२. तबला एकल वादन - वैविध्य

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
8 Nov 2010 - 12:56 am

तबला म्हणजे उ. झाकिर हुसेन असे एक समीकरणच झाल्यात जमा आहे इतकी या कलाकाराची चतुरस्त्र प्रतिभा आणि तपश्चर्या मोठी आहे. असे असूनही आपण आणि श्रोते असा एक भावबंध जुळून यावा, आपले वादन फारशी जाणकारी नसलेल्यासाठीही रंजक ठरावे यासाठी ते आवर्जून प्रयत्न करतात आणि ते हुकूमीपणे जमवूनही आणतात. मूळ पंजाब घराण्याचे असूनही त्यानी इतर घराण्यांचा सखोल अभ्यास, आणि गाढा व्यासंग केलेला आहे. उ. झाकिर हुसेन हा स्वतंत्र लेखच काय लेखमालेचा विषय होईल. विस्तारभयास्तव थोडक्यात आटपते घेतो. तबला वादनातील रेला हा प्रकार इथे उस्तादजी उलगडून सांगत आहेत. ते कुठलाही बोल द्रुत वाजवत असताना जो नाद कानावर पडतो त्यात एकप्रकारची 'रव' (पदरव, गुंजारव या शब्दातील रव) जाणवते. उ. थिरकवा खानसाहेबांच्या वादनातली ही खासियत. तिचा प्रत्यय ऐकताना येईल. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक अजय चक्रवर्ती (उ. बडे गुलाम अलींचे पट्टशिष्य) येथे वेगळ्या भूमिकेत आहेत. त्यानी वाजवलेल्या नगम्यामुळे वादन अधिकच रंगतदार झाले आहे.

पंडित स्वपन चौधरी हे आणखी एक बुजूर्ग तबलावादक. उ. अली अकबर खानसाहेबांबरोबर सर्वाधिक काळ संगत त्यानीच केलेली आहे. हे अमेरिकेत वास्तव्यास असल्याने त्यांच्या एकल तबलावादनाचे (सोलो) कार्यक्रम भारतात तुलनेने कमीच होतात. 'धिर धिर' हा बोल ते विलक्षणच वाजवतात. तयारी आणि नादमाधुर्य दोन्हीत ते कसे बेजोड आहेत याचा प्रत्यय या छोटेखानी फितीमध्ये येईल. त्यानीच वाजवलेला 'तक धीन तक' चा लखनौ घराण्याचा (पूरब बाज) अवघड कायदा किती डौलदार आहे हे ऐकायलाच हवे. बनारस घराण्याचा जोरकस, खुला बाज आणि हा नरम, बंद बाज यातील नादाच्या गुणवत्तेचा (टोनल क्वालिटी) फरक सहज लक्षात येईल. या वादनाला पण्डित रमेश मिश्रा यांची सारंगीची साथ हा दुग्धशर्करा योगच आहे.

पंडित आनिंदो चटर्जी हे बूजुर्ग तबला वादक 'घेघे तीट' या बोलावर आधारित उ. हबीबुद्दिन खानसाहेबांच्या खानदानी बंदिशी पेश करताना. यांच्या वादनात इतकी सहजता आहे, की विलक्षण मुष्कील काम करत असतानाही ते विमानात बसून वर्तमानपत्र चाळत आहेत असे वाटावे. हा बोल ऐकत असताना कबुतरांची जोडी 'गुटुरघू' करते आहे असा भास होईल अशा रंजक पद्धतीने उ. झाकिर हुसेन पेश करतात. इथे तो पारंपारिक पद्धतीने वाजवलेला आहे.

पाकिस्तानात वास्तव्य असलेले अब्दुल सत्तार तारी खान हे एक हरहुन्नरी तबला वादक. उपशास्त्रीय संगीताला साथ करण्यात यांचा हातखंडा आहे. मेहदी हसन, गुलाम अली यांच्या गझल गायकीच्या कित्येक मैफिली त्यानी गाजवल्या आहेत. हे स्वतः उत्तम गझल गायकही आहेत. त्यांच्या 'लाईट' वादनाने या लेखाची सांगता करतो.

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

उस्ताद झाकीर साहेब वगळता इतर सर्वांना पहिल्यांदाच ऐकण्याचा योग आला.
तुम्ही केलेल्या जबरदस्त विश्लेषणावरून दिसतंच की मूकवाचक तब्बलजी भी है!
आता तुमचीच एक क्लीप टाका इथं.

अवांतरः उस्ताद झाकीर हुसेन फिल्मिंडस्ट्रीत हिरो के तौर पर आते तो भी सितारा बनते. व्हेरी हॅण्डसम अ‍ॅण्ड डिसन्ट गाय.

उस्ताद झाकीरांच्या एका अत्यंत दर्दी अभ्यासक चाहतीने केलेले (हे) अप्रतिम लिखाण यावरून आठवले.

मूकवाचक's picture

9 Nov 2010 - 3:08 am | मूकवाचक

धन्यवाद यशवन्त जी.

"उस्ताद झाकीर साहेब वगळता इतर सर्वांना पहिल्यांदाच ऐकण्याचा योग आला" - हेच महत्वाचे.

लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वाचे मन:पूर्वक आभार.

तबला वादनाच्या क्षेत्रात प्रत्येक घराणे स्वतन्त्र लेखच काय तर लेखमालेचा विषय ठरेल इतके समृद्ध आहे. तेच तबला वादकान्चे. प्रत्येकावर स्वतन्त्र लेखमाला लिहावी असे कित्येक दिग्गज वादक होऊन गेले आणि आजही आहेत. तेव्हा या विषयावर इतके सविस्तर आणि विद्वत्तापूर्ण लिहीणे म्या पामराचे काम नव्हे. मी आधीच लिहिल्याप्रमाणे मला मनापासून ऐकण्याची आवड असली, तरी या विषयात माहिती जुजबी स्वरूपाचीच आहे.

या त्रोटक लेखमालेला 'श्रीगणेशा' केला असे आपण समजूया. इथे प्रतिसाद देणार्या रसिक श्रोत्यानी जी घराणी आणि वादकान्चा उल्लेख केला त्यान्च्याबद्दल इथे सविस्तर प्रतिक्रिया देणे, स्वतन्त्र लेख लिहीणे असे केल्यास ही मालिका पुढे चालूच राहिल. शक्यतो या क्षेत्राला ग्रासून टाकणारी अतिरेकी व्यक्तीपूजा टाळली, श्रेष्ठत्वाचे वाद टाळले आणि लिखाणाला छोट्याछोट्या ध्वनिचित्रफितीन्ची जोड दिली तर उपयुक्त ठरेल एवढेच नम्रपणे सुचवतो.

बाकी चू.भू.दे.घे.

चिंतामणी's picture

8 Nov 2010 - 8:33 am | चिंतामणी

तबला वादनात (आणि शिष्य घडवण्यात) आजच्या पिढीतील एक महत्वाचे नाव आहे तालयोगी पं. सुरेश तळवळकर. त्यांच्या उल्लेखाशीवाय हा लेख नक्कीच अपुर्ण आहे. पुढील ५ मिनीटाचे क्लिपींग पुर्ण बघावे.

http://www.youtube.com/watch?v=5XFZ_NXTPHY

विसोबा खेचर's picture

8 Nov 2010 - 10:53 am | विसोबा खेचर

बहोत अच्छे..

कृपया अजूनही विस्तृत लिहा..

एकल तबलावादनात पं भाई गायतोंडे यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल..

तात्या.

चिंतामणी's picture

8 Nov 2010 - 11:06 am | चिंतामणी

तालयोगी पं. सुरेश तळवळकर हे भाईंचेच शिष्य आहेत.