. आपल्या देशात अश्या विजीगिषु वृत्तीचा अभाव फार आढळतो. "रंग दे बसंती" सिनेमातील बारमध्ये बसलेले असतानाचे दृश्य मनापुढे नेहमीच तरळून जाते. देशावर प्रेम करणारे लोक देशात तयार व्हायला लागतात. देश जसा असेल तसाच स्वीकारणारे, त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे जेव्हा जास्त संख्येने तयार होतील तो सुदिन.
बाकी भारतीय संसदेने पुढील काळात विमान अपहरणाच्या घटनांमध्ये अपहरणकर्त्यांशी कुठलाही सौदा करता येणार नाही असा कायदा केला आहे. हेही नसे थोडके. (अशी वेळच येऊ नये ही माझी वेडी इच्छा)
26 Nov 2010 - 1:07 am | रन्गराव
>>पण यात लोकांनाही दोष देण्यात अर्थ नाही
दोष कसा देणार? कारण ह्याच "लोक" ह्या प्रकारात मीही मोडतो :(.
>>देश जसा असेल तसाच स्वीकारणारे, त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे जेव्हा जास्त संख्येने तयार होतील तो सुदिन.
खरच छान आहे वाक्य. :)
26 Nov 2010 - 8:00 am | सुधीर काळे
या घटनेबद्दलचा माझा संताप मी माझ्या इतर लेखनात २-३ वेळा व्यक्त केलेला आहे. पण हा लेख २६/११ वरील असल्यामुळे मी तो इथे केला नाहीं.
26 Nov 2010 - 12:53 am | अपूर्व कात्रे
कांग साहेबांबद्दलची माहिती थोडीफार ऐकली होती. आज सविस्तर वाचले. धन्यवाद. Hotel Management शिकत असताना "ताज"ची वेगळी संस्कृती आहे असे नेहमी ऐकायचो. ती काय आहे हे २६/११ च्या हल्ल्याने दाखवून दिले.
26 Nov 2010 - 7:37 am | गांधीवादी
तेथे कर माझे जुळती
असेच म्हणेन !
हे वीर नसते तर आणखी काय हाहाकार माजला असता हा विचार देखील करवत नाही.
सर्व शहीद वीरांना सलाम.
काय मिळवलं त्यांनी आपले प्राण गमवून? आणि कुणासाठी मेले ते? म्हणतात ना शिवाजी महाराज जन्मावेत पण शेजाराच्या घरात, तस आमच आहे.
हे मात्र नेहमी मनात सलत राहतं.
26 Nov 2010 - 8:40 am | ऋषिकेश
सर्व शहिदांना सलाम आणि श्रद्धांजली
26 Nov 2010 - 9:06 am | यशोधरा
सर्व शहिदांना सलाम आणि श्रद्धांजली..
करमबीर कांगांबद्दल वाचून अतिशय भरुन येते... असेच अजून किती अनाम वीर असतील..
26 Nov 2010 - 9:07 am | इन्द्र्राज पवार
".....पत्नीचा व मुलांचा देह हाती आल्यानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांनी केला व ते हॉटेलवर परतले व "हॉटेल लवकरात लवकर पुन्हा सुरू करायचे" ध्येय समोर ठेऊन त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले ....."
~ देश घडणार असेल तर अशा सीईओज् मधूनच. सर्वश्री करकरे, कामटे, सालसकर, उन्नीकृष्णन, ओंबाळे आणि अन्य अनेक ज्ञात्/अज्ञातांच्या 'शहिद' होण्याला खर्या अर्थाने सलामी आहे ती कांगसाहेबांच्या "Duty Speaks" या कृतीची.
थोडीफार माहिती होती कांग कुटुंबावर कोसळलेल्या त्या धक्क्याची; पण हे आज कळाले की, त्यांच्या वडिलांनी "त्यांना मदत करू शकत नसलास तर इतरांना मदत कर. एका अस्सल शिखासारखा धैर्याने संकटाचा सामना कर" दिलेला हा संदेश.
देशाचा इतिहास घडतो तो अशा ज्वलंत उदाहरणातून !!!
थॅन्क्स टु सुधीर काळे फॉर धिस एक्सलंट अॅण्ड इन्फॉर्मेटिव्ह राईट अप !!
इन्द्रा
26 Nov 2010 - 9:42 am | पियुशा
शब्द अपुरे आहेत ,अशा विराना मानाचा मुजरा !
26 Nov 2010 - 10:15 am | kamalakant samant
लेख उत्तमच आहे.
आ॑तरराष्ट्रीय परिस्थीती वेगळी असते हे ध्यानात घेउनसुद्धा म्हणावेसे वाटते की २६/११ न॑तर भारताने पाकिस्तानविरद्ध
कडक कारवाइ केली नाही.
आपला देश क्षात्रधर्मच विसरत चालला आहे असे वाटते.
आता खरया अर्थाने विजयी वीर हवेत्.त्यासाठी लागणारी मानसिकता ना राज्यकर्त्या॑मध्ये ना जनतेमध्ये.
आनेका॑नी आजपर्य॑त बलिदान केले आहे.आपल्याकडे हुतात्मे खूप झाले,त्या॑ची वानवा नाही.
झाले तेवढे बस्स झाले.आता विजयी वीरच हवेत.
26 Nov 2010 - 10:17 am | सुधीर काळे
Amen!
१०० टक्के सहमत!!
26 Nov 2010 - 12:02 pm | आत्मशून्य
.
26 Nov 2010 - 10:22 am | sneharani
या विरांना विनम्र अभिवादन!
मॅनेजर श्री करमबीर सिंग कांग यांचीही कामगिरी अलौकीक अशीच!
26 Nov 2010 - 12:12 pm | वाहीदा
या सर्व विरांना सलाम
व्यर्थ न हो बलिदान !!
पण आता देशाला विजयी वीरच हवे आहेत ..
26 Nov 2010 - 12:33 pm | जागु
सर्व शहीद विरांना श्रद्धांजली.
26 Nov 2010 - 12:57 pm | गणेशा
निशब्द ...
डोळ्यात पाणी आले .. विषेश करुन मुलांचे फोटो पाहुन खुप हेलावुन आले. .
सर्व लढणार्या व्यक्तींना मनापासुन सलाम ...
26 Nov 2010 - 3:22 pm | दिपक
The untold story of 2008's terrorist attack on the Indian city of Mumbai.
http://www.liveleak.com/view?i=1e4_1246490858
शहीदांना श्रद्धांजली !
26 Nov 2010 - 4:48 pm | सुधीर काळे
असलीच दृष्यें असलेल्या चित्रफिती आणि संवाद असलेच्या ध्वनिफिती या घटनेच्या पहिल्या स्मरणदिनाच्या आधी जवळ-जवळ सर्वच वाहिन्यांवर दाखविल्या गेल्या होत्या.
26 Nov 2010 - 7:08 pm | मदनबाण
सर्व वीर शहीदांना श्रद्धांजली !!!
26 Nov 2010 - 8:25 pm | शाहरुख
>>"त्यांना मदत करू शकत नसलास तर इतरांना मदत कर.
व्वा !! संकटकाळी असा सल्ला देणे म्हणजे खरोखरच कमाल आहे !
27 Nov 2010 - 10:25 am | बिपिन कार्यकर्ते
काळेसाहेब, अतिशय समयोचित आणि हृदयद्रावक आठवणी जागवणारे लेखन. अस्वस्थता काही जात नाहीये अजून २ वर्षांनीसुद्धा!
29 Nov 2010 - 9:59 pm | पक्या
काळेसाहेब, लेख खूप आवडला. लेखातील आठवणी काळजाला चिरे पाडून जातायेत.
कांग साहेबांसंबंधी इथे लिहिल्याबद्द्ल धन्यवाद.
२६/११ घटनेतील सर्व हुतात्म्यांना आणि अनाम वीरांना सलाम.
29 Nov 2010 - 10:25 pm | सुधीर काळे
विलासराव, यशवंत एकनाथ-जी, विकास-जी, रंगराव, कात्रेसाहेब, गांधीवादी-जी, ऋषिकेश-जी, वाहीदा, इंद्रराज-जी, पियुशा-जी, सामंतसाहेब, आत्मशून्य-जी, स्नेहाराणी, जागु-जी, गणेशा-जी, दिपक-जी, मदनबाण-जी, शाहरुख-जी, बिका-जी आणि प्रकाश-जी (पक्या) या सर्वांना त्यांच्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
30 Nov 2010 - 12:47 am | प्राजु
नि:शब्द!