वेलकम टु द लाईफ..बार !! (प्राईस ऑफ सॅक्रिफाईस.)

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
30 Oct 2010 - 3:33 pm

कांऊटर वरच्या पोरांशी हाय-हॅलो झाल्यावर, माझ तिथल्या आडोश्याकडे लक्ष गेल, तिथ हे चित्र होतं.

खरे तर या आडोश्याला मी बरीचशी चित्र पाहिली होती,पण एखाद्या लहान मुलाला ? श्या !! समाजमानस बदलत चाललेय.दादा यायला बराच ऊशीर होता.मी काऊंटरवरच्या पोरांशी गप्पा चालू केल्या.पण गप्पांकडे माझं लक्षच नव्हत,लक्ष होत ते त्या लहान पोराकडे, थंड वातावरणात अंगात केवळ एक शर्ट ( त्याला शर्ट तरी कसे म्हणावे, धड गुंड्या देखील नव्हत्या त्याला. ) घालुन उभं होत.मध्येच तो अप्पा,अप्पा करत काहीतरी म्हणे आणि त्याच्या समोरचा इसम त्याला हातवारे करत झापत असे.मला ती भाषा, मी इकडे कर्नाटकात आल्यावर, कन्नड होती हे समजले, तिथे मात्र मला काही-ही समजत नव्हते. सरतेशेवटी ते पोरगं रडायला लागलं. पण बापाने त्याच्या हातात देशी ने भरलेला ग्लास दिल्यावर मात्र मी जाम चिडलो. मी हिंदीमध्ये त्याला झापले, दोन-तीन वाक्य माझ्या तोंडातून निघाले नसतील, खाली बसलेला इसम हातवारे करत काहीतरी बोलू लागला, तो चिडला आहे हे मला समजले आणि तेव्हढ्यात माझ्या शेजारी उभ्या असणार्‍या इसमाने मला चटदिशी थोबाडीत मारली.

खरे तर, मी या ऊण्यापुर्‍या तीस वर्षाच्या आयुष्यात किमान तीन-एकशे तरी थोबाडात खाल्लेल्या, पण या गेल्या चार-पाच वर्षात कोणाचीही थेट माझ्या गाला पर्यंत, लाडाची चापटी मारायला देखील कोणाचा हात पोहोचला नव्हता.( पण ,बापाने वर्षभरापूर्वी, दारूत न्हावून आल्याने, बायकोसमोर, माझी मस्त धुलाई केली होता, तो भाग निराळा) धक्काच बसला एकदम,पण दोनच सेकंद, दूसर्‍या क्षणाला त्याच ही थोबाड रंगले होत, शर्टाची बटनं तुटली होती आणि तो माझ्या समोर पार्क केलेल्या दुचाकीवर आपटला होता. ते पाहून बाकीची ही मंडळी जागे वरची उठली, त्यातला एक माझ्या दिशेला आला पण तो मला दिसलाच नाही कारण काऊंटरच्या पोरांनी त्याचा ताबा घेतला होता, इकडं मी माझं हेल्मेट हाताशी धरले आणि बाकीची काव-काव आटोपती घेतली. सगळेच जण मार खाऊन मिळेल त्या दिशेला पळून गेले.

सगळे जण परत काऊंटरवर आलो. दिप्या नी पेग भरून दिला.
"शांत हो जरा, ही साली सगळी चु**** अशीच आहेत,दादा पण लई परेशान होतो यांच्यामुळे, पंधरा दिवसांपूर्वी स्साला ग्राऊंडवर यांच्या-यांच्यातच काव-काव झाली आणि एका मा***** विकेट पडली, चार दिवस आत होती भो*** , काल-परवाच बाहेर आलेत"
मी :" ? दे सोडून " म्हणत पेग ओठाला लावला.

दोन घोट पोटात गेल्यावर वाईन-शॉप मधल्या आरश्यासदृश्य ग्लास मधे प्रतिबिंबित झालेल्या स्वतःच्या प्रतिमे कडे लक्ष गेलं. गालावर छानपैकी पाच बोटं उमटलेली होती, मनात म्हटल काय गरज आहे असल्या उचापती करायची, पण म्हटल चला, बर्‍याच दिवसांनी मार ही पडला आणि दिला ही, पुढील वेळेस,कदाचित, तो त्या लहान मुलाला इथे घेऊन येणार नाही, अरे पण ते आहे कुठे ? या सगळ्या दाणादाणीत त्याला काही झालं नाही ना !! जरा नजर इकडे तिकडे फिरविली. तिथल्याच त्या आडोश्याच्या एका कोपर्‍यात , भेदरलेल्या नजरेने, तो माझ्याकडं पाहत होता. हाताच्या दोन्ही मुठी गळ्यापर्यंत घेतलेल्या त्या चिमुकल्या जीवाकडे पाहून माझी मलाच लाज वाटली. लहाणपणी सहसा सर्वांचाच एक 'फेव्हरेट हिरो 'असतो तो म्हणजे आपला बाप , मग भलेही तो कसाही असो. आणि मी त्या केविलवाण्या बालकासमोर त्याच्या बापाला मारहाण केली. स्वतःचा प्रचंड राग आला मला,भावनेच्या उद्वेगाने, मी त्याला उचलले, छातीशी कवटाळले, पण त्याची थरथर कमी झाली नाही. सरते शेवटी त्या निष्पाप बालकाला थोडे-फार पैसे देऊन, सांगवी पोलीस-चौकीवर पाठविले.

त्या भावनातिरेकाने बाहेर निघायला थोडा वेळ लागला.जसं-जसा अंधार वाढायला लागला, तसं-तशी काऊंटरवर गर्दी ही वाढू लागली. मी माझा पेग आवरता घेतला आणि दुकानात शिरलो. एक-एक करून गिऱ्हाईकांना रम, व्हिस्की, ग्लास ,चणे फुटाण्याचे पुडे वाटायला लागलो. स्पायसर कॉलेजचे काही मणीपुरी स्टड्स भरभरून बाटल्या नेत होती .त्यांच्या त्या सुरनळ्या झालेल्या पॅन्टस, वडील-भावाचे शर्ट्स, रंगबिरंगी चौकडी चे शूज वगैरे पाहून मला गंमत वाटत होती, काही कृष्ण-वर्णीय मंडळी आडोश्याला बसूनच बीयरचा आस्वाद घेत होती. एक जण मध्येच येऊन " एक मेरा नंबर वन देना " असे मला म्हणाला. मला कळेनाच की हा कुठला ब्रॅन्ड आहे. मग आठवले की एमसीडी रम आणि व्हिस्कीची जाहीरात "मेरा नंबर वन" अशी करतात. मनात म्हटल दारू मागायची पण क्या स्टाईल है? ही जागाच अशी आहे, जगातली जवळपास सर्वच स्तरातील आणि सर्वच प्रकारची लोकं इथे येतात. हा हा म्हणता आठ कधी वाजले कळलच नाही. थोडासा ब्रेक घ्यावा म्हणून मी ही दुसरा पेग भरला आणि माझं लक्ष गर्दीमधे उभ्या असलेल्या, मळकट, विटकरी रंगाचा , सलवार कमीज घातलेल्या स्त्रीने वेधून घेतलं.

अंदाजे पाच-एक फूट उंच, स्लिम अ‍ॅण्ड ट्रिम बांधा, किंचितसा सावळा वर्ण, थोडासा घामेजलेला चेहरा, पांढरे शुभ्र डोळे, थोडीशी तपकिरी छटा असलेली बुब्बुळं, त्याच डोळ्यात अगतिकता, सरळ नाक , ओठ थोडेसे विलगलेले, किंचितसे कुरळे केस, हालचाली मंदावलेल्या, हातात एक बॉटल-साईज पर्स, गळ्यात (नकली असावं बहुतेक) मंगळसूत्र, बहुधा कामावरून परतलेली असावी. मी आजवर बर्‍याचं मुलींना दारू खरेदी करताना ,पिताना पाहिल आहे, त्यांना सर्व्रिस ही केली आहे.माझ्या पाहण्यानूसार, अश्या मुलींचं राहणीमान एकतर अतिशय उच्च दर्जाच असतं किंवा मग एकदम खालच्या पातळीचे, तीच दोन्हींपैकी काहीच वाटत नव्हत. ती एखाद्या साध्या-सुधा मध्यमवर्गीय घरातील सुसंस्कृत मुलगी वाटत होती. मला आश्चर्य वाटले.जवळपास सगळीच गर्दी तिच्याकडे पहात होती.

"अरेsss एss ! बियर दे ना लवकर " दादाचा दणकट आवाज कानी पडला .दादा तिच्या शेजारीच ऊभा होता.दिप्या नी कुत्रं मागं लागल्या गत, पळापळ करित, किंगफिशरचा ५०० एम.एल चा कॅन दादाला गर्दीत नेऊन दिला. त्यांनी तो कॅन तिच्या हातात दिला, तिनं तो पटकन तो पर्समध्ये टाकला, पैसे दादाच्या हातात दिले आणि गर्दीतून पसार झाली. दादा आत मध्ये आला.मी " ती कोण आहे ? " असे विचारणार होतो तितक्यात माझा फोन वाजला.माझ्या प्रेयसीचा फोन होता. रात्री तिला हॉस्पिटलमधून पिक करून घरी सोडायचे होते. तिच्या भेटीच्या ओढी च्या नादात मी तो प्रश्न विचारायचा विसरलो. गर्दी पुन्हा वाढली.( सहसा बार-रेस्टांरट किंवा वाईनशॉपमध्ये संध्याकाळचे दोन राऊण्ड असतात, पहिला ७ ते ९, या लोकांना आम्ही हॉटेलात असताना 'जेन्टलमन ड्रिंकर्स' म्हणायचो आणि दुसरा ९ ते ११-१२-१-२, या लोकांना आम्ही 'प्रॉब्लेम ड्रिंकर्स' म्हणायचो आणि जे संध्याकाळी ७ ते नो लिमिट, ते आमच्यासाठी 'सेलिब्रेटी ड्रिंकर').काऊंटरवरची गँग, दादा, मी, सर्वच पुन्हा कामात गुंतलो. १०.३० च्या सुमारास दादांनी, एफ.एल.आर. भरायला सुरुवात केलेली पाहून मी दादांचा पहिला आणि माझा तिसरा पेग भरला.

११.३० च्या सुमारास खेळ संपला आणि दादांनी शटर डाउन करायला सांगीतले, तसं मागच्या बाजुने पार्सल चालू असतात १२ पर्यंत, म्हणून दादा आणि मी बसलो आतच. दादांनी चकणा म्हणून तंन्दूरी मागवलेले होते, पोरं लचके तोडत-तोडत आजच्या कामकाजाचा आढावा घेत होती. संध्याकाळी झालेल्या मारामारी विषयी दादा 'तुझ्या सवयी काही सुटणार नाही ' इतकेच म्हणाला. अनायासे माझ्या मनात त्या तरुणी विषयी विचार आला. मग मी विचारले.
" ती कोण होती? "
" बेक्कार झालय रे तिच्याबरोबर "
" ? " माझी उत्सुकता वाढली.
" तिचा नवरा दोन-एक वर्षापासून एका 'मर्डर-केस' मध्ये आत आहे. आपली वर्षा दिदी आठवतेय का ?
" हो " (सांगवी-बोपोडी झोपडपट्टीत,झोपडपट्टी सुरक्षा दलाचा वापर करून, बक्कळ पैसा खाणार्‍या या बाईस कसा ओळखणार नाही ?)
" त्याचं सामान* होत ते ? "
" आँ ! " झटका.
" एक दिवस किरकोळ पैश्यावरून काहीतरी वाजलं आणि ह्यानी चार चौघात कुर्‍हाडं डोक्यात घातली तिच्या, तेव्हापासून आत आहे, लव्ह-मॅरेज मुळं आधीच दोघांच्या घरच्यांनी बाजुला टाकलं होत. ही आधी चार घरची धुणं-भांडी करून वकिलाचा, घरचा, तीन पोरांचा खर्च भागवायची पण तीन एक महिन्यापूर्वी नवऱ्याला बेल मिळावी म्हणून, प्रॉसिक्युटर, वकील, जज्ज यांची टोटल मिळून जरा मोठीच रक्कम होती आहे, वर अजुन तुरूंग अधिकारी, मग काय करेल ही बाई? कर्ज घेऊन भागण्यासारखं नाही. आता तो खर्च कुठून करायचा म्हणून ही जातेय कधी 'मसाज पार्लर'ला तर कधी 'फुल नाईट'ला, मन मारण्यासाठी, जडल्यात असल्या सवयी "

मी चाट !! काय म्हणू ? त्यागाची परिसीमा की प्रेमांधतेने गाठलेला मुर्खपणा कळस ?

जेवण आटोपून निघायला एक वाजला.गाडीला किक मारायच्या आधी सिगरेट पेटविली.जॅकेट चढविले.सांगवी पेट्रोल-पंप क्रॉस करुन, स्पायसर कॉलेज रोडला, माझी गाडी वळवणार तितक्यात, भुsssर्र करुन हवेशी स्पर्धा करित, दोन मोटर-बाईक्स मला क्रॉस झाल्या. हम्म !! रायडर्स !! चालले असतील पुणे-बेंगलौर हाय-वे ला.एव्हरिबडी इज इन निड ऑफ फ्लॅटफॉर्म !! असो, हवेत मंद-मंद गारवा पसरला होता.चांदण्यांची शीतलता तिच्या भेटीची ओढ लागलेल्या मनाला अजुनच जाळत होती.चंद्रकोर, काळ्या-सावळ्या मेघांतुन लपाछपी खेळुन, तिच्या बरोबरच्या आधीच्या सहवासांत,तिच्या अदांची आठवण काढुन देत होता.

आणी अचानक ! खडकी रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजुच्या वळणावर,गोर्‍या -पान मांड्या पाहुन मी भांबावलो !!

ते दृश्य असे होते. एक मुलगी, मेन स्टँडवर पार्क केलेल्या, कायनेटीक किंवा होंडा अ‍ॅक्टिव्हा असावी, छानपैंकी पाय पसरुन, मागच्या सीटवर बसुन, काहीतरी गुणगुणत होती. केसांना पॅरोट कट,स्कीन कलरचा टाईट टॉप आणि एक्ट्रा शॉर्टस चड्डी घालुन बसलेली होती. चेहर्‍याची ठेवण मणीपुर,मेघालय वगैरे त्या साईडची. तिच्यापासुन पाच पावलांवर जॅकेट घालुन एक तरुण , भुशभुशीत झालेला लाकडी दरवाचा ठोठावत होता. त्यानी घातलेल्या पुल-ओव्हरवर ईग्रंजीत स्पायसर कॉलेज लिहीलेले होते. ते एक देशी दारुचं दुकान आहे. हल्ली देशीच्या दुकानांनलागी बियर मिळायला लागली आहे आणि या दुकानातुन रात्रभर पार्सल मिळते.हे जोडपे त्या करिताच आले असावे पण इतक्या रात्री गर्लफेंडला घेउन अश्या ठिकाणी , ते ही तिला अश्या कपड्यांमध्ये ? स्पायसर कॉलेजच लेडीज होस्टेल ८ वाजता बंद होते.स्पेशल परमिशन्स ११ वाजेपर्यंत. म्हणजे अर्थातच हे जोडपे बहुधा नाइट नाउट अथवा लिव्ह-इन असणार. मनातल्या मनात " चालु द्यात " म्हणालो आणि पुढच्या प्रवासास निघालो.

बुधरानीच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना मोबाईलमधे वेळ चेक केली. ग्रेट !! पावणे दोन वाजलेत. म्हणजे फक्त पंधरा मिनिटे उशीर, चला म्हणजे, आज तरी एका मितभाषी तोंडातुन बोलणे खावे लागणार नाहीत. पायर्‍या उतरत येताना, मिल्की व्हाइट शॉर्ट कुर्ता आणी स्काय ब्लु जीन्स मध्ये, तिने दिलेली लाइट स्माईल जिवघेणी होती. पण माझ्या जवळ येता-येता तिचा चेहरा गंभीर झाला. ती माझ्या जवळ आली. माझी हनुवटी धरुन चेहरा उजव्या बाजुला फिरविला.
" किती मार्‍यामार्‍या करतोस रे ? "
त्या पाच बोटांचा छाप तिला माझा आजचा इतिहास सांगत होता. काय करु ? हिला गळ्यात मंगळसुत्र बांधायच्या आधी सगळी लफडी सांगावी लागणारच होती, तेव्हा हिची काय प्रतिक्रिया असेल ? वेलकम टु द लाईफ, सुहास, वेलकम टु द लाईफ !!

क्रमश.....

खुलासा :

१ ) सामान= पुण्यात हा शब्द प्रेयसी,ठेवलेली वा एखादी रुपवान मुलीसाठी वापरला जातो.
२ ) वर्षादिदी हे नाव बदलले आहे, असे अनेक पुरुष नादाला लावुन सोडले आहेत,सध्या आत आहे.

डिसक्लेमर :
१) समाजातील कुठल्याही स्तराची चेष्टा करण्याचा हेतु नाही, फक्त जे समोर आले ते मांडण्याचा प्रयत्न.
२) लेखातील मते माझी वैयक्तीक आहे.
३ ) लेखात ईग्रंजी शब्दांचा वापर केवळ,मराठीत पर्यायी शब्द न सापडल्याने आणि सहज समजतील म्हणुन केला आहे.

पुढच्या भागात...हिची कथा !!

समाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

sneharani's picture

30 Oct 2010 - 3:47 pm | sneharani

लिहीत रहा..!
वाचत आहे.
:)

चिगो's picture

30 Oct 2010 - 3:49 pm | चिगो

सुन्न... हे असले अनुभव म्हणजे...
चोंबडेपणा मानु नका, पण एका ठिकाणी तुम्ही बायकोसमोर धुतल्या गेल्याचं बोललाय, आणि नंतर प्रेयसी... समझा नही.
लिहीलयं मात्र छानच...

गोगोल's picture

30 Oct 2010 - 8:53 pm | गोगोल

प्रश्ना पडला होता. त्या एका वाक्यात दोन संभ्रम आहेत. एक तुम्ही म्हणता तो आणि दुसरा दारू मध्ये कोण न्हाऊन आल होत?
बाकी लेख मस्तच.

इंटरनेटस्नेही's picture

30 Oct 2010 - 4:48 pm | इंटरनेटस्नेही

चानच लिहलंय! चान चान! :) चित्रदर्शी वर्णन.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत!

--
(सर्व स्तरांतला) इंट्या.

अनुप्रिया's picture

30 Oct 2010 - 5:49 pm | अनुप्रिया

निशब्द केल्स सुहास. काय बोलणार??

अवलिया's picture

30 Oct 2010 - 6:06 pm | अवलिया

लिहिते रहा !!

बस ! अजुन काय बोलु?

प्रसन्न केसकर's picture

30 Oct 2010 - 6:07 pm | प्रसन्न केसकर

काय प्रतिक्रिया देणार यावर? विषण्ण करतं खरं असलं वास्तव अनेकदा.

स्वाती२'s picture

31 Oct 2010 - 5:46 pm | स्वाती२

+१
असेच म्हणते.
लिहित रहा!

प्रीत-मोहर's picture

30 Oct 2010 - 6:25 pm | प्रीत-मोहर

सुहास भौ मस्तच.............

इन्द्र्राज पवार's picture

30 Oct 2010 - 6:35 pm | इन्द्र्राज पवार

"....त्या पाच बोटांचा छाप तिला माझा आजचा इतिहास सांगत होता. ..."

~ आणि मी तर म्हणेन, तिला काय वाटायचे ते वाटो, पण माझ्या नजरेत तो छाप एका अभिमानी कृतीची निशाणी आहे. सामाजिक जाणीवेबाबत विविध माध्यमातून हरेक क्षणाला शब्दरुपाने गळे काढले जातात, पण इथे लेखकाने अंगावर शहारे आणणार्‍या प्रसंगाच्यावेळी जी जाण दाखविली (आणि तीबद्दल किंमतही चुकविली....) ती शब्दातीत आहे.

श्री.सुहास....तुमच्या या लिखाणाच्या वेळी मला सातत्याने श्री.अनिल अवचट यांच्या 'कार्यरत' या एका अफलातून पुस्तकाची आठवण येत राहिली. तुमचा लेख अगदी त्यातील लेखांच्या भट्टीतीलच आहे. विशेषतः सुरेखा दळवीवर लिहिल्या गेलेल्या.....ती एक कार्यकर्ती तुमच्याच पंगतीतील आहे.

(खरे तर या लेखांने १०० प्रतिसादांची संख्या ओलांडली पाहिजे, इतका हा महत्वाचा आहे....असे झाले नाही तर श्री.सुहास यांच्या गालावरील 'तो' इतिहास दुर्लक्षिला गेला असे होईल.)

इन्द्रा

(अवांतर : सामान= पुण्यात हा शब्द प्रेयसी,ठेवलेली वा एखादी रुपवान मुलीसाठी वापरला जातो. असे सुहास यानी खुलाशात म्हटले आहे.....
त्या अनुषंगाने :-
~ कोल्हापुरात रखेलीसाठी सामानऐवजी 'ऐदान' वापरतात.
प्रेयसीसाठी = लाईन (याची व्युत्पत्ती माहित नाही.) "तिचा नाद करू नका भाऊ, ती त्या दादाची लाईन आहे."
रुपवानसाठी = माल (सामानचेच एक रूप).... "काय माल आहे !" असे प्रिती झिंटासाठी.)

सहज's picture

30 Oct 2010 - 6:42 pm | सहज

फक्त पुणेच नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, आशीया नव्हे तर आख्खे जग असेच जवळुन पहायला मिळो व त्यातील अशाच वेगवेगळ्या माणसांचे विश्व शब्दबद्ध करुन आमच्यासमोर आण.

पैसा's picture

30 Oct 2010 - 6:49 pm | पैसा

हाही लेख पहिल्या भागाइतकाच छान झालाय. अशी आणखी किती लहान पोरं वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत दारुची चव घेऊन मोकळे होत असतील देव जाणे. भीषण आहे पण वास्तव आहे.

कानडाऊ योगेशु's picture

30 Oct 2010 - 11:34 pm | कानडाऊ योगेशु

समाजातील वेगवेगळ्या थरांत वावरल्यामुळे असेल तुझ्या अनुभवांना तू शब्दबध करतान एक वेगळेच परिमाण लाभते.

तुझ्या संवेदनशीलतेलाही सलाम!

तू दाखवत असलेले हे जग खरेच मन विषण्ण करणारे आहे.

नंदन's picture

31 Oct 2010 - 10:00 am | नंदन

...

असुर's picture

1 Nov 2010 - 4:46 am | असुर

लिहीत रहा रे!!!

--असुर

मराठमोळा's picture

1 Nov 2010 - 6:24 am | मराठमोळा

जे काही आहे ते चांगलं आहे असं म्हणवत नाही. पण लिखाण नक्कीच चांगलं करतो आहेस.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2010 - 9:39 am | llपुण्याचे पेशवेll

छान छान. लिहीत रहा.

आर्या's picture

3 Nov 2010 - 4:32 pm | आर्या

:(

बाप रे !

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2010 - 4:34 pm | बिपिन कार्यकर्ते

नेहमीप्रमाणे एका वेगळ्या जगाची सफर... लिहित रहा रे.

भाऊ पाटील's picture

3 Nov 2010 - 6:27 pm | भाऊ पाटील

वेगळ्या जगाची सफर... पण विषण्ण करणारी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2010 - 5:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

.