'निर्लज्ज व्हा' च्या ह्या तिसर्या भागात आपण जे काही बघणार आहोत त्याला समर्थपणे तोंड द्यायला किंवा त्यातून निव्वळ निभावून जायला निर्लज्जपणा सोबतच कमालीचा अफाट डांबरटपणा, थोडाफार निगरगट्टपणा आणि कोडगेपण आवश्यक आहे. त्याचं असं आहे की बॉस आणि नोकरी कोणत्याही क्षणी बदलू शकतात. ट्रेनमधे आपण रोज फार फार तर जाऊन-येऊन ३-४ तास घालवतो. पण बायको हा असा विषय आहे की जो भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवून फेस आणतो. मी मी म्हणणारे आणि बाहेर गर्जना करणारे नरसिंह घरात शिरायच्या आधीच आपली नखं आणि दात काढून ठेवतात. आमच्या एका कर्दनकाळ मास्तरांना सकाळी सकाळी केवळ धोतर नेसून कपडे वाळत घालताना पाहून मला बायको हा विषय काही तरी वेगळा आहे ह्याची बालपणीच जाणीव झाली होती. आमचे मास्तर सकाळी सकाळी केवळ धोतर नेसून कपडे वाळत घालत होते ह्यात काही वावगं नाही. पण त्यांची ती कसरत सुरू असताना त्यांची धर्मपत्नी समोर खुर्चीत बसून चहा पित होती हे महत्त्वाचं आहे. लग्न झालेल्या सगळ्याच पुरुषांच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच असं नाही. काही काही बायका मोठ्या मनाने कामवाली बाई ठेवायची परवानगी देतातही. पण ह्या पलिकडेही अनेक मानसीक ताण आहेत. सगळ्यात महत्त्वाचा ताण म्हणजे आपल्याला वेळेवर उठवायचा त्यांचा अट्टाहास.
'घड्याळ हे माणसाने वेळ मोजण्यासाठी तयार केलेलं यंत्र आहे. जगन्नियंता हाताला घड्याळ बांधत नाही. सकाळी ९ वाजून पंधरा मिनिटांनी पॄथ्वी निर्माण करीन. दुपारच्या जेवणानंतर हलकेच वामकुक्षी आटपून साधारण ५ च्या सुमारास माणूसाला जन्म देईन असं ब्रम्हदेवाने ठरवलं नव्हतं.' हे मी बायकोला लक्षवेळा ऐकवूनही ती त्यातून बोध घेत नाही. इतक्या स्ट्राँग अर्ग्युमेंटवर ती 'तू ब्रम्हदेव नाहीस' ह्या एका वाक्यात बोळा फिरवते.
बायकोसोबत आयुष्य काढायचं असल्याने असे कैक समर प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. त्यातले काही आता आपण बघू.
घटना १ - सामान्य दॄष्टीकोन
वेळ - रविवार सकाळी कधीही
पार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायको तुम्हाला उठवायच्या प्रयत्नात आहे.
बायको - ऊठ बघू...
तुम्ही - ५ मिनिटं...
बायको - तो गजर बोंबलून बोंबलून शांत झाला...
तुम्ही - खरंच ५ मिनिटं
बायको - ५ मिनिटं ५ मिनिटं करत करत तास झाला. कितीवेळ झोपायचं ह्याला काही सुमार आहे की नाही. उठ बरं लवकर, मला मदत कर पटापट. किती कामं पडलेयत.
तुम्ही - झोपू दे गं थोडावेळ. आज सुट्टी आहे.
बायको - मलाही सुट्टी आहे, तरी मी उठले ना?
तुम्ही - ह्या आठवड्यात मर मर काम केलंय. दमलोय मी. झोपू दे मला.
(सुजाण नागरीकांनो आणि अजाण बालकांनो, तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी हे वाक्य जर तुम्ही उच्चारलं तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही.)
बायको - काम केलंय म्हणजे? मी काम नाही करत? मी नाही दमत.
तुम्ही - अगं पण...
बायको - तू आपला घरी आलास की बसतोस तंगड्या पसरून. मला ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळावं लागतं.
तुम्ही - मी सुद्धा मधून मधून मदत करतोच की तुला.
बायको - डोंबलाची मदत. शेवटचं काम तू कधी आणि काय केलं होतंस सांग बघू.
(खूप प्रयत्न करूनही आठवत नाही. आठवण्यासाठी मुळात कामं करावी लागतात.)
बायको - नाही ना आठवलं. कसं आठवेल? आठवण्यासाठी मुळात कामं करावी लागतात. जरा इकडची काडी तिकडे करायला नको.
तुम्ही - हे बघ, मला काड्या करायची सवय नाहीये. हॅ हॅ हॅ...
(सुजाण नागरीकांनो आणि अजाण बालकांनो, तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी अशा प्रसंगी विनोदबुद्धीला आवर घातला नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही.)
बायको - फालतू विनोद केलेस तर पातेलं घालीन डोक्यात...
तुम्ही - मान अडकेल अगं तुझी... (विनोद नकोत)
बायको - हे बघ, मी मस्करीच्या मूड मधे अजिबात नाहिये. बायको म्हणजे काय कामवली बाई वाटली तुला? आत्ताच्या आता उठ आणि पटापट मला आवरायला मदत कर.
बायको आपल्याला बळजबरीने खेचून बेडवरून उठवते. रवीवार सकाळ लोळत घालवण्याच्या तुमच्या मनसुब्यांबर पाणी फिरवलं जातं. बेडवरून खेचून उठवण्याव्यतिरिक्त तोच इफेक्ट देणारे काही वेगळे उपायही बायको वापरू शकते - आईला फोन लावून आपल्याशी बोलायला लावणे (ह्याला पाहुण्याच्या काठीने साप मारणे असेही म्हणतात), पंखा बंद करणे, कुकरमधे नुसतंच पाणी घालून शिट्या होऊ देणे आणि सगळ्यात जालीम उपाय म्हणजे रडणे + बट्ट्याबोळ झाला माझ्या आयुष्याचा हे ऐकवणे. ह्या सगळ्याचा शेवट आपल्या मनासारखा व्हावा अशी इच्छा असेल तर उपाय फार सोपा आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
घटना १ - माझा दॄष्टीकोन
वेळ - रविवार सकाळी कधीही
पार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायकोच्या पहिल्या हाकेलाच तुम्ही उठता.
बायको - ऊठा... ८ वाजले.
(तुम्ही ताडकन उठून बसता.)
तुम्ही - अरे यार... इतका वेळ कसा झोपलो? गजर वाजलेलाही समजला नाही. जाग कशी नाही आली मला.
बायको - काय झालं रे?
तुम्ही - काही नाही गं, आज जरा आवराआवरी करायचा विचार होता. पण तू कशाला उठलीस इतक्यात? झोप अगं थोडा वेळ. किती दमतेस आठवडाभर. ऑफिस घर दोन्ही सांभाळता सांभाळता पिट्ट्या पडतो अगदी तुझा.
बायको - असू दे रे, त्यात काय इतकं. सगळ्याच बायका करतात.
तुम्ही - सगळ्यांचं मला माहिती नाही. तू पड जरा. मी पटकन कामं संपवतो. चहा टाकतो आणि तुला उठवतो.
बायको - वेडा आहेस का अरे. खरं म्हणजे तूच झोप थोडावेळ. ह्या आठवड्यात खूपच काम होतं तुला.
तुम्ही - अगं पण...
बायको - माझं होईल आवरून इतक्यात. मग उठवते तुला. मस्त आलं घालून चहा करते.
तुम्ही - बरं. लवकर उठव पण. तू कामं करत असताना लोळत पडणं आवडत नाही मला.
हाय काय अन् नाय काय. द्या ताणून आता सुखाने. जे काम कितीही आदळाअपट केली असती तरी झालं नसतं ते केवळ १ मिनिटाच्या डांबरटपणाने झालं. पण ह्या युक्तिचा उपयोग मर्यादित प्रमाणात करावा. अन्यथा एके दिवशी बायको खरंच कामाला लावेल आणि तुमचा सप्तरंगी पोपट होईल.
(निर्लज्जपणे) पुन्हा क्रमशः
प्रतिक्रिया
12 Oct 2010 - 12:01 pm | आदिजोशी
कुटूंब म्हणजे जग आणि कुटूंबातले प्रश्न म्हणजे जागतिक प्रश्न त्यामुळे कुटूंबामधील उत्तरे हीच जागतिक उत्तरे असा माझा अजिबात समज नाही.
खुलासा २
बायका म्हणजे कजाग आणि नवर्यांना बायकांचा ताप ही जागतिक समस्या त्यामुळे बायकांच्या प्रश्नांवर उत्तरे हीच जागतिक उत्तरे असाही माझा अजिबात समज नाही.
12 Oct 2010 - 12:05 pm | यशोधरा
:D मेल्या!
12 Oct 2010 - 12:25 pm | गांधीवादी
ह्या वेळेस थोडा निराश झालो.
तुम्ही सुचविलेला उपाय हा निर्लज्जपणाचा उपाय खचितच नाही.
थोडक्यात काय, तर सौ. पुढे कोणताच उपाय (दीर्घकाळ) कामी येत नाही.
अनंत* वेळा सप्तरंगी पोपट झालेला.
मी
गांधीवादी नाही, त्या मुखवट्या पलीकडचा , केवळ मी...
------------------------------------------------------------------------------------
* अनंत म्हणजे न मोजता येण्यासारखे. आमच्या अल्पमतीनुसार.
12 Oct 2010 - 12:56 pm | नगरीनिरंजन
अगदी असेच म्हणतो. या वेळचा उपाय हा निर्लज्जपणाच काय साधा डांबरटपणाही वाटत नाहीय. हा उपाय पहिल्यावेळीसुद्धा काम करेल असं खात्रीपुर्वक सांगू शकत नाही. उलट रोगापेक्षा औषध घातक ठरण्याची शक्यता आहे.
मोठ्या आशेने शेवटपर्यंत वाचलं पण अंती निराशा झाली. तुमचे आधीचे निर्लज्जपणाचे उपाय लोकल समस्यांवर असल्याने त्यांचा उपयोग झाला नाही आणि खरोखर जागतिक अशा समस्येवर निर्लज्जपणाचाही उपयोग नाही हे सिद्ध झाले याचे फार दु:ख वाटले.
-((रंग न सांगणारा)पोपट) नगरीनिरंजन
पण तुमचे तिन्ही लेख आवडले. अचूक निरीक्षण आहे आणि अनुभव अगदी बरोबर पकडलेत.
12 Oct 2010 - 12:45 pm | ब्रिटिश टिंग्या
अॅडीभौ रॉक्स!
12 Oct 2010 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या वेळच्या निर्लज्जपणाची मिती (मराठी शब्दः डायमेंशन) वेगळी असल्याचं जाणवलं. तरीही (निर्लज्जपणे) निर्लज्जपणा आवडला असं लिहीत आहे. :-D
12 Oct 2010 - 1:18 pm | आदिजोशी
निर्लज्जपणा अनेकदा सटलपणे वापरावा लागतो. ट्रेनमधल्यासारखा निर्लज्जपणेणा इथे दाखवल्यास बॅगा भरून घराबाहेर पडण्याची सोय केल्यासारखे होईल.
निर्लज्जपणाची ही वेगळी छटा ओळखणार्या आदिती ताईंची अभिनंदन. अर्थात तू जोशी असल्याने हे अपेक्षीतच होतं म्हणा. असो.
आपला,
आदि जोशी
12 Oct 2010 - 1:28 pm | विजुभाऊ
अर्थात तू जोशी असल्याने हे अपेक्षीतच होतं म्हणा
हम्म......
नो कॉमेन्ट्स
बाकी लेख झकास रे.
असा निर्लज्ज पणा करायला नको वाटते रे. हे म्हणजे बायकोच्या निरागसपणाचा गैर फायदा घेतल्यासारखा वाटतो.
12 Oct 2010 - 4:26 pm | धमाल मुलगा
>>बायकोच्या निरागसपणाचा गैर फायदा घेतल्यासारखा वाटतो.
बायको आणि निरागस?
=)) =)) =))
(स्वगतः चला, काडी टाकणेत आली आहे...आता शेकोटी कधी पेटतेय तेव्हढं वाट पहात बसावं.)
12 Oct 2010 - 3:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी अगदी!
तू जोशी असल्यामुळे तुझी अपेक्षा असणार हे माहित होतंच! आणि तुझ्याहीकडून अपेक्षा आहेच, ती म्हणजे निर्लज्जपणाच्या वेगवेगळ्या मित्या दाखवण्याची.
अदिती जोशी
12 Oct 2010 - 10:30 pm | प्रीत-मोहर
कनक्लुजनः सगळे जोशी निर्लज्ज???
13 Oct 2010 - 12:07 am | अडगळ
हा बघा लाजलो . इश्श्य्.
(जोशी केल तोटि केल)अडगळ जोशी.
12 Oct 2010 - 1:04 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!!! मस्तच.
- (एकरंगी)
12 Oct 2010 - 1:08 pm | गणपा
आमचा उपाय. बायको उठवायला आली की तिचा हात धरुन तिलाच.... जाउदे.. गरजुंनी व्यनी करावा ;)
12 Oct 2010 - 1:22 pm | बिपिन कार्यकर्ते
आमचा व्यनि बाय डिफॉल्ट धरत जावा..... आय मीन हात सोडल्यावर धरा पण धरा ब्वॉ!!!
12 Oct 2010 - 1:30 pm | ब्रिटिश टिंग्या
म्हातारचळ!
12 Oct 2010 - 4:35 pm | धमाल मुलगा
गणप्या...
दे टा़ळी! ;)
12 Oct 2010 - 5:52 pm | मृत्युन्जय
वा वा वा गणपाशेठ. व्यनि केल्यास इथे लिहिता न येण्यासारखे काहितरी तुम्ही व्यनि मार्फत सांगणार की काय?
आणि मुळात "गरजु" हा शब्द काळजाला भिडला एकदम.
13 Oct 2010 - 9:40 am | विजुभाऊ
मुळात "गरजु" हा शब्द काळजाला भिडला एकदम.
तो शब्द || गरजू || असा लिहिल्यास काळजाला अधीक भिडेल
13 Oct 2010 - 2:04 pm | मृत्युन्जय
आता ते तुम्ही गणपाशेठला सांगा. काळजाला अजुन भिडवण्याची जबाबदारी त्यांची
13 Oct 2010 - 2:21 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो असे म्हणू नका, तो गणपाशेठ फोन येऊन येऊन त्रस्त होईल. शेवटी विचारेल फोन करणारे ते गरजू तुम्हीच का?
13 Oct 2010 - 4:16 pm | मृत्युन्जय
गणपाशेठ बहुधा गरजवंतांसाठी एक टेप तयार करुन ठेवतील. मी गरजू असे कोणी म्हणले की यांची टेप गरजायला सुरुवात होइल.
गर्जा जयजयकार गणपांचा गर्जा जयजयकार.
15 Oct 2010 - 3:32 am | मिसळभोक्ता
नुकताच "अभिमान" पाहिलात वाटतं ! (त्यासाठी पहाटे उठून दात घासून ठेवावे लागतात ;-)
12 Oct 2010 - 1:31 pm | सूड
तुमचे हे लिखाण वाचून भावी आयुष्यात नक्कीच उपयोग होईलसे वाटते. कारण स्वयंपाक बर्यापैकी येत असल्याने असा सप्तरंगी पोपट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, ते अशा अनुभवी मार्गदर्शनामुळे कमी होतील.
12 Oct 2010 - 1:42 pm | sneharani
मस्त!
वेगळाच वाटला हा निर्लज्जपणा!
12 Oct 2010 - 1:54 pm | गणेशा
आवडला हा निर्लज्जपणा ...
12 Oct 2010 - 4:12 pm | स्वाती२
निर्लज्जपणा आवडला!
12 Oct 2010 - 4:19 pm | सुहास..
आपल्याला बुवा या बाबतीत धम्याने सांगीतलेला ईलाज आवडतो आणी तो मी कटाक्षाने पाळतोही कधी-कधी
बाकीअ अॅडीभौ , तुझा २/३ अंथरुण व्यापण्याचं पुढ काय झाल ? आणी दुसरा प्रश्न वरील प्रसंग जर ऊलट्या बाजुन आला तर काय करावे ?
12 Oct 2010 - 4:39 pm | satish kulkarni
+१
12 Oct 2010 - 6:52 pm | चिरोटा
निर्लज्जपणा आवडला..
बायका असे खरोखरच म्हणतात? ज्यांच्या बायका असे म्हणत असतील ते नवरे (त्यातल्यात्यात)सुखी असावेत.
12 Oct 2010 - 8:00 pm | प्रभो
मस्त रे अॅड्या??
12 Oct 2010 - 8:11 pm | धमाल मुलगा
काळ आणि वेळ: कोणतीही.
बायको: तू सिगरेट सोडणार की नाही?
नवरा : च्चॅक्क... (डोकं पेपरात खुपसुन तसाच मख्खपणे.)
बायको : अरे....शेवटचं विचारतेय, सिगरेट कधी सोडणार तू?
नवरा : पुढच्या जन्मी सोडेन. आणि हो, आत्ताच म्हणालीस शेवटचं विचारतेय, आता ह्या जन्मात प्लिज पुन्हा नको हां विचारूस. (असं म्हणुन नवरा मिपावर कोणा कोणाच्या खरडी आल्या आहेत ते पहायला पळतो.)
12 Oct 2010 - 8:22 pm | गणपा
आमच्यात ह्याला बेडर वा धाससीपणा म्हणतात.. (क्षणिक का असेना ) ;)
15 Oct 2010 - 3:30 am | मिसळभोक्ता
आमच्यात ह्याला स्वप्नरंजन म्हणतात.
12 Oct 2010 - 8:41 pm | मृत्युन्जय
स्वानुभव का धमालशेठ?
12 Oct 2010 - 8:47 pm | पैसा
धमु काय मरायचंय का?
12 Oct 2010 - 9:09 pm | धमाल मुलगा
कर चलें हम फिदां जान-ओ-तन साथियों.....
12 Oct 2010 - 9:17 pm | पैसा
तर ये परत!
12 Oct 2010 - 9:51 pm | धमाल मुलगा
मोडलोय पण वाकलो नाहीये ;)
हा किस्सा वर्षाभरापुर्वीचा आहे. :D
12 Oct 2010 - 10:49 pm | पैसा
खूपच लवकर विसरली तर!
12 Oct 2010 - 8:59 pm | शेखर
धम्या....
ह्या नंतरच्या बायकोने दिवस/आठवडाभर केलेल्या शब्दाशिवायच्या कृती पण लिही.
12 Oct 2010 - 9:08 pm | धमाल मुलगा
ए गप ना शेखरु दादा ;)
12 Oct 2010 - 9:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता कळलं अॅड्या सटल्टीबद्दल का आणि काय म्हणतोय ते! :p
15 Oct 2010 - 3:30 am | मिसळभोक्ता
ह्या नंतरच्या बायकोने दिवस/आठवडाभर केलेल्या शब्दाशिवायच्या कृती पण लिही.
सॉरी, मी "न केलेल्या कृतीबद्दल" असे वाचले.
12 Oct 2010 - 9:05 pm | पैसा
तुमच्या बायकोने हे वाचलंय का?
12 Oct 2010 - 9:06 pm | चतुरंग
तिच्या परवानगीनेच तर लिहितो तो! ;)
(अनुभवी)रंगा
12 Oct 2010 - 9:13 pm | आदिजोशी
तिच्या परवानगीनेच तर लिहितो तो!
छे छे... अहो परवानगी कसली? तिच मला लिहून देते आणि मी इथे टाकतो.
12 Oct 2010 - 9:16 pm | चतुरंग
अच्छा, तू आमच्यापेक्षा एक पायरी पुढे आहेस तर! ;)
रंगाकाका
13 Oct 2010 - 9:48 am | विजुभाऊ
बायको आणि निरागस?
=)) =)) =))
(स्वगतः चला, काडी टाकणेत आली आहे...आता शेकोटी कधी पेटतेय तेव्हढं वाट पहात बसावं.)
धम्या ; असते एखादेवेळेस.
तो निरागसपणा आपण जपायचा असतो. अगदी पुस्तकातले मोरपीस जपतात ना तस्सा.
स्वप्नाना फुले येण्याच्या काळात तर ते जास्त जाणवत. प्रत्येक कणखर मनाच्या मागे एक कोमल अंतःकरण दडलेलं असतं
( म्हणजे काय ते विचारू नकोस. मी सध्या दवणे स्कूलच्याएन्ट्रन्स ची तयारी करतोय. तज्ञानी मार्गदर्शन करा ) ते मोरपीस आपल्या मनातले बालपण जागवते. कधीकाळी मोरपीसाला वाहिलेलं हळदीकुंकू आठवते. उगाच रचलेले जर तर चे इमले आठवतात.
मोरपीस जपायला मोरपीसासारखे भरजरी मन बाणवायला लागतं मग आभाळ खुणावून बोलावत रहाते. फिकुटसा ढग सुद्धा मुसळधार पावसात भिजलेल्या मनाला तरारून आणतो
13 Oct 2010 - 2:09 pm | यशोधरा
विजूभाऊ, काही दिवसांनी दवणे स्वतःच दवणीय ऐकायला तुमच्या पाऊलांशी बसतील! नक्कीच! :D
15 Oct 2010 - 3:29 am | मिसळभोक्ता
खांडेकर गेले, व पु गेले, विजुभाऊंच्या तब्येतीची काळजी वाटते.
13 Oct 2010 - 5:40 pm | धमाल मुलगा
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग.....
भाऊ, आवरा!
च्यायला, ह्यांच्या अंगात एक काय लेखक संचारतात कोण जाणे. (लै दिवसात जी.ए. नाही झालात भौ?)
13 Oct 2010 - 7:30 pm | अनिल हटेला
सै जमलाये हा भाग !!
:-)
13 Oct 2010 - 7:41 pm | राजेश घासकडवी
विनोद नकोत म्हटलेले प्रसंगनिष्ठ विनोद आवडले. मांडणी छान आहे, संवाद नैसर्गिक आहेत.
वपुंचं एक कॅरेक्टर होतं. तो गडी आपल्याला काही झेपत नाही असं दाखवायचा. दोनचार कामांमध्ये घोळ घालून ठेवला, तेव्हापासून बायकोच म्हणायला लागली, तुम्ही काही करू नका, उगाच दुप्पट काम करून ठेवाल. मग हा माणूस आरामात तिच्यावर उपकार केल्यासारखा पेपर वाचत (थोडासा ओशाळवाणा चेहेरा करून, अर्थातच) बसायचा.
ती युक्ती मला या लेखातल्या युक्तीपेक्षा अधिक आवडली.
10 Jun 2016 - 2:42 pm | शाम भागवत
तुम्हाला युक्ति आवडली की नाही ते राहू द्या.
तुम्ही ती वापरून पाहिली का ते सांगा.
:-))
धागा वर काढण्यासाठी
10 Jun 2016 - 2:58 pm | बाळ सप्रे
हॅहॅहॅहॅ
ही प्रतिभा म्हणायची की अनुभवाचे बोल :-)
काहीही म्हटलं तरी कहर आहे