एकात्म......

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Oct 2010 - 7:23 pm

मला काही गोष्टींचा उलगडा व्हायला चाळीस वर्षं लागली.

त्याची ही गोष्ट.

खरी, खोटी हे ठरवायचा हक्क मी तुम्हाला बहाल केला आहे. कदाचित तुम्हाला हे निव्वळ मनोरंजन वाटेल, कदाचित तुमचा विश्वास बसला तर तुम्ही त्याच्या मागे लागाल. तुम्हाला हे शक्य आहे का ? याचे उत्तर तुम्हाला ते मिळवायचे आहे का ? याच्यात दडलेले आहे. असेल मिळवायचे, तर शक्य आहे हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो कारण याचा अनुभव मी घेतलेला आहे.

सुरवात झाली माझ्या लहानपणी.

माझ्या आजोळी आम्ही दर वर्षी सुट्टीत जायचोच. सुट्ट्या दोन- एक दिवाळीची आणि एक उन्हाळ्याची म्हणजे मे महिन्याची. ही मोठी २ महिन्याची. १ जूनला परत पुण्यात यायचे आणि दुर्मुखलेल्या चेहर्‍याने ७ तारखेला शाळेत जायला लागायचे. आजोळचे खटले मोठे. सहा मावश्या, तीन मामा, या सगळ्यांची मुले या सुट्ट्यांमधे जमायची. म्हणजे खेळायला धमाल. आजोबांचा वाडा मोठा. म्हणजे किती मोठा ? दोन रस्त्याच्या मधे. पुढच्या दरवाजा मुख्य रस्त्यावर तर मागचा नदीपाशी. वाड्याच्या पुढच्या बाजुलाचा आजोबांचे कार्यालय. नावाजलेले वकील होते ते. आणि सावकारी होतीच त्यामुळे गावात सगळीकडे दबदबा होता. आम्ही मुलेही त्यांना वचकूनच असायचो. त्या कार्यालयात दोन मोठी बाके होती पक्षकारांना बसायला. त्या बाकांना नक्षीकाम म्हणून फिरणारे नक्षीदार रूळ बसवले होते. लहानपणी ते आम्ही फिरवायचो तेव्हा येणारा अंगावर शहारे आणणारा आवाज अजूनही माझ्या कानात ऐकू येतोय. खोलीच्या एका टोकाला एक भले मोठे टेबल आणि त्याच्या मागे एक चकाकणारे सागवानी लाकडाचे कपाट. मला आठवतंय जेव्हा वाडा रंगावायला काढायचे तेव्हा हे कपाट हलवताना नोकरांची त्रेधातिरपीट उडायची. या कपाटाच्यावर टोल देणारे एक सुंदर घड्याळ होते. या खोलीतली ही एकमेव वस्तू जी मला आवडायची. याच खोलीच्या मागे अजून एक खोली होती त्यात एक मोठा झोपाळा होता. पितळी कड्यांचा. त्या कड्या काळ्या पडल्या की त्याला पॉलीश करायचे काम आम्हा मुलांकडे असायचे. या दोन खोल्यांवर दोन मजले होते आणि सगळ्यात वरच्या खोलीवर एक माळा होता. या माळ्यात सगळी जुनी कागदपत्रे आणि जुनाट पुस्तके खच्चून भरलेली होती. या माळ्यावर चढायला शिडीबिडी काही नव्हती. एकामेकांच्या खांद्यावर बसून आम्हाला त्यात प्रवेश करायला लागत असे. पण एकदा प्रवेश केला की आमच्या हाती खजिनाच लागायचा. एकदा आमच्या मामाचे प्रगतीपुस्तकही आमच्या हाती लागले होते आणि त्यातले मार्क बघून आमची हसुनहसुन मुरकुंडी वळलेली मला अजूनही आठवती आहे.

हा वाड्याचा पुढचा भाग. मागचा भाग आणि हा भाग एका मोठ्या चौकाने विभागला गेला होता. या चौकात एक तुळशी वृंदावन एका टोकाला तर दुसर्‍या टोकाला लाकडाच्या मोळ्या ठेवलेल्या असत. चौकाच्या पुढच्या टोकाला व्यवहार, कठोरता, शिस्त इत्यादींची रेलचेल असायची तर चौकात तुळशी वृंदावनाच्या बाजूला प्रेम, माया, भुक इ.ची सुरवात व्हायची. याच टोकाला एक बोळ होता तो पार मागच्या दरवाजाला घेऊन जायचा. या बोळाच्या सुरवातीला डावीकडे पहिल्यांदा लागायचे ते स्वयंपाकघर आणि भले मोठे देवघर. त्याच्या शेजारून वरच्या मजल्यावर जायचा एक जिना होता. त्या मजल्यावर दोन खोल्या होत्या. त्यातली एक होती ती आंब्याची आढी लावायची खोली. त्याच्या समोर होती त्याला म्हणायचे धुण्याची खोली कारण इथे धुणे वाळत घातले जायचे.

या खोलीच्या बरोबर खाली जी खोली होती ती होती बाळंतिणीची अंधारी खोली. अस्मादिक येथेच या जगात अवतिर्ण झाले. घराचा हाच भाग आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे म्हणून जरा सविस्तर सांगतोय. हीच खोली ज्यात काही अतर्क्य अशा गोष्टीं घडल्या आणि ज्याचा उल्लेख मी सुरवातीला केला, त्या विषयी मी सांगणार आहे, पण त्याला अजून वेळ आहे.

तर मी काय सांगत होतो ? ही जी खोली होती ही एकदम अंधारी, त्यात एक गोड वास भरलेली असायचा.. बाळाच्या टाळूवर जे वेखंड इ. घालायचे बहुदा त्याचा वास असावा. त्यात धुपाचाही वास योग्य प्रमाणात मिसळलेला असायचा. एका बाजूला एक छोटी खिडकी आणि दुसर्‍या बाजूला एक मोठी खिडकी, जी नेहमीच बंद असायची आणि कधी कधीच उघडली जायची, जेव्हा आजी आत असायची. एक जूने भले मोठे शेल्फ, एक औषधाचे कपाट, कपडे वाळत घालण्यासाठी एक दोरी, आणि दोन बाजा. हे एवढेच सामान असायचे या खोलीत.

त्या खिडकीतून, म्हणजे मोठ्या, बाहेर बघितले की एक मोठे झाड आणि त्या वरची घारीची घरटी नजरेस पडायची.....

या घारींचे वर्णन करायलाच पाहिजे कारण त्या अतर्क्य घटनांमधे त्यांचाही सहभाग आहेच.....

क्रमशः...

जयंत कुलकर्णी.

कथा

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Oct 2010 - 8:02 pm | पैसा

वाड्याचं वर्णन एखाद्या 'व्यक्तिसारखं जिवंत' झालंय. खूप आवडलं. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...

धमाल मुलगा's picture

27 Oct 2010 - 8:35 pm | धमाल मुलगा

काय टायमिंगला क्रमशः टाकलंय.

जयंतराव, वाचतोय हो. येऊद्या पुढचा भाग लवकर. :)

प्रभो's picture

27 Oct 2010 - 9:56 pm | प्रभो

हेच म्हणतो...

इन्द्र्राज पवार's picture

27 Oct 2010 - 8:54 pm | इन्द्र्राज पवार

"......एकदा आमच्या मामाचे प्रगतीपुस्तकही आमच्या हाती लागले होते...."

~~ हे तर धमालच आहे....कारण जवळजवळ सर्वच भाच्यांना आपल्या मामाची त्याच्या वयातील प्रगतीपुस्तकातील 'प्रगती' कळाली की एकप्रकारचा 'असुरी' आनंद होत असतो.....(जो मी स्वतः अनुभवलाय...). गणिताच्या गुणावरून माझ्या मामाचा हसून हसून मी लसावी काढला होता....आणि आज अनुक्रमे ८ वी व ५ वी शिकणारी माझी भाचरे माझ्या गणिताच्या गुणांच्या चिंध्या करतात आणि 'मामाचा कसा कचरा केला..." यावर खिदळतात....!!

अर्थ इज राऊंड आफ्टरऑल ! नो?

श्री.जयंतराव....थॅन्क अ मिलिअन फॉर सच अ ब्युटिफुल नॉस्टॉल्जिया ! नो नीड टु टेल यू दॅट इगरली अवेटिंग नेक्स्ट कोटा ऑफ धिस एक्सलंस इन रायटिंग फ्रॉम यू, सर !

इन्द्रा

विसोबा खेचर's picture

27 Oct 2010 - 9:20 pm | विसोबा खेचर

आनेदो और भी..

तात्या.

नितिन थत्ते's picture

27 Oct 2010 - 9:51 pm | नितिन थत्ते

वातावरण निर्मिती मस्त झाली आहे.
लवकर दुसरा भाग टाका.

जयंत कुलकर्णी's picture

27 Oct 2010 - 10:30 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

सुचेल तसे लिहीतो आहे. पण मनात रुपरेषा तयार आहे. भिती हीच आहे, पुढचे लेखन जमेल का ? कारण (या प्रकारचे ) असे लेखन पहिल्यांदाच करतो आहे.....:-)
जयंत कुलकर्णी

मृत्युन्जय's picture

28 Oct 2010 - 1:45 pm | मृत्युन्जय

जमेल की हो. इतके विविध विषय निवडले तुम्ही आत्तापर्यंत. हे पण आरामात जमुन जाइल.

बाकी श्री धमाल मुलगा म्हणतात त्याप्रमाणे क्रमशः अगदी योग्य जागेवर पडला आहे.

प्राजु's picture

27 Oct 2010 - 10:29 pm | प्राजु

वाचतेय!! येऊ द्या लवकर.

चित्रा's picture

28 Oct 2010 - 1:16 am | चित्रा

मस्त वर्णन. वाट पाहते. लहानपणी पाहिलेल्या जुन्या घरांची आठवण झाली.
तो बाळांच्या टाळूचा वास हा मात्र स्पेशलच असतो :)

शिल्पा ब's picture

28 Oct 2010 - 5:05 am | शिल्पा ब

छान लेखन...पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

ढिन्च्याक !
एकदम चित्र दर्शी !! घरच पहाते अस वाटल !

बाकी ही प्रगती पुस्तक वेळच्या वेळी विल्हेवाट लाव्ली तर ठीक नाहीतर अशी भुत होउन मानगुटावर बसतात ना की बस !

पुढचा भाग लवकर येउद्या !

खूप सुरेख लिहिले आहे, अगदी चित्रदर्शी. मिपावर हल्ली जे काही थोडेच चांगले लिखाण येते, त्यातले एक.

कुलकर्नि साहेब, झकास जमलय ! पुढ्चे लिहा लवकर

मदनबाण's picture

28 Oct 2010 - 7:56 pm | मदनबाण

वाचतोय... :)

निखिल देशपांडे's picture

28 Oct 2010 - 8:13 pm | निखिल देशपांडे

वाचतोय..
जयंतराव आता प्रतिक्रिया शेवटच्या भागालाच देईन

जयंत कुलकर्णी's picture

29 Oct 2010 - 10:39 pm | जयंत कुलकर्णी

श्री. देशपांडे,

घाबरू नका ! :-) हा काही भला मोठा लेख नाही आहे माझ्या इतर लेखांसारखा.