एकात्म - ५ अंतीम भाग.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Nov 2010 - 5:20 pm


एकात्म भाग चवथा
एकात्म भाग तिसरा
एकात्म भाग दुसरा
एकात्म भाग पहिला

बाहेर पडलो आणि पावले आपोआप नदीकडे वळली. वाळूत बसलो आणि मागे वळून बघितले चंद्र चिंचांच्या मागून आकाशात आला होता. त्याच्या प्रकाशात पाणी चमचम करत होते.. त्या चंद्रप्रकाशात आमच्या वाड्याची काळी आकृती स्पष्ट दिसत होती. त्याच्या कडेची चिंचेची झाडे स्तब्ध उभी होती. मी पाण्याकडे पाठ करून वाड्याकडे नजर रोखली. तेवढ्यात चिंचावरून दोन तीन घारी पंख फडकवत उडाल्या. मी सिगरेट पेटवली आणि वाळूत रेघा मारत विचार करत होतो.
काय करावं......................................

विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती तेव्हा. तेथेच वाळूत कलंडलो. डोळे मिटले. उघडले तेव्हा चंद्र डोक्यावर आला होता. पंधरा वीस फुटावर एक मोठी घार वाळूत शांतपणे उभी राहून माझ्याच कडे बघत उभी होती. ती तेथे का उभी होती हे आता मला चांगलेच माहीत होते. काळजी करत बसण्यापेक्षा नातवावर नजर ठेवणे सोपे नाही का ?

आज चाळीस वर्षांनंतर मी त्याच वाळूत अशाच चंद्रप्रकाशात खुर्ची टाकून बसलो आहे. अरे हो मधे काय काय झालं हे सांगायलाच पाहिजे.

आजी गेली. तिच्या अगोदर आई गेली. मी लष्करात कमिशन घेऊन वेगवेगळ्या गावी हिंडत होतो. अगदी कांगोमधेही गेलो. आता निवृत्त होऊन आजीच्या गावी बस्तान बसवले आहे. मामांनी गाव सोड्ले पण मी त्यांच्याकडून तुळशी वृंदावनापासून ते मागच्या दरवाजापर्यंत सर्व जागा विकत घेतली. डागडूजी केली. पण आहे तशीच ठेवली अगदी. त्या बाजे सकट, त्या खिडकीसकट. मागच्या दरवाजापासून नदीपर्यंत सगळी जमीन विकत घेऊन मी आता त्याच वाळूत खुर्चीवर आरामात माझ्या आवडत्या व्हिस्कीचे घोट घेत बसलो आहे. समोरच्या टेबलावर माझा लॅपटॉप आणि माझा पाईप. लॅप्टॉपवर मिसळपाव उघडलेले आहे आणि माझे वाचक मित्र आणि मैत्रिणी मदनबाण, यशोधरा, धमू, स्वाती, शुची, पैसा, मोहर, पुष्करिणी, स्पा, इंद्रा, तात्या, नितीन, शिल्पा, प्राजू मला आग्रह करताएत की अजून लिहा जरा सवीस्तर. पण आता याच्या पेक्षा सविस्तर लिहायचे म्हणजे मला ती पोथीच येथे लिहावी लागेल. ते कसे शक्य आहे ? या वरच समाधान मानून घ्या मित्रांनो !

थोड्याच अंतरावर माझा नोकर माझ्यासाठी बार्बीक्यूवर नदीतले मासे भाजतोय. माझ्या प्लेयरवर संध्याकाळचा अमीरखॉसाहेबांचा मारवा. थोड्याच वेळात माझा तिसरा पेग संपेल. त्याला माहीत आहे की त्या नंतर मला खायला लागते. बरोबर त्याच वेळी तो तो मासा माझ्या समोर टेबलावर आणून ठेवेल.

अरे हो सांगायचे राहिलेच ! मला मुलगी झाली. तिचे नाव साशेंका. लाडाने मी तिला म्हणतो साशा !. पुण्यात असते. तिलाही नुकतीच मुलगी झाली. मोठी गोड आहे माझी नात. म्हणून तिचे नाव ठेवले आहे “सायली”. मधून मधून पुण्याला चक्कर असतेच.

माझी गाडी चौकात पोहोचली की साशा कडेवरच्या सायलीला सांगत असणार “ रडू नकोस आजोबा आले बघ चौकात. ! त्याच वेळी आकाशात एखादातरी काळ ठिपका असणार हे आता मी तुम्हाला सांगायला नको.

मी सहज मागे वळून बघितले, चंद्र चिंचांच्या मागून आकाशात आला होता. त्याच्या प्रकाशात पाणी चमचम करत होते.. पेल्यातले पेय सोन्यासारखे चमकतय. त्या चंद्रप्रकाशात आमच्या वाड्याची काळी आकृती स्पष्ट दिसत होती. मस्त मंद वारा सुटलाय. वाड्याच्या कडेची चिंचेची झाडे मंद हलत होती. मी पाण्याकडे पाठ करून वाड्याकडे नजर रोखली. तेवढ्यात चिंचावरून दोन तीन घारी पंख फडकवत उडाल्या. मी पाईप पेटवला आणि पेल्यातल्या त्या सोनेरी पेयाचा आस्वाद घ्यायला सुरवात केली.
समाप्त.
जयंत कुलकर्णी.

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणालाही कसलेही कशाबरोबर साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. मित्र मैत्रिणींची नावे त्यांना न विचारता लिहीली आहेत त्या बद्दल क्षमस्व. आशा आहे ते माफ करतील !

कथा

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Nov 2010 - 5:29 pm | पैसा

सगळी कथामालिका वाचताना आपण पण त्या घारींबरोबर एक साक्षीदार आहोत असं वाटत राहिलं.

माझी गाडी चौकात पोहोचली की साशा कडेवरच्या सायलीला सांगत असणार “ रडू नकोस आजोबा आले बघ चौकात. ! त्याच वेळी आकाशात एखादातरी काळ ठिपका असणार हे आता मी तुम्हाला सांगायला नको.

बस्स. इतकंच. आणखी सांगायची गरजच नाही!

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2010 - 5:43 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

वाचल्याबद्दल आणि इथे लिहील्याबद्दल !

स्पा's picture

6 Nov 2010 - 5:53 pm | स्पा

झकास भाग जयंत आजोबा............... ;)

आता पुढच्या "कादंबरीची" वाट बघतोय.. अशीच रहस्यमय पण जरा " मोठी".....:)

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2010 - 6:00 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

;-)

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणालाही कसलेही कशाबरोबर साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.

नेमकी कशाची भीती वाटते हो ही कथा पूर्णत: सत्य आहे हे सांगायला??
तुमच्या त्या कोवूरांची??
की वाचकांची? वाचकांची वाटत असती तर तुम्ही हे इथं मांडलंच नसतं.
आम्ही काही विचारायला येणार नाही सायलीला ते कसब कसे शिकवलेत ते.

पण अब्राहम टी. कोवूरांच्या चाहत्याची अशीही बाजू पाहून अमंळ मजा वाटली ;-)

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2010 - 6:11 pm | जयंत कुलकर्णी

हा हा ! :-) :-)

एक वेगळेच मत ! आवडले.

त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !

तुम्ही गप्प बसलाय आता जयंतराव! बदला ती स्वाक्षरी!

स्वाती२'s picture

6 Nov 2010 - 6:35 pm | स्वाती२

झकास!

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2010 - 7:10 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद स्वाती ! धन्यवाद !

प्रीत-मोहर's picture

6 Nov 2010 - 7:28 pm | प्रीत-मोहर

मस्तच...जरा उशीरा आले ..पण कथा खूप आवलडी

संजय अभ्यंकर's picture

6 Nov 2010 - 7:41 pm | संजय अभ्यंकर

आपण लिहिलेली कथा सत्य आहे अथवा नाही हे आपल्यालाच ठाऊक.
आपण त्या बद्दल अटकळ बांधायला जागा ठेऊन लेख संपवलात.

अत्यंत उच्च दर्जाचा लेख.

उच्च दर्जाचा ह्यासाठी की केवळ आपले आप्त, जिवलगच नव्हे तर, आपल्याला पदोपदि भेटणारी माणसे कशी आहेत, हे आपल्याला कळण्यासाठी ह्या तंत्राचा उपयोग होतो.

मी गेले २४ - २५ वर्षे भारत व जग फिरुन अनेक लोकांशी व्यवहार केला.
कोठे ठेचकाळलो, तर कोठे अनपेक्षीतपणे मनापासुन मदत करणारे भेटले.
ह्या वर विचार करता करता, लोकांच्या अंतरंगात डोकावण्याचे तंत्र आत कोठेतरी विकसीत होत गेले.

बर्‍याच वेळा माझ्या प्रतिक्रिया ह्या माझ्याशी बोलणार्‍या माणसाच्या आतल्या विचारांवर अवलंबून असतात, भलेही तो माणूस तोंडाने काही वेगळे बोलत असेल.

हे तंत्र आपले मन विकसीत करते.

कुठल्याहि व्यक्तीशी एकात्म होणे हे तपश्चर्येने जमते. आपण ह्यात १००% नाही, पण,बर्‍याच अंशी यशस्वी होऊ शकतो.
हि तपश्चर्या म्हणजे व्यक्तींचा अभ्यास, त्यांच्या विषयीचे मनन

"मी आता त्याच वाळूत खुर्चीवर आरामात माझ्या आवडत्या व्हिस्कीचे घोट घेत बसलो आहे. "

"थोड्याच अंतरावर माझा नोकर माझ्यासाठी बार्बीक्यूवर नदीतले मासे भाजतोय. माझ्या प्लेयरवर संध्याकाळचा अमीरखॉसाहेबांचा मारवा. थोड्याच वेळात माझा तिसरा पेग संपेल. त्याला माहीत आहे की त्या नंतर मला खायला लागते. बरोबर त्याच वेळी तो तो मासा माझ्या समोर टेबलावर आणून ठेवेल"

यार, माणसांना जळवायची लिमिट पार केलीत त्या बद्दल निषेध!

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2010 - 8:04 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

बसू एकदा यासारखे ! :-)

संजय अभ्यंकर's picture

6 Nov 2010 - 9:21 pm | संजय अभ्यंकर

आमंत्रणा बद्दल!

छान वाटलं इतक्या सुंदर साहीत्य कृतीमधे आमची नावं गुंफलीत : ) ..... परत शांतपणे पारायण करणार आहे या भागांचं. आत्ता ऑफीसमधून गडबडीत वाचले .
ह्म्म कोजागीरीच्या चांदण्यात शेकोटी पेटवून त्या ज्वाळांची आभा कशी बरं दिसत असेल? - विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
जयंतराव लिहीत रहा आपले लेख फार आवडतात. आणि आता आमची नावं गुंफल्याने तर वाचक-लेखक नात्याचे निराळेच बंध निर्माण झाले आहेत असं वाटतं. :)

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2010 - 8:27 pm | जयंत कुलकर्णी

या सुंदर प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ! आपणाला आपली नावे गुंफल्याचा आनंद झाला हे बघून मलाही बरे वाटले. असा प्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे.
वाचल्याबद्दल आणि आवडले ते इथे लिहील्याबद्दल परत एकदा आभार !

स्पा's picture

6 Nov 2010 - 8:18 pm | स्पा

आणि आता आमची नावं गुंफल्याने तर वाचक-लेखक नात्याचे निराळेच बंध निर्माण झाले आहेत असं वाटतं.

असेच म्हणतो.....

यशोधरा's picture

6 Nov 2010 - 9:19 pm | यशोधरा

आवडली कथा.
मित्रांमध्ये गणल्याबद्दल धन्यवाद.
घारीशी संवाद होतो का?

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2010 - 9:27 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

//घारीशी संवाद होतो का ?//

:-)

स्पा's picture

6 Nov 2010 - 9:30 pm | स्पा

अवांतर : एक छोटी शंका .....

घारींपेक्षा गरुड जास्त उंचावर उडतात ना?

जयंत कुलकर्णी's picture

7 Nov 2010 - 12:58 pm | जयंत कुलकर्णी

हो अर्थातच ! म्हणूनच त्यांची गाठ पडणे अवघड असते.
:-)

नगरीनिरंजन's picture

6 Nov 2010 - 10:25 pm | नगरीनिरंजन

दीर्घकथा आवडली! सत्याच्या आभासात काल्पनिक जगाचे रेखाटन करून अशा सिद्धीचे स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करणारे लेखन!

जयंत कुलकर्णी's picture

7 Nov 2010 - 9:37 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

या प्रामाणिक प्रतिक्रीयेसाठी !

मस्त... :)
मध्यंतरी ट्रीप मारली व्हतीत...तवाच हे समदं सुचलं हाय वाट्ट... ;)

जयंत कुलकर्णी's picture

7 Nov 2010 - 10:33 am | जयंत कुलकर्णी

:-)

धन्यवाद !

चिगो's picture

7 Nov 2010 - 10:59 am | चिगो

अतिशय सुंदर शैलीत, बांधून ठेवणारे लेखण...
एकदमच वाचली सगळी.. मस्त !!
असा सुंदर वाचनानुभव दिल्याबद्दल धन्यवाद...

जयंत कुलकर्णी's picture

7 Nov 2010 - 12:56 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !

कथा वाचल्याबद्दल आणि ती आवडली हे येथे लिहीलेत त्यासाठी आपले आभार !

पहिल्या पासुन तर वाचलीलच पण आज पुर्ण झाल्यावर परत एकदा सगळी वाचली. अतिशय गुढ वाटत होत वाचताना. म्हणजे हे वर्णन वाचुन झालय पुढ जावु अस नाही, परत एकदा पुरी त्याच जिज्ञासेन वाचुन झाली. सुन्दर !

अप्पा जोगळेकर's picture

7 Nov 2010 - 3:08 pm | अप्पा जोगळेकर

मनाची पकड घेणारं लिखाण आहे. नेहमीसारखंच. घारीची पकड असते ना अगदी तसंच.

झंम्प्या's picture

7 Nov 2010 - 3:29 pm | झंम्प्या

खुपच छान....
:)

जयंत कुलकर्णी's picture

7 Nov 2010 - 3:41 pm | जयंत कुलकर्णी

श्री. जोगळेकर, श्री. झंप्या आणि अपर्णा,

आपल्याला ही कथा आवडली हे वाचून आनंद झाला. ही कथा वाचल्याबद्द्ल आभार.

राजेश घासकडवी's picture

11 Nov 2010 - 3:55 am | राजेश घासकडवी

कथा पहिल्या भागापासूनच पकड घेते. त्या पोथीचं गूढ काय आहे हा पडलेला प्रश्न सुटेपर्यंत राहावत नाही. ते नक्की काय आहे याची हळुहळू मांडणी पहिल्या तीन भागात फारच छान झाली आहे. या कथेचा प्रवास एकरेषीय होत नाही. मूळ कथानकाला फांद्या फोडून एकाच वेळी उत्कंठा जास्त ताणणं, आणि त्या फांद्या रेखाटताना कथानकाला आवश्यक वातावरण निर्मिती करणं हे तंत्र फारच समर्थपणे वापरलेलं आहे. वातावरण निर्मिती सुंदर झालेली आहे. तो वाडा, तो बाक, ती पोथी... सगळं डोळ्यापुढे उभं राहातं.

शेवटच्या उपोद्घातात्मक भागातला हळुवार गौप्यस्फोटही उत्तम.

मिपावर इतक्या ताकदीचं लिखाण क्वचितच दिसून येतं. तेव्हा अजून उत्तमोत्तम लिहीत रहा ही विनंती. तोपर्यंत आमच्याकडून सलाम स्वीकारा.

जयंत कुलकर्णी's picture

11 Nov 2010 - 8:00 am | जयंत कुलकर्णी

श्री. राजेश,

आपली प्रतिक्रिया वाचून आनंदलो. जे मला करायचे होते, त्याचे वर्णन आपण अचूक केले आहे. आणि ते मला जमले आहे हे वाचून बरं वाटले. मला बर्‍याच वाचकांचे ( माझ्या ब्लॉगच्या) इ-मेल आले त्यात शेवट गुंडाळला आहे असे म्हटले आहे. आपल्याला व इतरांनाही तसे वाटते आहे का ? लोकांचे म्हणणे आहे शेवटच्या भागात जरा या विद्येची जास्त तांत्रिक माहिती द्यायला पाहिजे होती. पण माहितीच नाही तर कुठून देणार ?
:-)
परत एकदा धन्यवाद.

शिल्पा ब's picture

11 Nov 2010 - 10:26 am | शिल्पा ब

वाह!!! एकदम वेगळी कथा...खूप आवडली.

जयंत कुलकर्णी's picture

11 Nov 2010 - 10:38 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद ! शिल्पा ब !

सुप्रिया's picture

11 Nov 2010 - 2:05 pm | सुप्रिया

सुंदर कथा !
सगळे भाग एकदमच् वाचले.

जयंत कुलकर्णी's picture

11 Nov 2010 - 11:06 pm | जयंत कुलकर्णी

सुप्रिया,

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद !

मुलूखावेगळी's picture

25 Aug 2011 - 1:04 pm | मुलूखावेगळी

सगळे भाग वाचले
आवडली गुढ्ररम्य कथा आनि शेवट पन

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद नाहीतर तुमच्या ह्या लिखाणाला मुकलो असतो.
एकादमात सगळे भाग वाचून काढले.
अतिशय छान आवडले.

diggi12's picture

14 Oct 2023 - 2:48 pm | diggi12

एकदम वेगळी कथा