प्रतीक्षा

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
19 Oct 2010 - 9:28 am

नदीतटावर रात्रभर मी थकलो तुझी पाहुनी वाट
प्रिये तिष्ठत थांबली बघ क्षितीजावर येऊनी पहाट
नभात पाहा खोळंबून राहे चांदण्यांची वरात
अजून थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात

सुगंधास्तव तुझ्या झुरते मुग्ध रातराणी एकांतात
दूर लवलवते तेल घालूनी ज्योत नयनी गवाक्षात
थरथरे पालवी अस्वस्थपणे तरंग उठवुनी डोहात
ताटकळते उभी तशीच ओल्या दवात भिजुनी चिंब रात

जागली तरी तशीच बसली ती पाखरे अजुनी कोटरात
तुझ्या आगमनाची अशी प्रतीक्षा राहिली भरुनी चराचरात
जरी होईल निस्तेज तो दिशा उजळता होऊनी प्रभात
तरी थांबला बघ तुला पाहण्या चंद्रमा अजुनी अंबरात...

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

वाट बघावी तर तुम्ही नगरी , अन अश्या वाट पहाणार्‍याला ती तिष्ठवते?

काय वर्णन आहे, ओळ अन ओळ सुन्दर , एखादी निवडुन फार आवडल म्हणाव अस नाहीच , पुर काव्य अप्रतिम.

चेतन's picture

19 Oct 2010 - 4:24 pm | चेतन

असेच म्हणतो

अवांतरः पूर काव्य अप्रतिम.;)

अतिशय सुंदर कविता ..

नदीतटावर रात्रभर मी थकलो तुझी पाहुनी वाट
प्रिये तिष्ठत थांबली बघ क्षितीजावर येऊनी पहाट
नभात पाहा खोळंबून राहे चांदण्यांची वरात
अजून थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात

जबरदस्त ओळी आहेत या तर ..

सहज's picture

19 Oct 2010 - 1:23 pm | सहज

~~प्रतीक्षा
'प्रतीक्षा' अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचे नाव आहे. श्री अमिताभ बच्चन यांचे पिताश्री डॉ. हरिवंशराय बच्चन हे एक चांगले कवी होते. तश्या चांगल्या कवितांची मला अजुनही प्रतीक्षा आहे. मी वाट बघीन.

~~खुद्द अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटात प्रतिक्षा म्हणजेच वाट बघण्यासंबधी एक गाणे होते. चित्रपट आज का अर्जुन.

रस्ता देखुंगा मै पान की दुकान पे , साडे तीन बजे!
चली आना तू पान की दुकानपे साडे ऊ साडे म, साडे तीन बजे

~~प्रतिक्षा लोणकर एक मराठी अभिनेत्री आहे.

सर्वांचे लाडके (असे ते समजतात)इंद्राजजी पवारसाहेब यांच्या लेखनात ~~ हे चिन्ह जितक्यावेळा आढळले आहे तितक्यावेळा मी ते कधी आयुष्यात वापरले आहे की नाही याबद्दल मी साशंक आहे. इतरांच्या तश्या अनुभवाच्या प्रतिक्षेत आहे.

जास्त वेळ प्रतीक्षा करायला लावू नका.

ऋषिकेश's picture

19 Oct 2010 - 4:31 pm | ऋषिकेश

कविता आवडली
(तरीही हा रात्रीच्या वेळी नदीतिरावर तिची प्रतीक्षा का बरे करत असावा असे वाटले ) ;)

शुचि's picture

19 Oct 2010 - 10:59 pm | शुचि

फारच मस्त आहे कविता. वातावरणनिर्मीती इतकी सुरेख जमली आहे.
माझं लक्ष गेलं ते प्रतीक्षा मधील ती दीर्घ असल्या कारणामुळे म्हटलं कोण इतकं शुद्ध लिहीतय पाहू यात बरं आणि बरं झालं हे पान उघडलं.

प्राजु's picture

20 Oct 2010 - 8:54 am | प्राजु

मस्तच!! खूप छान कविता.

तर्री's picture

20 Oct 2010 - 11:27 pm | तर्री

कोटरात म्हणजे घरट्यामध्ये का ? मला हा एक नवा शब्द कळला .

रेंगाळत फिरणारा कालचाच सांजवात आणि अंबरात अजुन वाट पहाणारा चंद्रमा हया दोन ओळी : खल्लास.
खूप आवडली .

फ्रॅक्चर बंड्या's picture

21 Oct 2010 - 9:21 am | फ्रॅक्चर बंड्या

नभात पाहा खोळंबून राहे चांदण्यांची वरात
अजून थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात

आवडली कविता...

जागु's picture

21 Oct 2010 - 1:16 pm | जागु

सुंदर.

राघव's picture

26 Oct 2010 - 12:41 pm | राघव

"सुहानी रात ढल चुकी.. " ची उगाच आठवण झाली अन् जीव कासावीस झाला.. ;)

क्रान्ति's picture

26 Oct 2010 - 11:02 pm | क्रान्ति

"चलने को अब फ़लक से तारों का कारवां है | ऐसे में तू कहां है"
या ओळी आठवल्या. अतिशय सुरेख चित्रकाव्य!