आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ?
पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात.
" मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार "
" मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? "
" वादळात भरकटणार्यांना कोणतीच दिशा नसते. पण वादळाला दिशा देणार्यांची वादळंच वाट पाहात असतं "
" पाटणकरांच्या कविता मला तरी अश्लीलतेचे उदात्तिकरण करणार्या वाटतात. तुला का आवडतात त्या ? "
" उदगीरचे शिबीर छानच झाले. १३० प्रशिक्षार्थी संख्या होती. समारोप आणि संचलन जोरदार "
" प्रेमात पडलेय मी मायडे, आज कळाले कोवलनास्तव कण्णगिचे ते तिळतिळ तुटणे, दक्षाच्या यज्ञात सतीचे शिवशंभूस्तव विलीन होणे "
" माइ, मागच्या महिन्यात बापाला नेला पोलिसानी. पारध्याचं जिणं पापंच अस्तंय का गं ! "
" माया, बौद्धिकांच्या विषयांची यादी पाठवत आहे. वक्ते शोधून आमंत्रणं पाठवावीत."
" तुझ्याचसारखा जोडीदार मिळाल्याबद्दल अभिनंदन मायाताई, संसाराची घडी नीट बसली की पुन्हा कार्यात नव्या जोमाने उतराल याची खात्री आहे, शुभचिंतन"
" तुझ्यासारखी तरूण मुलगी मला पत्र लिहिते हे पांढर्या केसांचं महात्म्य समजू का ? "
" तुम्ही बुद्धट ( बुद्धिमान उद्धट ) बनत चालला आहात याची कल्पना तुम्हाला असेलच असे मी गृहीत धरते."
" शिक्षणसंस्थेचे महत्त्व पटावे असे काहीच गेल्या वर्षभरात घडले नाही. तरीही शेवटचे वर्ष म्हणून खर्डेघाशी का करावी ? "
" घरच्यांनी कमी मार्क्स मिळाल्याचं खापर आपल्या कामावर फोडलं होतं. बघा म्हणावं आता, विद्यापीठात तिसरी आले गं ! "
किती वेगवेगळे विषय, किती वेगवेगळी माणसं ! या सर्वांशी मी जोडलेली होते फक्त पत्र या माध्यमातून.
महिन्याला साधारण ४० पत्रांची आवकजावक. आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर देणे, पत्रांवर क्रमांक घालून नीट फाईल करणे, साधी पोस्टकार्ड पण मार्जिन आणि दिनांक वगैरे घालून नीटनेटकी ठेवणे हा जणू छंद झाला होता. दिवसभर कॉलेज, मित्रमैत्रिणींसोबत दंगा, संघटनेचे कार्यक्रम, घरी आल्यावर घरकाम, टी व्ही, अभ्यास हे सगळे झाल्यवर मी खास माझ्या पत्रविश्वात जायची. अगदी जवळच्या मैत्रिणींच्या पत्रांची पारायणं व्हायची. लांबलचक उत्तरे लिहून व्हायची, पत्रांमधून अंगावर पडलेली कामं करण्याच्या योजना कागदावर उतरायच्या आणि मग शांत डोक्याने झोप.
पुढे स्वतःचे लग्नही पत्रातून ठरवले. पत्रांच्या संख्येत वाढ !
अगदी पाचवीत असल्यापासून मी पत्र लिहायची. त्यामुळेच कदाचित पत्र हे व्यक्त होण्यासाठीचे माझ्यापुरते सर्वोत्तम माध्यम बनत गेले. जिवाभावाच्या सख्यांशी आणि सख्याशी रोजचा फोन संवाद शक्यच नव्हता. मग त्यांच्याशी जे काही शेअर करावे वाटेल ते डायरीत पत्र लिहून ठेवत असे. जेव्हा भेट होई तेव्हा या डायर्यांची अदलाबदल ! आमची नाती या डायर्यांमधल्या पत्रांनी मजबूत केली. या पत्रांनी विचारांचा पाया मजबूत केला. स्वतःला जे वाटतंय ते दुसरीला किंवा दुसर्यालाही तसंच वाटतं हे कारण आत्मविश्वास वाढविण्यासाठी फार मोठे होते. संघटनेच्या कामाबाबत ज्या काही शंका असत त्यांना उत्तरं पत्रातून मिळत असत. एकेक गोष्ट, जिला तत्त्व म्हणता येईल ती अगदी घासूनपुसून लखलखीत झाल्याशिवाय स्वीकारताच यायची नाही. मला कसं जगायचं आहे, भविष्यात काय करायचं आहे याची रूपरेषा या पत्रांमधून होणार्या चर्चांमधून ठरत गेली. अगदी प्रत्यक्ष भेटीत होणारे आततायी वादविवाद पत्र सांभाळून घेत असे. स्वतःची भूमिका लिहून पाठवणे यात खूप संयम आपोआप येतो. कुणाला दुखवायचं असलं तरी आणि मलमपट्टी करण्यासाठीही पत्राएवढं प्रभावी माध्यम नाही. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत वेगवेगळ्या भेटीत जोडली गेलेली नाती या पत्रांने टिकवली. माणसं समजावली. अपेक्षा, अपेक्षाभंग आणि अपेक्षापूर्ती म्हणजे काय हे शिकविले. स्वतःच्या भावना ओळखायला पत्रांनी शिकविले. मनातल्या विचारांना पत्रातून वाहून दिलं की कसं बरं वाटायचं. समोरची व्यक्ती माझं म्हणणं नक्की ऐकून, समजून घेईल ही खात्री असायची. मला तुझ्या सल्ल्याची गरज आहे, मार्गदर्शन हवे आहे हे सरळ सांगता यायचे.
आज कितीतरी दिवसांनी ती पत्रं आठवली. एका पेटीत नीट गठ्ठे करून ठेवलेला माझा खजिना ! पत्रातून जोडले गेलेले सगळे लोक आजही माझेच आहेत. अधुनमधून ओर्कुट, फेसबुक वर भेटतातही, पण त्या भेटीत काहीतरी कमतरता असते. मेलमध्येही ती निखळता नाहीच. वीज नसतानाही मनातले कागदावर उतरवण्याची अधीरता म्हणून मेणबत्तीच्या प्रकाशात लिहिलेली निळ्या अंतर्देशीय पत्रावरची गडद निळ्या शाईतली पत्रं, पत्रात वाद घालताना आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ उतरवलेले पुस्तकातले उतारेच्या उतारे किती समृद्ध करून गेले, एका मैत्रिणीला मेघदूत हवं म्हणून बोरकरांनी अनुवादित केलेलं समश्लोकी समवृत्ती मेघदूत मी हस्ताक्षरात लिहून पाठवलं होतं आणि त्या लेखनाने मला किती आनंद दिला होता !, वयाने, अनुभवाने मोठ्या व्यक्तींनी कानउघाडणी करणारी पत्रं पाठवल्यावर ती पचवायला किती कागद खर्ची घातले होते ! माझे मी लग्न ठरवले हे घरात सांगितल्यावर उसळलेला भावनिक कल्लोळ घरातल्या घरात मी-बाबा, बाबा-मी, मी- आई अशी पत्रापत्री होऊन शांत झाला होता. सासूशी झालेले मतभेद पत्राने उलगडले होते, नवर्याशी सुरुवातीला होणारी भांडणं पत्रातून मिटली होती, परदेशात आलेले एका मित्राचे पत्र हे हजार मेल पेक्षा मोलाचे वाटले होते...
मग आता काय झाले ? पाडगांवकर म्हणतात,
पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा
पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !
ते उमगलेलं असतानाही पत्र का नाही लिहून होत ? विचारांचं ओझं होतंच, काळज्या हैराण करतातच, अगदी काधीतरी आनंदही गुदमरून टाकतो पण ही सगळी ओझी वाटून नाही घेता येत. एखाद्या तात्विक मुद्द्यावर २४-२४ पत्रं लिहून काथ्याकूट केलेल्या मनाला आज त्याची गरजच वाटत नाही. हा आळस आहे की संवेदनशीलता कमी होतेय? स्वतः व्यक्त होण्यात कमीपणा वाटतोय की समोरच्या व्यक्तीने समजून घेतले नाही तर ही भिती वाटतेय ? कदाचित मनाचा हा संरक्षक पवित्रा असावा. मनाच्या गावातले तेव्हाचे सगळे लोक आपलेच आहेत ही समजूत जपायचा हा एक अट्टहास असावा का ?
एकदा स्वतःला पत्र लिहून विचारलं पाहिजे ! पत्रांच्या गावात लवकरच एक फेरफटकाही मारला पाहिजे.
प्रतिक्रिया
27 Oct 2010 - 7:39 pm | पैसा
अगदी मनातलं बोललीस बघ. हे मला मैत्रिणीचं खूप वर्षानी आलेलं पत्रच समजते मी. उत्तर नक्की लिहीन.
27 Oct 2010 - 7:42 pm | यशोधरा
>>मग त्यांच्याशी जे काही शेअर करावे वाटेल ते डायरीत पत्र लिहून ठेवत असे. जेव्हा भेट होई तेव्हा या डायर्यांची अदलाबदल ! आमची नाती या डायर्यांमधल्या पत्रांनी मजबूत केली. या पत्रांनी विचारांचा पाया मजबूत केला. स्वतःला जे वाटतंय ते दुसरीला किंवा दुसर्यालाही तसंच वाटतं हे कारण आत्मविश्वास वाढविण्यासाठी फार मोठे होते >>
माया डिट्टो! :)
मस्त लिहिलं आहेस अगदी! :)
27 Oct 2010 - 8:04 pm | Dhananjay Borgaonkar
मला तरी वाटत की पत्राच माध्यम कुठल का असेना मजकुर आणि त्यातल्या भावना महत्वाच्या.
माध्यमं बदलली तरी भावना तरी त्याच असतील ना?
27 Oct 2010 - 8:57 pm | प्रभो
ह्म्म्म...
पत्र फकस्त मराठी आणी विंग्रजीच्या पेप्रात लिहिलं...मधे आधे कुणाला आंतर्देशीय लिहिलं असेल तरच.... :)
28 Oct 2010 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार
प्रभोशी सहमत आहे. मी तर पेप्रांनंतरसुद्धा कोणाला पत्र लिहिलेले आठवत नाही.
'बुद्धट' हा शब्द एकदम आवडला ;)
28 Oct 2010 - 10:51 pm | मेघवेडा
प्रेमपत्रं नाही लिहिलीस का रे कधी? छ्यॅ.. ;)
माया, मस्तच गं! पत्रांप्रति असलेला जिव्हाळा स्पष्ट दिसत आहे. इतक्या सुंदरपणे भावना शब्दबद्ध करण्याचं तुझं कसब अजबच! :) बाकी लिहिलंयस ते एकदम पटेश! :)
27 Oct 2010 - 9:12 pm | असुर
मायातै, क्लास आहे हे सगळं! आवडलं मला!
इकडे आल्यावर पहिल्यांदा राखी आली मला घरुन, तेव्हा काय भारी वाटलं होतं! दोन मिनिटं तर उघडायची पण भिती वाटत होती. असं वाटत होतं की ते पाकीट फोडताना पण त्या पाकीटाला दुखेल की काय! किती वेळ नुसता पहात बसलो होतो मी! वर्षातून एखादं पत्र येतं असं, येताना घाऊक आठवणी बरोबर घेऊन येतं!
--असुर
27 Oct 2010 - 9:17 pm | सुनील
छान मनोगत!
27 Oct 2010 - 9:18 pm | सेरेपी
सुंदर लिहिलं आहेस.
27 Oct 2010 - 9:42 pm | रन्गराव
आज ईमेल , चाट , मोबाईल आणि इतर सोशियल नेटवर्क ह्यांच्यामुळे माणसांमधील अंतर कमी झालं आहे. कशाचीही वाट पहाणे आणि त्यामुळे असणारी उत्सुकता हा भाग थोडा कमी झाला आहे. आपली एखादी व्यक्ती जितकी लांब असेल तितकी तिच्या विषयीची ओढ वाढत जाते. पण आजकाल कोणीच लांब राहीलेले नाही. तंत्रज्ञानाची कमाल!
दहा वीस वर्षांपूर्वी जर तासाला ड्झन ह्या वेगाने पत्रव्यवहार करता आली असत तर त्यांची मजा निघून गेली असती. कमुनिकेशनचा अतिरेक ह्याला जबाबदार असणार.
बाकी मनं जवळ आलीयेत का नाही हे नीटसं सांगता येणार नाही :(
27 Oct 2010 - 10:06 pm | प्राजु
अप्रतिम!!!
27 Oct 2010 - 10:17 pm | बिपिन कार्यकर्ते
हे सावकाश आणि परत परत वाचायचं लेखन आहे.... मस्तच.
28 Oct 2010 - 1:38 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
28 Oct 2010 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>हे सावकाश आणि परत परत वाचायचं लेखन आहे.... मस्तच.
असेच म्हणतो...!
-दिलीप बिरुटे
28 Oct 2010 - 6:03 pm | प्रदीप
बिपीनशी १००% सहमत. सुंदर लिखाण आहे.
27 Oct 2010 - 10:33 pm | शुचि
मलाही परत नीट वाचायचं आहे. सुंदरच गं मितान !
27 Oct 2010 - 10:54 pm | अनामिक
सुरेख मितान.
आजच्या धावत्या जगात तंत्र आणि तंत्रज्ञानाने माणसाला एकमेकांच्या एवढं जवळ आणलंय की आपण पत्र हा प्रकार विसरत चाललो आहोत.
अवांतरः वाचनखूण साठवता आली असती तर किती छान झालं असतं!
27 Oct 2010 - 11:14 pm | पिवळा डांबिस
लेखन आवडलं!
हार्दिक अभिनंदनासाठी हे पत्र!
28 Oct 2010 - 5:59 am | सहज
सुंदर लेख.
28 Oct 2010 - 12:36 am | अर्धवटराव
तुमच्या पर्यटन लेखनासारखच हे मनोगतहि मनाच्या आत कुठेतरी झिरपून गेलं. बिपीन ने म्हटल्याप्रमाणे हे परत परत वाचायचे लेखन आहे.
(वाचक) अर्धवटराव
28 Oct 2010 - 2:36 am | डावखुरा
सविस्तर प्रतिक्रिया द्यय्चीय .
आता झोप येतेय..
जागा राखुन ठेव्तोय..
28 Oct 2010 - 6:00 am | विजुभाऊ
एस एम एस आणि ए मेल ने लेखी पत्राची मजा घालवून टाकलीय.
तरीदेखील लेखी पत्र हा मला आजही एक जपून ठेवावा असा ठेवा वाटतो
28 Oct 2010 - 6:46 am | विंजिनेर
छान लिहिलयंस गं.
स्वत:लाच पत्र लिहायची कल्पना जामच आवडली!
28 Oct 2010 - 8:40 am | ५० फक्त
मितान ताई
खुप सुंदर लिहिलं आहेस. खरंच आज पत्रांची जागा इमेल्नं घेतली आहे आणि इमेल पाहताना सुद्धा तशीच धड्धड जाणवते जी पुर्वी पत्र पाहताना व्हायची.
परंतु -- "माझे मी लग्न ठरवले हे घरात सांगितल्यावर उसळलेला भावनिक कल्लोळ घरातल्या घरात मी-बाबा, बाबा-मी, मी- आई अशी पत्रापत्री होऊन शांत झाला होता. सासूशी झालेले मतभेद पत्राने उलगडले होते, " -- हि वाक्यं थोडिशि ओढुन ताणुन वाटतात.
28 Oct 2010 - 8:46 am | स्पंदना
सुन्दर ग मितान.
मी लिहिलेली पत्र माझ्या घरी अजुन जपुन ठेवली आहेत, काही काही मित्र मैत्रीणी पण असाच उल्लेख करतात.
माझ्याकडे त्यामानाने ख्प कमी पत्रांचा साठा आहे, पण अजुनही एव्हढ्या सार्या शिफ्टींग नंतर ती जशीच्या तश्शी आहेत.
बिका नी म्हंटल्या प्रमाणे लेख परत परत 'रव्ंथ' करत वाचण्याजोगा !!
28 Oct 2010 - 9:12 am | चिंतामणी
किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ?
आजच्या मोबाईल/ईमेलच्या जमान्यात माणसे जवळ आली आहेत/जग जवल आले आहे असे म्हणतात. पण .......
पण आजच्या युगात कोरडेपणा जास्त जाणवतो.
पत्रोत्तराची वाट पाहणे, उत्तराआल्यावर अधाश्यासारखे ते पुन्हा पुन्हा वाचणे. याची मजा आज नाही.
माझे वडील फारच व्यवस्थीत होते या बाबतीत. आलेली पत्रे वाचणे. वाचुन झाल्यावर पत्रोत्तर पाठवणे. पत्रे वर्गिकरण करून ठेवणे. उत्तराचा आराखडा (फानयल करून मग पत्रावर लिहीत असत) पत्राला संदर्भासाठी जोडुन ठेवत.
गेले ते दिन गेले.
28 Oct 2010 - 9:42 am | निखिल देशपांडे
बरेच दिवस झाले कुणाला तरी पत्र लिहुन...
माया मस्त लेख
28 Oct 2010 - 10:16 am | sneharani
मस्त लेख! सूंदर झालाय.
:)
28 Oct 2010 - 11:18 am | चाफेकळी
सुंदर !!
पत्रं-व्यवहाराच्या दिवसांची आठवण करून दिलीत.... पत्रांच्या गावात फेर-फटका मारून आलं पाहिजे खरच!
28 Oct 2010 - 12:58 pm | स्वाती दिनेश
खूप सुरेख लिहिलं आहेस माया,
स्वाती
28 Oct 2010 - 1:16 pm | ढब्बू पैसा
त्या जुन्या दिवसांची आठवण करुन दिलीस जेव्हा शेजारी बसणार्या मैत्रिणीलाही पत्रं लिहिणं व्हायचं!
तू इतकं सुंदर व्यक्त करतेस ना, की ब-याच जणांची लिहिण्याची गरज संपत असेल.
28 Oct 2010 - 5:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर लिखाण, माया!
28 Oct 2010 - 5:28 pm | श्रावण मोडक
सुंदर, लाघवी लेखन.
30 Oct 2010 - 2:55 am | गुंडोपंत
सुंदर लिखाण. आवडलेच. पत्र लिहिण्यात आणि ते टाकण्या आधी एकदा वाचण्यात मजा असते. शिवाय टाकायचे राहून गेले की ता क टाकायला पण मजा येत असे.
असो जुने दिवस आठवले परत. मस्त लिखाण अजून येऊ द्या!
30 Oct 2010 - 1:23 pm | अवलिया
मस्त लेखन... ! :)
30 Oct 2010 - 2:04 pm | जागु
मितान खुप छान लिहीलत तुम्ही.
पुर्वी पोस्ट्मन आला की धावत बाहेर जायचो कोणाच पत्र आलय का ते बघायला. पण हल्ली पोस्ट्मन फक्त बिल आणतो.
माझी नणंद लग्नाच्या उंबरठ्यावर आहे पण अजुनही घरात कोणाशी काय खटकल की त्यांना आपली मत किंवा माफी चिठ्ठी लिहुन व्यक्त करते.
7 Nov 2010 - 12:32 pm | चिगो
खुप सुंदर लिहीलयंत.. लहान असतांना, हॉस्टेलला गेल्यावर आईची आलेली पत्रे पुढे बरीच वर्षं होती जवळ. नंतर गहाळ झाली. भावनांचे आदान-प्रदान करायला अनेक माध्यमं आहेत आता, पण जुने पत्र पुन्हा वाचून हळवं होण्याचा किंवा ते क्षण पुन्हा जगण्याचा आनंद नाहीसा होतोय हे नक्की..
ह्या सुंदर, भावूक लिखाणासाठी धन्यवाद !!
7 Nov 2010 - 9:36 pm | चंबा मुतनाळ
बोटीवरच्या खलाश्याला आणी सीमेवरच्या जवानाला पत्रांचे महत्व जास्तच असते बाकीच्यांपेक्षा!!
बोटीवर काम करताना, जेंव्हा बोट ३०-४० दिवसानी बंदराला लागायची तेंव्हा एजंट बोटीवर आल्यावर कॅप्टनच्या कॅबीन बाहेर खलाश्यांची गर्दी व्हायची. आणी नंतर सुखदु:खाच्या लाटा बोटीवर पसरायच्या!
ह्या काळात काही जण पत्र आले नाही म्हणून व्हॉयलंट पण झालेले बघीतले आहेत मी. हा काळ सॅटेलाईट फोन बोटीवर यायच्या आधीचा आहे. तेंव्हा घरी फोन करायचा म्हणजे रेडिओ टेलिफोनीवरून करायचा नाहीतर बंदराला बोट लागली की किनार्यावरून करायचा. त्यामुळे पत्र हेच मुख्य संपर्काचे साधन असायचे. गेल्या ८-१० वर्षातच परिस्थिती बदलली आहे बोटींवर. आतातर बहुतेक सर्व कंपन्या खलाशांना ई मेल ची सुविधा उपलब्ध करून देताहेत. सॅटेलाईट फोन पण आता बराच स्वस्त झाला आहे. मी देखील सर्व पत्रे अजुन जतन करुन ठेवली आहेत.
8 Nov 2010 - 2:17 pm | राघव
पत्राची महती खरंच तेवढी असली पाहिजे!
मला आठवतं, माझा एक मित्र शाहजहानपूरला नोकरीला लागला. मी तेव्हा नागपूरात होतो. एखाद वर्षं तो होता तिकडे. पण फोनवरच बोलायचो त्यामुळे पत्र लिहिण्याचा कंटाळा. मात्र जॊब निमित्त नागपूरातून बाहेर पडायच्या आधी त्याला मी एक पत्र लिहिलेलं. नंतर साधारण ५-६ दिवसांनी त्याचा फोन आला तेव्हा मी अगोदर त्याचा आवाजच नाही ओळखला इतका तो एक्साईट झाला होता. साधं-सुधं पत्र ते, पण त्याला त्याच्या घराजवळ घेऊन आलं. आज ५ एक वर्ष झालीत पण ते पत्र तो अजूनही सांभाळून ठेवलंय म्हणतो यातच सारं आलं. :)