पण बोलणार नाही...

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
13 Oct 2010 - 11:02 am

द.मा.मिरासदारांची एक 'कोणे एके काळी' नावाची कथा आहे. त्यात एका राजाचे मन जिच्यावर बसले आहे अशा एका सुंदर आणि चतुर स्त्रीचे हृदय जिंकण्यासाठी त्या राजाचा विदूषक त्याची मदत करतो असे कथानक आहे. श्रीमंत नगरशेठची मुलगी असलेली ती ललना राजाच्या बुद्धीची पारख करण्यासाठी जी सांकेतिक कोडी घालते आणि त्यांचा अर्थ लावून तो विदूषक तिच्याच भाषेत तिला कसे संदेश पाठवतो याचं बहारदार वर्णन कथेत आहे. शेवटी ती राजाच्या बुद्धीमत्तेवर भाळून त्याला प्राप्त होते खरी पण जो खरा कर्ताकरविता आहे आणि या सगळ्या प्रकारात ज्याने आपले हृदय तिला अर्पण केले आहे असा तो विदूषक मात्र स्वत:ची पायरी ओळखून वस्तुस्थितीची कधीच वाच्यता करत नाही.
ही कथा मला फार आवडली. मिरासदारांच्या इतर कथांपेक्षा पूर्णपणे वेगळी ही कथा मी या कवितेत मांडायचा प्रयत्न केला आहे.
****************************************************

पण बोलणार नाही.......

देशाटनी एका शहरी प्रासादाच्या प्रांगणी
दिसली त्याला एक ललना फिरताना उपवनी
सिंहकटी ती कांचनगौरी मूर्तिमंत रागिणी
चाफ्याचा दरवळ जिला अशी शुक्राची चांदणी

रत्नखचित गुलाब घेउन सेवक एक धाडिला
चोळित गाल खाउनी एक श्रीमुखात आला
प्रतिमदनसा मगधराज तो चिंताक्रांत झाला
चतुरचोंबड्या कुरुपरांगड्या आणा विदूषकाला

संकेत जाई संकेत येई संवाद संकेतांचा
सांकेतिक जणू खेळ चाले प्रेम पाखरांचा
चातुर्य तिचे पाहून झाला घात विदूषकाचा
जीव जडला हंसिणिवर पाहा कावळ्याचा

लावूनी डोके घेऊनी धोके मोठ्या हिकमतीने
जिंकिले तिचे हृदय त्याने राजाच्या वतीने
राकारजनीस राजभेटीस ती येता गजगतीने
प्रथमदर्शनी भिजल्या नयनी हसला केविलवाणे

चतुरा जरी प्रीत माझी तुजला गमणार नाही
बुद्धीहीन जरी श्रीमान तो सुखे त्यासव राही
जळते मन तन जळते माझे होते लाही लाही
अंतर्यामी आक्रंदतो मी पण बोलणार नाही

(पूर्वप्रकाशित)

शृंगारकरुणप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

कस वाटतय सांगु?

शरदीनी तैंची सावली पडल्या सारख, ते सुरुवातीच नमन काढलत तर अगदी तै!

[विषयानुरुप सुन्दर काव्य, सारर्‍या कथेच प्रतिबिम्ब !!]

एकदम मस्त साहेब ..
छान लिहिले आहे ...

लिहित रहा .. वाचत आहे

जागु's picture

13 Oct 2010 - 4:48 pm | जागु

मस्त.

सुत्रधार's picture

13 Oct 2010 - 5:16 pm | सुत्रधार

लै भारी

पाषाणभेद's picture

13 Oct 2010 - 8:58 pm | पाषाणभेद

प्रतीके अन सौंदर्यप्रचूर भाषेचा योग्य उपयोग केला आहे. एकदम छान. खुपच मेहनत घ्यावी लागली असणार. मिरासदारांनाही पाठवा.

अथांग's picture

14 Oct 2010 - 12:07 am | अथांग

खूप आवडले...