काय म्हणालात? रेषेवरची अक्षरं? ते काय असतं बॉ? आमची ही अक्षरं रेषेवरची काय, रेषेखालचीही नाहीत..! ही आहेत केवळ वेडीवाकडी अक्षरं.. आमच्या अनुभवविश्वातली..!
सारं काही तेच ते अन् तेच ते..! विंदांची कुठलिशी कविता आहे म्हणे ही. इथेही तसंच आहे. तोच तो मुंबैचा फोरास रोड. तोच तो तिथला झमझम देशी दारूचा बार अन् तोच तो तिथला कॅशियर तात्या..!
सायंकाळचे वाजले असतील सताठनऊ.. तात्या बारच्या गल्ल्यावर बाटल्यांचा हिशेब करीत बसला होता. बारमधली मंडळी निवांतपाणे पीत होती. शिव्या ओव्या गप्पा सुरू होत्या. नेहमीचाच रुटीन कर्यक्रम सुरू होता..
"ए तात्या भडव्या चकणा दे ना.. भें**.. केव्हापासनं मागतोय कोण ऐकायला कबूल नाय..!"
कुणा गिर्हाईकाने मला छानशी शिवी दिली होती.. मीही लगेच दुसरी एक सणसणीत शिवी हासडून बारच्या पोर्याला त्या इसमाला चकणा द्यायला सांगितला. पोर्याने माझी शिवी खाताच त्या इसमाम्होरं चणे नेऊन ठेवले..
'कोण हा मला नावानिशी ओळखणारा? तसा मी त्या फोरासरोडवर 'तात्यासाब' म्हणून प्रसिद्ध होतो. पण आता येथे येणारी नियमित गिर्हाईकंही मला वळखू लागली होती म्हणायची! पण हा चक्क मराठीत एकेरीवर येऊन मला 'तात्या..भडव्या..' अशी फुलं वाहणारा कोण?
ती संध्याकाळ तशीच मावळली. पुन्यांदा दोन्चार दिसात पुन्हा तो शिवी देणारा बारमध्ये पियाला आला. तो आला. टेबलापाशी बसला. जीएम डॉक्टरचा त्यानं फुल्ल खंबा मागवला. मग मीच पुन्हा शिवी खायच्या आत चपळाईनं थोडे चणे अन् भाजलेला पापड घेऊन त्याच्या टेबलापाशी गेलो..
"सॉरी बॉस.. परवा चुकून शिवी गेली तोंडातनं.. काय सांगू, डोकं जाग्यावर नसतं..! " असं म्हणून तो थोडासा ओशाळा हासला..
त्याक्षणी मला तो आवडला अन् मीही त्याच्या टेबलापाशी त्याच्यासमोर बसलो..त्याला गप्पात रंगवायचा यत्न करू लागलो. लौकरच त्यात मला यश आलं..
हा कोण?, कुठला? याची उत्तरं मिळतील अश्या बेतानं त्याच्यासोबत गप्पा विणू लागलो. जी एम डॉक्टरचा पयला पेग भर्कन संपवला गड्यानं.. दुसरा पेग सुरू झाला. अधूनमधून मी गल्ल्यावर जात होतो, तिथलीही कामं संभाळत होतो..
भिवा शिवराम लोहारी असं कायसंसं त्याचं नाव मला समजलं..
"ए तात्या, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातो मी.. मा***द..!" भिवाच्या डोळ्यात आता पाणी होतं. स्वतःलाच त्यानं चांगली पंचाक्षरी छप्पर उडवणारी, सॉरी, रेषेवरची शिवी घातली होती.. ;)
"का रे बाबा? काय झालं..? रडतोस का? मला सांग की.."
माझ्या प्रश्नातली आपुलकी त्याला भावली असावी. त्यानंतर भिवा माझ्याशी बोलू लागला.. मोकळा झाला.
मुंबै शहर.. लाखोंच्या वस्तीचं.. हार्बर, मध्य व पश्चिम अश्या तीन तीन रेल्वेचं जाळं असलेलं. इथे हप्त्याला किमान सताठ रेल्वे अपघात ठरलेले... त्यात बरेचसे भिकारीटाकारी, तर बरेचसे अगदी चांगल्या घरचेही. कुणी डोकं खांबाला अडकून चालत्या गाडीतनं पडलेले, कुणी जीव दिलेले, कुणी धावती गाडी पकडताना प्लॅटफॉर्मखाली गेलेले तर कुणी घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडताना गाडीखाली आलेले..!
सर्वांवर उपाय एकच. पोलिस मयत व्यक्तिला त्याच्या तुटक्या अवयवांनिशी नजिकच्या मुल्शिपाल्टीच्या नायर/सायन/केम/कस्तुरबा इत्यादी रुग्णालयात पोचवतात. अन् तिथूनच नेमकं भिवाचं काम सुरू होतं.. ज्या डेडबॉडीज विविध रुग्णालयात पोहोचवल्या जातात, भिवा त्या सार्या रुग्णालयातला व्हिजिटिंग/फ्रीलान्सर मुडदा-शिंपी आहे.. !
एक जाडसर दाभण घेऊन त्याच्यात त्याच जाडीचा भक्कम दोरा ओवून प्रेतांचे तुटलेले हात-पाय-मुंडकी टेंपरवारी किंवा नेणार्याला बॉडी एकसंध नेता येईल इतपत शिवणे व त्या बदल्यात संबंधित रुग्णालयातून/मृतांच्या नातेवाईकांकडून पैशे घेणे हेच भिवाचं काम, त्याचं उत्पन्नाचं साधन, त्याचं मानधन, त्याची बिदागी...!
"काय करशील तात्या, हे काम पण कुणीतरी केलंच पायजेल ना? आपण करतो..!"
ती संध्याकाळही तशीच संपली.. पण भिवा हप्त्यातनं तीन्चार दिस तरी बारमध्ये येतच होता. "तात्या, भडव्या आज आमलेट मागव ना. पण तुझ्या पैशाने हां.!"," तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा"? असे आमचे दोस्तीतले संवाद सुरू झाले, हायहॅलो सुरू झालं.. माझी अन् भिवाची वेव्हलेंथ जमली.. भिवा यायचा, तासभर बसायचा.. कधी रडायचा, कधी फुल्ल टाईट झाल्यावर काहितरी कारणाने कुणाला तरी जाम शिव्या द्यायचा..
मध्यम उंची, कुरुप चेहेरा..साधेसुधे कधी बरे तर कधी मळके कपडे, साफ हडकुळा..वगैरे वगैरे. हे भिवाचं वर्णन.. पण चेहेरा मात्र विलक्षण बोलका..!
" तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा?"
"नको रे. मी देशी पीत नाही.."
थोड्या वेळाने भिवा टाईट. "मायझंव, इंग्लिश मागवू का तुझ्याकरता? पी ना रे भोसडचोदीच्या.. आज दोन दोन पाय शिवलेत.. एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..!"
एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..???????????????????
"तात्या, एक लै भारी मालदार पार्टी होती रे ती.. काय कसा माहीत पण त्यांचा तरूण पोरगा गाडीखाली आला रे.. अरे भल्या घरची माणसं होती रे ती.. मुलाचा बाप/भाऊ/काका/मामा अन् कोण कोण.. सारीजण बॉडी न्यायला आल्ते रे पोराची.."
"मग..?"
"मग काय? ते आले तेव्हा मी नायरच्या मॉर्गमध्येच होतो. पोस्टमॉर्टेम होऊन त्या पोराची ताजी बॉडी नुकतीच आणून ठेवली होती मॉर्गमध्ये.. सोबत तुटलेले दोन पाय..! भडविचं कार्ट कसं काय ट्रेनखाली आलं असणार कोण जाणे..!"
मी बगितलं.. पार्टी भली होती, पैशेवाली पण वाटत होती. त्या पोराचा कोण काका की मामा आत आला. बॉडीची ओळख पटवून बॉडी पायजेल म्हणाला. मी म्हटलं "घ्या ही बॉडी अन् ते पाय..!"
"नेहमीचा अनुभव रे तात्या.. तुला काय लेका, तू मस्त इथे बारमध्ये गल्यावर बसलेला असतोस..!"
दुनियेत सगळं सापेक्ष आहे मंडळी.. मला तेव्हा माझा कुणी सखसवंगडी सी ए होऊन त्याच्या एसी हापिसात बसलेला असतो त्याचा हेवा वाटतो, तर भिवाला माझा हेवा वाटतो..!
"बॉडी शिवायचे पैशे होतील.." भिवानं सुचवलं अन् एक पाय शिवायचे तीनशे रुपये या प्रमाणे दोन पायाचे सहाशे असा सौदा ठरला..!
"एक पाय शिवायचे तीनशे रुपये? अरे शिवणारा काय एकच पाय शिवून घेईल का?" मला विनोदीच वाटला तो प्रकार..
"आमच्यात असाच रेट सांगतात..!"
पण त्या दिवशी मात्र भिवा जामच अस्वस्थ वाटला..
"तात्या, मला पचतील का रे हे सहाशे रुपये? पण मी काय करू? मी माझं काम केलं आहे.."
सारं काही भिवाच बोलत होता..!
मला नेमकं काय बोलावं ते सुचत नव्हतं..
"अरे तात्या, तसा मी या कामाला चांगला सरावलो आहे. आजवर इतक्या बॉड्या शिवल्या की आता या कामाचं काही वाटत नाही. शिवायचे पैशेपण घेतो चांगले.. पण कधी कधी लैच त्रास होतो.."
थोडा वेळ तसाच गेला.. भिवाने बाटली संपवली.. बेभान टाईट झाला अन् तिथेच भडाभडा ओकला..!
मी काहीच बोललो नाही.. बारच्या पोर्याला सांगून ते सगळं साफ करून घेतलं.. भिवाच्या चेहेर्यावर सोडा मारला. अजूनही भिवा टाईटच होता..बरळत होता -
"तात्या, मला नाय पचले रे ते सहाशे रुपये.. भांचोत, त्या पोराच्या बापाचा चेहेरा डोळ्यासमोर दिसतो. पोरगंही गोड होतं रे.."
का माहीत नाही, पण माझा भिवावर अन् भिवाचा माझ्यावर लोभ होता..एकदा केव्हातरी मी चिंचपोकळीला असणार्या त्रिवेणीसदन या त्याच्या चाळीतही गेलो होतो. भिवानं तेव्हा माझ्याकरता इंग्लिश मागवली होती..!
त्यानंतरही भिवा बारमध्ये येतच गेला, येतच गेला..
कधी कुणाचा पाय शिवून, तर कधी हात शिवून तर कधी पायाची जोडी किंवा हाताची जोडी शिवून व जोडीच्या हिशेबात पैसे घेऊन...!
- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
8 Nov 2010 - 10:31 pm | यकु
:(
आता ह्याला क्वांटीटी म्हणायचं का क्वालीटी तात्या??
जबरदस्त वेग असलेले वास्तववादी लिखाण!
8 Nov 2010 - 10:33 pm | चिरोटा
मन अस्वस्थ करणारे अनुभव.
8 Nov 2010 - 10:35 pm | पैसा
जगात पोटासाठी सगळ्या प्रकारची कामं करणारे लोक असतात. त्यांचीही गरज भागते, जगाचीही....
8 Nov 2010 - 10:35 pm | पिवळा डांबिस
सुन्न!!!
बस्स, आणखी काही प्रतिक्रिया सुचत नाहिये!!!
9 Nov 2010 - 12:03 am | चिगो
सुन्न...
9 Nov 2010 - 1:52 am | मेघवेडा
असंच म्हणतो. सुन्न. :(
9 Nov 2010 - 9:53 pm | संजय अभ्यंकर
सुन्न!
10 Nov 2010 - 12:59 am | मी-सौरभ
__/\__
सुन्न करणारे व्यक्तिचित्र..
8 Nov 2010 - 10:58 pm | प्रियाली
काय प्रतिक्रिया देणार या लेखावर?
8 Nov 2010 - 10:59 pm | झंम्प्या
खरंच काहीच सुचत नाही... सुन्न...
8 Nov 2010 - 11:19 pm | प्राजु
बापरे!!! काहीच सुचत नाहीये..
8 Nov 2010 - 11:44 pm | शिल्पा ब
बापरे !!! असं काही काम असतं हेच मला माहिती नव्हतं...
8 Nov 2010 - 11:58 pm | बेसनलाडू
पण केवळ एकच अनुभव का? तुमच्यासारखेच भिवाचे अनुभवविश्वही समृद्ध असेलच की; आणि इतकी मैत्री झाली असेल, तर चारदोन आणखी अनुभवही सांगता आले असते त्याचे. असो.
त्याच त्या व्यक्तिचित्रांपेक्षा हे वेगळे आणि वेगवान असल्याने आवडले. पण विंदांच्या कविता, रेषेवरची अक्षरे आदींच्या अनावश्यक संदर्भांतून इतक्या चांगल्या, चवदार पाककृतीत कुठे थोडेसे मीठ जास्त, तर कुठे कच्चट राहिलेली भातशिते असे काहीसे दुर्दैवी, बेचवही घासात येते, हे खेदजनक. चालायचंच!!
(वाचक)बेसनलाडू
9 Nov 2010 - 12:44 am | भडकमकर मास्तर
सहमत..
नेहमीपेक्षा वेगळे व्यक्तिचित्र..
आवडले...
9 Nov 2010 - 6:34 am | सहज
पण असे खडे मीठ घालुन येणारी चव तात्याला जास्त आवडते त्याला कोण काय करणार. ज्याची त्याची... :-)
हे व्यक्तिचित्र वेगळेच. अजुन येउ द्या.
9 Nov 2010 - 10:58 am | श्रावण मोडक
बेलाशी सहमत.
वेगळे आणि वेगवान (पण श्राद्ध उरकावे तसे उरकलेले) व्यक्तीचित्र.
खरं तर, हे व्यक्तीचित्र नव्हेच. भिवा ही व्यक्ती इतकीच आहे? शवाचे (इथं मलाही मुडद्याचे असं म्हणता येतंच) चार अवयव शिवणारी? ती तेवढीच असेल तर तशी माणसं जवळपास प्रत्येक जिल्हा रुग्णालयात असतात (इथे माझ्यापेक्षा प्रसन्न केसकर अधिक बोलू शकतात). भिवासारख्या व्यक्तीत दडलेला माणूस हा फक्त बेवडेबाजीपुरताच असतो? का फक्त इंग्लीश पाजण्यापुरता असतो?
अनुभवलं आहे ना अधिक, तर लिहा अजून. लिहिले आहे ते वाचकांना मूक करणारं असेल तर, आणखी असं लिहा की वाचक बोलू लागतील. पण ते आव्हान आहे आणि ते पूर्ण केल्यानंतर झटकन टाळ्या मिळत नसतात.
अर्थात, हे सगळं जालावरही सकस साहित्य निर्माण होऊ शकतं या समजातून लिहिलं आहे. जालावर आम्ही केवळ टाईमपास, विरंगुळा यासाठी येतो असं मानणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करावे, ही विनंती.
9 Nov 2010 - 11:05 am | विसोबा खेचर
बेला आणि श्रामो,
आपल्या दोघांच्याही सूचनांचे स्वागत आहे/आदर आहे..
तूर्तास इतकंच सांगेन की ही थोड्या गडबडीत उरकलेली भिवाची धावती ओळख समजावी..
हे व्यक्तिचित्र निश्चितपणे क्रमश: होऊ शकेल..भिवाबद्दल लिहिण्यासारखं अजूनही खूप काही आहे ते लिहू शकलो नाही, धावत्या ओळखीत जमवू शकलो नाही हे मान्य..!
परंतु 'क्रमश:' या शब्दाची माझी मलाच अलिकडे खूप भिती वाटते.. :)
असो..
भिवा पूर्ण करीन..
तात्या.
9 Nov 2010 - 11:08 am | श्रावण मोडक
स्वागत, वाट पाहतोय. :)
9 Nov 2010 - 12:30 pm | बेसनलाडू
तात्या,
तुमच्या अनुभवविश्वबद्दल आणि व्यक्तीचित्रणातील हातोटीबद्दल शंकाच नाही. पण वर श्रामोंनी म्हटल्याप्रमाणे तुमच्या संपर्कात येणारी व्यक्तीही तुमच्यासारखीच अनुभवसमृद्ध असणार हे नक्की. आणि ते विश्व उलगडून दाखवण्याची, त्या अंतरंगांत डोकावण्याची खुबी तुम्हाला अवगत असल्याने आम्हालाही ते विश्व तुमच्या लेखनातून दिसावे, असे वाटते. म्हणून इतका प्रतिसादप्रपंच.
(प्रतिसादी)बेसनलाडू
9 Nov 2010 - 2:08 pm | विसोबा खेचर
धन्यवाद बेलाजी..!
तात्या.
( आता आपण मालक नाही. पुन्हा सारी जमवाजमवी केली पायजेल..! ओक्के..! - स्वगत ;) )
9 Nov 2010 - 8:26 pm | तिमा
तात्या तुम्ही या भिवा शिंप्यावर किंवा झमझम बारमधल्या कुठल्याही एका कॅरॅक्टर वर एक नाटक लिहा 'सखाराम बाईंडर' सारखं! लई पावरबाज होईल बघा.
9 Nov 2010 - 1:01 am | इंटरनेटस्नेही
जबरदस्त! तात्यांचा व्यक्तिचित्रणात कोणीही हातच काय बोट देखील धरु शकणार नाही!
रेल की पटरी पार ना करे, पुलों का करे इस्तेमाल, आप रहेंगे सदा सुरक्षित और हमेशा ही खुशहाल!
9 Nov 2010 - 2:20 am | उपास
तात्या, साल्या का लिहितोस असं.. काय मिळतं तुला.. आं?
9 Nov 2010 - 2:30 am | असुर
भीषण आहे हे! एक जोडी पाय शिवून नंतर त्याच पैशाची... स्साला, पोटापायी परिस्थिती काय प्रसंग आणते...
--असुर
9 Nov 2010 - 7:41 am | यशोधरा
बापरे...
9 Nov 2010 - 7:53 am | स्पंदना
हम्म्म्म्म्म्म्म्म!
मुम्बैतल्याला कलत हे सगळ ....बर्याचदा ..च्..काहिच लिहावस नाही वाटत .
9 Nov 2010 - 8:23 am | llपुण्याचे पेशवेll
हम्म. आमच्या ओळखीतले एक ससून मधे फोटोग्राफर होते. काम : पोलिस रेकॉर्डसाठी मुडद्यांचे फोटो काढायचे. बर्याच गोष्टी सांगायचे अशा. पण स्वतः ते कधी दारू प्यायचे नाहीत का कधी कोणाला शिवीगाळ करायचे नाहीत. तसे एकदम शांत आहेत. पण त्यांच्या तोंडून या अशा गोष्टी ऐकल्या आहेत. इतरही अनेक गोष्टी ऐकल्या आहेत अशाच. मध्यंतरी जर्सी सिटी, न्यू जर्सी मधे ख्राईस्ट हॉस्पिटलमधून एक नवजात अर्भक जे जन्मतःच मृत होते त्याचा मृतदेह गहाळ झाला (कदाचित ट्रॅशमधे गेला असे हॉस्पिटलचे म्हणणे होते) त्यामुळे तिकडे बराच मोठा गजहब झाला होता. पण इथे ससून मधे अशा बर्याच गोष्टी होतात. कधी कधी तर बेवारस प्रेतांचे तुटलेले हात पायही कचर्याबरोबर जातात. सुरुवातीला अशा घटना घडल्या तेव्हा पोलिसांना खुनाचा संशय येऊन बराच तपास केला पण नंतर कळले की ढिसाळ सेवकवर्गामुळे असे होते. मग परत असे काही मिळाले की पोलिस पहीले शवागारात बघतात कुठल्या प्रेताचा हात पाय हरवला आहे का ते. असेल तर तो मिळालेला भाग तिथे जुळणारा आहे का ते बघायचे. जुळत असल्यास तो त्या प्रेतापाशी ठेऊन मग मुदत पूर्ण होण्याची वाट बघायची.
असो.
तात्याचा लेख छान.
9 Nov 2010 - 8:36 am | ईन्टरफेल
जबरी लेख
तात्याचे लीखान
वाचुन मन सुन्न होते
9 Nov 2010 - 12:11 pm | टुकुल
एकदम सुन्न झालो, विचारच केला नव्हता कधी कि अस पण कुठल काम असु शकत.
9 Nov 2010 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार
एका वेगळ्याच व्यक्तीचरित्राची ओळख ! खास तात्या शैलीतले ओघवते लेखन आवडले.
9 Nov 2010 - 12:57 pm | मराठमोळा
सुन्न..
एकदा एक पोस्ट मॉर्टम करणारा पाहिला होता, त्याच्या अंगाला खुपच घाणेरडा वास येत होता, आणि हे लोकं कायम दारु पिऊन असतात असे कळले, बरचसे डॉक्टरसुद्धा दारु पिऊन ऑपरेशन करतात असे ऐकले आहे. त्याशिवाय हे प्रकार करण अवघड असेल असे वाटते.
9 Nov 2010 - 2:18 pm | भडकमकर मास्तर
बरचसे डॉक्टरसुद्धा दारु पिऊन ऑपरेशन करतात असे ऐकले आहे. त्याशिवाय हे प्रकार करण अवघड असेल असे वाटते.
वरील वाक्य मोठे रोचक वाटले.
बरेचसे म्हणजे नक्की प्रमाण किती, कोणत्या प्रकारचे डॉक्टर, दारू किती?कोणत्या प्रकारची?, कोणते ऑपरेशन , कोणाकडून ऐकले असे काही तपशील कळाल्यानंतर विधान अधिक रोचक होईल असे वाटते...
आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ काही लगेच सुचणारी उदाहरणे:
१.आता डॉक्टरी न करणार्या एका नटाने लिहिलेल्या एका पुस्तकात त्याने चक्क अमेरिकेत कान नाक घशाची शस्त्रक्रिया शिकत असताना दारू पिऊन ऑपरेशन केले आणि ते कसे व्यवस्थित झाले याची रोचक कथा लिहिलेली होती , हे त्यानिमित्ताने आठवले.
२.मृत्युदाता नावाच्या सिनेमामध्ये ( दिग्द.मेहुलकुमार) तो उन्च नट पिऊन शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टराचा अभिनय करतो.
9 Nov 2010 - 2:59 pm | मराठमोळा
>>बरेचसे म्हणजे नक्की प्रमाण किती, कोणत्या प्रकारचे डॉक्टर, दारू किती?कोणत्या प्रकारची?, कोणते ऑपरेशन , कोणाकडून ऐकले असे काही तपशील कळाल्यानंतर विधान अधिक रोचक होईल असे वाटते...
अवघड आहे ब्वॉ.. हे स्टॅटीस्टीक्स शोधणं एखाद्या पी एच डी करणार्यालाच जमेल..
मला एक माणसांचा डॉक्टर/सर्जन माहित होता, तो रम चे ३-४ नीट पेग घ्यायचा, अॅक्सींडंट केस मधील हाडांच्या ऑपेरेशन्च्या आधी. ;)
9 Nov 2010 - 1:31 pm | स्वाती दिनेश
वाचताना सुन्न व्हायला झाले,
(श्रामोंच्या सूचनेचा विचार व्हावाच..)
स्वाती
9 Nov 2010 - 2:03 pm | सविता००१
खरेच मलाही असे काही माहित नव्हते
9 Nov 2010 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते
छान व्यक्तिचित्र. श्रामो, बेला आणि तात्याचा संवादही आवडला.
नायरच्या मॉर्गमधे अगदी आत जाऊन स्वतःच्या आप्ताची बॉडी ओळख पटवून ताब्यात घ्यायचा प्रसंग स्वानुभवातला आहे. त्यामुळे लेखन अजून भावले. पण सुन्नता प्रत्यक्षात अनुभवली असल्याने इथे वाचताना मन निब्बर झालं.
9 Nov 2010 - 5:03 pm | डॉ.प्रसाद दाढे
मेंदूला झिणझिण्या आणणारा लेख..
दारू पिणार्या डॉक्टरांवरून एक किस्सा आठवला.. एकदा असेच काही डॉक्टर्स पार्टीला
बसले होते, मैफल रंगात आली अन त्यातल्या एकाला मोबाईलवर होम व्हिजिटसाठी इमरजन्सी
कॉल आला. फोनवरच्या संभाषणावरून इतरांना अंदाज आला की पेशन्टला मॅसिव्ह हार्ट अॅटॅक आलेला
आहे. ह्या पठ्ठ्याने सांगितले,"आजोबांच्या अंगाला भरपूर ब्रॅन्डी चोळा, मी येतोच आहे.." फोन ठेवल्यावर
मित्रांनी विचारलेच की अश्या परिस्थितीत ब्रॅन्डीने काय होणार आहे? डॉक्टर म्हणाले," अर्थात काहीच
फरक पडणार नाही पण निदान त्यामुळे नातेवाईकांना माझ्या तोंडाचा वास तरी जाणवणार नाही!"
10 Nov 2010 - 11:41 am | विसोबा खेचर
मस्त किस्सा दाढेसाहेब.. :)
तात्या.
9 Nov 2010 - 6:10 pm | स्वाती२
सुन्न करणारे लेखन!
या लेखामुळे इथे फ्युनरल होम मधे embalmer चे काम करणार्या लोकांची आठवण झाली. इथे Mortuary Science and Embalming शिकण्यासाठी कॉलेज प्रोग्राम आहे. हा ट्रेड घेणार्या लोकांचा या गोष्टी कडे बघायचा दृष्टीकोन -" we help people in their difficult time" असा असतो.
9 Nov 2010 - 7:54 pm | शुचि
प्रकाटाआ
10 Nov 2010 - 1:47 am | वारा
पी. एम. सेन्टरचा अनुभव एकदा आला होता. अशा कामातील लोका.न्च्याकडे बघण्याचा समाजाचा द्रुष्टीकोण विचीत्र असतो. तात्या.न्चा लेख व ईतर सभासदा.न्च्या प्रतिक्रीया आवडल्या.
10 Nov 2010 - 11:43 am | विसोबा खेचर
प्रतिसाद देणार्या सर्वांचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..
सवड मिळाल्यास व मूड लागल्यास भिवाबद्दल अजूनही काही नक्की लिहीन..
तात्या.
11 Nov 2010 - 3:27 am | आमोद शिंदे
वा! तात्या छानच लेख. शिवाला सांगा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायला तो काय कुणाच्या दुर्धर व्याधीच्या नावाने लोकांना ३%ने थोडाच लुबाडतोय.