टेकडीच्या माथ्यावर

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जनातलं, मनातलं
6 Oct 2010 - 11:58 am

मी महात्मा सोसायटीच्या मागच्या टेकडीवर व्यायामाच्या निमित्ताने फिरायला जात असे. हल्लीही जातो पण दोन वर्षापूर्वी जसा सलग दोन वर्षे नित्यनियमाने जात असे तसे आता काही राहीले नाही. पण अजूनही टेकडीवर कधी गेलोच तर पूर्वीचाच ताजवा जाणवतो. टेकडीवरच्या कितीक मजेशीर आणि अन्य प्रसंगामुळे टेकडीवर फिरायला जाणे हि कल्पना दिवाळीच्या सणाइतकी मनाला प्रसन्नता देणारी असते.

पश्चिम ते पूर्व असा विस्तार असणार्‍या ह्या टेकडीचे एक टोक पश्चिमेकडे मुंबै-बंगळूर हायवेकडे तर पूर्वेचे गांधीभवन-डहाणूकर कॉलनी भागाला वळसा घालून कर्व्यांच्या कॉलेजकडे उतरते. टेकडीवर मी पश्चिमेच्या दिशेने न जाता पूर्वेच्या दिशेने जातो. बर्‍यापैकी गवत असलेल्या ह्या टेकडीवर कधीकाळी एक स्टोन क्वारीदेखील होती. स्टोन क्वारीमुळे दोन मोठ्ठे खड्डे तयार झालेले आहेत आणि ट्र्कच्या चाकांमुळे रस्ताच तयार झाला आहे. दोनपैकी एका खड्ड्यात भरपूर पाणी साठंत गेल्यामुळे त्याचे कायमस्वरुपी तळे तयार झाले आहे. आतल्या काठावर मध्यम उंचीची झाडे तर तळ्यात पाणवनस्पती, प्राणी, पक्षी ह्यांचे छोटे विश्वही निर्माण झाले आहे. जांभळटसर गुलाबी आणि पांढर्‍या रंगाची मध्यम आकाराची किमान चार कमळे तरी पावसाळ्यानंतर दररोज फुललेली असतात. चक्क चार नदीसुरय तळ्यात तळ ठोकून आहेत. तळ्यातल्या पाणवनस्पतीत कमळवेलीसोबत वेताची लव्हाळेदेखील आहेत. तळ्यात छोटे मासे अगणित आहेत त्यामुळे तळ्याच्या आतल्या काठावर असलेल्या झाडांच्या फांदीवर एकतरी खंड्या हमखास दिसतोच. अजून अजून पूर्वेकडे जाताना वाटेत स्मृतीवन नावाची टेकडीवरची बाग लागते. आपल्या लाडक्या दिवंगत नातेवाईकाच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे अनेक लोकांनी झाडे लावली आहेत. त्यात कांचन, बहावा, नीलमोहर, गुलमोहर, रेनट्री आणि इतर अनेक प्रकारची झाडे आहेत. बर्‍याचश्या झाडांवर मृत व्यक्तीचे नांव आणि त्याखाली त्याचा मृत्युदिनांक लिहीलेल्या पाट्या लावलेल्या आहेत. टेकडीवर पुणे महानगरपालिकेची एक पाण्याची टाकीदेखील आहे. ठळकपणे सांगता येईल एवढाच काय तो ऐवज टेकडीवर आहे.

टेकडीवर फिरायला जाण्यामुळे आमचा चौघांचा ग्रुप तयार झाला. मी आणि माझे सहकारी मित्र श्री.घाणेकर (मी त्यांना घाणेकरमामा म्हणतो) आम्ही दोघेतर अगोदरपासूनच बरोबरच जात असू, पण त्यात नंतर जोरीबुवा आणि श्री.प्रभुदेसाई ह्यांची एका मजेशीर योगाने भर पडली. तो योग असा.

मी आणि घाणेकरमामा सकाळी ५.४५ला टेकडीवर फिरायला निघालो. टेकडी चढून माथ्यावर आलो आणि नेहमीच्या पायवाटेने गप्पा मारंत चालायला लागलो. थोडं अंतर गेल्यावर उजवीकडे एक वयस्कर गृहस्थ उताणे पडलेले दिसले. अजिबात हालचाल नाही. चेहरा शांत, डोळे मिटलेले, दोन्ही हात फैलावलेले. अंगात कॉटनचा निळा हाफ शर्ट आणि कॉटनची खाकी हाफ चड्डी. पायात चामड्याच्या जुन्या चपला. माझं व मामांचं दोघांचही एकदम तिकडं लक्ष गेलं आणि एकमेकाकडे पाहून हसलो त्यावर मामा एवढंच म्हणाले "शवासन". आम्ही तसेच पुढे निघून गेलो.

नंतरच्या सुमारे अर्ध्या तासाच्या चालीनंतर आम्ही परत आल्यावरसुध्दा ते गृहस्थ तसेच पडलेले दिसले. मग मात्र वेगळीच शंका यायला लागली. आम्ही तिथेच थांबून निरीक्षण करायला लागलो. तोवर तिथे अजून दोन फिरायला आलेली माणसंसुध्दा आलेली होती. त्यापैकी एक ४०-४५ वर्षाचा, टिपिकल मध्यमवर्गीय. त्याच्या हातात साखळीला बांधलेलं पामेरीयन जातीचं कुत्रं होतं. तर दुसरा जरा हाडापेराने मजबूत, पोट पुढं आलेलं, गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर बुक्का लावलेला असा.
मी त्यांच्याकडे पहात म्हणालो "आम्ही अर्ध्या तासापूर्वी पाहीलं तेव्हा हे गृहस्थ असेच पडलेले होते".
बुक्कावाला म्हणाला " हा ना राव, मगापासून ह्ये आसंच पडलेलंय"
घाणेकरमामा म्हणाला " आयला, मला वाटंल हा शवासनच करतोय"
बुक्क्यानं विचारलं "कसलं आसन?"
मामा " तुम्हाला नसेल माहीती ते आसन. एकटयानंच करायचं असतं".
मला मामाच्या ह्या बोलण्याचं जाम हसू आलं, पण मी ते आवरलं.
कुत्रेवाला म्हणाला " व्यायाम करताना काही प्रॉब्लेम झाला कि काय कोण जाणे"
सगळ्यांना आलेली शंका एकच होती. म्हातारा बेशुध्द पडला कि खपला.
बुक्का म्हणाला " आसं करा, त्येचा खिचा तपासा, मोबाईल आसंल तर संमंधिताला कळवा कि ह्ये ग्रुहस्त इथे आहेत म्हनाव्".
कुत्रेवाला म्हणाला "अगोदर छातीला कानतर लावून बघा, मग फोन करा हवंतर"
मामा छातीला कान लावण्यासाठी वाकतात न वाकतात तोच त्या माणसानं खाडकन डोळे उघडले.
"शवासन करंत होतो मी" थोड्या घुश्श्यानच त्यानं सांगितलं.
मी म्हटंल "एवढा वेळ ?"
"त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय" तो म्हणाला.
बुक्का एकदम चिडला "ओ नाना, आमाला वाटंल बेशुध पडला कि काय तुमी, म्हनून बघत होतो. मरं ना कां जायना तुमी तिकडं. आमाला काय घेनंय".
त्यावर तो गृहस्थ वरमला आणि हसंत म्हणाला "पाऊणतास शवासन केल्यावर उत्तम रिझल्टस मिळतात"
मामा खवचटपणे म्हणाला "उत्तमच काय.. तुम्ही सर्वोत्तम करायला पाहीजे होतं, अनायसे चारजण मिळालेच होते. टेकडीचा पायथा इथून फक्त अर्धा किलोमीटर आहे, तुम्ही तसे फार जड नाही आम्हाला".
आता मात्र ते गृहस्थ संतापून आमच्याकडे बघू लागले.
बुक्का हसायला लागला त्यानी मामांना टाळी दिली.
कुत्रेवाला खी..खी.. हसंत निघून गेला.
मी मामांच्या शर्टाची बाही खेचून त्यांना चल म्हणून खुणावलं.
आम्ही सगळे तिथून निघून गेलो.

क्रमशः

समाजजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

6 Oct 2010 - 12:04 pm | विजुभाऊ

छातीला कन लावण्ञापेक्षा नाकाला सूत लावून पहायचे होते ना

श्रावण मोडक's picture

6 Oct 2010 - 12:05 pm | श्रावण मोडक

पुढे?

दत्ता काळे's picture

6 Oct 2010 - 12:11 pm | दत्ता काळे

लवकरच पुढचा भाग येतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2010 - 12:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढे?

तो माणूस कुठल्याशा कालिजात मॅनेजमेंटचे धडे देणारा होता का?

तो माणूस कुठल्याशा कालिजात मॅनेजमेंटचे धडे देणारा होता का?
=)) =))
=))
तो तसा असता तर टेकडीवर सकाळी न येता मध्यरात्री जास्त झाली म्हणून टेकडीवर तसाच राहिलेला असता.
नान्न्या तु म्हणजे अगदीच हा झालायस आजकाल . असले गौप्यस्फोट करायचे नस्तात

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Oct 2010 - 12:26 pm | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2010 - 12:44 pm | बिपिन कार्यकर्ते

लिहा पटकन.

यशवंतकुलकर्णी's picture

6 Oct 2010 - 12:56 pm | यशवंतकुलकर्णी

मेलो..मेलो...ह.ह.पु.वा.!!!!!!

=) ) =) ) =) ) =) )
खी:खी:खी:खी:

स्वैर परी's picture

6 Oct 2010 - 2:23 pm | स्वैर परी

पुढची कथा येउ दे भरभर!!! :)

कुत्रा होता ना बरोबर त्याला पुढ करायच सोडुन तुम्ही शिव्या खायला कशाला गेलात राव!

ह. ह. पु.वा.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2010 - 5:30 pm | प्रकाश घाटपांडे

मागच्या वर्षी मर्डर झालेल प्रेत मी तिथच पाहिल होत सकाळी सकाळी! स्मृतिवन च्या बाजुने वर डोंगरावर गेल्यावर.

पुष्करिणी's picture

6 Oct 2010 - 9:31 pm | पुष्करिणी

भूताची गोष्ट? पुढील भागाच्या प्रतिक्षेत

धमाल मुलगा's picture

6 Oct 2010 - 9:39 pm | धमाल मुलगा

दत्ताकाका,
मस्त लिहिताव हां :)

पुढच्या भागाची वाट पाहतोय!

शुचि's picture

6 Oct 2010 - 10:28 pm | शुचि

आवडलं वर्णन.

हा भाग आवडला. पुढे लिहा लवकर. :)